Categories
आंतरजातीय विवाह

जाती विरहित समाजाकडे वाटचाल घडविणारे कोल्हापूरचे आंतरजातीय विवाह सहाय्यता केंद्र!

वार्षिकांक – २०१२
कोल्हापूरचे केंद्र स्थापन होऊन 6 वर्षे झाली आहेत.
 6 वर्षात या केंद्राने लावलेल्या विवाहांचे वर्गीकरण पाहिल्यास त्याची व्यापकता लक्षात येईल.
एकूण विवाह - 93 लावले. 
त्यातील आंतरजातीय विवाह - 81
आंतरधर्मीय विवाह - 12 
कोल्हापूर जिल्ह्यातील विवाह - 75
कोल्हापूर जिल्ह्यातील बाहेरील विवाह -18
आईवडीलांची मान्यता घेऊन लावलेले विवाह-11
विवाहानंतर पोलिसात तक्रारी झालेले विवाह-09
विवाहानंतर कुटुंबियांनी स्वीकारलेले विवाह-24
लग्न पत्रिका छापून, लावलेले विवाह-15

आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्र!

            एवढे लांबलचक नाव असणारी सामाजिक संस्था कोल्हापुरात कुठे असेल याचा आपण अंदाज करू शकतो. अलिकडच्या पंधरावीस वर्षांत बिंदू चौकातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ऑफीस अशा सामाजिक चळवळीचे केंद्र बनले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण रक्षण, स्वच्छ पाणी-मुबलक पाणी, दारूबंदी आंदोलन, लेक वाचवा अभियान आणि स्त्रीभ्रूण हत्याविरोधी संघटना, स्त्रीमुक्ती संघटना, व्यसनमुक्ती संघटना, शिक्षण बचाव, शेती वाचवा, आम्ही भारतीय लोक आंदोलन अशा विविध प्रमुख सामाजिक चळवळी आता या ऑफीसमधूनच चालतात. श्रमिक प्रतिष्ठान, पुरोगामी साहित्य संघ, अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन अशा विविध सामाजिक संस्था इथेच आहेत. आयटकच्या नेतृत्वाखालील कामगार संघटना, ए.आय.एस.एफ., ए.आय.वाय.एफ., भारतीय महिला फेडरेशन, मोलकरणी-अशा-ग्रामपंचायत कर्मचारी-सचिव-फेरीवाले अशा अनेक कष्टकर्‍यांच्या संघटनांची कपाटे इथे आहेत. त्यातीलच एका लहान कपाटाच्यामधल्या कप्प्यात आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्राची फाईल ठेवायला जागा मिळाली आहे. त्या फाईलमध्ये नोंदवलेले शंभर एक विवाहाचे कार्यालयही आयटक कामगार केंद्राचे सभागृह होते. काही विवाह कोल्हापुरातल्या प्राथमिक शाळा, सत्यशोधक समाज आणि तरूण मंडळांच्या हॉलवर संपन्न झाले.

            या केंद्राची स्थापना सहा वर्षांपूर्वी शिवाजी, शिंदे, अनिल चव्हाण, के.डी.खुर्द, गिरीश फोंडे, बिजली कांबळे, मेघा पानसरे, तनुजा शिपूरकर, अनुराधा गायकवाड, ज्योती भालकर, संजय सुळगावे अशा निवडक कार्यकर्त्यांनी केली. अर्थात मार्गदर्शक होते कॉ.गोविंद पानसरे ‘बोले तैसा चाले….’ या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या मुलांच्या आंतरजातीय विवाहांचे खुल्या मनाने स्वागत पूर्वीच केले आहे.

            केंद्र काढावे अशी काही वेगळी निकड नव्हती. अनेक वर्षे असे विवाह घडत आहेत. गरज पडेल तेव्हा पुरोगामी कार्यकर्ते त्यांना मदत करत आहेत. अशा अनुभवातूनच पुढची नैसर्गिक पायरी म्हणून केंद्र स्थापन झाले.

            केंद्रामुळे कामाला सुसंघटीतपणा आला. हेही एक महत्वाचे काम आहे हे अधोरेखीत झाले. या विषयाकडे जाणीवपूर्वक, गांभीर्याने पाहिले पाहिजे ही भावना तयार झाली. समाजातील अनोळखी तरूणांना हक्काची मदत मिळू लागली.

            यापूर्वी कोल्हापुरात स्वातंत्र्य चळवळीत काम करणार्‍या देशभक्तांनीही असे विवाह केले होते. बापूसाहेब पाटील, शंकरराव सावंत, रामचंद्र कदम गुरूजी, दादासाहेब चव्हाण, संतराम पाटील ही काही त्यातील निवडक नावे.

            घरच्यांचा आणि समाजाचा विरोध असूनही अत्यंत कमालीच्या हालअपेष्टा सोसून त्यांनी आपले संसार सुखी व समृद्ध केले. त्याचबरोबर राजकीय आणि सामाजिक कामातही आपला ठसा उमटवला.

            सामाजिक चळवळींचा काही वेळा राजकीय कामावर मोठा परिणाम होतो. त्यातूनच राजकीय आधी की सामाजिक आधी असा वाद स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसमध्ये गाजला.

            भुदरगडमध्ये याचा अनुभव कम्युनिस्ट पक्षाने घेतला. कम्युनिस्ट पक्षाचे प्राबल्य असलेल्या एका वसाहतीत काही वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला. त्यापूर्वी आणि त्यानंतरही त्या भागात आंतरजातीय विवाह झाले आहेत. पण ह्या विवाहाने वसाहतीत राजकीय उलथापालथ केली.

            कम्युनिस्ट पक्षाच्या कामात सहभागी झालेल्या एका तरूण व तरूणीची जवळीक झाली. त्यातून मैत्री वाढली. प्रेम झाले आणि एकमेकांना जीवनभर साथ देण्याच्या त्यांनी आणाभाका घेतल्या. नेहमी घडते तसेच हे होते.

            पण यात वेगळेपण म्हणजे प्रेम विवाहाचे रूपांतर विचार विवाहात करण्याचा झालेला प्रयत्न. प्रेमविवाह कसा करावा याचे धडे महाभारत कालापासून समाज गिरवत आला आहे. पण इथे या पारंपारिक पद्धतीला फाटा देऊन पक्ष नेतृत्वाने घरच्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.

            एके दिवशी पानसरे मुलीच्या घरी पोहोचले. त्यांनी कुटुंबियांचे तास दोन तास बौद्धिक घेतले. पण परिणाम शून्य. पक्षसदस्य असलेल्या आईने आपला आग्रह सोडला नाही. तेव्हा मुलीने पेच टाकला “आण्णांनी सांगितलं तर मी लग्नाचा विचार बदलीन.” तेव्हा मुलीची आई म्हणाली, “आण्णा तुम्ही सांगा मुलीला.”

पानसरे – मी काय सांगू तिला?

आई- हे लग्न करू नकोस!

पानसरे – ठीक आहे- पण का करू नकोस? मुलगा पोरीला सांभाळणार नाही?

आई – तसे नाही

पानसरे – मग तो व्यसनी आहे. पैसे मिळवत नाही, लबाड आहे, काय सांगू मी!

आई – यातील काहीही नाही. मुलगा व्यसनी नाही, तो कर्तृत्ववान आहे, तो फसवणार नाही. पण त्याची जात खालची आहे. म्हणून तो आम्हाला नको!

पानसरे- ते मी कसं सांगू? जातीवरून कोणाला कमी किंवा जास्त मानू नये हे मी आयुष्यभर भाषणात सांगत आलो, आणि आता जात बघून तू लग्न करावं असं मला कसं सांगता येईल?

            बैठक मोडली. मग सूत्रे तरूणांच्या हातात गेली त्यांनी पळापळी करून लग्न लावून दिले. परिणामी हितसंबंधी लोकांनी वसाहतच कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात उभी केली. पक्षाचा पाया उखडला.

            असा अनुभव पाठीशी असला तरी सामाजिक कार्यकर्त्यांनी हार मानली नाही. श्रमिक प्रतिष्ठान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व भारतीय महिला फेडरेशनचे कार्यकर्ते एकत्र आले त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना मदत करण्यासाठी कायदेशीर संस्था स्थापन करण्याचे ठरवले. कॉ.पानसरेंशी चर्चा केली, त्यांनी काही मौलिक सूचना केल्या; मोठ्या उत्साहात गुरूवार दि.5 ऑक्टोबर 2006 रोजी कोल्हापुरात आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्राचे उद्घाटन झाले.

            आपण आंतरधर्मीय दांपत्याचे अपत्य असल्याचे मोठ्या अभिमानाने सांगणार्‍या गिरीश फोंडेंची प्रमुखपदी निवड झाली.

            उद्घाटनासाठी रीतसर निमंत्रण पत्रिका छापल्या गेल्या. त्यावरील काही वाक्ये कार्याची दिशा दर्शवणारी आणि आमचे आदर्श कोण असतील ते स्पष्ट करत होती.

म.फुले म्हणतात –

‘ख्रिस्त महंमद मांग ब्राम्हणाशी। धरावे पोटाशी बंधुपरी॥’

            छत्रपती शाहू महाराजांचे नाव उठसूठ घेणार्‍यांना त्यांचे विचार ठाऊक असतातच असे नाही.

छ. शाहू महाराज म्हणतात –

“आमचे खरे महात्मा बादशहा अकबर शहा हेच आहेत, कारण त्याने स्वत: जोधाबाई नावाच्या रजपूत स्त्रीशी लग्न करून तिला हिंदूच राहू दिले. जी गोष्ट विसाव्या शतकात अशक्य झाली ती सतराव्या शतकात या मुस्लीम राजाने शक्य केली.”

            “या देशाची उन्नती लवकर किंवा उशिरा होणे, हे केवळ जातीभेद ज्या प्रमाणात नाहीसा होईल त्यावर अवलंबून आहे. हा जातीभेद नाहीसा होण्यास भिन्न भिन्न जातींचे संबंध विस्तृत प्रमाणावर होणे, फार जरूर आहे. रोटी व्यवहार आता जास्त प्रमाणावर होणारच, पण बेटी व्यवहाराची तशी गोष्ट नाही, असे विवाह होण्यातील कायदेशीर अडचणी दूर झाल्या पाहिजेत. (राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ पृ.849, 702)

डॉ.आंबेडकर म्हणतात- “आंतरजातीय सहभोजन करणार्‍या अनेक जाती आहेत; परंतु स्वजातीची जाणीव व वृत्ती ठार करण्यात सहभोजने यशस्वी ठरली नाहीत, असा सर्वांचा अनुभव आहे. आंतरजातीय विवाह हाच त्यावर खराखुरा तोडगा आहे, असे मला वाटते. रक्त संबंधांनेच आपुलकीची भावना निर्माण होते. पण या नातेसंबंधांच्या भावनेवाचून, विभक्तपणाची भावना कळसाला पोहोचून जातीने निर्माण केलेली परकेपणाची भावना कधीच नष्ट होणार नाही(जातीभेद निर्मूलन)

            उद्घाटन कार्यक्रमाची सुरवात आंतरजातीय विवाहाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत व स्त्री चळवळीच्या पुरोगामी समाजवादी कार्यकर्त्या रजिया पटेल होत्या, प्राचार्य सुनीलकुमार लवटे आणि अ‍ॅड.गोविंद पानसरेंची विशेष उपस्थिती होती.

            केंद्राला काही वेळा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. कोल्हापूरपासून दहा पंधरा किलोमीटरवर असलेल्या गावातील एका पाटलाच्या मुलाचे ढोर समाजाच्या मुलीशी प्रेम जुळले. विवाहोत्सुक तरूणाने आपल्या संस्थेशी संपर्क साधला. दोघांशी चर्चा केल्यावर कार्यकर्त्यांची त्यांच्याबाबत खात्री पटली. पुढची पायरी होती दोघांच्या पालकाशी बोलून त्यांना पटवण्याची. ही जबाबदारी पानसरेंच्यावर सोपवण्यात आली. पानसरे सांगायला आलेत म्हटल्यावर निम्मे यश पदरात पडले. उरलेले काम नियोजित वधुवरांनी केले. त्यांच्या हट्टापुढे दोन्ही बाजू नमल्या हा आंतरजातीय विवाह घरच्यांनी ठरवून, सर्व मानपान आणि रूढी, परंपरा सांभाळून, पाहुण्यारावळ्यांच्या साक्षीने मोठ्या थाटामाटात लावून दिला. हे यश फार मोठे होते. आज त्यांचा संसार सुखासमाधानाने ओतप्रोत भरलेला आहे.

            क्वचित का असेना पण समाजाच्या व कुटुंबियांच्या संमीतीनेही विवाह लावून देण्याच संस्थेला यश आले आहे. तर काही विवाह प्रसंगांचे वर्णन कल्पनेपेक्षा वास्तव भयानक असते याची खात्री पटवणारे आहेत.

            गेल्या वर्षी एक आंतरजातीय विवाह झाला. दोघेही सज्ञान, विचारी पण घरच्यांचा प्रखर विरोध असल्याने, त्यांना न कळू देता विवाह लावण्यात आला. आजही दोघे आपापल्या घरी राहताहेत, पण पालकांना त्यांच्या लग्नाचा पत्ताच नाही. हार्टचे पेशंट असलेले पालक, रागीट पालक, आईबापावर अवलंबून असलेले वधूवर अशा कारणामुळे पालकांना न सांगता विवाह केले जातात.

            एक आंतरजातीय विवाह लावून दिल्यानंतर एका महिन्याने मुलीच्या घरच्यांनी मुलीला गायब केले. महिनाभर कोंडून घातले. धाकदपटशा दाखवून मुलाच्या विरोधात आणि कार्यकर्त्यांच्या विरोधातही पोलीस केस करायला लावली. पुढे तीन महिन्यांनी मुलीला घटस्फोट घ्यायला लावला. इतका प्रखर विरोध काही केसेसमध्ये दिसतो. अत्यंत पराकोटीचा विरोध असूनही एकत्र येणारे वधूवर आहेत.

            एका केसमध्ये प्रेमसंबंधातून मुलीला दिवस गेले. विवाहाला घरचा विरोध होता. विवाह झाला नाही. तिला मुलगा झाला. घरच्यांनी बाळंतपण केले आणि मूल अनाथाश्रमात दिले. काही महिन्यांनी मुलीने पुन्हा प्रियकराशी संधान साधले. तिने पळून जाऊन विवाह केला. हा विवाह केंद्राने लावून दिला. लग्न झाल्यावर त्यांनी आपल्या प्रेमाची निशाणी असलेले मूल अनाथालयाकडे परत मागितले. पण तोपर्यंत ते मूल दत्तक गेले होते. त्याचा पत्ता अनाथाश्रमाने दिला नाही. मुलाची भेट काही झाली नाही.

            एक अंधांचा विवाह संस्थेने लावून दिला. ह्या आंतरजातीय विवाहला वृत्तपत्रांनी मोठी प्रसिद्धी दिली. “सहजीवनाच्या वाटेवरचे दृष्टिहिनांचे डोळस पाऊल”, “अंधांचा डोळस विवाह”, “डोळसांच्या डोळ्यात अंधांनी अंजन घातले.” अशा मथळ्याखाली विवाहाला पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली गेली. या निमित्ताने आंतरजातीय-आंतरधर्मिय विवाह होणे समाज ऐक्यासाठी कसे आवश्यक आहे, यावर वृत्तलेखकांनी प्रकाश टाकला.

            केंद्रासंबंधाची अधिक माहिती वार्तापत्राच्या वाचकांना उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही एक चर्चासत्र घेतले. त्यावेळी झालेली चर्चा पुढीलप्रमाणे-

अनिल चव्हाण : हे केंद्र सुरू करण्यामागे आपले उद्दिष्ट काय होते?

मेघा पानसरे : आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्राची स्थापना आम्ही 6 वर्षांपूर्वी केली. “जाती विरहित समाजाकडे वाटचाल” हे आमचे ब्रीद आहे. जातीव्यवस्था व धर्मभेद निर्मूलनासाठी समाजमन तयार करणे हे केंद्राचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे.

अनिल चव्हाण : दैनंदिन जीवनात आपल्याकडे कोणत्या समस्या येतात?

मेघा पानसरे : अनेक तरूण तरूणी प्रत्यक्ष विवाह, तसेच कायदेशीर सल्ला, विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशन, कुटुंबाशी संवाद, पोलीस ठाण्यातील कारवाई, त्यासाठी आधार-मदत. न्यायालयीन स्तरावरील लढाई अशा विविध बाबींसाठी संपर्क साधतात. जात धर्माच्या रूढीबाहेर जाऊन विवाह करण्याचा निर्णय तरूणांसाठी सहज आणि सोपा असत नाही. या प्रक्रियेत त्यांना अनेक अनेक मानसिक व भावनिक, तसेच सामाजिक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. अशा तरूणांना आधार देण्याचे कार्य केंद्र करते.

शिवाजी शिंदे : वेळेवर असा आधार मिळाला नाही तर तरूण मोडून पडतात. त्यातून आत्महत्याही घडतात.

            भारतीय घटनेने जात-धर्म-पंथ-लिंग-भाषा यावरील भेदभावास विरोध केला आहे. प्रत्येक सज्ञान नागरिकाला त्याचे जीवन स्वत:च्या इच्छेने जगण्याचा अधिकार आहे. त्यांनी विवाहासाठी हा अधिकार वापरला आणि रूढीच्या विरोधात आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाह करण्याचा प्रयत्न केला तर त्याला हिंसेला तोंड द्यावे लागते. छळ सोसावा लागतो. मग घटनेने दिलेल्या अधिकारांना काय अर्थ आहे?

अनिल चव्हाण : पण त्यासाठी शासकीय अधिकारी आहेत, पोलीस आहेत. घटनेतील तत्वांचे रक्षण करायची जबाबदारी तुम्ही का घेताय?

शिवाजी शिंदे : पोलीस खाते काही वेळा मदत करते. पण बहुतेक वेळा त्यांच्यापासूनच तरूण-तरूणींचे रक्षण करण्याची पाळी आमच्यावर येते.

अनिल चव्हाण : असे एखादे उदाहरण सांगाल?

स्नेहल कांबळे : एक का अनेक सांगता येतील. नुकतेच घडलेले सांगते. गडमुडशिंगीचा अक्षय माळी आणि वसगड्याची पूजा देसाई यांचे प्रेम जुळले. एकमेकांच्या संपर्कात ते तीन वर्षेहोते. जाती वेगवेगळ्या असल्याने त्यांच्यापुढे पेच होता. कुटुंबात समजले तेव्हा त्यांचा विरोध सुरू झाला. पण त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. सत्यशोधक समाजाच्या हॉलमध्ये त्यांचा विवाह संपन्न झाला.

अनिल चव्हाण : कधीची गोष्ट आहे ही?

गिरीश फोंडे : नुकतीच! म्हणजे गेल्या महिन्यातली. 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचा विवाह झाला. सत्यशोधक समाजाच्या हॉलमध्ये लग्न लावून दिले. घरच्यांच्या विरोधाला भिऊन दोघेही बाहेरगावी गेले.

शिवाजी शिंदे : बहुतेक वेळा लव्ह मॅरेज करणारे असेच करतात. थोडे दिवस झाले की, घरचे राग विसरतात, आणि माफ करतात.

मेघा पानसरे : पण इथं तसं झालं नाही. पूजाच्या घरच्यांनी मुलगी हरवल्याची तक्रार गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. 19 ऑगस्ट रोजी अक्षय आणि पूजा कोल्हापुरात आले. ते कळल्याबरोबर मुलीच्या घरच्यांनी दोघांना गाठले. जबरदस्तीने पूजाचे अपहरण केले.

अनिल चव्हाण : असं तुम्ही म्हणताय?

शिवाजी शिंदे : नाही. ही तक्रार अक्षय माळीनी पोलिसात केली. त्याला, त्याच्या कुटुंबियांना आणि पूजाला ठार मारण्याची  धमकी देण्यात आल्याचं त्यानं म्हटलंय! गांधीनगरच्या पोलिसांनी पूजा आणि अक्षयला संरक्षण देण्याऐवजी पूजाच्या कुटुंबियांना मदत केल्याचं अक्षयचं म्हणणं आहे. पोलीस मदत करत नाहीत हे दिसल्यावर शेवटी अक्षयने कोर्टाकडे धाव घेतली. 23 ऑगस्टला त्यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे आपल्या कायदेशीर पत्नीस परत आणण्यासाठी दाद मागितली. न्यायालयाने सर्च वॉरंट लागू केले. परंतु पोलिसांनी अद्याप पूजाला कोर्टात हजर केलेले नाही.

मेघा पानसरे : ही तक्रार पुन्हा आमच्याकडे आली. आम्ही मा.जिल्हापोलीस प्रमुखांची भेट घेतली. त्यांनी दूरध्वनीवरून गांधीनगर पोलिसांना पूजाचा शोध घेण्याचा आदेश दिला. तिला न्यायालयात हजर करायला सांगितले. पण काही उपयोग नाही.

            आजपर्यंत तरी पूजाला न्यायालयात हजर करण्यात

आलेले नाही.

अनिल चव्हाण : पण सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश दिले आहेत.

गिरीश फोंडे : होय! जातीबाहेर लग्न केल्यास नातेवाईकांचा विरोध असतो. कुटुंबियांना अप्रतिष्ठा होण्याची भीती वाटते. ते मुलींचा मानसिक, शारीरिक छळ करतात. हिंसा करतात. काही वेळा त्रासाला कंटाळून तरूण तरूणी आत्महत्येचा मार्ग शोधतात. अशा खोट्या प्रतिष्ठेपायी हत्या होऊ नयेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांनी तरूण तरूणींना संरक्षण द्यावे असे सांगितले आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही.

सतीशचंद्र कांबळे : पोलिसांची मानसिकता जातीव्यवस्था टिकवण्याची, पुरूषसत्ताक पद्धती टिकवण्याचीच असते. वरील केसमध्येही असेच झालेले आहे. म्हणून आम्ही नुकतेच(16 सप्टेंबर 2012)  रोजी मा.जिल्हा पोलीस प्रमुखांना पुढील मागण्यांचे निवेदन दिले आहे.

1) पूजा देसाई हिच्या जीवाला धोका असल्याने तिला पोलिसांनी ताबडतोब न्यायालयात हजर करावे. या संबंधीच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्फत व्हावी.

2) अक्षय व पूजा यांना संरक्षण देणार्‍या गांधीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी.

3) मा.जिल्हा पोलीस प्रमुखांनी सर्वच पोलीस ठाण्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह करणार्‍यांना संरक्षण देण्याचे आदेश द्यावे.

अनिल चव्हाण : तुम्ही लोकांच्यासाठी काही सांगाल काय?

सतीशचंद्र कांबळे : जनतेचे सहकार्य महत्वाचे आहे. भारतीय घटनेतील समानता, न्याय, स्वातंत्र्य यांच्या रक्षणासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून आम्ही लोकांना आवाहन करत आहोत.

1) व्यक्तीस्वातंत्र्य मानणार्‍या, जातीप्रथेला विरोध करणार्‍या सर्वच व्यक्तींनी अक्षय आणि पूजा यांना आणि या सारख्या इतरही तरूण तरूणींना मदत करण्यासाठी पुढे यावे.

2) हिंसेला बळी पडणार्‍या तरूण-तरूणींनी स्वत:ला एकटे न समजता, आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत.

3) आपल्या मित्र मैत्रिणींच्या बाबत अशा घटना घडत असल्यास केंद्रला कळवावे.

संत कबीर म्हणतात,

“जातिन पूछो साधू की, पूछ लिजिए ज्ञान।
मोल करो, तलवार का, पडा रहन दो म्यान॥

            याच धर्तीवर अनुरूप जोडप्यांनी जात पाहण्यापेक्षा गुण पाहावेत असे म्हणता येते.

            या चर्चेमध्ये कोल्हापूरचे इतर कार्यकर्ते- डॉ.मंजुश्री पवार, प्रा.सुधा पाटील, रमेश वडणगेकर, तनुजा शिपूरकर, अ‍ॅड.मिलिंद कदम, सचिन ओतारी, दिग्वीजय पाटील, रसिया पडळकर, उमेश सूर्यवंशी इ. सहभागी झाले. डॉ.मंजुश्री पवार यांनी विवाह संस्थेचा इतिहास सांगताना एकमेकांच्या संमतीने गांधर्व विवाह होत असत याचा दाखला दिला.

            संपर्क करणारे, अडचणीत आणणारे, केंद्राकडे येतात. पण त्याशिवाय केंद्राशी संबंधित असलेले कार्यकर्तेही बाहेर अशा विवाहांना मदत करतात. समाजाची मानसिकता तयार करण्यासाठी केंद्राचा वाटा मोठा आहे.

            केंद्राशी संबंधित असणारे अ‍ॅड.अजित चव्हाण आणि संतोष चव्हाण या बंधूंनी त्यांच्या भाच्याचा आंतरधर्मीय विवाह नुकताच लावून दिला. उंचापुरा गोरा पान आणि कुरळ्या केसांच्या भाच्यावर एक वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी फिदा झाली. तिने विवाहाचा आग्रह धरला. धर्म वेगळे असल्याने येणार्‍या अडचणींचा पाढा भाच्याने वाचला. पण उपयोग झाला नाही. तिने आपला मनोदय आपल्या घरी जाहीर केला. आईवडिलांनी तिला बदडून घरात डांबले. बाहेर जायची बंदी झाली. एके दिवशी संधी साधून ही प्रेमिका बाहेर पडली. तिने मिळेल त्या गाडीने कोल्हापूर गाठले. यापूर्वी तिची मुलाच्या मामांशी(अ‍ॅड.अजित चव्हाण) ओळख झालेलीच होती. त्यांनी तिची राहाण्याची सोय केली. त्याच दिवशी दोघांचे आईवडील उपस्थित नसताना लग्न लावून देण्यात आले. ही बातमी फोनने मुलीच्या घरी कळवण्यात आली. त्यांनी गल्लीतले शंभरच्यावर तरूण एकत्र करून 50 कि.मी. अंतरावर असलेल्या कोल्हापूरकडे कूच करण्याची तयारी चालू केली. तसा निरोप आल्याबरोबर इकडेही चव्हाण घराणी एकत्र आली. त्यांनी नातेवाईकही जमा केले. शेवटी मध्यस्थानी चर्चा-तडजोड करून ‘सैन्य’ ज्या त्या ठिकाणीच राहील याची खबरदारी घेतली. मध्ये काही दिवस गेले.

            मुलीकडच्यांनी व्यूहरचना वेगळी केली. त्यांनी माफ केल्याचा निरोप पाठवून भेटीला बोलावले.

            कोल्हापूरला निवडक ‘पथक’ भेटीला गेले. एक गाडी गावाबरोबर पेट्रोल पंपावर थांबली. एक गाडी मुलीच्या घरी पाठविण्यात आली. सोबत त्यांनी एक कन्नड समजणारा स्नेही नेला. घरी मुलाकडच्यांचे स्वागत करण्यात आले. आतल्या खोलीत सुरू असलेली गुप्त चर्चा कानावर पडत होती, पण तिचा अर्थ कळत नव्हता. अर्थ समजणार एक जणच कानात प्राण आणून ऐकत होता; त्याच्या हावभावावरून प्रकरण गंभीर असल्याचे इतरांना जाणवत होते.

            आतल्या खोलीत, पाहुण्यांचा समाचार घेऊ या, आणि मुलीला परत आणूया अशी चर्चा सुरू होती. त्यावर एकमत होत नव्हते. वाद वाढत होता. पण अचानक एका आजीने एंट्री केली. तिने कन्नडमध्येच सर्वांना झाडले. “झाले गेले विसरून जा. मुलीचा आनंद विचारात घ्या. आपली मुलगी काळजाचा तुकडा आहे, त्यासाठी राग गिळा.” असा तिच्या सांगण्याचा मतितार्थ होता.

            मग मात्र वातावरण निवळले. सर्वांची खात्री झाल्यावरच दुसर्‍या गाडीतील वयस्कर मंडळींना मुलीच्या घरी नेण्यात आले.

            मुलीच्या सुखासाठी सर्वांनी मान्यता दिल्यावर चर्चा पुन्हा लग्नावर आली. पूर्वीचे लग्न हिंदू पद्धतीने-ब्राम्हणेतर भटजीने लावले होते. आता पुन्हा मुहुर्त काढण्यात आला. लग्नाच्या पत्रिका छापण्यात आल्या. लग्नाचे सर्व विधी पूर्ण करून मित्र नातेवाईकांच्या साक्षीने पुन्हा लिंगायत धर्मानुसार लग्न झाले. आता सौजन्या शिरकोले आणि सनी मोहिते हे दांपत्य सुखात आहेत.

            व्यक्तीप्रमाणे काही संघटना या केंद्राच्या संपर्कात आहेत. ऑल इंडिया स्टुंडटस फेडरेशनचे कार्यकर्ते-नेते असलेले सुशील लाड आणि वैशाली यादव यांनी विवाहाचा निर्णय घेतला. दोन्ही घरच्यांचा विरोध असताना ए.आय.एस.एफ.च्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मदतीने मोठ्या उत्साहात विवाह संपन्न झाला. वधू वरांचे मातापिता किंवा कुटुंबीय यांच्या अनुपस्थितीत विवाह झाला. काही दिवसांनी कुटुंबियांनी सामावून घेतले.

            विवाह सहायता केंद्राची वाटचाल अशा रीतीने खाचखळग्यातून पण विकासाच्या दिशेने सुरू आहे. लोकमानस तयार करण्यासाठी तुमचे नियोजन काय आहे? या प्रश्नावर सतीशचंद्र कांबळेंनी सांगितले – “आता आम्ही वेबसाईट सुरू करणार आहोत. त्याची बरीचशी तयारी झाली आहे.” त्याशिवाय वृत्तपत्रातून लेख लिहिणे, कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी या विषयावर निबंध वक्तृत्व, वादविवाद, स्पर्धा घेणे, पोस्टर प्रदर्शन करणे, व्याख्याने आयोजित करणे, असा विवाह केलेल्यांचा मेळावा घेणे इ. उपक्रमासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

एकाच जातीत असो की आंतरजातीय असो, प्रेमविवाहाबद्दल लोकमत दूषित आहे असा एक सूर चर्चेमध्ये आला. तेव्हा राजेंद्र आसवेंनी गेल्या पिढीत विवाहबद्ध झालेल्या दोन जोडप्यांची साक्ष काढली. कुमार मंडपे आणि प्रमोदिनी सावंत यांच्या प्रेमविवाहास घरातून विरोध होता. रेखा आसबे आणि शरद शिंदे यांनी तर पळून जाऊन विवाह केला. त्यांनाही घरच्यांनी बराच काळ स्वीकारले नाही. त्यांचे संसार आज यशस्वी झाले आहेत.

            सुमारे तीस वर्षांपूर्वी इंटरकास्ट विवाह केलेल्या सौ.कु.र.शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, “आम्हाला अत्यंत त्रास झाला; पण प्रत्येक समाजात काही चांगल्या व्यक्तीही असतात. त्यांच्या मदतीमुळे अडचणीवर मात करता येते. अशा चांगल्या व्यक्तींची संख्या वाढवणे, असलेल्यांना संघटीत करून कार्यात आणणे, हे काम करण्याची गरज आहे. सौ.शिंदे विद्यापीठ हायस्कूलमध्ये सहाय्यक शिक्षिका आहेत. त्यांनी अडचणींवर मात करून मुलाला आणि मुलीला शिकवून डॉक्टर केले, दोघांचे विवाह केले. आता त्यांच्या मांडीवर तिसरी पिढी खेळत आहे. हे सांगितल्यावर कॉम्रेड पानसरे म्हणाले, ही पिढी मोठी होईल तेव्हा अशा केंद्रांची गरज लागू नये, यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करण्याची गरज आहे. “आणि हे प्रयत्न समाजाशी जिवंत संबंध असलेल्या कार्यकर्त्यांनी करावेत, व्यवहाराशी सांगड घालूत तारतम्याने समस्या सोडवाव्यात.” असा सल्ला कॉ.दिलीप पवार यांनी दिला.

            हा केवळ जातीभेदापुरता मर्यादित प्रश्न नाही. प्रेमविवाह अगदी जातीत किंवा नात्यात करणार्‍यांकडेही समाज  कुत्सितपणे पाहतो. पालक असा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करतात. प्रकरणे मारहाण आणि आत्महत्येपर्यंत जातात.

            देशाचे राज्य कोणी करावे हे ठरवण्याचा-मताचा-अधिकार 18 वर्षांवरील तरूण-तरूणींना दिला आहे. पण त्यांचा स्वत:चा विवाह ठरविण्याचा अधिकार पालक त्यांना देत नाहीत.

            मुलांच्या सुखासाठी पालक जात, घराणे, पैसा, प्रतिष्ठा पाहून लग्ने ठरवतात. जोडीदार पसंत नसताना मनाविरूद्ध लग्न लावले तर त्यांना रडत-कुडत-भांडत आयुष्य काढावे लागते. त्यांना मानसिक समाधान असत नाही. पालकांनी याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

अनिल चव्हाण, कोल्हापूर