सांगली शहरापासून फक्त बारा किलोमीटरवर येरळा नदीच्या काठावर मिरज आणि तासगाव दोन तालुक्यांच्या हद्दीवर वसलेलं नांद्रे हे तसं खाऊन-पिऊन सुखी असलेल्या ऊस बागायतदारांचं गाव. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक इत्यादी सर्वच क्षेत्रात जागरूकतेचा वारसा या गावाला लाभलेला आहे. गावात जातीय सलोखा नांदतोय. गावच्या वेशीवरच असलेल्या हजरत ख्वाजा कबीर दर्ग्याचे भक्तगण सार्या जाती धर्मातले आहेत. असं जरी असलं तरी याच दर्ग्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे, अवैज्ञानिक आणि अघोरी असे प्रकार सर्रास दिवसाढवळ्या वर्षानुवर्षे चालत आलेले आहेत. अगदी बिनबोभाटपणे ते सुरू आहेत. त्यावर भाष्य करण्याचं कुणी धाडसच करत नाही. मध्यंतरीच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ.प्रदीप पाटील यांनी त्यास वाचा फोडली होती. त्यावर थोडा वचक बसला. पण अंधश्रद्धेचे व अवैज्ञानिक प्रकार काही थांबले नाहीत. अंधश्रद्धेला बळी पडणारांची त्या दर्ग्यात अमावास्येला व गुरूवारी मोठी वर्दळ असते. 15 ऑक्टोबर 2012 रोजी सर्वपित्री अमावास्या होती. त्या दिवशी जनार्दन गोंधळी, विलास राजमाने आणि महादेव शिंदे यांच्यासह मी त्या दर्ग्यात तीन-चार तास घालवले.
“हजरत ख्वाजा कबीर दर्गा” असं त्या दर्ग्याचं नाव. ख्वाजा आणि कबीर हे दोघे सख्खे भाऊ. आखाती देशात जन्मलेल्या या दोन भावांची नैनुद्दिन व मैनुद्दिन अशी मूळ नावं होती. दोघेही भाऊ शाळेत अत्यंत हुशार असल्यामुळे त्यांच्या शिक्षकांनी त्यांची कौतुकानं ख्वाजा व कबीर अशी नावं ठेवली. बहामनी राज्याची शकले होऊन ज्या पाच शाह्या झाल्या त्या पैकी गावकोंड्याची कुतुबशाही एक होती. तिथले कुतुबशहा चौदाव्या शतकाच हाज यात्रेस गेले. तिथं त्यांनी हिंदुस्थानात भूतंखेतं आणि चेटकिणी यांनी हैदोस घातला असल्याचं सांगितलं. त्यामुळं त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ख्वाजा आणि कबीर या दोन भावास कुतुबशहाबरोबर हिंदुस्थानात पाठविण्यात आलं. ते प्रथम गोवळकोंड्यास गेले. तिथून मिरज येथे व नंतर देवरूखला गेले. येरळा नदी काठच्या नांगरे-पाटील नावाच्या शेतकर्याने त्यांना नांद्र्यास आणले. मुळात ख्वाजा व कबीर हे हिंदुस्थानात आले ते भूतांनी आणि चेटकिणींनी घातलेल्या थैमानाचा बंदोबस्त करण्यासाठी. नांद्य्रात स्थायिक झाल्यावर त्यांनी त्यांचे काम सुरू ठेवले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची कबर म्हणा, समाधी म्हणा किंवा स्मारक म्हणा ते बांधून दर्ग्यात त्यांच्या अनुयायांनी त्यांचे काम पुढे चालू ठेवले अशी अख्यायिका आहे.
दर्ग्यात प्रवेश केल्याबरोबर पश्चिम बाजूस बाबांचे समाधीस्थान/कबर आहे. त्या ठिकाणी लोखंडी जाळीतून कबरी दिसतात. मात्र स्त्रियांना तिथं प्रवेश नाही. स्त्रियांना प्रवेश नाकारणारी कारणे शोधण्याचा प्रयत्न केला पण ती सापडली नाहीत. शनि शिंगणापूरला पूर्वी तेल वाहण्याच्या कट्ट्यावर,. स्त्रियांना प्रवेश नव्हता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आंदोलनानंतर त्या कट्ट्यावर सर्वांनाच प्रवेश बंदी केली व कट्ट्याभोवती स्त्रियांना प्रवेश दिला. कबरीच्या पूर्वेला बाबांची गादी आहे. तिथल्या भिंतीला गुळगुळीत फरशी बसविलेली आहे. त्या फरशीला रूपये, दोन रूपये, पाच रूपये यांची नाणी चिकटविण्याची एक शक्कल तिथल्या मंडळींनी काढली आहे. भिंतीला नाणे चिकटले तर ते नाणे बाबाच्या गादीस अर्पण करावे अशी सूचना तिथं लिहिली आहे. ज्या भाविकांचे नाणे चिकटते त्याच्या इच्छा पूर्ण होतात अशी अंधश्रद्धा तिथं पसरविली आहे. त्यामुळं असंख्य लोक नाणी चिकटविण्याच्या खटपटीत असतात. वास्तविक नाणं आणि भिंत यातील जागा निर्वात झाल्यास म्हणजे तिथं बिलकूल हवा नसल्यास नाणे भिंतीस चिकटते. नाणे आणि भिंत यांच्यामध्ये किंचित जरी हवा राहिली तर नाणे चिकटत नाही. हे शास्त्रीय कारण आहे. परंतु या विज्ञानाचाच बाजार मांडून भाविकांना अंधश्रद्धेकडे नेले जाते आहे वास्तव आहे.
बाबांच्या गादीसमोर लोखंडी गजांची जाळी आहे. व एक दरवाजा आहे. त्या जाळीच्या आत तीन-चार जण असतात. तिथं भाविकांची गर्दी असते. तिथं ताईत मिळतो. एका ताईतला पंधरा रूपये घेतले जातात. ज्याला हवा तो भाविक ताईत बांधून घेतो. दर गुरूवारी व अमावास्येला शेकडो ताईत बांधले जातात. बाबांच्या गादीशेजारी बसलेला एकजण भाविकांच्या समस्या ऐकून घेतो आणि त्यावर तातडीनं इलाजही सांगतो. पोरगीला सासरी जाच होतो, सून नांदत नाही, पोराला नोकरी मिळत नाही, घरात शांती नाही, शेजारी भांडतात, तब्येत सुधारत नाही, कायम आजारी असतो, पोरगं खुळ्यासारखं वागतं, कोर्टाचा निकाल कधी लागेल, तो कसा लागेल यासारखे नानाविध प्रश्न विचारले जातात, समस्या सांगितल्या जातात. प्रश्न विचारल्याबरोबर त्याच्या हातात आधीच बांधून ठेवलेली एक पुडी दिली जाते. ती पुडी सोडली की, त्यात लहान लहान तीन पुड्या असतात. त्यातली एक पुडी तिथला पुजारी घेतो. उलगडतो आणि प्रश्नाचं उत्तर देतो. आमच्या बरोबर असलेले विलास राजमाने हे सेवानिवृत्त एस.टी.कामगार होते. त्यांची कोणतीही कोर्ट केस नव्हती. तरीही त्यांनी त्या पुजार्यास माझ्या कोर्ट केसचा निकाल कधी लागेल व तो माझ्यासारखा लागेल काय? असे विचारले असता त्याला एक पुडी दिली. ती सोडली. त्यात तीन लहान पुड्या होत्या. त्यातली एक त्यानं परत घेतली. ती उलगडली. त्यात कुंकू होतं. तो पुजारी ताबडतोब कुंकू दाखवून म्हणाला की, हे बघं तुझा निकाल तुझ्यासारखा झालाच आहे. आता बिनधास्त जा. नसलेल्या केसचा निकाल घेऊन राजमानेंनी त्यास नमस्कार केला व तिथून काढता पाय घेतला.
सांगलीच्या एम.आय.डी.सी.शेजारी राहणारं एक तरूण पोरगं एकानं हाताला धरून बाबाच्या गादीसमोर आणलं. तो म्हणाला, पोराला परवा मटण आणायला पाठवलं होतं. दिवस बुडायच्या वक्ताला मटण घेऊन येताना तो शेजारच्या ओढ्यात पडला. त्यावेळेपासून तो खुळ्यासारखा करायला लागलाय. लगेच पुजारींनी पुडीची उचलाउचली केली आणि ह्या पोराला भूत लागल्याचं जाहीर करून टाकलं. ज्या ओढ्यात तो पडला त्या ठिकाणी गुरूवारी आणि अमावास्येला मटण व अंडी उतरून टाकायला सांगितले. त्यास एक बाबाचा ताईत बांधला. अंगारा लावला. पुढच्या गुरूवारी परत यायला सांगितलं आणि त्याची बोळवण केली. गर्दीतून बाहेर येताना आमच्यातल्या एकानं त्या पोराला दवाखान्यात का नेलं नाही असं विचारलं तर तो माणूस त्याच्यावर एकदम खेकसलाच. त्याचा परिणाम म्हणून सर्वच भाविक आमच्याकडं संशयित नजरेनं बघायला लागले.
बाबांच्या गादीच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेच्या कोपर्यात एक चिंचेचे झाड आहे. त्या झाडाच्या खोडावर असंख्य मोळे मारलेले आहेत. त्याला भूताखेत्यानं झपाटलं आहे त्यानं त्या झाडाजवळ जायचं. त्यांच्या उंचीप्रमाणं त्यानं त्या झाडाच्या खोडात मोळा ठोकायचा. तो मोळा डायरेक्ट भूताच्या कपाळात जातोय आणि भूत पळून जातं. अशी अंधश्रद्धा असल्यानं त्या झाडात बरेच मोळे मारले आहेत. त्या झाडाला अनेकजण फेर्या मारत असतात. सर्वात मोठी अंधश्रद्धा ही त्या झाडाजवळ बघायला मिळते. बाबांच्या कबरीजवळ चारी बाजूला रिकामी जागा आहे. कबरीच्या भिंतीला दक्षिण बाजूस लोखंडी जाळी आहे. त्या जाळीसमोर अनेक जण आपल्या स्वत:च्या अंगावरून, मुलाबाळाच्या अंगावरून लिंबू उतरून टाकतात. तोच लिंबू स्वत:च्या पायाखाली चिरडतात. अशा चिरडलेल्या लिंबाचा ढीग पडतो आणि लिंबाच्या रसाचा राडा झालेला असतो. त्या कबरीच्या पश्चिम व दक्षिण बाजूस अंगात येऊन घुमणारे पाच-सहा स्त्री पुरूष असतात. ते मूळचे नांद्र्याचे नाहीत. बाहेर गावाहून येतात. भिंतीला डोकं लावून घुमायला लागतात. त्या घुमणार्या बाई किंवा बाप्याकडं लगेच भाविक जातात. आपापल्या समस्या सांगतात. अंगात येणारे मग समस्या सांगणारास भेडसावतात. शिवीगाळ करतात. त्यांच्या चुका सांगतात. मग त्यावर उपायही सांगतात. लिंबू उतरून टाकणे, पाणी टाकणे, अकरा अमावास्या किंवा अकरा गुरूवार दर्ग्यात येणे, मटण/अंडी उतरून टाकणे असे उपाय तर सांगतातच याशिवाय बाधिताच्या कुटुंबियांना लुबाडतात. अंगात येणारी बाई/पुरूष भूत काढण्यासाठी बाधिताला मारतात. कधी हाताने तर कधी काठीनं मारतात. अंगात येणार्या बाया किंवा बाप्या हे मुस्लीम भक्तांना हिंदीत तर हिंदू भक्तांना मराठीत सल्ला देतात. अंगात येणारा समोरचा माणूस हिंदू किंवा मुसलमान असल्याचे कसे कळते याची मात्र आम्हास उकल झाली नाही.
अंगात येणे व समस्यांचे इलाज सांगणे हेच मुळात एक ढोंग असते. या ढोंगाला अभय देण्याचं काम नांद्र्याच्या दर्ग्यात खुलेआम चालते. अंधश्रद्धेला खतपाणी घालणे, ती जोपासणे, लोकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांना अंधश्रद्धेकडे नेणे, त्यांच्यावर अवैज्ञानिक व अघोरी उपाय करणे, त्यांची आर्थिक लुबाडणूक करणे या सर्व बाबींना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्राच्या विधीमंडळात जादूटोणा विरोधी कायदा संमत होणे हाच उपाय आहे. परंतु धर्मरक्षणाचा मक्ता घेतलेल्यांना त्यांची रोजीरोटी बुडेल या भीतीने ते कायद्यालाच विरोध करीत आहेत.
– अॅड. के. डी. शिंदे