Categories
वेचक-वेधक

जन्मदात्रीला घरातच पुरलेराधानगरी तालुक्यातील प्रकार

मार्च - २०११

घुडेवाडी(ता.राधानगरी, जि.कोल्हापूर) येथे जन्मदात्रीला घरातच पुरल्याची घटना उघडकीस आली. घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे. हा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या छड्यामुळे उघडकीस आला आहे. घटनेतील मातेचे नाव श्रीमती भागूबाई महादेव बुगडे(वय 85 वर्षे) असे आहे. दरम्यान, या प्रकरणी राधानगरी पोलिस घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत होते. आईचा मृत्यू झाल्यानंतर तिला पुरले, की जिवंत गाडले याबाबत नेमकी माहिती मिळाली नाही. श्रीमती बुगडे यांचा मुलगा बाबूराव अध्यात्मिक वृत्तीचा असल्याचे सांगण्यात येते. त्याने पत्नीसह घरातच दीड बाय दीडचा खड्डा खणून त्यात आईला पुरल्याचे पोलिसांना सांगितले. भागूबाई हिला दोन मुलगे व मुलगी असून, यापैकी मोठा मुलगा शिवाजी विभक्त असून मुलगी आक्काताई विवाहित आहे. बहीण-भावांना व नातेवाईकांना न सांगता बाबूरावने केवळ अध्यात्मिक वेडामुळे आईला घरातच पुरले. काही दिवसांनी गावात कुजबूज सुरू झाली. त्याआधारे राधानगरीचे हवालदार मधुकर पाटील यांनी वर्दी दिल्यानंतर पोलिस निरीक्षक एस.एस.वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.व्ही.देसाई, रावसाहेब केसकर, अजित देसाई, दिनकर पाटील, एन.के.रजपूत यांनी घटनास्थळी पाहणी केली.

            बाबूरावकडे चौकशी केली असता त्याने आईला पुरल्याची जागा दाखविली. आईचा मृत्यू झाल्यानंतर कुणाला सांगू नकोस, कारण हे समजल्यावर माणसे रडतील, असा देवाचा दृष्टांत झाल्यामुळे कुणालाही न सांगता आपण मातेला घरातच दफन केल्याचे सांगितले. मृत भागूबाईचा मृतदेह  सायंकाळी बाहेर काढला. नायब तहसीलदार अनिता देशमुख यांच्या समक्ष पंचनामा झाला. तपास राधानगरीचे पोलिस निरीक्षक एस.एस.वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.व्ही.देसाई, एन.के.रजपूत, रावसाहेब कसेकर, दिनकर पाटील, अजित देसाई करत आहेत.

भावना कुलकर्णी,  कोल्हापूर