Categories
बालविभाग

“जरा डोकं चालवा!”

वार्षिकांक – २०११

1.

एका दगडावर दोन व्यक्ती बसल्या होत्या. त्यापैकी एक वयानं प्रौढ होती तर दुसरी पोरसवदा. लहान व्यक्ती ही मोठ्या व्यक्तीची मुलगा होती, पण मोठ्या व्यक्तीला त्या मुलाचा बाप म्हणणं चूक ठरलं असतं. या दोन्ही व्यक्तीत काय नातं असेल?

2.

एका रूंद नदीच्या एका काठावर तीन माणसं उभी होती. कोणीतरी दुसर्‍या काठावरून बंदुकीची गोळी झाडली. तिघांपैकी एकाला धूर दिसला, दुसर्‍यानं गोळी नदीच्या पाण्याला चाटून जाताना पाहिली, तर तिसर्‍याला गोळीचा नुसता आवाज ऐकू आला. गोळी झाडल्याचं सगळ्यात आधी कुणाला कळलं. नंतर कुणाला कळलं आणि शेवटी कुणाला कळलं?

3.

मामाची बहीण आपली मावशी नसते असं केव्हा होतं?

4.

केवळ 9 या एका आकड्याचा सहा वेळा उपयोग करून 100 ही संख्या कशी मांडाल?

5.

शर्यत जिंकणारा घोडा

जेव्हा अंतिम टप्प्यापाशी आला तेव्हा ‘स्पन ग्लास’

हा घोडा ‘अल मख्तूब’ या घोड्याच्या दोन फूट मागे होता. ‘तस्लरून’ हा घोडा ‘डार्क मिश्चिफ’ या घोड्याच्या

मागे तीन फूट होता. ‘अल मेहबूब’ हा घोडा

‘ओरायन’ या घोड्याच्या पुढे अडीच फूट होता.

‘अल मख्तूब’ हा ‘तस्लरून’च्या पुढे अर्धा

फूट होता. शर्यतीत ‘ओरायन’ पाचवा आला.

तर हे घोडे शर्यतीत कोणत्या क्रमाने आले?

6.

एका इमारतीला शंभर खोल्या आहेत. प्रत्येक खोलीच्या दरवाजावर पितळी क्रमांक बसावायचे आहेत. यासाठी नऊ(9) या आकड्याचे किती तुकडे लागतील?

7.

काय आहे याचा अर्थ?

अ. “डॉक्टर काळे यांचा भाऊ डेन्टिस्ट आहे.”

ब. “मला वाटलं नव्हतं की, आमच्या डेन्टिस्टला एखादा भाऊ असेल”

अ. “छे, छे, तुमच्या डेन्टिस्टला भाऊ नाहीच!”

ब. “तुम्ही काय बोलताय याचा अर्थ तुम्हाला तरी कळतोय का?”

8.

दोन बाप आणि दोन मुलगे शिकारीला गेले. त्यांनी प्रत्येकी एका पाणकोंबडीची शिकार केली आणि ते तीन पाणकोंबड्या घेऊन घरी आले. चौथ्या पाणकोंबडीचं काय झालं? काय आहे हा प्रकार?

9.

दिवे लावले नव्हते आणि तरीही ड्रायव्हरनं गाडी भरधाव सोडली होती. त्याच रस्त्यावरून एका काळ्या रंगाचा दारूड्या काळे कपडे घालून झिंगत चालला होता. तो भरधाव जाणार्‍या गाडीखाली सापडणार इतक्यात ड्रायव्हरनं त्याच्यापासून फूटभर अंतरावर ब्रेक दाबत गाडी थांबवली. हे घडलं तरी कसं?

10.

माणसाला ठेवलं जातं भुंग्याचं नाव. तेही असं की, त्यातलं पहिलं आणि दुसरं अक्षर घेतलं की पदार्थाला ‘गोडवा’ येतो. दुसरं आणि तिसरं अक्षर घेतलं तर दिवसादेखील नीट दिसत नाही. तिसरं आणि चौथं अक्षर घेतलं तर हा अंक तुम्ही पकडलाय त्या अयवयाचं नाव होतं. सांगा बरं हे नाव!

वरील प्रश्नांचे उत्तरे याच अंकात इतरस्त शोधा व आपले टॅलेंट तपासून पहा!

  • 1. आई आणि मुलगा
  • 2. प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगाहून जास्त असतो आणि ध्वनीचा वेग गोळीच्या वेगाहून जास्त असतो. म्हणून गोळी झाडल्याचं ज्ञान धूर पाहिलेल्या माणसाला आधी, आवाज ऐकलेल्या माणसाला नंतर आणि गोळी पाण्याला चाटून जाताना पाहिलेल्याला शेवटी झालं.
  • 3. ती आपली आई असते तेव्हा….
  • 4. 99 + (99/99)
  • 5. ‘डार्क मिश्चिफ’, ‘अल मेहबूब’, ‘अल मख्तूब’, ‘तस्लरून’, ‘ओरायन’, ‘स्पन ग्लास’
  • 6. वीस (20) तुकडे.
  • 7. डॉक्टर काळे या स्त्री आहेत!
  • 8. शिकारीला तिघेच गेले- आजोबा, बाप आणि मुलगा. चौथ्या पाणकोंबडीचा प्रश्नच येत नाही.
  • 9. अंधार पडला होतं असं कुठे सांगितलंय? तेव्हा दिवसाउजेडी ड्रायव्हरला तो दारूडा दिसला आणि त्यानं गाडी थांबवली यात कसलं आश्चर्य?
  • 10. मधुकर.