Categories
ज्योतिष

ज्योतिषी – सामाजिक गुन्हेगार?

ऑक्टोबर - २०११

            ब्राम्हण समाजातच नव्हे तर इतर जातीत सुद्धा पत्रिकेचे खूळ वाढलेले दिसते. लग्न जमविण्याचा भाग म्हणून मुला-मुलींची पत्रिका पाहिली जाते. कुंडलीत गुण उतरल्यानंतर लग्न जमविण्याचा पालकाचा विचार असतो. जवळ जवळ 90 टक्के लग्ने कुंडली जमवून केली जातात. तरीही घटस्फोटाचे प्रमाण, गृहकलहाचे प्रमाण व गृहविच्छेदाचे प्रमाण वाढताना समाजात दिसते. ही चिंतेची बाब आहे. या दृष्टिकोनातून मी स्वत: एक सर्वेक्षण केले. त्यातून समोर आलेले वास्तव मांडण्याचा हा प्रयत्न….

ज्योतिषी एक सामाजिक गुन्हेगार?

            ज्या घटस्फोटीत वधुवरांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्या सर्वांनी निक्षून पत्रिका व कुंडली जमल्याचे सांगितले, लग्न विधिवत मुहुर्तावर पार पडल्याचे सांगितले. ज्या कुटुंबातून घटस्फोट झालेला आहे, त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालेले आहे कारण ज्या मुलींचे घटस्फोट झालेले आहेत, त्यांचे आई वडील वृद्ध आहेत. त्यांना वृद्धापकाळामुळे निरनिराळे आजार आहेत अशा मुलींना माहेरही स्वीकारीत नाही व सासर अंतरलेले असते. ज्या मुलींनी एखाद्या दुसर्‍या बालकाला जन्म दिला आहे त्याचे हाल तर बघवत नाहीत. पितृत्व हरवलेले, मातृत्व अधांतरी अशा परिस्थितीत ही बालके आयुष्याची वाटचाल कशी करणार हा प्रश्न आहे. घटस्फोटीत मुलींचा प्रश्न पतंगाची दोरी तुटलेल्या पतंगासारखा अधांतरी भरकटत असतो. जर या सर्वांचे विवाह कुंडली बघून झालेले असतील तर, अपयशाची कायदेशीर जबाबदारी ज्योतिषांनी स्वीकारायला काय हरकत आहे? अशा ज्योतिषावर फसवणुकीच्या कायद्याखाली फौजदारी करावी. आर्थिक नुकसानीसाठी दिवाणी दावे करावेत. जर ज्योतिषी स्वत:ला व्यावसायिक समजत असतील तर ग्राहक मंचात त्यांच्या विरूद्ध तक्रारी कराव्यात. कुठल्याही परिस्थितीत अपयशाची जबाबदारी ज्योतिषांनी स्वीकारलीच पाहिजे. अन्यथा त्यांनी व्यवसायाच्या व अपयशाच्या मर्यादा स्पष्टपणे सांगाव्यात. या पुढे ज्योतिषाचा सल्ला घेणार्‍यांनी लिखित स्वरूपात घ्यावा व दिलेल्या पैशाची पावती घ्यावी म्हणजे त्यांचे विरूद्ध कायदेशीर कार्यवाही करणे सोपे पडेल. जर महाराष्ट्रातून घटस्फोटीत वधु-वरांचे पालक ज्योतिषावर फसवणुकीचे खटले दाखल करावयास तयार असतील तर मी त्यासाठी आवश्यक कायदेशीर सहकार्य करण्यास तयार आहे.

ज्योतिष म्हणजे फॅन्टसी

            काही ज्योतिषांनी असे प्रतिपादन केले की, तुम्ही समाजजागृती करून आमच्या उपजीविकेवर पाय देत आहात काय? परंतु विज्ञान युगात ही कल्पनेवर(फॅन्टसी) आधारलेली एखादी गोष्ट टिकू शकते काय? व ती पूर्णत्वाचे समाधान देऊ शकेल काय? अंधश्रद्धेच्या व फसवणुकीच्या पायावर ही इमारत किती दिवस टिकणार? वास्तविक पाहता सद्या अनेक विज्ञान अधिष्ठीत व्यवसाय व लोकोपयोगी व्यवसाय करून जगता येईल. आज एकही ज्योतिषाचा मुलगा स्व:च्या वडीलाचा व्यवसाय पुढे करण्यास तयार नाही. अनेक वेळा ज्योतिषी आपल्या राजकीय ओळखीचा फायदा घेऊन कुठेतरी नोकरीत चिकटवण्याच्या नादात असतो. यातच ज्योतिषाच्या फोलपणाचा संकेत रूजलेला आहे. विवाह नोंदणीत एकही वधुचा बाप पुरोहित अथवा ज्योतिषी यांना मुलगी देण्यात तयार नसतो असे माझे निरीक्षण आहे.

सामाजिक दुष्परिणाम किती?

            कुंडली जमत नाही, म्हणून मुलीचे लग्न वेळेवर होत नाही. चांगली स्थळे हातची जातात, साहजिकच निवडीची संधी कमी होते आणि कुंडली जमते या पायी नाही त्या नाहक माणसाशी संबंध येतात. त्यातून आत्यंतिक अनाचार घडतात व घटस्फोटाचे प्रमाण वाढते. ज्या मुलींची लग्ने वेळेवर होत नाहीत त्यावर समाजकंटकाची वाईट नजर असते. अनेक वेळा विवाहीत पुरूषाबरोबर अनैतिक संबंध निर्माण होतात व मुलीच्या अध:पतनाला पूर्णपणे ज्योतिष हे जबाबदार ठरते. मुलांची विशिष्ट वयात कुंडली न जमल्यामुळे लग्ने होत नाहीत व शारीरिक गरज न भागल्यामुळे एड्ससारख्या आजाराचे ते बळी पडतात. अनेक मुली प्रौढ कुमारिका होतात व पुढे आयुष्यभर अविवाहित राहतात.

राजज्योतिषाचा किस्सा

            मध्यंतरीच्या काळात टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक हकीकत प्रसिद्ध झाली होती. एका संस्थानच्या राज्य ज्योतिषाने आपल्या नात्यातील मुलाची पत्रिका पाहून व त्याचे उज्वल भविष्य पाहून, स्वत:च्या मुलीचा विवाह त्या मुलाशी ठरविला. विवाह विच्छेद तर झालाच, पुढे नवरा मुलगा मानसिक रूग्ण झाला व या सर्व प्रकाराने खचून जाऊन ज्योतिष्याच्या मुलीने आत्महत्या केली. ज्याला स्वत:च्या मुलीचे भविष्य नीट कळत नाहीत, ते दुसर्‍याचे भविष्य काय घडविणार? दुसरे एक उदाहरण, महाराष्ट्रातील एक नामवंत भविष्यकाराने एक दैनिक सुरू केले. उण्यापुर्‍या एका वर्षाच्या आतच ते बंद पडले. यावर वृत्तपत्र सृष्टीत एक विनोद सांगितला जातो की, या भविष्यकाराने वृत्तपत्र सुरू करण्याचा मुहूर्त नीट बघितला नव्हता काय?

मानसिक दुर्बलता हेच कारण

            ज्योतिष्याचा मूळ आधार सामान्य माणसाची मानसिक दुर्बलता आहे व दुसरा आधार माणसाच्या आयुष्यातील अनिश्चितता आहे. सद्याच्या प्रगतीच्या युगात, संधीनुसार एकाच वर्गात शिकलेले दोन विद्यार्थी, एक उच्च स्तरावर जातो व दुसरा सामान्य स्तरावर जातो. हीच आवृत्ती दोन बहीणींच्या वैवाहिक जीवनाबाबत घडू शकते. कुठलेही दोन समान घटक समान संधी व समान न्याय व समान स्थान मिळवतील अशी नाही.

ज्योतिष्याचे मुख्य बळी

            ज्योतिष्याचे मुख्य बळी आहेत राजकारणी व सिनेसृष्टीतील लोक. सदैव अनिश्चिततेच्या व पराभवाच्या छायेत वावरणारे लोक, हे नेहमी अनामिक भयगंडाने पछाडलेले असतात. मी गेली 40 वर्षे राजकारणाशी निगडित असलेल्या अनेक व्यक्तीच्या सान्निध्यात आहे. राजकारण्यांची मानसिकता इतकी दुर्बल असते की, सदैव अपयशाची भीती, सदैव संशय, सूड, कटकारस्थाने, जवळच्या माणसाविषयी असूया, द्वेषभावना, बाहेर मिळणार्‍या सन्मानापेक्षा अंतर्गत कलहात, मानापमान जास्त, यामुळे राजकारणी सतत अस्थिर मनस्थितीचे जीवन जगत असतात. त्यामुळे ज्योतिषी, बुवा व गंडेदोरे याच्या आहारी जातात. प्रत्येक गोष्ट ज्योतिष्याला विचारून, फॉर्म भरण्याची वेळ, प्रवासाची दिशा, यासाठी ज्योतिष्याचे मार्गदर्शन घेत असतात. राजकारणी लोकांना हे माहीत पाहिजे की, त्यांचा शत्रू सुद्धा ज्योतिष्याचे मार्गदर्शन घेऊनच कृती करत असतो!

            माझ्या पाहण्यातील एक राजकारणी, ज्योतिष्याच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नव्हते. प्रवासाची वेळ व दिशा सुद्धा ज्योतिष्याला विचारून ठरवित! दुर्दैवाने त्यांचा भीषण खून झाला, त्यांना सल्ला देणार्‍या ज्योतिषाने स्वत:चे नैतिक अध:पतन समजून जाहीर प्रायश्चित घ्यावयास काय हरकत आहे?

            सिनेसृष्टीत हा प्रकार प्रखरतेने आढळतो. जर ज्योतिष खरे असेल तर, फक्त 25 टक्के चित्रपट यशस्वी ठरतात तर 75 टक्के चित्रपट अयशस्वी ठरतात, मग हे अपयश कोणाचे? चित्रपट कोणत्या अद्याक्षराने सुरू व्हावा ते चित्रिकरण व चित्रपट प्रदर्शन हे सर्व काही भविष्यावर अवलंबून राहते. तोच परिणाम दूरचित्रवाणीच्या मालिकांपर्यंत आलेला आहे. या मालिकांनी क का ची बाराखडी सोडलेली नाही.

            याबाबतीत कलामहर्षी व्ही.शांताराम यांची एक आठवण सांगतात. त्यांच्य स्वत:च्या कला सामर्थ्यावर इतका विश्वास होता की, ते ज्योतिष्यावर अजिबात विश्वास ठेवत नसत. त्यांना अनेक वेळा अपयश आले, त्यांनी प्रसारित केलेले चित्रपट मागे घेतले परंतु ते म्हणत रसिक माझे देव आहेत. त्यांना माझी कधी पूजा आवडेल कधी न आवडेल, स्वत:च्या कला सामर्थ्यावर विश्वास असणारा असा कलाकार विरळाच!

            नाट्यसृष्टीबाबत असेच आहे, सर्व काही मुहुर्तावर व ज्योतिष्यावर आधारित करून नाटकाची यशस्वीता 20 टक्क्यांच्या पुढे जात नाही.

अपयश का झाकता?

            ज्याप्रमाणे जुगारी व मटका खेळणारा अथवा रेसवर पैसे लावणारा, आपणास आलेल्या रक्कमेचे आकडे सांगतो, व गेलेली रक्कम सांगत नाही व नफा तोट्याचे हिशोब देत नाही, तसाच प्रकार ज्योतिष्याचा आहे. ज्या कुटुंबाचे घटस्फोटाचे अर्ज न्यायालयात आहे त्यांना मी भेटलो, त्यांनी कुंडली बघूनच लग्न जमविल्याचे निक्षून सांगितले. त्यानंतर कुंडली जमविलेल्या ज्योतिष्याला भेटलो. त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. राजकारणात आयुष्य घालविलेल्या, माझ्या व्यक्तीमत्वाला हे पटत नव्हते. मी त्याला केस चालविणार्‍या वकीलाची व न्यायाधीशाची कुंडली आणून देतो असे सांगितले व केसचा निकाल कसा लागेल याविषयी भविष्य सांगण्यास सांगितले व जर भविष्य खोटे ठरले तर पोलीस केस करण्याची  तयारी दर्शविली मग मात्र ज्योतिषी महाशयाची बोबडी वळली. त्यांच्या उपजीविकेवर गंडांतर येऊ नये, म्हणून मी त्यांना ज्योतिष्याच्या मर्यादा स्पष्ट करून ज्योतिष सांगण्याचा सल्ला दिला. एकंदरीत माझ्या रूपाने ज्योतिष्याच्या कुंडलीत त्यादिवशी अनिष्ट ग्रह आले होते, हे मात्र निश्चित!

            माझ्या परिचयातील एक राजकारणी स्वत:च्या भूमिकेवर व कर्तृत्वावर इतके ठाम आहेत की, ते निवडणुकीचा फॉर्म भरताना मुहूर्त पाहत नाहीत परंतु बहुमताने निवडून येतात, अर्थात अशी कणखर मनाची माणसे समाजात फार दुर्मिळ आहेत!

अपयश जाहीर करावे!

            ज्याप्रमाणे वैद्यकीय शास्त्रात डॉक्टर शस्त्रक्रियेपूर्वी किंवा उपचारापूर्वी यशस्वीतेची टक्केवारी सांगतात व अपयशाची जबाबदारी विषद करतात. त्यात त्याला शरीराची स्वाभाविक रचना, पेशंटच्या शरीराचा स्वभाव(नेचर ऑफ बॉडी) व उपचाराला दाद देण्याची शरीराची पद्धती(रिस्पॉन्स) व रोग्याची मानसिकता यावर वैद्यकीय उपचाराची फलनिष्पती अवलंबून आहे असे स्पष्टपणे सांगतात, यामुळे वैद्यकीय शास्त्राच्या मर्यादा स्पष्ट होतात व या शास्त्रावरील विश्वास वाढतो. वैद्यकीय शास्त्र हे दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय व लोकोपयोगी होण्यामागे त्या शास्त्राचा स्पष्टपणा व पारदर्शकता कारणीभूत आहे. ही पद्धती ज्योतिष्यांनी स्वीकारावयास काय हरकत आहे?

अपयशावर मात करण्याची तयारी हवी!

            जीवनात अनेक ठिकाणी अपयश आहे, व यशही आहे. संधी आहे तर ती न मिळण्याची शक्यताही आहे. हे सर्व पचविण्यासाठी माणसाला सशक्त मानसिकतेची गरज आहे. आहे त्या परिस्थितीशी मिळवून घेण्याची मानसिक ताकद, प्रगतीसाठी झटण्याची जिद्द, सुदृढ कुटुंब व्यवस्था, एकमेकाला आधार देणारी कुटुंबातील व्यक्ती व त्यांच्यावर झालेले चांगले संस्कार, उत्कट आध्यात्मिकता व समान श्रद्धा व समान ध्येय असणारी कुटुंबेच प्रसंगावर मात करू शकतात.

            सातासमुद्रापलिकडून शिडाच्या जहाजातून आलेला इंग्रज खंडप्राय भारत देशावर राज्य करू शकतो तर ज्योतिष्याचा ताफा बाळगणारे पेशवे अयशस्वी का ठरतात?  पेशवाईत सुद्धा पहिले बाजीराव पेशवे हे रांगडे शिपाईगडी होते. कच्ची मक्याची कणसे व हिरव्या मिरच्या तोंडी लावून त्यांनी मोहिमा फत्ते केल्या, तत्कालीन पुण्यातील ब्राम्हण वर्गाने त्यांच्यावर ‘अब्राम्हण्यांचा’ आरोप करून बहिष्कार टाकला, ते पहिले बाजीराव पेशवे सर्वच युद्धात व राजनीतीत यशस्वी ठरले. याउलट नंतरच्या काळात कर्मकांडात व ब्राम्हणत्वाच्या आहारी गेलेले पेशवे पूर्णपणे अपयशी ठरले!

            माझा एक ज्योतिष्याला सल्ला आहे, आपण रेसकोर्सवर जाऊन आपली दुकानदारी थाटावी किंवा मटक्याची बुकींग घेणार्‍यांच्या बाजूला आपला स्टॉल टाकावा. शेअर बाजारात जाऊन शेअर दलालाशी भागीदारी करावी, व खूप पैसा कमवावा.

पत्रिका मॅच करणारी गुन्हेगारी!

            माझ्या पाहण्यात मुलाकडची अथवा मुलीकडची पत्रिका हाती पडली की, त्याला मॅचिंग कुंडली करून देणारे अनेक ज्योतिषी आहेत. एक तर या ज्योतिष्याची स्वत:च्या ज्ञानावर व शास्त्रावर श्रद्धा नाही अथवा विश्वास नाही किंवा कुठल्यातरी धार्मिक भावनेचा आधार घेऊन हा फसवणुकीचा धंदा आहे. एकमात्र खरे की, अशा मॅचिंग कुंडल्या केलेले अनेक विवाह यशस्वी झालेले आहेत,(मी हे उदाहरण ज्योतिष्याच्या फोलपणाविषयी देत आहे).

कोण खरे कोण खोटे?

            एखादी गोष्ट मोठ्या प्रमाणात खोटी बोलली की, ती खरी वाटू लागते असा मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. चुकून एखादी गोष्ट अगर अंदाज खरा ठरला की, त्याची हजारपट प्रसिद्धी करावयाची व ज्योतिष्याची प्रसिद्धी वाढवावयाची असे एक तंत्र आहे. जर राजकीय भविष्यात खरेपणा असता तर अनेक राजकीय नेत्यांचे अपमृत्यू वाचू शकले असते. परकीय आक्रमण व अतिरेक्याचे हल्ले कमी होऊ शकले असते. एकीकडे दाते पंचांगकर्ते सांगतात की, नारायण नागबळीचा विधी हा शास्त्राला धरून नाही तर दुसरीकडे नाशिक त्र्यंबकेश्वरचा नारायण नागबळीचा धंदा पराकोयीला पोहचला आहे. ही विसंगती का?

वैद्यकीय तपासणी

            कुंडलीऐवजी वधु-वरांची वैद्यकीय तपासणी अवश्य करावी. विशेषत: एच.आय.व्ही.टेस्ट करणे अगत्याचे आहे. त्याचबरोबर ब्लडगु्रप, हिमोग्लोबीनचे प्रमाण इ. आवश्यक तपासण्या करूनच विवाह ठरवावेत.

फलज्योतिष काय आहे?

            ज्योतिष्यशास्त्र ही भारतातील उत्कृष्ट कालमापन पद्धती आहे. (Astronomy, Astrophysics & Almac) जगातील सर्व कालमापन पद्धती व दिशाशास्त्र हे भारतीय ज्योतिष्य शास्त्रावर आधारीत आहे. एवढेच नव्हे तर पाश्चात्य राष्ट्रात वापरले जाणारे ग्रेगरियन पंचांग (Solar) ही कालमापन  पद्धतीसुद्धा भारतीय ज्योर्तिविद्येवर आधारीत आहे. लोकमान्य टिळक हे ज्योतिषशास्त्राचे अत्यंत तज्ञ होते. त्यांनी ज्योतिषशास्त्रविषयक अनेक पुस्तके लिहिली व संशोधन केले तथापी त्यात एक वाक्यही फलज्योतिष्यावर लिहिलेले नाही. फलज्योतिष ही कोणीतरी पोटार्थी अथवा धूर्त व्यक्तीने शोधून काढलेली कला आहे. याला शास्त्राचा आधार नाही. या मागे पोट भरण्याची किंवा राजकीय महत्व वाढविण्याची कला आहे.

याचे उत्तर काय?

            ज्या वेळेस प्लेग, कॉलरा, देवी यासारख्या रोगांच्या साथीत लाखो लोक मरत त्यावेळेस ज्योतिष शास्त्र काय करीत होते? दुष्काळ, महापूर, भूकंप या दुर्घटनेला कुठली ग्रहदशा म्हणावयाची? अशा आपत्तीत लाखोनी माणसे मरतात. मरणार्‍यात बाराही राशींची माणसे असतात. मग सगळ्याच कुंडल्या सारख्या असतात का? अनेक राशींच्या व्यक्तींच्या एकत्रित मरण्याला फलज्योतिष काय उत्तर देऊ शकेल?

शरद उपाध्ये यांचे जाहीर स्पष्टीकरण!

            बारा राशींच्या कार्यक्रमावर, मनोरंजन करून विनोद निर्मिती करणारे व महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असलेले  शरद उपाध्ये यांना फलज्योतिषाबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करून खुलासा मागितल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे राशीरंजन व राशी वर आधारलेले कार्यक्रम हे केवळ मनोरंजन आहे. आणि ज्योतिष हे शास्त्र होऊ शकत नाही. असे जाहीरपणे ‘दैनिक सकाळ’ मधून प्रसिद्ध केले आहे. मात्र राशीरंजनाचा दुष्परिणाम समाजावर इतका झाला आहे की, घरातील गृहिणी, तुमच्या मुलाची किंवा मुलीची रास कोणती? एवढे विचारून या राशीशी माझ्या मुलामुलीचे लग्न होऊ शकत नाही! किंवा अशा दोन राशीच्या विवाह यशस्वी होऊ शकत नाही! असा निर्णय घेऊन फोन खाली ठेवतात! एकंदरीतच मनोरंजनाच्या माध्यमाने समाजाच्या मानसिकतेवर काय विकृत परिणाम होईल. याचा कार्यक्रम सादर करणार्‍यांनी गंभीरपणे विचार करायला हवा होता.

            कुठलीही राष्ट्रीय, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती ज्योतिष टाळू शकले नाही. ज्या देशात ज्योतिष पाहिले जात नाही. त्या राष्ट्रात भारताच्या तुलनेत आत्यंतिक प्रगती झालेली आहे. केप ऑफ गुडहोफला वळसा घालून शिडाच्या नावातून भारत खंडावर राज्य करणारे इंग्रज कुठलेही पंचांग घेऊन पाहून निघाले नव्हते, अथवा अमेरिकेचा शोध लावणारा कोलंबस याने कुठल्याही शुभमुहुर्ताचा आधार घेतला नव्हता. याउलट पानिपतच्या लढाईवर पंचांगांची गाठोडी घेऊन पेशव्यांच्या सैन्याबरोबर युद्धावर गेलेले ज्योतिष विषयक मार्गदर्शन करण्यासाठी गेलेले ज्योतिषी एक तर स्वत:चा जीव गमावून बसले, त्याचबरोबर त्यांच्या बायका, मुले कंधाहारच्या बाजारात गुलाम म्हणून विकले गेले. पानिपतच्या पराभवापाठीमागे धार्मिक भावनाचा अतिरेक व ज्योतिषाचा अनावश्यक प्रभाव युद्धनीतीवर व युद्धशास्त्रावर झाला ही सुद्धा कारणे आहेत.

फलज्योतिषाचा फोलपणा

            कुठल्याही परिस्थितीत फलज्योतिष हे थोतांड असून ते कुठल्याही दृष्टीने कुटुंबाच्या व्यवस्थेत व राष्ट्र उभारणीस उपयोगी नाही. केवळ व्यक्ती-व्यक्तीमधील द्वेषभावना, असंतोष व कमकुवत मानसिकता याचा फायदा ज्योतिषी लोकांनी घेतलेला आहे. समाजातील व्यक्तीची मानसिक व बौद्धिक क्षमता, विज्ञानावरील निष्ठा वाढल्यास व मनोदुर्बलता कमी झाल्यास ज्योतिषाचा आधार कोणीही घेणार नाही. अंधश्रद्धा व मानसिक असंतुलन यामुळे होणारी फसवणूक व लूट यामुळे थांबणार आहे. सामाजिक जीवनात जितक्या अडचणी सर्वसामान्य माणसाला आहेत, तेवढ्याच अडचणी कौटुंबिक जीवनात ज्योतिषाला आहे. जर असे असेल तर त्यांच्याकडे स्वत:चा प्रश्न घेऊन जाणारा काय उपाय योजना करून त्यातून मुक्ती मिळवणार, हेच कळत नाही! मी ज्योतिषी असल्यामुळे माझ्याकडे ग्रहाचा कोप होत नाही. परिणाम भोगावे लागत नाही, मी स्वत:ला व कुटुंबियांना ग्रहदशेपासून दूर ठेवतो. असे सांगणारा एकही ज्योतिषी भेटत नाही! याकरीता आपण ज्योतिषापासून चार हात दूर राहिले पाहिजे.

अशोक कुलकर्णी