गॅलिलिओने त्याची दुर्बिण चंद्राकडे रोखली ते साल होते इ.स.1609. त्याने केलेल्या ग्रहगोलांच्या निरिक्षणातून कोपर्निकसने मांडलेल्या सूर्यकेंद्री सिद्धांताला भक्कम पुरावे मिळाले. निरिक्षणे घ्यावीत व पुरावे मिळवावेत हा विज्ञानाच्या पद्धतीचा महत्वाचा निकष आहे. गॅलिलिओनंतर न्यूटनने त्याचे विख्यात गतीचे नियम व गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. या नियमाच्या आधारे सुर्याभोवती पृथ्वी व इतर ग्रह लंबवर्तुळाकार मार्गाने फिरतात हे केपलरने निरीक्षण गणिताने सिद्ध केले. एखाद्या गृहितावरून तार्किक पद्धतीने निष्कर्ष काढावेत व ते पडताळून पहावेत ही विज्ञानाची पद्धत गॅलिलिओ व न्यूटन यांनी सिद्ध केली. म्हणून त्यांना विज्ञानाचे जनक म्हणतात. 17 व्या शतकापासून विज्ञानाच्या क्षेत्रात नवनव्या संशोधनाला गती मिळाली व पूर्वापार चुकीच्या समजुतींना छेद बसू लागला. खगोल विज्ञानाच्या बाबतीत व भौतिक विज्ञानाच्या बाबतीत सुरू झालेली ही क्रांती जीवविज्ञान, शरीरविज्ञान व औषधविज्ञान यांनासुद्धा लावली जाऊ लागली. त्यातूनच आरोग्यविज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन होऊ लागले व एकेकाळी विविध समाजात प्रचलित असलेल्या चुकीच्या उपचारांचे धोके उघड होत गेले. भौतिक विज्ञानाचा प्रवास जसा वेदनादायी व संघर्षमय तसाच आरोग्य विज्ञानाचा प्रवासही वेदनादायी आहे. आज आरोग्यविज्ञानात मान्यता पावलेली नैधानिक चाचणी सुखासुखी मान्यता पावलेली नाही. त्यासाठी अनेकांना झगडावे लागले आहे. चुकीचे किंवा फसवे उपचार व मान्यताप्राप्त खात्रीशीर उपचार यांच्यातील संघर्ष समजून घेणे आवश्यक आहे.
ब्लडलेटींग(रक्तमोक्षण)
ब्लडलेटींग हा एकेकाळी मान्यता पावलेला उपचार पण तो कसा विश्वसनीय नाही हे समजायला एक शतक जावे लागले. या चुकीच्या उपचाराने कित्येक जणांचे बळी घेतले. या बळीमध्ये एक अतिमहत्वाची व्यक्ती होती ती म्हणजे अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन.
ब्लडलेटींग म्हणजे रोग बरा करण्यासाठी शरीरातील रक्त बाहेर काढणे किंवा वाहू देणे अर्थात रक्तमोक्षण. रक्त काढल्यामुळे अनेक आजार बरे होतात अशी समजूत होती. ब्लडलेटींगचा मोठ्या प्रमाणातील वापर हा प्राचीन ग्रीसमध्ये सुरू झाला. ग्रीक तज्ञांच्या मते शरीर रोगग्रस्त होण्यास कारण म्हणजे, त्यातील चार द्रवामधील बिघडलेले संतुलन होय. रक्त, पिवळ्या पित्त, काळे पित्त व कफ असे हे चार द्रव ग्रीकांनी सांगितले. आधुनिक संशोधनात काळ्या पित्ताला पुरावा नाही. पण बाकीच्या तीन द्रव्यांना पुरावा आहे. या द्रव्यांच्या असंतुलनामुळे केवळ शारीरिक आजार होतात असे नव्हे तर व्यक्तीच्या स्वभावावरही त्याचा परिणाम होतो असे ग्रीक विचारवंत मानीत. रक्त हा आशावादी स्वभावाचे कारण तर पिवळे पित्तामुळे स्वभाव तापट बनतो, काळे पित्त हे उदासीनतेकडे नेते तर कफामुळे जडपणा किंवा आळशी स्वभाव बनतो. अशी त्यांची समजूत होती.
एकवेळ अज्ञान परवडले पण चुकीची समजूत किंवा चुकीचा उपाय जीवघेणा ठरू शकतो. जॉर्ज वॉशिंग्टन यांना ब्लड-लेटींगमुळे प्राणास मुकावे लागले. शरीरातील रक्त बाहेर काढण्याच्या अतिरेकामुळे वॉशिंग्टन प्राणास मुकले. ब्लड लेटींगची सुरवात ग्रीक काळातच झाली होती. ग्रीकांनी अनेक क्षेत्रात मूल्यवान संशोधन केले होते. परिणामी त्यांच्या विचाराचा पगडा संपूर्ण युरोपवर पडला व ग्रीकांची प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याची पुढील अनेक शतके युरोपीयन लोकांना सवय लागून गेली. मध्ययुगीन काळात ब्लड-लेटींगचे उपचार मंक करीत. पण 1193 मध्ये पोपने यावर बंदी घातली. मग हा व्यवसाय न्हाव्यांच्या हातात गेला. काहीजण जळवांचा वापर करू लागले. जास्त रक्त काढण्यासाठी जळूच्या मागे काप घेण्याचे तंत्र निघाले. शोषलेले रक्त कापातून बाहेर वाहू लागते. पुढेपुढे ब्लड लेटींगचे तंत्र युरोपमधील डॉक्टरही वापरू लागले. सोळाव्या शतकात फ्रान्समध्ये राजदरबारी ब्लडलेटींगचा उपचार रूढ होता. युरोपातील गोरे लोक अमेरिकेत गेल्यावर ब्लड लेटींग अमेरिकेतही सुरू झाले. अमेरिकेतील डॉक्टर व युरोपमधील इस्पितळे व विद्यापीठे येथे सर्वप्रकारच्या आजारावर ब्लडलेटींगचा उपचार रूढ झाला. 1799 मध्ये या तंत्राने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावर हा उपचार केला गेला. आणि नव्या वादाला तोंड फुटले. ब्लड लेटींग हा माणसांना वाचवणारा उपचार की, त्याला थडग्याकडे नेणारा उपाय असा तो वाद होता.
13 डिसेंबर 1999 ला या वादाची सुरवात झाली. या दिवशी जॉर्ज वॉशिंग्टनला सर्दीची लक्षणे दिसू लागली. जेव्हा त्यांच्या स्वीय सहाय्यकाने वॉशिंग्टनना औषध घेण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले, “तुला माहीत आहे की, मी सर्दीवर औषध घेत नाही.” ती जशी आली तशी ती आपोआप जाईल.
67 वर्षांचे जॉर्ज वॉशिंग्टन यांना चोंदलेले नाक व खवखवणारा घसा याबाबत काळजी करण्याचे कारण नाही असे वाटणे स्वाभाविक होते कारण या अगोदर अशा आजारापेक्षाही अधिक गंभीर प्रकारच्या आजारांनी त्यांना पछाडले होते व त्यातून ते बरेही झाले होते. किशोरवयात त्यांना देवीचा आजार झाला. क्षयानेही त्यांना गाठले होते. डासांनी भरलेल्या व्हर्जिनिया राज्यात सर्व्हेअर म्हणून काम करताना त्यांना मलेरिया पण झाला होता. नंतर 1755 मध्ये युद्धात सहभागी असताना ते बचावले होते पण ज्या घोड्यावर ते बसले होते ती दोन घोडी गोळीबारात ठार झाली होती. त्यांना न्युमोनिया पण झाला. पुन्हा मलेरियाने गाठले व पार्श्वभागात झालेल्या करटाने ते 6 आठवडे काम करू शकले नाहीत. पण विचित्र गोष्ट अशी की, अनेक युद्धात व गंभीर आजाराशी यशस्वी झुंज देत आलेल्या ह्या शूराला सर्दीसारखा साधा आजार ज्याची शुक्रवारी 13 डिसेंबरला सुरवात झाली होती तो जीवघेणा ठरला हे कसे? याचे कारण होते वॉशिंग्टनवर झालेला ब्लडलेटींगचा अज्ञानमूलक उपचार.
पुढच्या दिवशी त्यांची तब्येत अधिकच बिघडली. त्यांना श्वास घेणे कठीण झाले. औषध घशाखाली जाईनासे झाले. मग वॉशिंग्टनच्या इस्टेटीचा मॅनेजर अल्बिन रॉलिन्स याने ब्लडलेटींचा उपाय सुरू केला. धारदार सुरीने वॉशिंग्टनच्या हाताच्या शिरेवर जखम करून एक तृतियांश लिटर रक्त बाहेर काढले. सकाळ उजाडली आजारात उतार दिसेना मग तीन डॉक्टरांचे पथक दाखल झाले. त्यामध्ये डॉ.क्रेक हा वॉशिंग्टनचा वैयक्तिक डॉक्टर होता. डॉ. क्रेकनी वॉशिंग्टनच्या घशाला बाहेरून एक मलम चोळले त्याचाही परिणाम झाला नाही. मग क्रेकनी ब्लडलेटींचा उपाय सुरू केला व वॉशिंग्टनच्या शरीरातून अर्धा लिटर रक्त काढले.
सकाळी 11 वाजता पुन्हा अर्धा लिटर रक्त काढले. माणसाच्या शरीरात पाच लिटर रक्त असते. यातील बराच मोठा भाग आतापर्यंत काढला गेला. दुपारी पुन्हा एक लिटर रक्त क्रेकनी काढून टाकले. पुढच्या काही तासात वॉशिंग्टनला आराम पडला पण तात्पुरताच. संध्याकाळी त्यांची तब्येत पुन्हा बिघडली! आणि डॉक्टरांनी त्यांचे पुन्हा रक्त काढले. पण यावेळी रक्त घट्ट होते. आधुनिक ज्ञानानुसार वॉशिंग्टनच्या शरीराचे डीहायड्रेशन झालं होतं. त्या रात्री 10 वाजता वॉशिंग्टनचा मृत्यू झाला.

शरीरातील निम्मे रक्त एका दिवसात काढणे या प्रकारच्या उपचाराबद्दल मेडिकल क्षेत्रातील काही मंडळींनी शंका घ्यायला सुरवात केली. या मंडळींच्या मते डॉ. क्रेक आणि त्यांचे सहकारी यांनी वॉशिग्टनच्या शरीरातून रक्त काढून त्यांना अक्षरश: मरणाच्या दारात ढकलले.
मग खरं कोण? ज्याने वॉशिंग्टनला वाचविण्याची शर्थ केली ते डॉ.क्रेक की शंकेखोर डॉक्टर ज्यांना ब्लडलेटींग हा वेडेपणाचा उपचार वाटत होता?
योगयोगाने ज्या दिवशी म्हणजे 14 डिसेंबर 1709 या दिवशी वॉशिंग्टन वारला, त्याच दिवशी ब्लडलेटींग रोग्याला धोकेदायक की उपकारक या विषयावर कोर्टात सुनावणी चालू होती. हा खटला विल्यम कॉलेट या इंग्लिश वृत्तपत्र वार्ताहराने (जो फिलाडेल्फियाचा रहिवाशी होता) लिहिलेल्या एका लेखावर आधारीत होता, ज्यामध्ये ब्लडलेटींगचे मोठ्या अभिनिवेशाने कट्टर पुरस्कार करणारा प्रख्यात डॉ. बेंजमिन रश (Benjamin Rush) यास प्रतिवादी करण्यात आले होते. बेंजामीन रश हा वैद्यकीय क्षेत्राबरोबर इतर अनेक क्षेत्रात कार्यरत होता व त्याच्या या विविध कार्याबद्दल कॉलेटला कुतुहल होते.
डॉ.रश हा मेडिकल राजकीय व विज्ञान क्षेत्रातील बडीआसामी. 85 ग्रंथ प्रकाशित करणारा रश अमेरिकेच्या स्वातंत्र्यांच्या जाहीरनाम्यावर सही करणार्यापैकी एक होता. डॉ.रश फिलाडेल्फियामधील हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करीत होता व तेथील मेडिकल स्कूलमध्ये अध्यापक होता. त्याच्या कार्यकालात त्याच्या हाताखालून अमेरिकेतील एकूण डॉक्टरांच्या 3/4 डॉक्टर शिकून तयार झाले. वैद्यकीय क्षेत्रातील त्याच्या कामगिरीबद्दल वॉशिंग्टन शहरात त्याचा पुतळा उभा करून त्याचा सन्मान केला गेला. त्याने एका संपूर्ण डॉक्टर पिढीला ब्लडलेटींगचे तंत्र शिकविले. त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये जॉर्ज वॉशिंग्टनवर उपचार करणार्या डॉ. क्रेक व त्याचे दोन सहकारी या तिघांचाही समावेश होता. पण?
महान व्यक्ती चुकतच नाही हे खरे नाही. म्हणून व्यक्तीची श्रेष्ठता हा सत्यांचा एकमेव निकष नाही. सत्यांबद्दल आशंका उपस्थित झाली तर व्यक्तीमहात्म्य बाजूला ठेवून पडताळा घेणे ही विज्ञानाची पद्धत आहे. याच कारणाने डॉ. रश यास कोर्टात प्रतिवादी करण्यात आले.
डॉ. रश ब्लडलेटींगचे समर्थन करीत. पिवळ्या तापाच्या साथीच्या वेळी धडाकेबाज मोहीम आखून त्याने एका दिवसात शंभर शंभर रोग्यांच्या अंगातून रक्त काढण्याचे उपचार केले. परिसर रक्ताच्या दुर्गंधीने भरून जाई त्यावर माशांचा थवा बसे. वार्ताहर विल्यम कोबेट हा वैद्यकीय क्षेत्रातील चुकांचा शोध घेणारा पत्रकार होता. मृत्यू पावलेल्या रोग्यांचे रिपोर्ट तपासून त्याची खात्री पटली की, डॉ. रशचे ब्लड-लेटींगचे तंत्र रोग्यांच्या मृत्यूस कारण असावे. त्याने आपला आरोप वृत्तपत्रात प्रसिद्ध केला. या आरोपाला उत्तर म्हणून डॉ. रश यांनी कोबेटच्या विरोधात खटला दाखल केला.
विचाराची बाब अशी की, सत्य एक असते. तर कोर्टाचा निर्णय कधी कधी विरूद्ध येऊ शकतो. साक्षी, पुरावे व अन्य घटक निकालावर परिणाम करतात. ज्युरीने कोबेटच्या विरोधात निकाल दिला आणि रशला निर्दोष म्हणून जाहीर केले. पुरावे मिळवण्यात कोबेट कमी पडला.
उदाहरणार्थ साक्षीदार म्हणून आलेले तीनही डॉक्टर्स डॉ. रशच्या उपचारपद्धतीचे समर्थक होते. शिवाय युक्तीवाद करणार्या सात बड्या वकीलांचा युक्तीवाद पुराव्यापेक्षा अधिक प्रभावी ठरला. संपत्ती व प्रसिद्धी यांच्या सामर्थ्यामुळे रशने शहरातील नामांकित वकील केससाठी निवडले होते. त्यामुळे ही लढाई कोबेटसाठी अतिशय अवघड होती. यात भर पडली ती ज्युरीच्या मताची. कारण कोबेट हा काही डॉक्टर नव्हता. व रश हा अमेरिकन औषध क्षेत्रातील दादा होता. साहजिकच ज्युरीचे मत रशच्या बाजूला झुकणारे होणारच.
त्यामुळे हा खटला रशने जिंकला. यात आश्चर्य वाटायला नको. कोबेटने रशला 5000 डॉलर्स नुकसानभरपाई द्यावी असा कोर्टाचा हुकूम झाला. पॅनासिल्व्हानिया कोर्टाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी रक्कम होती. अशा तर्हेने ज्यावेळी जॉर्ज वॉशिंग्टन ब्लडलेटींगच्या उपचारामुळे मृत्यूच्या खाईत ढकलला जात होता त्याचवेळी कोर्ट ब्लडलेटींगच्या बाजूने निकाल देत होते व हा उपचार योग्य आहे असे त्याचे समर्थन करीत होते.
सत्यशोधनाचा प्रवास किती अवघड असतो? सूर्य स्थिर आहे व पृथ्वी त्याच्या भोवती फिरते या सत्याला पुरावा देणार्या गॅलिलिओला ख्रिस्ती धर्मपीठाने आजन्म नजरकैदेची शिक्षा सुनावली. ब्लडलेटींग जीवघेणे आहे असे सांगणार्या कोबेटने रशला 5000 डॉलर्स नुकसानभरपाई द्यावी असा कोर्टाने हुकूम केला. कोबेट हा इंग्लंडमधून अमेरिकेत आलेला म्हणजे उपरा होता. तर रश हा स्थानिक राष्ट्रीय हिरो होता. रशचं पारडं जड होतं. म्हणून असत्याचा विजय झाला.
ब्लडलेटींगचे महत्व किती याबाबत कोर्टाच्या निर्णयापेक्षा वस्तुनिष्ठ चाचण्या महत्वाच्या ठरतात. आणि तसेच घडत होते. अटलांटिक महासागराच्या पल्याड युरोपमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील वस्तुनिष्ठ चाचण्यांचे प्रयोग सुरू झाले होते. सुरवातीला या चाचण्या नाविकांच्या होणार्या आजारावरील क्रांतीकारी नवीन उपचार अशा स्वरूपात होते व नंतर ह्या चाचण्या ब्लडलेटींगसारख्या जुन्या उपचारातही लावल्या गेल्या आणि अखेरीस या वस्तुनिष्ठ चाचण्या सर्व आधुनिक मेडिकल उपचार व पर्यायी उपचार पद्धतींनाही लावल्या गेल्या. त्यामुळे उपचार योग्य की, अयोग्य याचा खात्रीशीर निर्णय करणे शक्य झाले. या कारणांनी ब्लडलेटींग हा फसवा उपचार आहे हे खात्रीशीरपणे सिद्ध झाले व हा घातक उपचार वैद्यकीय क्षेत्रातून हद्दपार झाला. कसा त्याची माहिती पुढील लेखात.
प्रा. प. रा. आर्डे