“कोल्हाटी-डोंबारी समाजातील सर्वजण आपले व्यक्तीगत जीवन जगण्यास मुक्त आहेत. त्यांच्यावर जातपंचायतीची बंधने राहणार नाहीत. यापुढे समाजाची कुठल्याही ठिकाणी जातपंचायत होणार नाही. समाजाचे इस्लामपूर येथे असलेल्या कुलदैवताचे दर्शन प्रत्येकजण आपल्या मर्जीने केव्हाही घेऊ शकतो.”
–दिलीप जावळे, माजी पंच, कोल्हाटी-डोंबारी समाज, इस्लामपूर, जि.सांगली. (दि.25 डिसें.2014)
“पद्मशाली समाज हा पावणेदोनशे वर्षांपूर्वी अहमदनगरला आला आहे. येथील पुरोगामी विचाराचा प्रभाव आमच्या समाजावर झाला असल्याने नव्या विचारांची तयारी आम्ही नेहमीच ठेवली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जातपंचायत मूठमाती अभियान सुरू करून राज्यभर प्रबोधन केले आहे. समाजाचे कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले व इतरांचे जातपंचायत बंद करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे आम्ही ‘पद्मशाली न्याय कमेटी’ बंद करण्याचा क्रांतिकारक व कौतुकास्पद निर्णय घेत आहोत. मात्र समाजाचे संवादकेंद्र असावे व त्याची नियमावली लेखी बनवावी असे ठरले.”
–प्रकाश यनगुंदल, माजी अध्यक्ष, पंचकमेटी पद्मशाली जाती समाज. (दि.27 जुलै 2014)
“महाराष्ट्रात वैदू समाजाची जातपंचायत होत होती. परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमुळे जातपंचायत चुकीची असल्याची जाणीव झाली. आजपासून आम्ही जातपंचायत बंद करत आहोत. येथून पुढे राज्यात कुठेही आमची जातपंचायत भरणार नाही. लहान मुलींचे लग्न करू नका. त्यांना शिकवा व मोठ्या झाल्यावरच लग्न करा. मराठी माणसे वागतात त्याच पद्धतीने वागायला पाहिजे.”
–चंदरबापू दासरजोगी, माजी मुख्यपंच, वैदू जातपंचायत, (तथाकथित सर्वोच्च न्यायाधीश, वैदू जातपंचायत, मढी) दि.15 मार्च 2015
गावातील एकाच जातीतील तरूण-तरूणीने आमच्या आदिवासी गौंड जातीच्या परंपरा मोडून लग्न केले होते. त्यामुळे आम्ही त्यांच्या घरावर बहिष्कार टाकला होता. परंतु पोलीस अधिकारी व अंनिसच्या प्रबोधनामुळे आम्ही आनंदाने राहून एकमेकांना मदत करत राहण्याचे ठरवले आहे.
–परशुराम तोडासे, सदस्य, आदिवासी गौंड पंचमंडळ, चंद्रपूर (दि.9 सप्टेंबर 2014)
“प्रबोधनामुळे आमच्यात बदल घडला आहे. समाजातील चांगल्या लोकांची जाणीयव झाली आहे. त्यामुळे आम्ही मागील वर्षीच जातपंचायत बंद केली आहे. मढीच्या यात्रेतसुद्धा आम्ही जातपंचायत भरवली नाही. येथून पुढे आम्ही सरळमार्गी वागून अडचणीत असलेल्याच्यासाठी उभे राहू. अत्याचार झालेल्याच्या पाठीशी उभे राहून चांगले काम करू.”
–बाळासाहेब वायकर, माजी पंच, भटके जोशी-नंदिवाले समाज, नाशिक. (दि.13 मार्च 2015)
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्याविषयी आम्हाला अभिमान आहे. त्यांनी खूप चांगले काम केले आहे. आंतरजातीय विवाह केल्याने चार-पाचशे कुटुंबांना वाळीत टाकले होते. परंतु अंनिसच्या प्रबोधन मोहिमेमुळे आम्ही आमची दाभोलखाडीय भोई समाजाची जातपंचायत बंद केली आहे.”
–शांताराम जाधव, माजी पंच, दाभोळखाडीय भोई समाज, मुंबई (दि.3 मे 2014)
“यापुढे आम्ही रमेश जाजू यांना हीन दर्जाची वागणूक देणार नाही. त्यांना सन्मानाची वागणूक देऊ. त्यांच्या आईचे नाव मंगल कार्यालयास देत आहोत. त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा जातीबाहेर टाकणार नाही.”
–विजय राठी, अध्यक्ष, माहेश्वरी पंच ट्रस्ट, अकोले. (दि.21 जुलै 2013)
“आमच्या समाजात अज्ञान जास्त आहे. मुलां-मुलींना शिक्षण दिले पाहिजे. त्यांचे पोटात असताना लागणारे लग्न थांबवले पाहिजे. शिकून मोठे झाल्यावरच लग्न झाले पाहिजे. समाजाचा विकास झाला पाहिजे, आमच्या समाजाची दुर्गा गुडेलु, पत्रकार विलास बढे व अंनिसमुळे आम्ही मुंबईची वैदू जातपंचायत रद्द करून सामाजिक मंडळ तयार करत आहोत. नवीन मंडळ संविधानाला धरून असेल.”
–स्वामी वैदू, माजी सदस्य, वैदू पंचमंडळ, मुंबई. (दि.28 एप्रिल 2014)