Categories
आठवणीतले दाभोलकर

कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे डॉक्टर

वार्षिकांक – २०१३

कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा, प्रोत्साहन देणे, संधी देणे, त्यांच्यातील क्षमतांची वाढ करून त्यांच्याकडून प्रेमाने काम करून घेण्याचे कसब डॉ.दाभोलकरांच्यात होते. त्यांची भेट तर उत्साह वाढविणारी ठरायची त्यामुळे त्यांच्या आठवणी आमच्या मनात चिरंतन राहतील….

22 वर्षे डॉक्टरांच्याबरोबर काम करताना त्यांचे मार्गदर्शन, सहवास यामुळे कार्यकर्ता म्हणून जडणघडण झाली. कार्यकर्त्यांच्या मताचा आदर करायचा, संघटनेतील सर्व निर्णय एकमताने घेण्याचा परिपाठ डॉक्टरांनी आम्हास घालून दिला. संघटनेतील पदाधिकार्‍यांच्या निवडी ही बिनविरोध, एकमताने होत आहेत. कार्यकर्ता आणि काम हेच चळवळीच्या केंद्रस्थानी राहिलेले आहे.

डॉ.दाभोलकरांच्या व्यक्तीमत्वाचा माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर प्रभाव टिकून आहे. डॉक्टरांचे साधे राहणे, खादीचे कपडे, माफक गरजा ठेवणे, समर्पित भावनेने अविरतपणे काम करणे हे सर्व आम्हाला नेहमीच अनुकरणीय ठरले आहे. डॉक्टरांचा नियमित व्यायाम, शारीरिक तंदुरूस्ती हे तर आम्ही डॉक्टरांच्यामुळे शिकलो. डॉक्टर सर्वांच्या अगोदर उठून व्यायाम करताना आम्ही बघत त्यामुळे ती सवय आमच्यासारख्यांना लागणे साहजिक होते. कार्यकर्त्यांनी आजारी पडणे हा सामाजिक गुन्हा आहे, त्यामुळे आजारच आपल्याजवळ येणार नाही यांची दक्षता कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. डॉक्टर आंतरराष्ट्रीय पातळीवरील कबड्डीपट्टू होते. त्यांचे किस्से तर नेहमीच स्मरणात राहतील.

संघटनेचे नेतृत्व करताना डॉक्टरांचा वावर नेहमीच सामान्य कार्यकर्त्यासारखा राहिला आहे. बैठका, परिषदा जिथे असतील तिथे डॉक्टर वास्तव्य करायचे. कार्यकर्ते जिथे राहतात तिथेच राहण्यात त्यांना आनंद वाटायचा. नेते म्हणून त्यांनी वेगळेपण कधीच दाखविले नाही. तुमच्यातील मी एक या भूमिकेमुळे आम्हाला त्यांचा अधिक आदर वाटत होता. अं.नि.स.च्या कार्यकर्त्यांनी सर्व पातळ्यांवर सक्षम असलेच पाहिजे ही डॉक्टरांची भूमिका होती. कार्यकर्ते लिहते, बोलते, कर्ते असेच पाहिजेत हा आग्रह होता. कार्यकर्ते काम करतात, बोलतात मात्र लिखाणात कमी पडतात या बद्दलची खंत ते व्यक्त करायचे. मला डॉक्टरांनी विविध उपक्रमावर पुस्तिका लिहायला सांगितली. दोन-तीनदा डॉक्टरांनी विचारले झाली का पुस्तिका? मात्र माझा आळस म्हणा किंवा कामाचे व्याप यामुळे शक्य झाले नाही. काम झाले नाही म्हणून डॉक्टर कधी कुणा कार्यकर्त्यांवर रागावले असा मला प्रसंग आठवत नाही. कार्यकर्ते कार्यकर्ता काय पण डॉक्टर कुणावर चिडले, रागवले हे आम्ही कधीच बघितलं नाही. डॉक्टरांच्यात ‘करूणा’, ‘प्रेम’ हे फार मोठ्या प्रमाणात होते.

संघटनेतील विविध कामांच्या विकेंद्रीकरणाला डॉक्टरांनी नेहमीच प्राधान्य दिले. राज्य कार्यकारिणी, कार्यकारी समिती रचना त्यासाठी केली. जाणीवपूर्वक ठरवून डॉक्टरांनी काही मोहिमांचे नेतृत्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे दिले. सेकंड लिडरशीप तयार होण्यासाठी डॉक्टरांनी केलेले प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीसाठी पथदर्शक ठरले. राज्यस्तरीय बुवाबाजी संघर्ष अभियान, खगोलयात्रा, ‘वारसा समाजसुधारकांचा’ मोहीम आदी राज्यव्यापी कार्यक्रमांचे नेतृत्व आम्हा तरूणांना दिले. आम्हा प्रमुख तरूण कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देण्यासाठी डॉक्टर आग्रही होते.

राज्यातील प्रमुख कार्यक्रम, दशकपूर्ती असो, द्विदशकपूर्ती असो सर्वच काम करणार्‍या, कार्यकर्त्यांना त्यांनी बोलण्याची संधी दिलीच त्याचबरोबर संयोजनाची जबाबदारी दिली. डॉक्टर फक्त आम्हावर लक्ष ठेवून गरज असेल तरच सूचना करायचे, मार्गदर्शन करायचे. डॉक्टरांना अनेक ठिकाणी आग्रहाची निमंत्रणे येत होती. मात्र डॉक्टर अनेकदा आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना त्या कार्यक्रमास पाठवत. शिवाजी विद्यापीठातील एका प्रमुख कार्यक्रमास डॉक्टरांना बोलविले होते. डॉक्टरांनी विद्यापीठाला जाण्यासाठी माझे नाव सूचविले. माझे इस्लामपूरातील कार्यकर्ते कार्यक्रम करतील असे सूचविले. कार्यकर्त्यांना सतत संधी देऊन त्यांच्यातील नेतृत्व विकसित करण्याला डॉक्टर प्राधान्य देत. स्वत:हून राज्य कार्याध्यक्ष पद सोडण्याचा त्यांनी जणीवपूर्वक, ठरवून निर्णय घेतला. त्यांनी संधी दिल्याने पूर्णवेळ काम करणारे अविनाश पाटील आज गेली तीन वर्षे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत क्षमतेने पार पाडत आहे. डॉक्टरांच्या खुनानंतर चळवळीच्या नेतृत्वाचे काय? हा प्रश्न तयार झाला नाही. हा फक्त डॉक्टरांनी दूरदृष्टीने केलेल्या प्रयत्नाचा परिपाक आहे.

डॉक्टरांचे प्रवक्तेपण उच्च दर्जाचे होते. संघटनेचे प्रवक्तेपणे इतर कार्यकर्त्यांनाही सक्षमतेने करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले. एकदा तर मला म्हणाले, तूच आमचा प्रमुख प्रवक्ता. आता आम्ही पत्रकार, दे आमच्या प्रश्नांची उत्तरे, कर अंनिसचे प्रवक्तेपण, या डेमोमध्ये मला मध्यम गुुण मिळाले. त्यावेळी डॉक्टरांनी आम्हा सर्वांना सांगितले, माझ्यापेक्षा अधिक कौशल्याने तुम्ही सर्वांनी प्रवक्तेपण केले पाहिजे. समर्थ प्रवक्तेपण करणारी फळी आज डॉक्टरांनी तयार केली आहे.

डॉक्टर उत्तम वक्ते, लेखक, प्रबोधनकार होते. त्यांचे कवितांचे, अनेक महत्वाच्या उतार्‍यांचे पाठांतर थक्क करणारे होते, कुठली कविता, कुठे वापरायची याचे कौशल्य त्यांच्याकडे जबरदस्त होते. चळवळीच्या कामाला मदत व्हावी म्हणून अंनिसच्या विचारांशी सहमत असणारे, मदत करणारे सेलिब्रिटीजचे महत्व आहे. डॉ.दाभोलकर अशा सेलिब्रिटीचा खूप आदर करायचे, काळजी घ्यायचे.

जून 2013 मध्ये इस्लामपूर राज्यकार्यकारिणी व प्रबोधन व्याख्यानमालेसाठी अच्युत गोडबोले आले होते. ते ताकारीमध्ये उतरणार होते. पहाटे पाचच्या सुमारास त्यांना रिसिव्ह करण्याला स्वत: हजर झाले. यांचे कौतुक गोडबोलेनांही वाटले.

मी डॉक्टरांना म्हटले मी रिसीव्ह करतो पण त्यावेळी डॉक्टर म्हणाले, “व्यस्त कामातून ते आपल्यासाठी, चळवळीला मदत व्हावी म्हणून येतात तर त्यांना रिसिव्ह करण्याला मी का येऊ नये.” याच स्वभावामुळे ते सर्वांना आपलेसे करायचे.

आम्ही सांगलीचा कार्यक्रम करून परत येत होतो. इस्लामपूरचे आम्ही पाच जण होतो. एक महिला कार्यकर्ती सोबत होती. डॉक्टरांनी विचारले. इस्लामपूरला कसे जाणार? आम्ही म्हटले एस.टी.ने जाणार. मग म्हणाले आता उशीर झालाय. चला आपण सर्व माझ्या गाडीतून जाऊ. मी म्हटले डॉक्टर आपण सातजण होतोय.

‘पुढे दोघे बसा. मागे आपण चौघे बसू’

डॉक्टरनी आम्हाला इस्लामपूरला सोडले ते पुढे सातारला गेले. कार्यकर्त्यांची काळजी घेणारे, नेतृत्व म्हणून आमच्या हृदयात त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या खुनानंतर खूप मोठा धक्का आम्हा कार्यकर्त्यांना बसला. डॉक्टर हॉटेलमध्ये कधी जायचे नाहीत. कार्यकर्त्याच्या घरीच उतरणे, जेवण नेहमीचेच. डॉक्टरांचा कार्यकर्त्यांशी पर्सनल टच(व्यक्तीगत स्पर्श) खूप असायचा. प्रत्येक कार्यकर्त्याची सविस्तर माहिती डॉक्टर करून घेत होते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करत होते.

जादूटोणाविरोधी कायद्यासाठी डॉक्टरांनी खस्ता खाल्ल्या. कायद्यानिमित्ताने अनेक मंत्री, नेते मंडळींना डॉक्टर सतत भेटत, पाठपुरावा घेत. ते जे जे करत ते सर्व आम्हां कार्यकर्त्यांना सांगत. डॉक्टर मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री किंवा वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटल्यावर त्यांच्याशी जी चर्चा करत त्याचे ब्रिफिंग आम्हां प्रमुख कार्यकर्त्यांना आवर्जून करत. एकदा डॉक्टरांना मी म्हणालो, की डॉक्टर तुम्ही सर्व करताय, सर्व कामाचा पाठपुरावा करता हे आम्हा कार्यकर्त्यांना कशाला सांगता? त्यावर डॉक्टर हसून म्हणत, अरे! तुम्हाला पुढे संघटना चालवायची आहे. त्यासाठी काय काय करायला लागते हे तुम्हाला माहीत झाले पाहिजे. त्यातील सर्व बारकावे तुम्हाला समजले पाहिजेत. त्यामुळे हे सांगणे माझी जबाबदारी आहे.

मे-2013 ला सातारा येथे प्रमुख 10-12 संघटना बांधणीसाठी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण चार दिवसांची चिंतन बैठक डॉक्टरांनी बोलविली. ही बैठक तर खूप अविस्मरणीय ठरली. मला तुम्हाला समजून घ्यायचे आहे. पुढील 20 वर्षे संघटना काय करणार याबाबत ते चिंतन होते. कार्यकर्त्यांना समजून घेण्यापासून ते त्यांच्या कौशल्याचा विकास, वेळेचे नियोजन, फ्युचर प्लान, संघटनेचे व्हिजन, संघटना बांधणी यावर चर्चा झाली. अंनिसच्या बैठकीच्या वेळी नेहमी साधे जेवण ठरलेलेच असते. या बैठकीला मात्र डॉक्टरांनी अपवाद केला. स्वादिष्ट जेवणाचा बेत केला. त्यामध्ये त्यांनी दररोज आईस्क्रिम, ज्यूस सर्व कार्यकर्त्यांना दिले. आम्ही त्यांना म्हटले, डॉक्टर तुम्ही आमचे करत असलेले लाड चळवळीला परवडणारे नाहीत. डॉक्टर आपल्या नेहमीच्या हसर्‍या चेहर्‍याने ‘असू दे रे!’ असे म्हणाले. डॉक्टरांच्या सोबतचे आमचे हे अखेरचे चिंतन ठरले.

कार्यकर्त्यांच्या कुटुंबाशीही डॉक्टरांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. आमच्या घरी आल्यावर ते सर्वांची आस्थेने चौकशी करत. जेवण झाल्यानंतर ते माझी पत्नी वनिता हिला जेवणाची स्तुती करून धन्यवाद देऊन निरोप घेत असत. मला जेव्हा मुलगी झाली तेव्हा डॉक्टरांना तिचे काय नाव ठेवायचे याबद्दल विचारले त्यावेळी ते म्हणाले, आपण सामाजिक समतेसाठी लढतोय. त्यामुळे तुझ्या मुलीचे नाव ‘समता’ ठेव! त्याप्रमाणे माझ्या मुलीचे नाव मी समता ठेवले आहे. कार्यकर्त्यांचे कौतुक करायला डॉक्टर कधीच कमी पडत नव्हते. शाखेत घेतलेल्या अभिनव उपक्रमाबद्दल डॉक्टरांना समजले की डॉक्टरांचा हमखास फोन ‘व्वा! छान! ग्रेट!’ या आवाजाचा यायचा. कौतुकाबरोबरच कामाची पुढची दिशा ते सुचवायचे .

गेल्या पाच वर्षापासून आम्ही शाखेच्या वतीने पुस्तक विक्रीचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवितो. आजपर्यंत आम्ही सात-आठ लाखाची पुस्तके विकली. या कामाचे नियोजन आमचे शाखेतील सहकारी प्रा. नितीन शिंदे काटेकोरपणे करत. या सर्व पुस्तक विक्रीतून झालेला नफा आमच्या शाखेला देत असतो. डॉक्टरांना या कामाचे खूपच कौतुक वाटे.

इस्लामपूरातील जून 2013 मध्ये झालेल्या अंनिसची राज्यकार्यकारीणी बैठक डॉक्टरांची ही शेवटची राज्य कार्यकारीणी बैठक ठरली. बैठक संपण्याच्या अगोदर आम्ही बैठकीच्या खर्चाचा हिशोब सादर केला. त्यावेळेला डॉक्टर म्हणाले की, इस्लामपूर शाखेचा आदर्श सर्वांनी घ्यावा. हे डॉक्टरांचे बोल आम्हाला कार्य करण्यास प्रेरणा देतात.

डॉक्टरांनी हे काम ज्या टप्प्यावर आणून ठेवले आहे त्याच्या पुढे जाण्यासाठी सर्वांनी संघटनेला वेळ देणे. अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. आपल्या नोकरी, व्यवसायानंतर दोन नंबरचा प्राध्यान्यक्रम संघटनेच्या कामाला द्यावा. हीच डॉक्टरांना आपल्या कार्यकर्त्यांची आदरांजली ठरेल!

संजय बनसोडे