चैत्रपाडव्याचं रखरखीत उन. वारा घुमा. वाटा निर्जन. झाडं चुळबुळायची थांबलेली. झुडुपं नुसतीच सापळा सांभाळून उभी. अशा भगभगीत दुपारी मी आंब्याच्या झाडाखाली विश्राम करीत होतो. आंब्याच्या गोंडस फळांचं रूपांतर संख्येत होऊन लागलेलं. अशातच निकमांचा काळू कावळ्यासारखा झपकन् जवळ आला अन् धापा टाकीत कर्कशपणे म्हणाला, ‘काका…ऽऽ… काका…. तिकडं म्हादेवाच्या मंदिराकडं जुळण…. हाये…. जुळण. गोरे काकूनं बोलीवेलंय तुम्हाला….’
गोरे काकूचं नाव ऐकताच माझ्यातील जोम, शक्ती, उत्साह वाढला. मन सुगंधी झालं अन् मी मंदिराकडे जाण्यासाठी एकदम उतावीळ झालो. गेल्या कित्येक दिवसांपासून असा योग जुळवण्याचे माझे प्रयत्न होते. त्याला यशाचे घुमारे फुटल्याने मला अतीप्रसन्न वाटू लागले होते. परंतु काळूचा कर्कश आवाज अन् गोरेकाकूंचं नाव ऐकून आमचं झोपलेलं घर खडबडून जागं झालं. अन् युद्धावर निघाल्यासारखं झटक्यात बाहेर आलं. तेवढ्यात काळू पुन्हा आमच्या घराला म्हणाला, “काकू…. तिकडं मंदिराकडं जुळण… हाये…. जुळण. गोरे काकूनं बोलीवलंय काकाला….’
गोरे काकूचं नाव ऐकताच बायकोने माझ्यावर नजर रोखली. तसा मला भयानक वादळ आल्याचा भास झाला अन् वीज कडालल्यासारखी क्षणात ती म्हणाली,
‘काई नाही हो… जाऊ नका तिकडे….’
बायकोने दिलेल्या तंबीतून गोरेंच्या नावाचा करिश्मा मला लगेच जाणवला. गोरे हा मजेचा भाग असला तरी आलेल्या वादळापुढे मी एकदम असा गप्पगार झालो होतो. उगाचच वादळाची परीक्षा घेऊ नये म्हणून मी निमूटपणे डोळे मिटले अन् मांजरीसारखा कानोसा घेत पुन्हा खाटेवर विसावलो. तेव्हा कुठे आमच्या घराची म्हणजे वास्तूची शांती झाली. काही वेळानंतर वार्याची झुळूक आली अन् सावली जराशी हलल्याचा भास झाल्याने मी डोळे उघडले. तेव्हा आमची साडेचार फुटाची वास्तू भोपळ्याच्या गोष्टीसारखी टुणूक…. टुणूक करीत पुढे झाली होती.
माझ्यासारख्या सेवाभावी माणसाची अशी फरफट झाल्यामुळे आंब्याचा अवघा हिशेब मी चुलाण्यात घातला होता. गोर्या बाईशी हितगुज करण्याची अशी नामी संधी वाया गेल्याने माझ्या मनाचा नुसता जळफळाट चालला होता.
अशातच मंदिराजवळ जमलेल्या बायका जुळण पाहताना काय काय कोट्या करीत असतील. कोण कुणाला कशा कोपरखळ्या मारीत असेल. कुणी दुपारच्या झोपेशी काडीमोड करून आल्या असतील. काहींच्या झिंज्या-बिंज्या अस्ताव्यस्त असतील. आणि मांजरीच्या मिशांसारखी बटा कानाशी अडकविणारी ती बँकेतील ठुमरी तर सर्वात पुढे असेल. अशा झग्यातून झगमग वावरणार्या विविधांगी बायकांचं वर्णन मी मनोमन रंगवित होतो. तेवढ्यात माझ्या पुढ्यातून दोन अनोळखी तरूण पुढे झाले. त्यापैकी एक म्हणाला, “ह्ये तर काहीच नाही. म्या धामणीचं पाहिलंय. काय जोश होता त्यांच्यात. दोन तास खेळत होते ते….”
तसा दुसरा म्हणाला, “हाओ नं…. अशीन तं काय…. हा मिठामिठीचा खेळ तासापासून पाहूनच र्हायलो नं मी… नई तं आपला नुसताच रामराम र्हायते अन् लागलीच लाईट लागते…”
अशी ही दोन तासाची गोष्ट ऐकल्यावर माझ्या मनी गोरे बाईंचा पियानो सा….रे….ग….म… करू लागला. अन् तशाने माझ्या पुढील अंगातून उत्साहवर्धक लहरींचं वहन सुरू झालं. पण ही गोरे बाई आपल्या नजर के सामने अन् जिगर के पास असली तरी आपल्या घराची फिगर देखील काही कमी नाही. तिकडे नुसते डोळे बटाट्यासारखे झाले तरी आपल्या कपाळी टराटरा घाम फुटतो.
अशाप्रकारे सगळ्या येडबडीचा अन् भानगडीचा विचार करीत रांडक्या-मुंडक्या पांढर्याफाक आभाळाकडे पाहत खाटेवर आडवा झालो. आंब्याचा सगळा हिशोब मी आधीच चुलाण्यात घातला होता. अन् तशानं मला एकदम विधवा झाल्यासारखं वाटू लागलं. त्या एकांतवासात माझ्या मनाची एकूणच घुसमट चाललेली असतानाच समोरून आमचं घर बर्फावरून चालल्या सारखं लगालगा येत होतं. त्यांच्या जीवाचा घाबरा उडाल्यासारखं वाटत होतं. सारं अवसान पाहून माझा मीच भीतीने गांगारलो अन् मनातच म्हणालो, “च्यायला… जनावर डसलं-बिसलं का काय एखाद्याला. जुळण पाहता पाहता कुणी दगुड-बिगुड मारला आसंल. नुसत्या पोरासोरांनाच काय नावं ठेवावीत. बायका बी काय कमी वांड नसत्यात.”
अशा प्रकारे माझ्या मनातला विचार फुटेपर्यंत आमचा भोपळा जरासा घराजवळ आला होता. त्यांची चालण्याची गती जरा कमी झाली होती. जवळ कुणी पोरसोर अन् माणूस-काणूस नसल्याने आपणच कोंडीत सापडल्याची भावना मनात आली. तसा मी उगाचच आपुलकी दाखवीत पुढे झालो नि म्हणालो, “असं येडबडल्यासारखं धावायला काय झालं. असं धावल्यानं झग्यातलं सगळं गबाळ उघडं पडल्यासारखं वाटतं…” आणि बोलणं थांबवीत मी जागीच उभा झालो. तसा डावा मुरका मारीत तिकडून आवाज फुटला.
“आवो… चला ना लवकर… बघा ना… नाग-नागिण हाये ते….”
मी म्हणालो, “तुम्हाला कसं समजलं. नाग-नागिण हाये ते….?”
“तुमचं ग्यान ठेवा हो तुमच्याजवळ. दोघं किती मोठे हायेत ते बघा. असले हायेत मनगटासारखे….”
आणि बायकोचा हात दंडावर असल्याचं पाहून मला हसू आलं अन् मी पुढं बोलणार तोच ती म्हणाली, “कसं दिसतंय ते… वडाच्या पारूंब्यासारखं. चला ओ चला… त्या सापवाल्याला फोन करा.”
“सापवाला म्हणजे काय रंगवाला, काचवाला असं दुकान-बिकान टाकून बसल्यागत हाये काय. नोकरदार माणसं असतात ती. सेवेचं काम करतात बिचारे…”
अशी नाटकातील पात्रांसारखी वैचारिक देवाण-घेवाण आमच्यात चालली होती. परंतु ही चर्चा मी फारशी मनाने करीत नव्हतो. कारण गोरेकाकूंनी माझं मन अगदी गुळांब्यासारखं गोड केलेलं होतं. परंतु हे हापूस आंब्यासारखं गोडाधोडाचं सुख. माझ्या टरबुजी मुखावर दिसू नये म्हणून मी उगाचच वैतागल्यासारखा करीत, कपाळी शंभर आढ्या पाडीत चपलात पाय सरकवीत पुढं झालो.
जरासा बाहेर रस्त्यावर आलो. तशा दोन-तीन महिला परतीला येताना दिसल्या. त्यात एक पांढर्या झग्यावाली होती. दुरून ती कापसाची गाठ बांधल्यासारखी चौकोनी दिसत होती. तिला पाहून मी खालमानेनं पुढे झालो. तेवढ्यात त्यातील एक म्हणाली, “येतोय का सर्पमित्र…”
तसा मी मनोमन हसलो,
हे जरा शिकलं सवरलेलं दिसतंय. कारण कुठे तो सापवाला आणि कुठे हा सर्पमित्र.
तेवढ्यात दुसरी म्हणाली, “खूप मोठी जुळण आहे हो…’ आणि तिने गोलाकार हात करीत चांगला आठ-दहा फुटांचा पिसारा करून दाखवला. तशी माझी पावलं बिगीनं पडू लागली.
आम्ही दोघेही मंदिराजवळून जरा पुढे झालो. तिथे जत्रा-यात्रात रेवड्या-गुडीशेव वाटताना सभोवती गर्दी होते तशी जुळण बघायला झुंबड उडाली होती. पण दहा बारा फुटांपेक्षा पुढे जाण्याची छाती कुणी करीत नव्हतं. मला वाटलं आपणही चार-चौघांसारखी नुसतीच गंमत पहावी. तर ते जुळण-बिळण काही नव्हतं. सगळं संपलं होतं. दोघे दोन तोंडाला हलकान झाल्यासारखे निपचित पडून होते. त्यांना पाहून मी दयेच्या स्वरात म्हणालो, “दमले असतील बिचारे…”

दोन्ही नर-मादी साधारण अडीच-तीन फूट अन् अंगठ्यापेक्षा जरा अधिक जाडीचे होते. पण त्यांचा केवढा गाजावाजा. कुणी म्हणे हात सव्वा हात. तर कुणीतरी म्हणालं होतं दोन हातभर. आमच्या बाईचं दंडाएवढं मनगट. अन् एक बाई तर आठ फुट म्हणाली होती. नंतर मी तिला विचारलं, “तुमच्याकडे सहा इंचाला फुटभर म्हणतात काय?” तर ती म्हणाली, “मी एकाचे चार अन् दुसर्याचे चार अशी आठ फुटाची जुळण म्हणाले होते.”
मी म्हणालो, “कमालच हाये तुमची. अन् बाई चांगली शिकल्यासवरल्या घरातील हो… पण शहापणपणा असा वाया गेलेला.”
तेवढ्यात तिकडे जराशी हालचाल झाली तसा मी म्हणालो, “आता जातील ते… चला गर्दी कमी करा…”
अशातच एक महिला नुकतीच आमच्यापुढे सरकली अन् नमस्कार करीत म्हणाली, “द्येवा… शंकरा… आत्ताआताच म्हाशिवरात्र झाली ना बाबा… अन् आज सोम्मार. बरं रे दर्शन धिलं सोम्मारचं.” आणि शंकराच्या मंदिराकडे हात जोडीत ती पुन्हा म्हणाली, “द्येवा… म्हादेवा.. आता घे यांना पुना गळ्यात…”
शेजारी तिची मैत्रिण उभी होती. दोनचारदा तिनेही नमस्कार केला अन् म्हणाली, “द्येवा…. परमेश्वरा… तुच रखवाला हाये बाबा आमच्या कॉलनीचा. सांभाळ बाबा सगळ्यांना.”
अशातच कुणीतरी म्हणालं, “पाया पडा पाया… त्यांच्या पाया पडा. जातील निघून आपोआप.”
आवाजाचा कानोसा घेऊन काळूनं बगळ्यासारखी मान उंचावली अन् काहीसा हसतच म्हणाला, “च्यायला…. सापाला पाय असत्यात व्हयं… अन् हे कोन हुषार म्हणतंय पाया पडा..? डोकं म्हणावं की खोबरं. बोलून चालून जनावरच त्ये. त्याला काय कळतोय नमस्कार….”
अशाच पद्धतीने इतर काहीजण बोलत होते. डोकं नसल्यासारखे पाया पडत होते. माझी नजर सर्वत्र भिरभिरत होती. गोर्याबाईला पाहत होती. अखेरीस डोळ्यातलं पाणी आटलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की, गोरेबाई लगबगीनं गेल्यामुळेच आपलं घर इतकं धावत-पळत आलं होतं.
अशा प्रकारे चैत्रपाडव्यालाच माझं चैत्रफुल झालं. एप्रिलफुल सारखं.
अशा त्या घायाळ अवस्थेत तिथे मी नुसताच शरीराने उभा होतो. मला त्या सर्पांना पाहण्यात आणि सर्पमित्रांना बोलविण्यात कोणताही आनंद राहिला नव्हता. कुणाशी बोलण्यातही मला फारसा रस वाटत नव्हता. अशा एकूणच परिस्थितीत माझे तिकडे लक्ष नसल्याचे पाहून काही महिला जुळणाला घालविण्याचा प्रयत्न करीत होत्या. एक महिला त्यांच्यासमोर दुरूनच कपडा हलवीत होती.
मी म्हणालो, “मॅडम… सर्पांना आठ-दहा फुटापलिकडे काही दिसत नाही. त्यांना ऐकायला येत नाही. अन् म्हैस की माणून हे देखील कळत नाही. त्यांना केवळ काळा नि पांढरा हे दोनच नैसर्गिक रंग समजतात.”
रंगाचं गणित लक्षात येताच एका काळ्या साडीतील जाडजुड देहाच्या काळ्या महिलेला मी पुढे केलं. तशी ती तीन-चार फूट पुढे झाली अन् भीतीला सोबत करीत पदर हलवू लागली. तसा पदराच्या विरोधात हलणारा पार्श्वभाग पाहून सगळे हसू लागले. एक से दो भले म्हणून मी दुसरी एक काळ्या झग्यावाली बाई पुढे केलीतर पाहणार्या अवघ्या मुखावर चार चंद्र जवळ आल्याचा अत्यानंद दिसू लागला. ते चारही चंद्र पाहण्यासाठी लोक जरा जवळ आले. जुळणाने क्षणात पळ काढला.
पण यानंतरच्या आठवड्यानंतर हा जुळण कार्यक्रम अधेमधे दिसू लागला. नाग तोच असे. नागिणी मात्र वेगवेगळ्या. आलटून पालटून. अशा नेहमी दिसणार्या नवनव्या नागिणींना लोक कौतुकाने बघायचे. अन् फावल्या वेळात टिचकुल्या पाडीत निसर्ग नियमांचं रसभरीत वर्णन अन् समर्थन करायचे.
पण अशी भीतीदायक जनावरं नेहमी दिसू लागल्याने अवघे रहिवाशी चिंता व्यक्त करीत होते.
मंदिराभोवती दगडी भिंतीचं कुंपण होतं. अलिकडे त्याची बरीच पडझड झाली होती. परिणामी त्यातून उंदीर, बेडकांनी उच्छाद मांडला होता. पलीकडे दोन मोठी वारूळं होती. त्यातच नाग-सर्पाचे वास्तव्य असल्याचा एकूणांचाच समज होता.
एक दिवस रहिवाशांची सभा झाली. सभेत बारागावांसारखा खल झाला. दुसर्या दिवशी चार-पाच सर्पमित्रांच्या उपस्थितीत वारूळं बुजवण्यात आली. कुंपण जमीनदोस्त करण्यात आलं. त्यावेळी त्यातून भरपूर उंदीर आणि आठ-नऊ जातींचे सर्प पकडण्यात यश आलं. अशी भली मोठी मोहीम फत्ते झाल्याने सायंकाळी तातडीनं संबंधित पुढार्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तेव्हा काही जाडजुड पुढार्यांच्या किडकिडीत बायकांचं काळीज चांगलं दोन-दोन सुपाएवढं झालेलं मी पाहिलं. शेवटी आभार प्रदर्शन करताना गोरेबाईंनी माझं नाव घेतलं. त्यावरून आमच्या घरानं मला रात्रभर डोक्यावर घेतलं अन् रात्रीचा दिवस करून टाकला.
यानंतर वैशाख अन् त्यापाठोपाठ ज्येष्ठ आषाढ वाजतगाजत पुढे झाले होते. श्रावणाच्या उनपाळ्या नुकत्याच सुरू झाल्या होत्या. मऊशार पिवळं उन पाहून मी घराबाहेर पडलोच होतो. तेवढ्यात पाच-पंचवीस महिलांचा ताफा सजूनधजून लाली-लिपस्टिक लावून मंदिराच्या दिशेने पुढे झाला होता. त्यांना पाहून मी पुन्हा घराकडे गेलो. अन् चालत्या पावलागणिक मनातच म्हणालो, “घरालाच विचारू बॉ आज काय खास विशेष हाये असं… पण पाहतो तर काय…. आमचं घर अकरा वाजले तरी रात्रीच्या झग्यातच होतं. बॉटलग्रीन झाडासारखं सरळसोट उभं. हाती तलवारीसारखा झाडू अन् वर अशा पानांसारख्या झिंज्या मोकळ्या. असा तो सगळा बहुगुणी अवतार पाहून मी घड्याळाकडे पाहिलं अन् सेकंदकाटा हळूच सरकावा तसा पापण्या लवून विनयाने म्हणालो, “आज काही सण वगैरे आहे का….?”
अखेरचा का म्हणून माझ्या भुवया अन् पापण्या वर झाल्याच होत्या. तेवढ्यात आमचं घर नागाच्या फण्यासारखं तोंड करीत फुस्कारून म्हणालं, “मला विचारता की घड्याळाला…?”
मी निमूटपणे पुढे झालो. अन् कॅलेंडर पाहू लागलो. तिथे वीस तारखेच्या रकान्यात नागाचं चित्र होतं. चित्र पाहताच माझी पावलं वारूळाच्या दिशेनं झपझप पडू लागली. बुजवलेलं वारूळ पुनश्च जैसे थे झालं होतं. ते पाहून मी मनाने चार मास मागे झालो. कुंपण जमीनदोस्त होताना पकडलेल्या सर्पांची माहिती सर्पमित्रांनी करून दिलेली होती. वारूळाशी नाग-सर्पाचा संबंध केवळ भक्ष पकडण्यासाठीच असतो. कारण वारूळ हे वाळवीचं म्हणजे उधईचं घर असतं. कालांतराने तिथे मुंग्या येतात अन् मुंग्या असतील तेथे सर्प राहत नाही. दूध हे सर्पाचे अन्न नाही. दुधाने सर्पाला मृत्यू येतो. अशा अनेक शंकांचं निरसन सर्पमित्रांनी केलं होतं. तरीदेखील नागपुजेसाठी वारूळाजवळ पोल्ट्रीफॉर्ममधील कोंबड्यांसारखी झुंबड उडाली होती.
त्यात जवळच्या बंगल्यात घरकाम करणारी सोनी होती. पलीकडच्या झोपडपट्टीत राहणारी सोनी दारिद्य्रात वाढली अन् अल्पावधीतच कामानं पिचली. अंगावरील ओल्या साडीवरून ती नुकतीच काम करून आल्याचं भासत होतं. तिच्या हाती पुजेचं ताट होतं अन् दुसर्या हातानं मागं धावत आलेल्या पोरालां ती बडवीत होती. जवळच्या घोळक्यात गोरेबाई काही महिलांना समज देत होत्या. धर्माच्या माध्यमातून वाढलेला कर्मकांडांचा गुंता सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता. पाळण्याची दोरी जशी आपल्या हाती तसं धर्माचं अवडंबर रोखण्याची शक्तीही आपल्याच हाती असल्याचं त्या सांगत होत्या.

समोर एक गोरागोमटा गलेलठ्ठ शेंडीधारी माणूस नागासमान वेटोळं करून बसला होता. त्याच्यासमोर पैशांची रास वाढत होती. तो सांगेल त्या पद्धतीने महिलांचा पूजाविधी चालला होता. एक-एक वाटी करीत पुष्कळसं दूध जमिनीत जिरत होतं अन् सोनीचं पोरगं दुधासाठी रडत होतं.
– अनुप गोसावी