ऑगस्ट 2012 मध्ये मी माझे नैसर्गिक वडील गमावले व ऑगस्ट 2013 मध्ये मी माझे सामाजिक कार्यातले वडील गमावले. केवढे हे आभाळाएवढे दु:ख.
आय.एल.एस.विधी महाविद्यालय, पुणे येथे बारावीनंतर प्रथम वर्ष एल.एल.बी.त शिकत असताना मी डॉ. दाभोलकर यांचे भाषण पुण्यात पहिल्यांदा ऐकले त्याला जवळपास आता 25 वर्ष लोटली. मी तेव्हा खूप प्रभावित झाले होते. लग्न झाल्यानंतर, वकिली व्यवसाय व घरगुती जबाबदार्यांमुळे, माझा अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क राहिला नाही पण डॉ. दाभोलकरांचे विचार पटायचे.
आता पुन्हा डॉक्टरांचे भाषण ऐ कायला मिळेल, एवढ्याच एका कारणासाठी मी अंनिस पिंपरी-चिंचवड शाखेच्या नियमित बैठकांना जाऊ लागले. अंनिसच्या विविध उपक्रमांमध्ये नियमित सहभागी होऊ लागले तसा डॉक्टरांशी संपर्क वाढू लागला. कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात डॉक्टरांचे विचार पुन्हा ऐकले, कार्यकर्ता कसा असावा हे जेव्हा डॉक्टर सांगायचे तेव्हा तसे गुण आपल्यात आहेत का हे पडताळून पाहू लागले. डॉक्टरांचे प्रत्येक भाषण हे प्रभावी असायचे, त्यांची साधी राहणीमान व उच्च विचारसरणी मला फार आवडायची. आपल्यालासुद्धा आपले विचार मांडता यावे व डॉक्टरांसारखे बोलता यायला हवे असे वाटायचे, कारण मी अंनिसमध्ये येण्यापूर्वी कधीच स्टेजवर बोलले नव्हते. डॉक्टरांनी मला प्रोत्साहन दिले व हळूहळू घाबरत घाबरत मी स्टेजवर बोलू लागले पण डॉक्टरांनी माझ्या चुका दाखवून मला कधीच निरूत्साही केले नाही. उलट बळच दिले. त्यांच्याबद्दलच्या खूप आठवणी आहेत कोणते सांगावे कळत नाही पण आवर्जून सांगण्यासारख्या दोन आठवणी सांगते.
पहिला प्रसंग असा की, 30 मार्च 2013 रोजी टी.व्ही.9 चॅनेलच्या वार्ताहरांनी डॉक्टरांना फोन केला आणि पुण्यात दुपारी चार वाजता लाईव्ह चर्चेमध्ये सामील होणार का विचारले, कारण प्रसंग असा होता की, राजस्थानमध्ये एकाच कुटुंबातील 6-7 व्यक्तींनी विषारी लाडूचे सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कारण त्यांनी पूजा करूनसुद्धा शंकर भगवान त्यांच्या भेटीस आले नाहीत म्हणून लाडू प्राशन करून ते स्वत: शंकर भगवान यांना भेटावयास जाणार होते. त्यादिवशी डॉक्टर पुण्यात नव्हते म्हणून त्यांनी मला फोन केला आणि मला विचारले की, तू पुण्यात आहेस का, मी हो म्हणाले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, टी.व्ही.9 चॅनेलचे लोक येतील आणि लाईव्ह चर्चेमध्ये तू अंनिसतर्फे बोल. टी.व्ही.वर लाईव्ह चर्चेमध्ये यापूर्वी मी कधीच सामील झालेले नाही असे मी डॉक्टरांना भीतभीतच बोलले. तेव्हा डॉक्टरांनी मला प्रोत्साहन दिले व म्हणाले मी जेवढे सांगतो ते बोल व अंनिसची भूमिका तुला माहीत आहे त्याविषयी बोल. सगळा धीर एकवटून मी तयारी करायला सुरवात केली, मार्गदर्शिका वाचली, मुद्दे काढले. अॅड.रमेश(माझे पती), तसेच मिलिंद देशमुख(राज्यसचिव) यांच्याशी चर्चा केली आणि मग चार वाजता टी.व्ही.9 चॅनेलचे लोक संपूर्ण संच घेऊन आमच्या घरी आकुर्डी, पुणे येथे आले व मी पहिल्यांदा लाईव्ह चर्चेमध्ये अंनिसतर्फे बाजू मांडली. चर्चा चांगली झाली. केवळ मला डॉक्टरांमुळे टी.व्ही.च्या लाईव्ह चर्चेमध्ये व्यवस्थित बोलता आले.
दुसरा प्रसंग असा की, आम्ही म्हणजे मी, डॉक्टर व मिलिंद देशमुख जून 2013 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व ट्रेनिंग इन्स्टिट्युट(बार्टी) पुणे येथे गेलो होतो; आम्ही तेथील महासंचालक मा.परिहार साहेबांची भेट घेतली व शिक्षकांचे शिबीर घेण्याविषयी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर आम्ही निघालो, दुपारची जेवणाची वेळ होती. बार्टीच्या कार्यालयाबाहेर आल्यावर डॉक्टर म्हणाले, ‘आपण कुठेतरी जेवायला थांबू’ तेव्हा मिलिंद देशमुख व मी दोघेही म्हणालो, ‘आम्ही डबा आणलाय!’ तेव्हा डॉक्टर म्हणाले, ‘अरे वा! छान, आपण डबा खाऊयात!’ तेव्हा मला फार आश्चर्य वाटले आणि आम्ही तिथेच झाडाखाली कारमध्ये बसून जेवण केले. तेव्हा डॉक्टरांनी खूप आनंदाने कौतुकाने आमच्या डब्यातले जेवण खाल्ले. मी आणलेलं आंब्याचा जाम पण त्यांनी खूप आवडीने खाल्ला. त्यामुळे मला खूप आश्चर्य वाटले की, एवढे थोर व्यक्तिमत्व पण किती साधेपणा व मनमिळाऊपणा होता त्यांच्यात.
अशा अनेक आठवणी डॉक्टरांबद्दल सांगता येतील आणि आता तर त्या फक्त आठवणी म्हणून राहतील खोल अंत:करणामध्ये आणि अश्रूरूपी वास्तवामध्ये!
– अॅड. मनिषा रमेश महाजन