जातीव्यवस्था भारतीय समाजाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय समाजाच्या सामाजिक-आर्थिक, राजकीय जडणघडणीवर जातीव्यवस्थेचा प्रभाव पडतो. त्यातही जातीव्यवस्थेतील उतरंडीनुसार व्यक्तीची जीवनपद्धती, दर्जा, श्रमव्यवहार, संस्कृती यातील शोषणाचे, विषमतेचे अनुभव जाती-जातीनुसार वेगवेगळे असतात. असेच मला परीट जातसमुहातून वाढताना, पुढे संशोधक म्हणून नव्या दृष्टिकोनातून याच जातीसमूहाकडे पहाताना आलेले अनुभव मांडण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे.

परीट म्हटलं की, लॉन्ड्री व्यवसायाचे काम करणारी बलुतेदार पैकी एक जात. आजही परीट मोठ्या प्रमाणात या व्यवसायात दिसतात. या जातीतच जन्माला आल्यामुळे लॉन्ड्री व्यवसाय पाचवीला पुजलेला. वडिलांना मदत करायचो, अभ्यासाला, स्वत:ची इतर कामे करायला वेळच मिळायचा नाही. आमची गिर्हाईके मुख्यत: मारवाडी, गुजराती, मराठा इत्यादी जातींची, कधी कपडे गोळा करायला गेलो तर दारातच थांबायचो, कपडे घ्यायला येणार्या बहुतेक गिर्हाईकांच्या वागण्यात उद्धटपणा असायचा. शाळेत, कॉलेजमध्ये मुले धोब्या धोब्या म्हणून चिडवायची, खूप कडक ईस्त्रीचे कपडे घातले तर म्हणायची गिर्हाईकाचे आहेत वाटतं! थोडक्यात, कळत नकळतपणे अस्पृश्यतेचा अनुभव येत होता याचा प्रचंड राग यायचा.
याच काळात आजीने सांगितलेल्या गोष्टींमधून परीट जातीबद्दल बरीच माहिती मिळायची. पूर्वी आम्ही गावातील ब्राह्मण, पाटलाचे कपडे धुवायचो. सणासुदीचे कपडे, बाळंतिणीचे कपडे, विटाळाचे कपडेसुद्धा आम्हाला धुवावे लागायचे. दिवाळीला पाटलाला ओवाळायचे. लग्नकार्यात मुलाकडच्या लोकांचे स्वागत करण्यासाठी पायघड्या अंथरायचो, लग्नात नवरा-नवरीला तेल लावताना तेलवणची गाणी म्हणण्याचा मान परटिणीला असे. त्याबद्दल साडी चोळी मिळायची. ब्राह्मण, पाटलांना धुलाईचे कपडे दिले तर ते पाणी शिंपडून पवित्र करून मगच घालायला घेत अशी पारंपारिक अनुभवाची शिदोरी आजीकडून मिळाली.
धोबी जात समुहातून मोठं होत असताना एकीकडे अस्पृश्यतेचे अनुभव, लॉन्ड्री व्यवसायातील कष्ट, घुसमट इत्यादी अनुभव येत होते. तर दुसरीकडे व्यवसायाच्या बदलत्या स्वरूपामुळे व्यवसायातील वाढत्या समस्या, प्रचंड स्पर्धा, तसेच समूहातील असंघटीतपणा, अल्प शिक्षण, राजकीय हक्काच्या जाणिवेचा अभाव, भांडवलाची कमतरता इत्यादी प्रश्न परीट जातीमध्ये मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळत होते. एम.फील करताना इतर विषयावर संशोधन करण्यापेक्षा माझ्याच जातीवर संशोधन करून जातसमूहाला प्रगतीकडे नेण्यासाठी ‘परीट जातसमूह : श्रमव्यवहार व अस्मिता’ हा विषय घेऊन परीट जातसमूहाच्या आजच्या काळातील समस्या, त्यांचा श्रमव्यवहार, बदलत्या काळाचा त्यांच्यावर होणारा परिणाम यावर संशोधन केले. त्यामुळे नव्या दृष्टिकोनातून जातसमूहाकडे बघण्याची संधी मिळाली. त्यातून पुढे आलेले जातसमूह, जातसंघटनेचे अनुभव :
भारतात जागतिकीकरणाबरोबरच मंडलवादाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली. यात ओबीसी वर्गातील जातींना शैक्षणिक व्यावसायिक संधी व आरक्षण मिळणार असे जाहीर झाले. त्यादृष्टीने जातसंघटनाचा प्रभाव वेगवेगळ्या जातीसमूहात मोठ्या प्रमाणावर वाढू लागला. परीट जातीतही जातसंघटना दिसू लागल्या. असंघटित असलेल्या परीट जातसमूहाला एकत्र करून त्यांच्याच राजकीय हक्काची, अधिकाराची जाणीव निर्माण करण्यासाठी जातीसंघटना यशस्वी ठरल्या असल्या तरी पुन्हा पुन्हा जातीव्यवस्थेला पोषक असे वधुवर मेळावे भरवणे, हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेणे, जातीची साप्ताहिक काढणे इत्यादी कार्यक्रम राबवले जातात. परंतु भविष्यातील पिढ्यांच्या विकासासाठी वसतीगृह बांधणे, शिक्षणसंस्था काढणे, विविध व्यवसायाचे मार्गदर्शन करणे, अंधश्रद्धा निर्मूलन करणे, मानवतावादी मूल्यांचा प्रसार करणे असे कल्याणकारी कार्यक्रम राबवले जात नाहीत.
शहरीकरणाने जात जाते असे म्हटले जाते. परंतु शहरीकरणामुळे नव्या स्वरूपात जाती अस्तित्वात येताना दिसतात. जात संघटना, संस्था, कार्यालये शहरात स्थापन होतात. मेळावे शहरात भरतात. जातनिहाय वधुवरसूचक मंडळे, पतसंस्था, मंगल कार्यालये, स्मरणिका काढल्या जातात त्यामुळे जातीव्यवस्थेला बळकटी येताना दिसते.
गाडगेबाबा परीट जातीत जन्मले. स्वत: निरक्षर असूनसुद्धा त्यांनी लोकजागृतीचे, सामाजिक परिवर्तनाचे काम केले. आपल्या कीर्तनातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी, तसेच शिक्षण प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून सामाजिक परिवर्तनाचे काम केले. त्यांच्या प्रतिमेचा वापर करून असंघटित असलेल्या परीट जातसमूहाला संघटित करण्याचे काम परीट जातसंघटनाकडून केले जाते. परंतु त्यांच्या मानवतावादी विचाराचा प्रसार, त्यांच्या तत्वाचे पालन करण्याचा प्रयत्न परीट जातसंघटनेकडून फारसा केला जात नाही.
आज अनेक जातीसमूहात आपल्या मानवतावादी विचार पसरवणारे व सामाजिक परिवर्तनाला योगदान देणार्या व्यक्ती होऊन गेल्या. उदा. महात्मा फुले, डॉ.आंबेडकर, गाडगेबाबा. अशा अनेक व्यक्ती ज्या जातीपातीमध्ये न अडकता संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी लढल्या त्यांनी शिक्षण प्रसार, समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वातंत्र्य इत्यादीसाठी प्रयत्न केले त्यांना अस्मितेच्या राजकारणामुळे जातीच्या अस्मितेच्या चौकटीत अडकवले गेल्यामुळे सर्व समाजात त्यांच्या विचाराच्या प्रसाराला मर्यादा येऊन पुरोगामी सामाजिक परिवर्तनाचा वेग मंदावताना दिसतो.
राजकीय हक्काच्या जाणिवेच्या निर्मितीसाठी जातीसंघटना उपयोगी पडत असल्या तरी परीटासारख्या जाती स्थानिक, प्रादेशिक व राष्ट्रीय राजकारणात फारशा सहभागी झालेल्या दिसत नाहीत कारण काही राज्यात इतर मागासवर्गीय, काही राज्यात अनुसूचित जातीत तर काही ठिकाणी अनुसूचित जमातीत मोडतात त्यामुळे अखिल भारतीय वैचारिक, राजकीय संघटन होण्यास मर्यादा येतात. यु.पी.मध्ये अस्मितेच्या राजकारणाचे वेगळे रूप बहुजन समाज पार्टीच्या राजकारणात दिसून येते. तिथे दलित अस्मिता धोबी जातसमूहासारख्या इतर अनुसूचित जातीबरोबर जोडून घेते तर महाराष्ट्रासारख्या राज्यात ओ.बी.सी. समूहामध्ये प्रत्येक जातीचे सुटे सुटे राजकारण चालते. त्यामुळे बहुजन असलो तरी व्यापक बहुजनवादी राजकारणाला मर्यादा येतात.
पूर्वी परटासारख्या बहुजन वर्गातील स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीने काम करत होत्या. पण अलिकडच्या काळात बहुजन समाजातील स्त्रिया ब्राह्मणी परंपरेच्या चौकटीत अडकलेल्या दिसतात. आज या स्त्रियामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मकांडाचे प्राबल्य वाढलेले दिसते. विविध बाबांच्या बैठका, उपवास, पूजा यांचे प्रमाण खूप वाढले आहे. जे पूर्वी फारसे नव्हते. त्यामुळे त्यांचा बराचसा वेळ चूल आणि मूल व धार्मिक कर्मकांडे करण्यात जातो. त्यामुळे स्वत:च्या विकासाकडे, नव्या दृष्टीने जगाकडे पहाण्याची संधी फारशी मिळत नाही. त्याचा परिणाम म्हणून पुढच्या पिढ्यांचे सामाजिककरणही त्याच पद्धतीने होते. त्यामुळे स्त्रियांसाठी जातसंघटनानी बचत गट, विविध विकासाच्या संधी निर्माण करण्याचे उपक्रम राबवले, तर सर्वच स्त्रियांना जीवन जगण्याचे नवीन मार्ग सापडतील. एकूणच सर्वच जातसमुहामध्ये आजच्या काळात पुढील दुविधा दिसतात. क्षत्रिय म्हणून ओळख सांगायची की, मागास म्हणून, पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करायचा की, आधुनिक कौशल्य आत्मसात करून विकास साधायचा, आपल्या मुलांना पारंपारिक व्यवसायात ठेवायचे की, वेगळे आयुष्य नवीन संधी मिळवून देऊन घडवायचे.
माझ्या मते, जातसमूह व जाती संघटनेच्या माध्यमातून जातीअंताकडे दोन प्रकारे जाता येऊ शकते. 1)जात संघटनांनी मानवतावादी मूल्यावर आधारित सामाजिक, शैक्षणिक, कल्याणकारी कार्यक्रम राबवावेत. ज्यामुळे पुढच्या पिढीला पुरोगामीत्वाकडे, समानतेकडे घेऊन जाण्याचा पाया तयार होईल. किंवा जातीसंघटनांनी सुटे सुटे राजकारण करावे. त्यादृष्टीने पुरोगामी, मानवतावादी संस्था संघटनांशी जोडून घ्यावे. त्यामुळे जातीअंताच्या चळवळीला बळकटी येऊ शकते.
– प्रा. राहुल दळवी
(लेखक महाविद्यालयीन व्याख्याते आहेत)