पत्रिका म्हणजे आपल्या जन्मावेळी मंगळ, गुरू, शनि इत्यादी ग्रह कोणत्या राशीमध्ये होते, हे सांगणारा नकाशा असतो. पत्रिका काही ठराविक मर्यादेपर्यंत वैज्ञानिक माहितीवर आधारलेली आहे; परंतु तिच्यावरून भविष्य सांगणे, हे मात्र अवैज्ञानिक आहे. पत्रिकेमध्ये अनेक चुकीच्या गोष्टींचे मिश्रण आहे. पत्रिकेमध्ये मध्यभागी पृथ्वी आहे आणि तिच्याभोवती विश्व फिरते ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे, हे सोळाव्या शतकात सिद्ध होऊनसुद्धा आम्ही बदललो नाही. हेच पंचांगकर्त्यांचे ‘खोटे; पण रेटून बोलण्याचे’ यशाचे गमक आहे.
मध्यभागी पृथ्वी आणि सभोवती बारा घरे असलेली चौकोनी आकृती म्हणजे पत्रिका. घरांची स्थाने प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ… ते द्वादश अशी दर्शवलेली आहेत. पत्रिकेतील स्थानांना फार महत्त्व आहे. अर्थात भटजीच्या दृष्टीने. स्थानांच्या क्रमांकाची सुरुवात अशीच का, हे विचारायचे नाही. कारण धार्मिक चिकित्सेला अजिबात वाव नसतो. स्थानांची नावे कुंडलीमध्ये लिहिलेली नसतात. कारण हा त्यांचा ‘छुपा अजेंडा’ आहे आणि ‘छुपा अजेंडा’ नेहमीच घातक असतो, हे आपण समजून घेण्याची गरज आहे.
कुंडलीमध्ये आडव्या-तिडव्या रेषा मारण्यापेक्षा सरळ बारा चौकोन केले असते, तर सोपे झाले असते. बहुजनांना समजले असते! पण खरी मेख तर इथेच आहे. बहुजनांना पत्रिका कशी बनवतात हे समजले तर पंचांगावरची विशिष्ट वर्गाची मक्तेदारी संपली असती. म्हणून धर्माने आणि संस्कृतीने जाणीवपूर्वक सोप्या गोष्टी अवघड करून ठेवल्या. आजचे पंचांग जेमतेम शंभर पानांचे; पण पाचशे पानांचे वैज्ञानिक अथवा इतर साहित्यिक पुस्तके लिहिणार्याला अथवा वाचणार्यालाही ते समजू नये अशीच त्याची रचना असते. हे एक भारतीय आश्चर्यच! पंचांगाच्या नादाला इतरांनी न लागण्याची सामाजिक व्यवस्थाच निर्माण केलेली असल्यामुळे हे घडतं. व्यक्तीची पत्रिका मांडताना व्यक्तीच्या जन्मावेळी पूर्व दिशेला जी रास उगवत असते, त्या राशीचा अनुक्रमांक प्रथम स्थानात लिहितात. पुन्हा असेच का? म्हणून प्रश्न विचारायचा नाही. त्यांनी जे ठरवले ते अंतिम. पत्रिकेमध्ये 1 ते 12 आकडे हे राशींचे अनुक्रमांक आहेत. आकड्यांपेक्षा राशींची नावे लिहिण्यास अडचण नव्हती. पत्रिका न समजण्यासाठी केलेले हे आणखी एक प्रयोजन. खाली दिलेली दीपालीची पत्रिका समजून घेऊ.(सोबतची पत्रिका पहा.)
दीपालीच्या जन्मावेळी पूर्वेला चार नंबरची कर्क रास उगवत होती. छोट्या अक्षरांच्या रुपामध्ये लिहिलेली ही अक्षरे ही ग्रहांची नावे आहेत. ग्रहांचे नाव पूर्ण लिहिलेले नसते. आपण त्या अक्षराने सुरू होणार्या ग्रहाचे नाव ओळखायचे असते.
मं : मंगळ, र : रवी (सूर्य), रा : राहू, के : केतू
शु : शुक्र, गु : गुरू, प्लु : प्लुटो, बु : बुध
ने : नेपच्यून, श : शनी, ह : हर्शल (युरेनस), चं : चंद्र
वरील पत्रिकेनुसार चौथ्या क्रमांकाच्या कर्क राशीमध्ये रवी, चंद्र आणि शनि होता. तिसर्या क्रमांकाच्या मिथुन राशीमध्ये बुध आणि शुक्र होते, तर सातव्या क्रमांकाच्या तूळ राशीमध्ये मंगळ आणि गुरू ठाण मांडून बसले होते. जणू काय सर्व ग्रह यांना विचारूनच घर ठरवत असतात. असो, अशा पद्धतीने व्यक्तीची जन्मपत्रिका तयार होते. ही पत्रिका लग्नाच्यावेळी अत्यंत उपयुक्त असते. कारण या पत्रिकेवरूनच कडक मंगळ, कालसर्पयोग काढता येतो आणि व्यक्तीला अडकवून ठेवता येतं. म्हणूनच या जन्मपत्रिकेला लग्नपत्रिकासुद्धा म्हणतात. पत्रिकेचं एक वैशिष्ट्य म्हणजे व्यक्ती ज्या पृथ्वी ग्रहावर राहत आहे, ती पृथ्वी मात्र कुंडलीमध्ये कुठेही नसते. जी पृथ्वी व्यक्तीला जन्म देते, तीच पालनपोषण करते, तिचं भविष्य घडवते, अशा पृथ्वीला यांच्या लेखी काहीच किंमत नाही. मग आपण अशा पत्रिकेच्या माध्यमातून आपलं वैवाहिक जीवन घडवायला जायचं का? याचा विचार मात्र केलाच पाहिजे. चंद्र ज्या राशीमध्ये असेल ती संबंधित व्यक्तीची रास असते. त्यामुळे दीपालीची कर्क रास आहे.
पंचांगकर्त्यांना राहू, केतू हे ग्रह वाटतात; परंतु ते ग्रह नसून आकाशातील काल्पनिक छेदनबिंदू आहेत. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा जिचे छेदतात, त्या छेदनबिंदूंना पंचांगकर्तेराहू आणि केतू अर्थात राक्षस संबोधतात. पंचांगकर्तेस्वत:ला देव समजतात. त्यामुळे त्यांना विरोध करणार्यांना ते राक्षसच संबोधणार हे ओघाने आलेच. त्यांना काय म्हणायचे आहे, हा त्यांचा प्रश्न आहे; परंतु ते बिंदू फार घातक आहेत, ही भीती निर्माण करणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नव्हे. राहू आणि केतू हे नेहमी सहा घरांचे अंतर राखून असतात. कारण ते एकमेकांपासून 180 अंशावर असतात.
पंचांगवाले युरेनस ग्रहाला हर्शल म्हणतात. युरेनसचा शोध विल्यम हर्शलने लावला म्हणून नव्हे, तर हर्शल नाव भारतीय वाटते म्हणून युरेनसला हर्शल म्हणतात. नावात काय आहे, असे म्हणणार्यांना याचे काहीच वाटणार नाही; परंतु सामाजिक आणि सांस्कृतिक अभ्यासकांना नावबदलाचा हेतू समजून येण्यास वेळ लागणार नाही. प्लुटोचं ग्रहपद 2006 साली आंतरराष्ट्रीय खगोलविज्ञान परिषदेने काढून घेतलेले आहे. त्याला आता बटू किंवा खुजा ग्रह म्हणतात; परंतु आजतागायत पत्रिकावाल्यांनी पत्रिकेमधून प्लुटो काढलेला नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट युरेनस, नेपच्युन आणि प्लुटो हे उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत; ते दुर्बिणीतूनच पाहावे लागतात. दुर्बिणीतून शोधल्यानंतरच ते पत्रिकेत आले. दुर्बिणीचा शोध विज्ञानाने, हॅन्स लिपरशेच्या मदतीने 1608 मध्ये लावला. त्यामुळे कोण कोणावर अवलंबून आहे, हे सुज्ञास समजण्यात अडचण येऊ नये. पत्रिकेच्या या चौकोनाकृती नक्षीवरून वेगवेगळ्या प्रकारचे योग, दोष, गुणमीलन, घातवार निश्चित केले जातात. प्रत्येक योगाची वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा करणे याप्रसंगी उचित ठरेल.