Categories
बालविभाग

किस्से शास्त्रज्ञांचे

वार्षिकांक – २०११

दहा पौंड पाण्याचे रहस्य

            आयझॅक न्यूटन हा एक अतिशय चतुर माणूस होता. एकदा न्यूटनने एक अतिशय सुंदर असे घर बांधले. नाना प्रकारच्या युक्त्या आणि प्रयुक्त्या घरात केल्या. न्यूटनने आपले हे नवीन घर दाखविण्यासाठी आपल्या मित्रांना निमंत्रित केले. आपले सर्व घर त्याने मित्रांना हिंडून फिरून दाखविले. त्यानंतर त्याने घराविषयीचा अभिप्राय मित्रांना विचारला. बराचवेळ मित्रांनी त्याच्या कल्पकतेबद्दल त्याची स्तुती केली. पण एका मित्राने धाडस करून आयझॅकला विचारले, ‘आयझॅक, तू घर बाकी छान बांधलंस, पण मित्रा, एक बारीकशी गोष्ट मात्र तुझ्या ध्यानातून सुटलेली दिसतीय, ‘काय बुवा?’ न्यूटनने विचारले.

            तो मित्र म्हणाला, ‘पाहुण्यांना आत येण्यासाठी जे दार ढकलावं लागतंय, ते खूप जोर लावलं तरच उघडतं- तर या ठिकाणी तुझ्या चातुर्याचा उपयोग तू करायला पाहिजे होतास!’ ‘केला आहे, निश्चित केला आहे, तेथेही मी माझं डोकं वापरलंय न्यूटन हसत म्हणाला, ‘माझ्याकडे येणारे पाहुणे जेव्हा हे दार मोठ्या प्रयासानं उघडतील, तेव्हा माझ्या घराच्या वर एक टाकी आहे, त्या टाकीत दहा पौंड पाणी खेचलं जाईल अशी व्यवस्था त्यात केली आहे. ‘हे उत्तर ऐकताच मात्र त्या मित्राचा चेहरा पाहण्यासारखा झाला.


शास्त्रज्ञ लग्न करतो तेव्हा…

            वाफेच्या इंजिनाचा संशोधक जेम्स वॅटला दुसर्‍यादा लग्न करावयाचे होते, तेव्हा त्याच्या भावी सासर्‍याने त्याला त्याचे बँक बॅलन्स विचारले. जर ते भरपूर असेल तरच आपली मुलगी तो वॅटला देणार होता.

            जेम्स वॅट आणि बोल्टन या दोघांचा एक संयुक्त धंदा होता. पण त्यांचा लेखी व्यवहार काहीच नव्हता. पैशाच्या संदर्भात जी काही देवाण-घेवाण चालायची, ती मित्रत्वाच्या तत्त्वावर, एकमेकांनी समजून उमजून. ही माहिती वॅटचे सासर्‍याला सांगितली, तेव्हा सासरा म्हणाला, ‘छे! छे! ते काही चालायचं नाही, लेखी करार पत्र आणि भरपूर बँक बॅलन्स दाखव, तरच लग्न शक्य आहे.’

            मग मात्र वॅटला बोल्टनकडे जावे लागले, आणि त्याने हे सगळं त्रांगडे बोल्टनला सांगितले. बोल्टनचा लेखी करारपत्राला काहीच विरोध नव्हता आणि पार्टनर अशा नाजूक स्थितीत साापडला आहे, तेव्हा त्याने सहाय्य करण्याचे ठरवले, पण नेमका त्यांचा सल्लागार मित्र आणि वकील त्यावेळी बर्‍याच कालावधीसाठी बाहेरगावी गेला होता. सासरा तर, हातघाईवर आला होता. शेवटी चरफडतच, तो दुसर्‍या वकिलाकडे गेला. त्या दोघांनी नवीन कागदपत्रे तयार केली. बोल्टनने व त्याने त्या कागदावर सह्या केल्या. मग ते डॉक्युमेंटस्-करारपत्रे सासर्‍याने पाहिल्यावर तो खुष झाला, आणि त्याने आपल्या मुलीचा हात वॅटच्या हातात दिला. तोपर्यंत वॅटचं शरीररूपी इंजिन बडबडीची वाफ बाहेर सोडत होतं!


थापेबाजी आणि मुतखडा

            अठराव्या शतकात थापेबाजी आणि संभावितपणे लूटमार करण्याचे प्रकार खूप वाढले होते. धातू रसायनज्ञ, रसायनशास्त्रज्ञ आणि वैद्यक शास्त्रज्ञांत तर फार मोठी चुरस यासंबंधी लागली होती. 1738 मध्ये श्रीमती जोएन्ना स्टिफन्स नामक एका महिलेने असे सांगितले, ‘मुतखडा(किडनी स्टोन) या असाध्य रोगावर माझ्याकडे एक जालीम उपाय आहे. परंतु हा उपाय करावयाचा असेल तर, प्रथम मला पेटंट घ्यावे लागेल. त्यासाठी त्याची किंमत पाच हजार पौंड लोकांनी मला द्यावी.’

            चर्चचे मुख्य पाद्री, बिशप आणि ड्यूक्स यांनी एक समिती तयार करून पैसा जमा करण्यास सुरवात केली, सरकारने सुद्धा काही पैशांचा वाटा उचलला, आवश्यक तेवढे पैसे घेतल्यानंतर श्रीमती स्टिफन्सच्या जालीम औषधाचे स्वरूप ‘लंडन गॅझेट’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले.

            ‘ते औषध तीन प्रकारचं होतं. पूड, पेय आणि गोळ्यांच्या स्वरूपांत गोगलगाईच्या शंखांची आणि प्राण्यांच्या अंड्यांची कवचांची पूड म्हणजे ते औषध. पेय म्हणजे काही वनस्पतींना पाण्यात उकळून जो अर्क तयार होतो, तो अर्क म्हणजेच पेयाच्या स्वरूपातील औषध. गोगलगाईचे तुकडे करून प्रत्येक बारीक तुकड्याभोवती कॅल्शियमचं वेष्टण दिलं की, झाली गोळी तयार. तसेच गाजराच्या बिया, बरंडॉकच्या बिया आणखी बरचसं मिश्रण जाळून भाजून ते काळ्या रंगाचं करायचं आणि त्यात मध मिसळायचा आणखी…. म्हणजे…. सगळं भंकस.

            केवळ, लोकांना लुटणे! त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेणे! कारण लोक अत्यंत गरजू होते. व्याधींपासून मुक्त होण्यास उत्सुक होते, म्हणूनच हे चाळे चालू शकले.


विल्यम फरग्युसन व चाकूची मूठ

            एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेल्या इंग्लिश सर्जन विल्यम फरग्युसनची ही एक कथा आहे. तो शस्त्रक्रियेत इतका निष्णात व तरबेज होता की, पापणीची उघडझाप होण्याच्या आत त्याची शस्त्रक्रिया संपल्यात जमा होत असे. एखाद्या नवख्या विद्यार्थ्याने शस्त्रक्रिया करताना पापणीची उघडझाप करण्याच्या आत त्याचं ऑपरेशन अर्धं अधिक होत असे.

            एकदा ऑपरेशन करत असताना अचानक चाकूची मूठ तुटली. आणि थोडा जरी विलंब लागला असता तरी, त्या रूग्णाचा जीव धोक्यात आला असता. फरग्युसनने चाकू सुद्धा बदलला नाही. त्याने चाकूची मूठ तात्काळ बाजूला ठेवली आणि दोन बोटांत पाते धरून त्याने शस्त्रक्रिया पूर्ण केली. व यशस्वीरित्या त्याने त्या रूग्णाचे प्राण वाचविले.


मधे मधे नाक खुपसल्याने….

            खगोल शास्त्रज्ञासंबंधीचीच ही पण आठवण आहे. तारकांचं अचूक निरीक्षण करणारा खगोल शास्त्रज्ञ टायको ब्राहे (Tycho Brahe) हा स्वभावाने शांत होता, संयमी होता. थंड डोक्याने तो तारकांचा अभ्यास करत असे. पण कोणाचं तरी व्यंग उघडकीला आणण्यास तो नेहमीच मध्ये मध्ये आपलं नाक खुपसत असे.

            ऐहिक सुखांच्या संदर्भात एकदा टायकोचं भांडण एका तरूण इंग्रज सरदाराशी(ज्ञपळसहीं) झाले. जेव्हा एखाद्या इंग्रजी सरदाराशी भांडण होतं, तेव्हा सरदाराशी तरवारीचे दोन हात करणं हे ओघानंच आलं. दोन हात करावयाचे, तेही काळ्याकुट्ट अंधारात. प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं किंवा नाही याची जाणीव होण्याच्या आतच सरदाराच्या तरवारीने टायकोच्या नाकाचा शेंडा उडवला.

            पुढे पूर्ण आयुष्यभर त्याला आपल्या नाकाचा शेंडा सोन्याचांदीच्या मिश्र पत्र्याने झाकून घ्यावा लागला.         असं म्हणतात की, कोणत्याही गोष्टीत कारणाशिवाय नाक खुपसलं की, त्याचं नाकच उडवलं जातं हे टायको ब्राहे या शास्त्रज्ञाने जगाला पटवून दिलं.


शाही शॉर्टकट

            भूमितीचा पिता एकदा भूमितीतील प्रमेये शिकवत होता. तो समजावून सांगत होता-

            ‘त्रिकोणाची तिसरी बाजू, इतर दोन्ही बाजूंपेक्षा लहान आहे.’ प्रमेय शिकविण्याची पद्धत जरा जड वाटल्यामुळे, इजिप्तचा राजा टॉलेमी(पहिला) युक्लिडला म्हणाला,

            ‘भूमिती शिकवण्यासाठी यापेक्षा आणखी एखादी सोपी पद्धत नाही काय?’

            आदरयुक्त परंतु विनम्र आणि साध्या शब्दात युक्लिड म्हणाला, ‘सर, भूमिती शिकण्यासाठी अजून तरी कोणताच शाही मार्ग अस्तित्वात आलेला नाही.’

            बिचारा टॉलेमी! राजा असून त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.


आगगाडी का धावतेय?

            एकदा एका धावणार्‍या आगगाडीकडे बोट करून स्टिफन्सनने आपल्या भूगर्भ-वैज्ञानिक मित्राला-बेकलॅन्डला विचारले, ‘बेकलॅन्ड, ही जी ट्रेन पळतेय, त्याबद्दल तुला काय वाटतंय? ती कशामुळे पळतेय?’

            ‘अगदी सोपं उत्तर आहे याचं. या आश्चर्यकारक यंत्राची कळ ड्रायव्हर जेव्हा हाताने फिरवितो, तेव्हा ती पळू लागते.’

            ‘चूक’ स्टिफन्सन म्हणाला.

            ‘मग बॉयलरमध्ये तयार होणार्‍या वाफेमुळे असेल!’

            ‘तरीही चूक’

            बॉयलरमधील पाणी गरम करणार्‍या उष्णतेमुळे!’

            ‘अगदीच चूक’

            नंतर स्टिफन्सन म्हणतो, ‘ही सर्व किमया आहे सूर्याची. विश्वात तो कोठेतरी तळपतो-चमकतो, ती उष्णता वनस्पती, म्हणजे झाडं शोषण करतात, आणि जिवंत राहातात. ही झाडं ज्यावेळी जमिनीत गाडली जातात, त्यावेळी त्या झाडांचा कोळसा बनतो. हाच कोळसा ज्यावेळी बॉयलरच्या खाली, म्हणजेच शॉवेलमध्ये टाकला जातो, तेव्हा बॉयलरमधील पाणी उकळतं, पाण्यापासून निघणारी वाफ….’

            बॅकलॅन्ड वैतागून म्हणाला, ‘पुरे, पुरे. ही आगगाडी का धावतेय ते कळलं मला.’


आळींबे व सिग्मंड फ्राईड

            आधुनिक मानसशास्त्राचा पितामह डॉ.सिग्मंड फ्रॉईड वयाच्या 30 व्या वर्षी मार्थो बर्नेंबरोबर विवाहबद्ध झाला. त्रेपन्न वर्षे ती अगदी सुखाने जगले. कोणत्याही प्रकारचं वादळ त्यांच्या वैवाहिक जीवनात आलं नाही. एकमेकांवरचं प्रेम शेवटपर्यंत आटलं नाही. शिवाय पूर्ण आयुष्यात त्यांनी एकमेकांचा कधी द्वेष केलेला नाही, किंवा त्यांना घृणा वाटली नाही असं म्हणतात. असे यशस्वी विवाह आणि संसार फार कमी होतात. असंही म्हटलं जातं की, पूर्ण त्रेपन्न वर्षांच्या वैवाहिक जीवनात ते केवळ एकदाच भांडले आणि भांडणाचा विषयही म्हणाल तर, तेवढाच क्षुल्लक होता आणि म्हटलं तर, तितकाच गंभीर होता.

            मशरूम म्हणजे आळिंब हे देठाशिवाय शिजवून खायचं, की देठ ठेवून शिजवून खायचं!


काही चुकलं का?

            आजन्म ब्रम्हचारी आणि आल्टरनेटींग विद्युतप्रवाहाचा जनक निकोला तेस्ला हा एक हुशार गणिती होता. गणितं सोडवण्यासाठी तो नवीन नवीन गणितांचा शोध घेत होता. हॉटेलात गेल्यानंतर समोर आलेल्या सूपचं घनफळ किती आहे हे शोधून काढल्याशिवाय तो सूप घेत नसे.

            एका रात्री तो हॉटेलात जेवत असताना, वेटरने त्याच्या पुढ्यात फ्रूट सॅलॅडचा बाऊल आणून ठेवला. फळांचा प्रत्येक तुकडा हा वेगवेगळ्या आकारांचा होता. तेस्लाच्या मनात आनंद मावेना. गणिततज्ञाला ते फ्रूट सॅलॅड म्हणजे एक आव्हान मिळाल्यासारखंच झालं. पंधरा मिनिटे तो सारखं कागदावर फळांच्या निरनिराळ्या तुकड्यांचे आकार अंदाजाने काढत होता, मोजत होता. त्याची आकडेमोड चालूच होती. तेवढ्यात वेटर तिथे आला. वेटरचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्याने निकोलसला विचारले, ‘साहेब, काही चुकलं का? तुम्ही फ्रूट सॅलॅड खातच नाहीत. काही चुकलं का?’

            ‘चुकलं? शक्यच नाही.’ त्याच्याकडे न पहाताच तो म्हणाला, ‘या पेक्षा बरोबर चांगलं काय असू शकेल? मी जी मोजदाद केली तीच बरोबर आहे.’

            नंतर स्वत:शीच पुटपुटत तो म्हणाला, ‘द्रवपदार्थ इतका, फळांचे तुकडे इतके म्हणजे सगळं मिळून हे एवढं.’ वेटर त्याच्याकडे बघतच राहिला. काय करणार बिचारा. ज्यावेळी निकोलाचं समाधान झालं, त्याचवेळी त्याने फ्रूट सॅलॅड खाण्यास सुरवात केली.