माझी छायाचित्रे दिवाणखान्यात लावण्यासाठी शोभेची नाहीत. काही ठिकाणी मला म्हणतात, ‘हीच चित्रे का दाखवतो?’ पण मी म्हणतो, ‘मी यांचाच प्रतिनिधी आहे, तुम्हाला मान्य करायचे असेल तर करा.’ पण त्यांना ते मान्य करावेच लागते. कारण समोरचे फोटो सत्यच सांगत असतात. माझी छायाचित्रे सांगत असतात, ‘तुम्ही आमच्या संघर्षात सामील व्हा, आमच्या या न्यायाच्या आणि सन्मानाच्या शोधयात्रेत सामील व्हा.’ ती विचार करायला लावतात. ती छायाचित्रे माणसातल्या विवेकाला आवाहन करत असतात.
चित्रकला, शिल्पकला, संगीत या जशा ‘कला’ आहेत, तशाच कॅमेर्याच्या सहाय्याने आपल्या कलाकृती निर्माण करणारी इतर कलामाध्यमांच्या तुलनेत आधुनिक असलेली छायाचित्रकलाही अशीच ‘कला’ आहे. या कलांच्या कलाकृतीतून जसे जगातील सौंदर्य अनुभवता येते, हे जग समजून घेता येते, जगाचा अर्थ लावता येतो, तसेच या जगाचा समजलेला अर्थ, कलाकाराला अभिप्रेत असलेली सामाजिक मूल्ये, कलाकाराचा विद्रोह या कलामाध्यमातून व्यक्त करता येतो. तसेच छायाचित्रकलेच्या माध्यमातूनही हे जगण्याचे सर्व वास्तव व्यक्त करता येते. छायाचित्रकला जगण्यातले डोळ्यांना, मनाला सुखावणारे सौंदर्य जशी दाखवते, तसेच वैयक्तिक-सामाजिक जगण्याच्या वास्तवाच्या भयानक बाजूचीही जाणीव करून देते. अशी सफाई कामगारांच्या, आदिवासी, कुपोषितांच्या, जातीय-धार्मिक दंगलीतील; विशेषत: 92 च्या मुंबईच्या दंगलीतील, बॉम्बस्फोटातील, लातूरच्या भूकंपातील, दुष्काळातील पीडितांच्या, वेश्यांच्या, अत्याचारामुळे पिडलेल्या दलितांच्या जगण्यातील भयानक वास्तवाची जाणीव आपल्या छायाचित्रांद्वारे समाजाला करून देणारे मूळचे विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील असलेल्या सुधारक ओलवे यांनी मुंबईच्या जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट्समधून फोटोग्राफीची पदविका प्राप्त केली असून सेंट झेवियर्स कॉलेजातून फिल्म आणि व्हिडीओ निर्मितीचा अभ्यास केला आहे.
सुधारक ओलवे यांच्या छायाचित्रांची जगातील अनेक भागात; विशेषत: मुंबई, दिल्ली, माल्मो (स्वीडन), लिस्बन, अॅमस्टरडॅम, लॉस एंजेलिस, ढाका, वॉशिंग्टन, टोकियो; तसेच जर्मनीत प्रदर्शने झाली आहेत.
ते राष्ट्रीय माध्यम फेलोशिपचे (1999-2000) मानकरी असून लिंगभाव आणि पर्यावरण या विषयावरच्या जागतिक परिषदेसाठी (2001-2003) त्यांची निवड झाली होती.
झारखंडमधील आदिवासी मातांच्या आरोग्याविषयीच्या त्यांच्या कामाला ‘वर्ल्ड प्रेस फोटो : न्यू स्टोरीज’ या पुस्तकात स्थान मिळाले आहे. 2004 साली त्यांचे पहिले पुस्तक ‘स्पिरिटेड सोल्स : विनिंग वूमेन ऑफ मुंबई’ हे मालविका संघवी यांनी शब्दबध्द केलेले पुस्तक प्रसिध्द झाले. तसेच 2013 साली ‘न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात (सफाई कामगारांची सांगितली न गेलेली कथा)’ हे सफाई कामगारांची स्थिती दर्शविणार्या छायाचित्रांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
2005 साली त्यांचा ब्राझिल, मेक्सिको व दक्षिण आफ्रिकेच्या अन्य तीन छायाचित्रकारांसमवेत ‘नॅशनल जिऑग्राफिक’च्या ऑल रोड फोटोग्राफर्स प्रोग्रामच्या अंतर्गत गौरव करण्यात आला.
2010 मध्ये लॉस एंजेलिसच्या पौल्गेट्टी म्युझियमने त्यांना तरुण आणि होतकरू छायाचित्रकारांना फोटोपत्रकारितेतले बारकावे शिकविण्यासाठी आमंत्रित केले होते.
2016 साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कलेचा, कामाचा गौरव केला आहे.
आपल्या कामाची सुरुवात त्यांनी इंग्रजी, मराठी वर्तमानपत्रात फोटो जर्नालिस्ट म्हणून काम करत केली. त्याच वेळेस ते स्वतंत्ररित्याही छायाचित्रकार म्हणून काम करत होतेच. मुंबईतील सफाई कामगारांच्या छायाचित्रातून प्रथमच ही अदृश्य माणसे आणि त्यांचा अवकाश त्यांनी जगासमोर आणला. त्या कामगारांच्या न्याय आणि सन्मानासाठीच हे छायाचित्रण त्यांनी केले. मुंबईतील 92 च्या दंगलीची छायाचित्रे असोत, कामाठीपुर्यातल्या उत्पीडित स्त्रियांचे चित्रण असो किंवा जातीय अत्याचाराची शिकार झालेल्यांचे छायाचित्रण असो, स्त्रियांवरील अत्याचाराची छायाचित्रे असोत, सुधारक ओलवे यांच्या त्या छायाचित्रांनी त्यांच्यावरील अन्याय समाजमनाच्या ऐरणीवर आणले.
केवळ एखाद-दुसरे छायाचित्र काढून ते थांबत नाहीत किंवा घटना घडली, छायाचित्र काढले, ते प्रसिद्ध झाले… संपले. अशी त्यांच्या कामाची पध्दत नाही. त्यामुळे त्या घटनेतील पीडितांचा सतत पाठपुरावा करत राहतात. मुंबईच्या कामाठीपुर्यातील वेश्यांचे फोटो काढत असताना तेथील कुंटणखान्यातून एका मुलीची सुटका पोलिसांच्या सहाय्याने करण्यापासून तिचा प्रियकर, तिचा प्रियकराबरोबरचा प्रणय, त्यांचे लग्न, नवर्याला नोकरी नसल्याने आलेला वैताग, तिचा संसार म्हणजेच…तिचे लग्न तिच्या प्रियकराबरोबर लावून देऊन तिचा संसार उभा करण्यापर्यंतचा जवळजवळ 17 वर्षांचा प्रवास त्यांनी स्थिर छायाचित्रातून चित्रित केला आहे. या प्रवासात तिचा सुरुवातीचा एकाकीपणा, भीती, चिंता, वैताग, हतबलता, प्रेम, प्रणय, आत्मविश्वास, आनंद, संसारी सुख या सर्व भावभावनांचे स्थिरचित्रण सलगपणे पाहत असताना आपल्याला एखादी कथाच वाचत असल्याचा भास होतो. त्यांच्या छायाचित्रांची प्रत्येक सीरिज म्हणजे एकेक कथाच आहे. पण या छायाचित्रित कथा म्हणजे ‘कल्पित’ नाही तर ते ‘वास्तव’ आहे. आजही मैला डोक्यावरून नेण्याची प्रथा अस्तित्वात आहेच, चंद्रावर, मंगळावर पोचलो आहोत; पण सफाई कामगार शरीरानेच घाणीत उतरत आहेत, पिढ्यान्पिढ्या त्यांचे हातपाय राड्यानेच भरलेले आहेत, आजही नितीन आगे मारले जात आहेतच. त्यांच्या मते, माझी ही छायाचित्रे हे एक प्रकारे ‘सामाजिक दस्ताऐवज’ आहेत. त्याचा फायदा येणार्या पिढीला होईल. त्यामुळे झगमगाटी दुनियेत त्यांच्या प्रदर्शनांना फार मोठी मागणी नसली तरी जेथे-जेथे संधी मिळेल, तेथे-तेथे या सामाजिक दस्तऐवजाची प्रदर्शने ते भरवत असतात. माझ्या छायाचित्रांमुळे न्यायालये, प्रशासन, पोलीस आणि समाज यांच्यात काहीतरी परिवर्तन होऊन त्यांना न्याय मिळेल, अशा आशेने एक कलाकार म्हणून मी सतत प्रयत्न करीत असतो. अशा या छायाचित्रकाराचे मानवतावादी, विवेकी मूल्ये आणि आपली कला याविषयीचे मनोगत…
माझ्या मते, कलेचा उद्देश केवळ मनोरंजन नाही. समाजात जगताना जे दाहक, करुण, अन्यायी सामाजिक-आर्थिक-राजकीय वास्तव तुम्हाला जाणवत असते, ते तुमच्या कलेतून प्रतिबिंबित व्हायला हवे. त्या वास्तवाच्या मागे असलेले दु:ख, कौर्य, हतबलता, असहायता; तसेच अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची ऊर्मी, आनंद अशा विविध भावना तुमच्या कलाकृतीतून कलात्मकतेने उमटल्या पाहिजेत. ज्यामुळे तुमच्या कलाकृतीच्या आस्वादकाच्या मनात हे सारे बदलले पाहिजे, यात परिवर्तन घडले पाहिजे किंवा या संघर्षास दाद दिली पाहिजे, अशी इच्छा निर्माण होईल. ज्या प्रस्थापित सामाजिक-आर्थिक व्यवस्थेतून हे दु:ख, शोषण सोसावे लागत आहे, त्या व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणत जनसामान्यांच्या जीवनाचा विकास झाला पाहिजे, ही भावना आपल्या कलेतून व्यक्त व्हावी, असे मला वाटते आणि अशाच उद्देशाने निर्माण झालेली कला प्रदीर्घ काळ टिकते आणि विवेकी मूल्ये समाजात रुजविण्याचे काम करते, असे मला वाटते. माझी छायाचित्रे तटस्थ नाहीत, मनमोहक नाहीत. सकाळी चहा पिता-पिता नजर खेचणारी ही वर्तमानपत्रीय छायाचित्रे नाहीत. वर्तमानपत्रात तुम्हाला दोन्ही बाजू मांडाव्या लागतात; पण इथे सरळ-सरळ मी एक बाजू घेतो. माझी छायाचित्रे ज्यांचे हातपाय तुटलेले आहेत, ज्यांचे चेहरे विद्रुप झालेले आहेत, ज्यांच्या डोक्यावर मानवी मैला आहे, ज्यांचे हातपाय घाणीने बरबटलेले आहेत, जातीय हिंसाचाराने पिडले गेलेले आहेत अशा दलित, आदिवासी, स्त्रिया, कामगार यांची बाजू घेणारी आहेत. मी ज्यांची छायाचित्रे काढतो, ते अतिशय एकाकी, असहाय, प्रचंड विषम स्थितीत जगत असलेले समाजगट आहेत. त्यांची समाजाला ओळखच नाही. मी केवळ पीडितांबद्दलच्या सहानुभूतीतून किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी, म्हणूनही छायाचित्रे काढत नाही. मी त्यांच्यावर प्रेम करतो, मला त्यांच्याबद्दल आस्था आहे. मीही अशाच समाजगटातून आलेलो आहे आणि हे फारच महत्त्वाचे आहे. त्यांच्यावरील अन्याय वेशीवर टांगत त्यांना न्याय मिळवून देणे हेच माझ्या कलेचे उद्दिष्ट मी मानतो. मी केवळ प्रतिमांचा फोटो काढणारा नाही, तर मी त्या फोटोतील प्रतिमांचा भाग आहे, अशी माझी भूमिका आहे.
या तुमच्या कलाविषयक भूमिकेला पोचण्यापर्यंतची प्रक्रिया तुमच्या वैयक्तिक जीवनात कशी घडली?
आमचे कुटुंब सर्वसाधारण होते. माझे वडील कवी होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर कविता करायचे, त्यांचे काव्यमंडळ होते. गावोगावी जाऊन ते त्या कवितांचे वाचन करायचे आणि बाबासाहेबांच्या विचारांचे प्रबोधन करायचे, घरी जमून त्यांचे बाबासाहेबांवरच्या कवितांचे वाचन, गाणी म्हणणे असे नेहमीच चालायचे. आम्ही ते ऐकायचो. त्यातून आजूबाजूच्या वातावरणातून बाबासाहेबांच्या विचारांची ओळख होऊ लागली होती. लहानपणी 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर रात्र-रात्र जायचो, गाणी ऐकायचो, भाषणे ऐकायचो; पण त्या वेळेस मला काही असे वाटत नव्हते की, माझ्या विचारांना असे काही वळण लागेल. नोकरी करणे भागच होते. त्यामुळे शिक्षण झाल्यावर वर्तमानपत्रात फोटो-जर्नालिस्ट म्हणून नोकरीला लागलो. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांत नोकरी करता-करता मुंबईतील बॉम्बस्फोट, दंगली, महाराष्ट्रातील दुष्काळ, लातूरचा भूकंप, झोपडपट्टीची पाडापाडी, त्याविरोधातील मेधा पाटकरांची निदर्शने, आंदोलने, मुंबईत येणारी दलाई लामा, मदर तेरेसा यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे यांची छायाचित्रे काढता-काढता माझी समज वाढायला लागली. मूळची आंबेडकरी विचारांची पार्श्वभूमी होतीच. हे सर्व जवळजवळ 15 वर्षे चालू होते. पण माझ्या दृष्टिकोनाला खरा आकार मिळाला तो मुंबईच्या महानगरातला दररोजचा 11,000 टन कचरा साफ करणार्या सफाई कामगारांच्या छायाचित्रांची सीरिज बनविली तेव्हा. जवळजवळ दोन वर्षे मी ती बनवत होतो. मी सफाई कामगारांच्या अगदी अंतरंगात शिरलो. त्यांचे जीवन जवळून अनुभवत गेलो, त्यांच्या कुटुंबाचाच भाग झालो.
सफाई कामगारांवरच्या सीरिजचा कामगारांच्या दृष्टीने आणि तुमच्या पुढील वाटचालीत कसा सहभाग आहे?
मला वाटते, 1950 साली सुनील जाना हे, भारतातील प्रसिध्द छायाचित्रकारांपैकी एक होते, त्यांनी डोक्यावर मैल्याची टोपली घेतलेल्या सफाई कामगाराचे छायाचित्र काढले होते. त्यानंतर प्रथमच माझ्यासारखा छायाचित्रकार या विषयाकडे वळला होता. ती सीरिज करत असताना समाजातील जातीयतेची धग मला खर्या अर्थाने जाणवली. जाणवले आजही अस्पृश्यता पाळली जाते. जातीआधारित व्यवसाय; विशेषत: तथाकथित खालच्या जातींवर आजही लादले जात आहेत. तेथे अगदी 100 टक्के आरक्षण आहे, त्याबद्दल कोणीही अवाक्षर उच्चारत नाही. प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय म्हणायचे, ‘आपला देश आंधळा आहे.’ इथे तर आंधळेपणाचे सोंग घेतलेले. सार्या शहराची स्वच्छता दिसते; पण ते स्वच्छ करणार्या व्यक्ती मात्र अदृश्य. त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसते, त्यांच्या त्या घाणीतल्या जगण्याबद्दल ना कुणाला आस्था, ना सहानुभूती. हे अदृश्य जगणे माझ्या छायाचित्रांमुळे दृश्य स्वरुपात पुढे आले आणि मलाही माझी दिशा सापडली. कॅमेरा हातात घेतला आणि फोटो काढले, असे होत नाही. फोटो काढणे ही शेवटची क्रिया आहे. प्रथम त्या विषयाची सखोल जाण, आस्था निर्माण झाली पाहिजे. त्यातूनच तुम्हाला सुरुवात कुठून करायची आणि कुठे थांबायचे, हे कळते. ही जाण मला या सीरिजने दिली. मी फक्त फोटो काढून थांबलो नाही. आजही माझा त्यांच्याशी जैवसंबंध आहे. सफाई कामगारांच्या मुलांसाठी गेली बारा वर्षे मी फोटोग्राफीचे वर्ग घेतले, त्यापैकी जवळजवळ दहा-बारा मुले आज पत्रकारितेत आहेत. ठिकठिकाणी लावलेल्या प्रदर्शनातून हा प्रश्न मी जनतेपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला. ही प्रदर्शने पाहिल्यावर मला हमखास प्रश्न यायचा, ‘तुमची जात? ही माणसं तुमचीच असणार त्याशिवाय तुम्ही यांची छायाचित्रे कशी काढणार?’ मी वैतागून सारे बंदच करणार होतो. पण आपलीच भावंडं ही, कशी सोडणार? छोटी-मोठी प्रदर्शने करत राहिलो, ‘नॅशनल जीऑग्राफिक’ने बोलावले. माझी प्रचंड घालमेल, हे फोटो अमेरिकेत कसे दाखवायचे, आपल्या देशाची प्रतिमा मलीन होईल वगैरे, वगैरे. पण मी विचार केला आपण कलाकार आहोत, आपली कलाकृती लोकांसमोर गेलीच पाहिजे. तसेच आपण नुसतेच कलाकार नाहीत तर दूत आहोत या लोकांचे. त्यांची बाजू, स्थिती जगासमोर आपण मांडलीच पाहिजे. अशाच एका प्रदर्शनात रतन टाटांनी ही छायाचित्रे बघितली. त्यांनी संवेदनशीलता दाखवत प्रस्तावना लिहित त्या छायाचित्रांचे पुस्तक छापून दिले.
तुमच्या दलित अत्याचारांवरील छायाचित्रांच्या सीरिजबद्दल काय सांगाल?
सफाई कामगारांवरील छायाचित्रांची सीरिज करताना माझ्या लक्षात आले, वर्णव्यवस्था आजही कार्यरत आहेच आणि त्याविरोधात विद्रोह करणार्यावर होणार्या अत्याचारांची संख्या मोठी आहे. केवळ उच्च जातीतल्या मुलीबरोबर बोलला, बाबासाहेबांचे गाणे रिंगटोनवर वाजविले यांसारख्या किरकोळ कारणांवरून जीव घेण्याचे प्रकार महाराष्ट्रासारख्या प्रगत फुले-आंबेडकर-शाहू-शिवाजीचा वारसा सांगणार्या राज्यात घडत होते. मी अत्याचारांच्या ठिकाणी जाऊ लागलो, त्या कुटुंबीयांना भेटू लागलो. पण केवळ फोटो काढण्यापुरते माझे जाणे मर्यादित नव्हते. आम्ही अत्याचार झालेल्या 25 कुटुंबांना मुंबईत घेऊन आलो, त्यांची परिषद आयोजित केली, त्यांना पत्रकार, कार्यकर्त्यांसमोर आणले. त्या अत्याचारांना जगासमोर आणण्याचे कामही मी केले. सफाई कामगारांपासून सुरू झालेल्या छायाचित्रांच्या मालिकांत दलित अत्याचार, देशभरातील स्त्रियांवरील; विशेषत: दलित स्त्रियांवरील अत्याचार, आदिवासीतील बालमृत्यू, कुपोषण अशा मालिकांची भर पडत राहिली.
हे सर्व करत असताना तुम्हाला काही विरोध झाला काय ? असे काही संघर्षाचे प्रसंग?
तसा माझ्या छायाचित्रांना कधी विरोध झालेला नाही. एक तर माझी छायाचित्रे दिवाणखान्यात लावण्यासाठी शोभेची नाहीत. काही ठिकाणी मला म्हणतात, ‘हीच चित्रे का दाखवतो?’ पण मी म्हणतो, ‘मी यांचाच प्रतिनिधी आहे, तुम्हाला मान्य करायचे असेल तर करा.’ पण त्यांना ते मान्य करावेच लागते. कारण समोरचे फोटो सत्यच सांगत असतात. माझी छायाचित्रे सांगत असतात, ‘तुम्ही आमच्या संघर्षात सामील व्हा, आमच्या या न्यायाच्या आणि सन्मानाच्या शोधयात्रेत सामील व्हा.’ ती विचार करायला लावतात. ती छायाचित्रे माणसातल्या विवेकाला आवाहन करत असतात. त्यामुळे जेव्हा मी माझी छायाचित्रे एखाद्या परिषदेत वगैरे दाखवतो, तेव्हा हॉलमधील प्रेक्षक स्तब्ध होऊन जातात.
आजच्या राजकीय–सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही एकूण कला क्षेत्राकडे; विशेषत: छायाचित्रकलेकडे कसे पाहता?
आजच्या विशेषत: गेल्या सात-आठ वर्षांपासून आपण एका वेगळ्याच राजकीय-सामाजिक फेजमध्ये गेलो आहे. परिस्थिती नक्कीच गंभीर आहे. नुकताच मी छत्तीसगडमध्ये जाऊन आलो. तेथे कुपोषणामुळे होणार्या बालमृत्यूचा दर एकेक तालुक्यात 35-35 टक्के आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यावरण याबाबतीत फारच गंभीर स्थिती आहे. जात, धर्म, मंदिर-मशीद हेच मुख्य प्रश्न बनले आहेत. आजही मैला डोक्यावरून घेऊन जाण्याची प्रथा नष्ट झालेली नाही. आजही एक एक रुपया दिवसाचा घेत मेहतर, डोंब, वाल्मिकी समाजातील लोक ही कामे करीत आहेत. माझ्यासारखा छायाचित्रकार समाजातील विद्रुपता आजवर उघड करत आलेला आहे. पण यापुढे हे स्वातंत्र्य मला राहील की नाही हा प्रश्न माझ्यापुढे आणि माझ्या सारख्या कलाकारांपुढे नक्कीच आहे. म्हणूनच कलाकारांनी आपआपल्या कोषातून बाहेर पडले पाहिजे. आपल्या कला माध्यमाच्या सहाय्याने जनतेला जागृत केले पाहिजे, असे मला वाटते.