Categories
ज्योतिष

जंत्री : पत्रिकेतील दोष आणि योगांची

मे - २०१९

छत्तीस गुणांची जुळवाजुळव करण्यापूर्वी पत्रिकेच्या माध्यमातून दोष आणि योगांची खातरजमा केली जाते. दोष आणि योगविरहित पत्रिका असतील, तरच गुणांच्या जुळणीत गुरुजी पडतात. चुकून काही दोष किंवा योग सापडलेच, तर शांतीचा पर्याय गुरुजींकडे असतोच. कारण सहजासहजी आलेलं गिर्‍हाईक हातचं सोडून कसं चालेल? पत्रिकेतील अशाच काही दोषांची आणि योगांची त्यांची मांडणी समजावून घेऊ आणि आपलं डोकं वापरू.

मंगळदोष

जन्मकुंडलीत प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम, द्वादश यापैकी कोणत्याही स्थानात मंगळ आला, तर कडक मंगळ असा शेरा पंचांगवाले मारतात. व्यक्तीच्या आयुष्यात अनंत अडचणी निर्माण करणारा आणि प्रगतीला मारक ठरणारा दोष पंचांगकर्त्याचा की मंगळाचा? कुंडलीतील एकूण बारा घरांपैकी वरील पाच घरांमध्ये मंगळ येण्याची शक्यता जवळपास पन्नास टक्के आहे; पण केवळ त्या घरात आला म्हणून तो व्यक्तीमध्ये काही दोष निर्माण करतो, यावर विश्वास कसा ठेवायचा? चिकित्सकपणे विचार केला, तर मंगळाने केवळ तीच घरे का निवडली, याला काही आधार? अर्थात, ही घरे काही मंगळाने स्वत: निवडलेली नाहीत. ती पंचांगकर्त्यांची ‘कर्तबगारी.’ कोणताही ग्रह व्यक्तीमध्ये दोष निर्माण करायला मोकळा आहे का? मुळात ग्रहांना भावना, विचार स्वातंत्र्य नाही, हे आजही एकविसाव्या शतकात सांगावे लागते, हेच मोठे दुर्दैव आहे.

कडक मंगळ असेल आणि लग्न करण्याची इच्छाच असेल, तर पुरोहित वर्ग काही मार्ग सांगतात. यात या वर्गाचा आर्थिक फायदा दडलेला असतो. मुलाला मंगळ असेल, तर मात्र शांती केली की, मंगळदोष नाहीसा होतो; पण मुलीच्या बाबतीत मंगळ शांत होत नाही. पृथ्वीपासून साडेसात कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगळाला कसे कळत असेल की, पुरोहिताने आपली शांती केली की, आपण आता शांत बसावे. पंचांगवालेच जाणोत! कडक मंगळ असणारा मुलगा शांती केल्यानंतर कुठल्याही मुलीशी लग्न करू शकतो; पण कडक मंगळ असलेल्या मुलीला ही मुभा नाही. तिला फक्त कडक मंगळवालाच मुलगा चालतो; अन्यथा विरोधात जाऊन लग्न केल्यास अपत्यसुख नाही, असं यांचं भाष्य; मग माणूस म्हणतो की, ज्या सुखासाठी लग्न करायला निघालो, ते सुख नसेल, तर कशाला रिस्क घ्या. तेव्हा शिकणारे जास्त धोका पत्करायला नको म्हणून विरोध करणे टाळतात. अपत्यनिर्मिती मंगळामुळेच होते, हे जाहीरपणे मान्य करत तुकारामांच्या “नवसे कन्यापुत्र होती। तरी का करणे लागे पती॥” या अभंगावर अक्षरश: बोळा फिरवतात. कडक मंगळ असलेल्या दीपालीची पत्रिका सोबतच्या चित्रात दिलेली आहे.

दीपालीच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानी मंगळ आलेला असल्यामुळे दीपालीला कडक मंगळ आहे, असा शेरा गुरुजी मारतात. एक मात्र निश्चित की, कडक मंगळ आहे म्हणून मुलाचे पालक लग्नास नकार देतात. ज्यांना लग्न करायचे आहे, त्यांना पसंत-नापसंतीचा अधिकार आमच्या ‘महान’ संस्कृतीने दिलेला नाही. किती ‘महान’ संस्कृतीचे वारसदार आहोत आम्ही! कडक मंगळ कसा? याची यत्किंचितही माहिती पालक अथवा वधू-वर यापैकी कोणालाही नसते. माहीत करून घेण्याचे कष्टही ते घेत नाहीत. हा सगळा ‘व्यवहार’ पंचांगवाले, भटजी किंवा पुरोहितांवर अवलंबून असतो. त्यामुळे भटजी सांगेल ते कर्मकांड करणे भाग पडते. डोके गहाण ठेवण्याचाच हा प्रकार. पंचांगामधील अनेक योग अथवा दोष बघितले, तर ते महिलावर्गावर अधिक अन्याय करणारे आहेत; पण संस्कृतीच्या नावाखाली महिलावर्गच केवळ अज्ञानापोटी ते टिकवून ठेवत आहे, असे खेदाने म्हणावे लागते. अर्थात, पुरुषप्रधान संस्कृतीमुळे हे करावे लागते, हे पण तितकेच खरे आहे. मंगळदोष दूर करण्यासाठी शांती करावी लागते आणि त्यासाठी ब्राह्मणाची आवश्यकता असते. पृथ्वीवरील भारतातल्या एखाद्या गावात ब्राह्मणाने आपली शांती केलेली आहे, हे मंगळाला कसे कळत असणार? त्या दोघांचा काही मोबाईल अथवा मेल संपर्क होतो काय? का व्हॉट्स अ‍ॅपवरून मेसेज येतो? येत असलाच तर भटजी ‘महान’च म्हणायला पाहिजे. अर्थात विचार केला तरच असे प्रश्न पडतात.

कडक मंगळाच्या बाबतीत आणखी काही धोरणात्मक निर्णय पंचांगवाल्यांनी घेतलेले आहेत. राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती होते. त्याप्रमाणे अधून-मधून ही घटनादुरुस्ती पंचांगवाले आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पंचांगामध्ये करत असतात. मुलगा आणि मुलगी दोघांच्याही कुंडल्यांमध्ये कडक मंगळ असेल, तर विवाह जमवण्यास हरकत नाही; फक्त त्यासाठी एक अट पूर्ण व्हावी लागते. एकाच्या कुंडलीत मंगळदोष असून जर दुसर्‍याच्या कुंडलीत प्रथम, चतुर्थ, पंचम, सप्तम, अष्टम, दशम, द्वादश यापैकी कोणत्याही स्थानी शनि असेल, तर मंगळदोषाचा परिहार होतो. काय भन्नाट कल्पना आहे! एकाचा कडकपणा घालवण्यासाठी दुसर्‍याचा उपयोग! पंचांगवाले कोणाचा कसा वापर करून घेतील, याचा अजिबात नेम नाही. शनिला जर हे कळले की, मंगळाला शांत करण्यासाठी माझा उपयोग करतात, तर तो गप्प बसेल काय? मुख्य म्हणजे पंचांगवाल्यांनी शनिची यासंदर्भात पूर्वपरवानगी घेतली आहे का? आपल्या मर्जीनुसार ग्रहांना वापरून घेणे हे संस्कृतीचे गोडवे गाणार्‍यांना शोभत नाही.

आर्थिक फायदा करून घेण्यासाठी असली अतार्किक आकडेमोड सांगितली की, सर्वसामान्यांना काही कळत नाही. त्यांना फक्त लग्न जुळवून आणायचे असते, एवढेच. मंगळ हा पापग्रह असून अनिष्ट असता, नुकसानकारक आणि इष्ट असता राजवैभवासारखे अधिकार व्यक्तीस देतो, असे ज्योतिषवाले सांगतात. याची चिकित्सा करण्यासाठी फार डोके लढवण्याची गरज नाही. शालेय जीवनातील अभ्यासाच्या आधारेसुद्धा ते करता येते. मंगळ हा ग्रह सूर्यापासून जवळपास तेवीस कोटी किलोमीटर अंतरावर आहे. या ग्रहाला भावना, दृष्टी नाही. त्याला सूर्याचा प्रकाश मिळतो आणि तिथून परावर्तित होऊन पृथ्वीवर येतो. त्यामुळे तो सायंकाळी तांबड्या रंगाच्या चांदणीच्या स्वरुपात दिसतो. चांदणीसारखा दिसणारा मंगळ व्यक्तीला ओळखू शकेल काय? मंगळाला जर काही करता येत असेत, तर मंगळावर पाठवलेले ‘पाथ फायंडर’ यान मंगळाने स्वत:वर उतरू कसे दिले? हा प्रश्न उरतो आणि भारताचे मंगळयान मंगळाने स्वत:भोवती फिरूच कसे दिले?

कालसर्पयोग

महान नेत्यांनी आणि चित्रपट कलाकारांनी अडचणीच्यावेळी धसका घेतलेला; तसेच लग्नात अडथळा ठरणारा हा योग. कालसर्पयोगाच्या निर्मात्याने नाव पण वेचकच निवडलेले आहे. ज्याला मानवप्राणी जास्त भितो तो साप आणि त्यात काल; मग विधी करण्यास विलंब लावण्याचे व्यक्तीचे धाडस होईल का? कालसर्पयोग बाधित व्यक्तीचे लग्न ठरण्यामध्ये अडचण येत असल्यामुळे, यातून सुटका करण्यासाठी तो नारायण नागबली विधीच्या मागे लागतो.

कालसर्पयोग आहे असे सांगितल्यानंतर व्यक्ती हा योग कसा असतो, हे विचारण्यापेक्षा तो निवारण्यासाठी काय केले पाहिजे, याची विचारपूस करते. एड्सग्रस्तापेक्षाही कालसर्पयोगग्रस्त व्यक्ती जास्त विवंचनेत राहते. राहू आणि केतू हे दोन पंचांगकर्त्यांचे ग्रह; प्रत्यक्षात विज्ञानाच्या दृष्टीने अवकाशातील काल्पनिक छेदनबिंदू, पंचांगकर्त्यांनी राक्षस म्हणून यांना संबोधले. राहू ते केतू हा एक मोठा साप आहे, असे ते समजतात. त्यापैकी राहू हे सापाचे तोंड आणि केतू हे शेपूट. पत्रिकेमधील सर्व ग्रह, राहू आणि केतूच्या एका बाजूला आले, तर कालसर्पयोग. हा साप त्या बाधिताला सोडत नाही, वेटोळा घालून घट्ट बसलेला असतो, असे ज्योतिषवाल्यांचे प्रतिपादन. मग या कालसर्पयोगबाधित व्यक्तीच्या सुटकेसाठी सुरू होतात शांतीचे उपाय. त्यासाठी आहे नारायणनागबली विधी. कालसर्पयोगबाधित व्यक्तीची पत्रिका सोबत दिलेली आहे.

नारायणनागबळी विधी

या पत्रिकेमध्ये राहू आणि केतूच्या एकाच बाजूला सर्व ग्रह आल्यामुळे कालसर्पयोगबाधित पत्रिका. अशा प्रकारची पत्रिका असणार्‍यांनी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर किंवा कोल्हापूर जवळील नृसिंहवाडी येथे जाऊन नारायण नागबळी विधीअंतर्गत जप, तप आणि नागाची सोन्याची मूर्ती दान केल्यास सापाचा विळखा सुटतो. काय शक्कल आहे पंचांग निर्मात्याची! योंग निर्माण करणारा तोच आणि सोडवणाराही तोच; फक्त नाडवले जाणारे आपण. हा योग आपल्या नावावरून बेतलेला आहे, हे जर नाग आणि समस्त सर्पजातीला कळाले, तर ‘बदनामीसाठी केवळ आम्हीच दिसलो का,’ असं म्हणून पंचांगकर्त्याला सोडणार नाहीत हे नक्की! पण जिथे शिकलेल्या मानवी प्राण्यास हे समजलेले नाही, तिथे त्या सापांचे काय चालणार म्हणा!

गुरूदोष

पंचांगामध्ये गुरू ग्रहाला फार महत्त्व आहे. बहुतेक तो सर्व ग्रहास मोठा असावा म्हणून त्यास हा मान दिलेला असावा. गुरूबल उत्तम असणे, ही पंचांगाच्या दृष्टीने फार महत्त्वाची बाब. यंदा आठवा गुरू आहे त्यामुळे लग्नकर्तव्य नाही, असं शिकलेली मुलं म्हणतात त्यावेळेला हसू येतं. आठवा गुरू असणे म्हणजे काय, हे माहीत नसतानाही त्याबद्दल भीती बाळगणारे महाभाग समाजामध्ये फार मोठ्या संख्येने आहेत.

गुरूला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी बारा वर्षेलागतात. आकाशाचे बारा भाग बारा राशींच्या रुपाने केलेले आहेत. याचाच अर्थ गुरू दरवर्षी एका राशीमध्ये असतो. दरवर्षी ऑगस्टमध्ये गुरू रास बदलत असतो. ऑगस्ट 2015 मध्ये तो सिंह राशीमध्ये, 2016 मध्ये कन्या राशीमध्ये. याप्रमाणे तो मार्गक्रमण करणार. प्रत्येकाला एक रास असते. आपल्या राशीमध्ये याप्रमाणे तो मार्गक्रमण करणार. प्रत्येकाला एक रास असते. आपल्या राशीला एक क्रमांक मोजत जावे. जो क्रमांक येईल त्या क्रमांकाचा गुरू आपल्याला असतो. आकाशातील गुरूची स्थिती सोबतच्या चित्रावरून स्पष्ट होते.

समजा, सध्या गुरू सिंह राशीमध्ये आहे. मुलाची रास वृश्चिक आहे. वृश्चिकाला एक क्रमांक दिल्यानंतर सिंह येईपर्यंत क्रमांक देत गेल्यास दहा क्रमांक येतो. याचाच अर्थ सध्या मुलाला दहावा गुरू आहे. गुरू किती नंबरचा आहे, यावर त्यांची कर्मकांडे अवलंबून आहेत.

गुरू 2, 5, 7, 9, 11 वा असेल, तर शुभ होय.

गुरू 1, 3, 6, 10 वा असेल, तर गुरूच्या सुवर्णप्रतिमेचे पूजन करावे, म्हणजे गुरू अनुकूल होईल.

आणि जर गुरू 4, 8, 12 वा असेल, तर अत्यंत धोकादायक. त्याच्या निवारणासाठी जप, तप आणि दान करून शांती करणे गरजेचे आहे, तरच गुरू अनुकूल होतो. दान करताना गुरूची सोन्याची प्रतिमा दान द्यावी, असे स्पष्ट उल्लेख पंचांगात आहे. कोणाला द्यावी हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही.

पंचांग कोणाची मक्तेदारी आहे, हे स्पष्टच आहे. बिनभांडवली जोरात चालणारा धंदा, असे म्हटले तर वावगे ठरू नये. सगळा आकड्यांचा खेळ. पंचांगकर्त्याच्या आकड्यांच्या खेळाला अधिकृत मान्यता आणि परंपरेबरोबर संस्कृतीचे अधिष्ठान.

मृत्युषडाष्टक योग

राशीच्या क्रमांकावर आधारलेला हा योग आहे. नावामध्येच भीती निर्माण करणारा हा, सहा (षड) आणि आठचा (अष्टक) योग, साक्षात मृत्यूची चाहूल देत असेल, तर विचार करणे गरजेचे आहे. हे (तथाकथित) सुशिक्षितासही कळते. मृत्यूचा योग असेल, तर तो टाळलेला बरा, असे वाटणे स्वाभाविक आहे. कारण पंचांगवाल्यांची दहशतच प्रचंड आहे. उदाहरणार्थ, मुलगा वृश्चिक राशीचा आणि मुलगी मेष राशीची असेल, तर मृत्युषडाष्टक योग येतो.

वधू-वराची रास परस्परांच्या राशीपासून सहा अथवा आठव्या क्रमांकावर आल्यास मृत्युषडाष्टक योग आला असे म्हणतात. वधूच्या अथवा वराच्या राशीला एक क्रमांक देऊन तिथून पुढील राशींना क्रमाने नंबर दिल्यावर वर अथवा वधूची रास, सहा अथवा आठव्या क्रमांकावर आली, तर हा योग संभवतो. या योगामध्ये दोघांचाही मृत्यू अटळ आहे; पण शांती केल्यास तो टाळता येतो. सर्व योगांवर (रोगांवर) रामबाण उपाय म्हणजे शांती. अर्थात जप, तप आणि दान. शेवटी मात्र दान! कारण हे दान म्हणजे बहुजनांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या श्रमाचं, पैशाचं शोषण करून पिढ्यान्पिढ्या आयतं जगण्याची व्यवस्था होय. वधूची रास वराच्या राशीपासून सहाव्या क्रमांकावर येते आणि वराची रास वधूच्या राशीपासून बरोबर आठव्या क्रमांकावर येते. काय अफलातून गणित आहे, असे वाटणे स्वाभाविक आहे. किती प्रचंड अभ्यास या पंचांगवाल्यांनी केला असेल, असे क्षणभर आपल्याला वाटेल; पण जरा डोके लढवले, तर लक्षात येते की, एकूण राशी बारा आहेत. पहिली रास दुसर्‍या राशीपासून सहाव्या क्रमांकावर आली, तर दुसरी रास पहिल्या राशीपासून आठव्या क्रमांकावर येणारच. त्यात कसला आलाय प्रचंड अभ्यास आणि किचकट आकडेमोड? हा शुद्ध भंपकपणा आहे; पण संस्कृती आणि परंपरेच्या भीतीमुळे तो आदराचा विषय ठरलेला आहे.

ही असली अतार्किक आकडेमोड करणार्‍याला आम्ही ‘गुरुजी’ म्हणून संबोधतो. हा खरा तर शाळेत शिकवणार्‍या गुरुजींचा अपमान आहे. सरळसरळ आपल्या नावाने समाजाला फसवायचा बिनभांडवली उद्योग ही मंडळी राजरोसपणे करीत आहेत. ग्रह, तारे ही खरी तर शिक्षण खात्याची मालमत्ता आहे; परंतु या ज्योतिषमंडळींनी ‘हायजॅक’ केलेली आहे. केवळ आपल्या निष्काळजीपणामुळेच!

शनीची साडेसाती

शनिला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तीस वर्षे लागतात. आकाशात बारा भाग बारा राशींच्या रुपाने केलेले असल्यामुळे शनि एका भागामध्ये, म्हणजेच एका राशीमध्ये अडीच वर्षेअसतो. शनि अनुक्रमांकानुसार आपली जागा बदलतो. शनि आपल्या राशीमध्ये येण्यापूर्वीची अडीच वर्षे, आल्यानंतरची अडीच वर्षेआणि निघून गेल्यानंतरची अडीच वर्षे, असे एकंदर साडेसात वर्षेराशीच्या व्यक्तीला साडेसातीच्या रुपाने लागतात. पीडायुक्त असणारी अनेक संकटे अंगावर येणारी ही वर्षेआयुष्याला अत्यंत धोकादायक असतात, असे पंचांगवाल्यांचे मत! साडेसात वर्षे शनिची साडेसाती सुरू असते.

सध्या शनि वृश्चिक राशीमध्ये आहे. अडीच वर्षेतो वृश्चिक राशीमध्ये राहणार. त्यापूर्वी तो तूळ राशीमध्ये अडीच वर्षे होता. नंतर तो धनू राशीमध्ये अडीच वर्षेराहणार. याचाच अर्थ तूळ राशीची शेवटची अडीचकी, वृश्चिक राशीची दुसरी अडीचकी आणि धनू राशीची पहिली अडीचकी सुरू आहे. एकाच वेळी तूळ, वृश्चिक आणि धनू या तीन राशींना सध्या साडेसाती सुरू आहे. बारा राशींपैकी तीन राशींना साडेसाती म्हणजे पंचवीस टक्के भारतीय जनतेला साडेसाती लागलेली असते. भारताव्यतिरिक्त जगामध्ये कुठल्याही अन्य देशांत हे खूळ नाही. शनि फक्त भारतीयांनाच नावानिशी आणि राशीनिशी ओळखतो का? ग्रह-तार्‍यांचा धाक दाखवून दरवर्षी कष्ट न करता लोकांच्याकडून आर्थिक कमाई चालू ठेवण्यासाठीची पिढ्यान् पिढ्यांची ही यंत्रणा आहे. शनि मागे लावून दिला की झालं! वृश्चिक राशीत शनी असतानाची आकाशातील स्थिती सोबतच्या चित्रामध्ये दाखवलेली आहे.

शालेय जीवनापासून शनि उघड्या डोळ्यांनी कधीही पाहिलेला नसतो. शनिची कडी पाहण्याचाही योग कधीही आलेला नसतो. खगोलाबद्दलची अनास्थाच याला कारणीभूत आहे. शनि पृथ्वीपासून जवळपास एकशेचाळीस कोटी किलोमीटर अंतरावर आहे. त्याला भावना, विचारस्वातंत्र्य, बुद्धिमत्ता असण्याचा प्रश्नच नाही. त्याच्याकडून अडचणी निर्माण करणारे, दु:खद घटना घडवणारे प्रकार कसे घडणार? हे करण्यासाठी माणसाचीच आवश्यकता आहे. हे सर्व खरे आहे हो! पण शनिकडून काहीतरी येत असलं पाहिजे, त्याशिवाय का परंपरेने हे चालत आलेले आहे, असे तथाकथित सुशिक्षितांचे मत असते. शनि सूर्यमालेचा सदस्य. सूर्यापासून पृथ्वी तीन नंबरला, तर शनि सहा नंबरला. पृथ्वी आणि शनि दोघांनाही सूर्यापासून प्रकाश मिळतो. शनिपासून हा प्रकाश परावर्तित होऊन पृथ्वीवर येणार, एवढेच. शनिकडून परावर्तित झालेल्या प्रकाशापेक्षा सूर्याकडून सरळ पृथ्वीवर येणारा प्रकाश जास्त तेजस्वी आहे. पूर्वीच्या लोकांनी हे सगळं लिहिलं ते गाढव होते काय, असे आणखी त्याच्या पुढचे मत या शिकलेल्यांचे असते. पूर्वीचे लोक गाढव नव्हते आणि फार हुशारही नव्हते. कारण त्यावेळेस ज्ञानाच्या कक्षा एवढ्या प्रगल्भ नव्हत्या. त्यांनी जी निरीक्षणे नोंदवली, ती त्या काळात उच्च दर्जाचीच होती, यात वादच नाही. त्या अभ्यासाच्या पुढे जाण्याची आजच्या माणसाची दृष्टी हवी होती; पण तसे न होता भारतीय समाज ग्रहतार्‍यांच्या संदर्भात अतार्किक गोष्टींमध्येच जास्त गुरफटलेला आहे. खगोलाचा विचार केल्यास आज एकविसाव्या शतकात ज्योतिषावर विश्वास ठेवणार्‍यांपेक्षा पूर्वीचे लोक फारच प्रगत मानले पाहिजेत. कारण त्यांनी शनि, मंगळ, गुरू, नक्षत्र, रास इत्यादी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले होते.

मूळ नक्षत्र मुळावर उठते

पंचांगकर्त्यांनी प्रत्येक भारतीयाला एक नक्षत्र दिलेलं आहे. ज्यादिवशी व्यक्तीचा जन्म होतो, त्यादिवशी जे नक्षत्र असते, ते जन्मलेल्या त्या व्यक्तीचे नक्षत्र होते. भारताची लोकसंख्या जवळपास एकशेवीस कोटी गृहीत धरली, तर जवळजवळ चार कोटी व्यक्ती एका नक्षत्राच्या येतील. दोन कोटी स्त्रिया आणि दोन कोटी पुरुष. त्यामुळे दोन कोटी स्त्रियांच्या वाटणीला मूळ नक्षत्राचे ‘प्रताप’ येतात. मूळ नक्षत्र सासर्‍यास वाईट, आश्लेषा नक्षत्र सासूस, तर ज्येष्ठ नक्षत्र दिरास वाईट. अशा विविध प्रकारच्या तरतूदी पंचांगनिर्मात्याने करून ठेवलेल्या आहेत. याला पुरावा काय? तर उत्तर येतं संस्कृती, परंपरा, धर्म, वेदवाक्य इत्यादी. सदर नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना या त्रासातून मुक्त होण्यासाठी शांती हा प्रकार आहेत. एखाद्या नक्षत्राची शांती केल्यावर तो आपल्याला त्रासातून मुक्त करतो, हा प्रकार हास्यास्पद वाटतो; पण त्यासाठी हे नक्षत्र आकाशामध्ये पाहायला पाहिजे आणि नक्षत्र म्हणजे काय असते, ते समजावून घेतले पाहिजे. अर्थात यासाठी वेळ पाहिजे. तो आहे कोणाकडे? नक्षत्र आकाशात न पाहता, त्याच्या शांतीसाठी मात्र पुरोहितवर्गाच्या मदतीने शॉर्टकटस् शोधले जातात.

मुलगी मूळ नक्षत्राची असेल, तर मुळावर उठते, असे पंचांगकर्तेम्हणतात. एकाही पंचांगकर्त्याला हे वाक्य लिहीत असताना जनाची नाही मनाची तरी लाज वाटायला पाहिजे होती. आपणही कोणातरी मुलीच्या पोटीच जन्म घेतलेला असणार हे विसरले वाटतं. सासर्‍यांना काही तरी वाईट घडलं, तर सून जबाबदार; सासर्‍याच्या कर्तृत्वाचा काहीच रोल नाही का? सासरी जर काही दुर्घटना घडली, तर सुनेच्या पायगुणावर घसरण्यासाठीची संस्कृतीने केलेली ही तरतूद आहे. मुलगा मात्र मूळ नक्षत्राचा असेल, तर चालतो. पुरुषप्रधान संस्कृतीचे हे आणखी एक रूप. आपल्यावर वाईट प्रसंग का येतात, याची सासरेबुवांनी चिकित्सा करायला पाहिजे. त्या प्रसंगाच्या कारणांपर्यंत गेले पाहिजे. ती कारणे दूर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सुनेला कशाला दोष द्यायचा? शेवटी तीही कोणाची तरी मुलगी आहेच ना?

वैरवर्ग

स्वत:च्या आर्थिक लाभासाठी ज्योतिषांनी वधू-वरांमध्ये शत्रुत्व अथवा मित्रत्व निर्माण केलं. वैरवर्ग काढण्यासाठी अथक परिश्रमातून त्यांनी निर्माण केलेलं कोष्टक खाली दिलेलं आहे.

नावातील आद्याक्षरवर्ग
अ ई उ ए
क, ख, ग, घ, ङ
च, छ, ज, झ त्र
ट, ठ, ड, ढ, ण
त, थ, द, ध, न
प, फ, ब, भ, म
य, र, ल, व,
श, ष, स, ह
गरूड
मांजर
सिंह
कुत्रा
सर्प
उंदीर
गज
हरिण

वधू-वरांच्या व्यावहारिक नावाची सुरुवात कोणत्या अक्षरापासून होते, त्यावरून ते कुत्रा, मांजर किंवा सर्प आदी वर्गांत समाविष्ट केले जाणार. मला एक साधा प्रश्न पडतो की, ट, ठ, ड, ढ, ण ही अक्षरे कुत्र्याने आणि प, फ, ब, भ, म ही अक्षरे उंदराने निर्माण केली आहेत काय? असो, यांचं सगळं विचित्रच आहे. व्यावहारिक दृष्टिकोनाच्या नेमकं उलटं. माणसाला प्राण्यांच्या रुपात वर्ग करणार्‍यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटते. अहो, यांना कोणीतरी सांगण्याची गरज आहे की, आदिम अवस्थेतील माणूस पूर्वी प्राणीच होता; पण नंतर त्याने जिज्ञासा आणि बुद्धीच्या सहाय्याने प्राणी वर्गातून शहाण्या अशा माणूस वर्गात प्रवेश केला.

वैरवर्ग पाहण्याची नियमावली तर फारच अफलातून आहे. वधू-वर एकाच वर्गात आले, तर त्यांच्यात परस्परप्रेम, एकमेकांपासून पंचम वर्गात असल्यास वैरभाव आणि इतर वर्गात असल्यास परस्परसमता असते. काय यांचं वधू-वरांच्या भावाचं अफलातून गणित! यांची समता कोण कितव्या स्थानावर आहे, यावर अवलंबून असते. समतेसाठी स्वत: किंवा समाजाने काहीच करायचं नाही. यांचं वैरभावाचं गणित पण कल्पनेच्या पलिकडचं आहे. केवळ नावातील आद्याक्षरावरून ते प्रेम, वैर आणि समता याचा लेखाजोखा मांडतात. यांनी वैरभावासाठी पंचमच का निवडलं? याला कोणता निकष लावण्यात आलेला आहे? गरूड आणि सर्प, मांजर आणि उंदीर, सिंह आणि गज, कुत्रा आणि हरिण, हे परस्पर वैरी होतात काय? त्यांच्या दृष्टीने असले फालतू प्रश्न त्यांना विचारण्यात काहीच अर्थ नाही.

एखाद्या वधूचं नाव डिंपल असेल, तर ती कुत्रा वर्गात गणली जाणार आणि वराचं नाव समीर असेल, तर तो हरिण वर्गात समाविष्ट होणार! काय पण यांची वर्गवारी करण्याची पद्धत आहे. आपल्या मुलीला कुत्रा आणि मुलाला हरिण समजणार्‍यांच्या ज्ञानाला सलाम. असो! डिंपल आणि समीर या दोघांचे वर्ग एकमेकांपासून पंचम स्थानावर येतात, त्यामुळे त्यांच्यात वैरभाव निर्माण होणार. हे आधीच तय झालेलं असल्यामुळे डिंपलला समीर कितीही आवडला असला, तरीही लग्न होणार नाही. कारण वैरभाव! ज्योतिषांचा अभ्यास फार प्रचंड आहे. कारण लग्नानंतर काय होणार, याची खडान्खडा माहिती त्यांनी जमा केलेली आहे. अक्षरावरून वर्ग काढण्याची आणि उंदीर, साप, कुत्रा अशी नावं देण्याची पद्धत, ज्या ‘बुद्धिवंता’ने निर्माण केली असेल, त्याला सलाम आणि आपल्या पाल्याची अशा प्रकारे वर्गवारी करून घेण्यासाठी जाणार्‍याला साष्टांग दंडवत! माझं नाव आहे नितीन, तर पत्नीचे नाव आहे दीपिका. दोघेही सर्प या वर्गात सामावले जातो आणि पंचांगकर्त्यांच्या दृष्टीने आमच्यात परस्परप्रेम आहे, असा निष्कर्ष निघतो. आता मला होय म्हणण्याशिवाय पर्यायच नाही. कारण नाही म्हटलं तर चळवळीच्या दृष्टीने उक्ती आणि कृतीमध्ये भिन्नता. त्यामुळे पंचांगवाल्याचं खरं ठरलं. अशाच प्रकारे यांचं खरं ठरत आलेलं आहे, हे लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता आहे.

कडक मंगळाच्या माध्यमातून मंगळाला, साडेसातीच्या माध्यमातून शनिला, आठव्या गुरूच्या माध्यमातून गुरूला, तर कालसर्पयोगाच्या माध्यमातून सापाला यांनी बदनाम केलं. मंगळ, शनि, गुरू किंवा सापाला जर खरोखरच भावना असत्या, तर त्यांनी यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असता. आम्हाला न विचारता, आमची परवानगी न घेता आम्हाला का बदनाम करता? म्हणून त्यांनी जाब विचारला असता ना! पण जित्याजागत्या भारतीय माणसाला हे कळत नाही, तिथं या निर्जीव ग्रहांचं आणि भावना नसलेल्या सापांचं काय चालणार म्हणा!