Categories
बुवाबाजी

काशीच्या पंडितांची नवी बुवाबाजी

एप्रिल - २०११

सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात काशीचे ब्राम्हण दर्शवून काही लोक राहतात. उत्तरप्रदेश किंवा बिहारमधील हे लोक 5-6 लोकांच्या समुहाने रहातात. एक खोली भाड्याने घेतात. सुरुवातीला ज्योतिष सांगून लोकांचा विश्वास संपादन करतात. एका गावात साधारणपणे महिनाभर मुक्काम करून दुसर्‍या गावात ते फिरत असतात. ‘काशी के ब्राम्हण’ हे धार्मिक लेबल असल्यामुळे त्यांना समाजात मान मिळतो. गावकरी त्यांना मोफत भाजीपाला, फळे, धनधान्य पुरवितात परंतु आपण फसलो आहोत याची जाणीव झाल्यावर त्यांना पश्चात्ताप करावा लागतो. प्रथम भूत-भविष्य सांगणारे हे ज्योतिषी भाविकांच्या समस्येवर तोडगे सांगून आर्थिक शोषण करत असतात. ह्या तोडग्यांचा दर साधारणपणे 5 हजारांच्या पुढे असतो.

            असाच 7 ज्योतिषांचा समूह धामोरी, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर येथे आला होता. त्यामध्ये पं.राकेश तिवारी(वय 42 वर्षे), पं.पवन तिवारी(वय 45 वर्षे), पं.उपाध्याय(वय 55 वर्षे) व इतर जणांचा समावेश होता. सभोवतालच्या 4-5 तालुक्यांत त्यांची किर्ती लवकरच पोहचली. पंडीत बरोबर भविष्य सांगतात असा प्रचार होताच गर्दी वाढतच गेली. दररोज 300 ते 400 लोक येऊ लागले. भविष्य बघण्यास आपला नंबर येण्यास दोन-तीन दिवस लागायचे. हुशार भाविक मात्र पहाटेच येऊन नंबर लावत असत. परंतु वाढत्या गर्दीप्रमाणेच आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींची चर्चा ग्रामस्थांत सुरु झाली. काहींनी सदरची बाब अंनिस नाशिकचे कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे यांच्या कानावर घातली. लगेचच चांदगुडे यांनी सदर गावास भेट दिली.

            ज्योतिषांच्या आतापर्यंतच्या बनावापेक्षा हा प्रकार काहीसा वेगळा होता. दोन खोल्या असलेले एक घर त्या ज्योतिषांनी भाड्याने घेतले होते. बाहेरील खोलीत चार ज्युनियर ज्योतिषी बसले होते. आम्हाला जास्त कळत नाही कारण आम्ही शिकावू आहोत असा त्या चौघांचा दावा असायचा मात्र आतील खोलीत बसलेला ज्योतिषी खूपच हुशार आहे व तो भाविकांचं भविष्य तंतोतंत सांगेल असंही ते चौघे सांगत असत. भाविकांनी एक नारळ देऊन चौघांपैकी एकाकडे नंबर लावायचा. मग तो ज्युनियर ज्योतिषी भाविकाच्या हस्तरेषा बघून म्हणायचा-“हम तो ट्रेनी है, आपका भविष्य बताने का कोशिश करते है मगर हमारे महाराज आपका भविष्य बराबर बताएंगे” खरंतर बाहेरील ज्योतिषी भाविकांकडूनच त्यांचा भूतकाळ काढून घेत होते. उदा.एखादा ज्योतिषी भाविकांस म्हणायचा. “आप माँ से ज्यादा प्यार करते हो” त्यावर भाविक जर म्हणाला “नही मॉ तो गुजर गई है” तर ज्योतिषी म्हणायचा, “अरे पगले जिंदा थी तो वह टाईम प्यार करता था ना” म्हणजे भाविकास आई नसल्याची माहिती त्यांना मिळत असे. अशा पद्धतीने ज्योतिषी पाच वेगवेगळ्या बाबींची माहिती काढत. बाहेरील चार ज्योतिषांकडे एक तक्ता होता. साधारणपणे पोस्ट कार्डएवढा. त्यामध्ये वेगवेगळे सांकेतिक कोड त्यांनी लिहिले होते. पहिला कोड म्हणजे आई, वडील कोण जिवंत आहे. दुसरा कोड लग्न झाले आहे का? तिसरा अपत्य काय आहे, चौथे शेती, नोकरी की धंदा व पाचवा समस्या कोणती उदा. एखाद्या भाविकाचा कोड ox – o असा काहीतरी असायचा. आतील ज्योतिषाकडेपण असाच तक्ता असे. बाहेरील ज्योतिषांचं एकच काम होतं ते म्हणजे येणार्‍या भाविकांचे तक्त्यामधील स्थान आतील ज्योतिषांकडे गुपचुपपणे पोहचविणे.

            भाविक जेव्हा बाहेरील ज्योतिषाकडे नंबरसाठी बसत असे तेव्हा त्याचा कोड नंबर तो ज्योतिषी त्याचच घरकाम करणार्‍या माणसाकडे पोहचवत असे. व भाविक जेंव्हा आतील खोलीत मुख्य ज्योतिषाकडे जात असत त्यावेळी घरकाम करणारा मुलगा संकेताद्वारे हा कोड पोहचवत असे. उदा.एखाद्या भाविकाचा कोड तक्त्यात 13 नंबरच्या कोडशी एकरूप होता. तेंव्हा हा मुलगा अगरबत्ती लावण्यास किंवा फोटो पुसण्यास जात असत व भाविकाच्या मागे उभे राहून स्वत:चा एक हात डोक्याला व नंतर लगेचच कानाला लावत असे(डोकं म्हणजे एक, डोळे म्हणजे दोन, कान म्हणजे तीन इ….) मुख्य ज्योतिषाला 13 हा नंबर पोहचला की त्याचं काम सोपं होत असे. भाविक आल्यानंतर तो ज्योतिषी मोठ्या भिंगातून भाविकाच्या मस्तकावरील रेषांचे निरीक्षण करी. नंतर जन्मवेळ विचारून पेन्सिलने पाटीवर कुंडली मांडत व पाटीखाली लपविलेल्या तक्त्यातून हळूच तो कोड बघून पाटीवर तो कोड लिहीत असत. मग पुढील दहा मिनिटे भाविकाने फक्त ऐकायचे कारण मुख्य ज्योतिषी आपली माहिती बरोबर सांगतात इतकंच नव्हे तर आपली समस्या काय हे सुद्धा ज्योतिषांना माहीत असते. सर्वच भाविक आश्चर्यचकीत होत. मग समस्येवरील तोडग्यासाठी ज्योतिषी मोठी किंमत वसूल करी.

            अंनिस नाशिकचे कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे त्यांचे मित्र विजय चव्हाणके व दै.लोकमतचे पत्रकार नवघरे हे बनावट भाविक बनून ज्योतिषांकडे गेले. त्याअगोदरच हा प्रकार डॉ.नरेंद्र दाभोलकर, अविनाश पाटील, महेंद्र दातरंगे व शहाजी भोसले यांना सांगण्यात आला. सर्वांनी योग्य ते मार्गदर्शन करून सापळा कसा रचायचा ते सांगितले होते. तिघांनीही बाहेरील ज्योतिषांना खोटी माहिती दिली. तेच भविष्य आतील मुख्य ज्योतिषाने तिघांना सांगितले. प्रत्येकाची खोटी समस्या वेगळी होती. अर्थात त्याकरीता पैसे पण कमीजास्त लागणार होते. शुक्राणुंची कमतरता आहे म्हणून अपत्य प्राप्तीसाठीची फी चार हजार आठशे रूपये झाली. डॉक्टरांना तंत्र-मंत्र विद्याची माहिती नसते. त्यामुळे अपत्य होणार नाही असं डॉक्टर सांगत असत असं म्हणण्यास सुद्धा ज्योतिषी विसरले नाहीत. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्रास होतो कारण पहिल्या पत्नीने करणी केली आहे. तिला प्रथम आजारी पाडून नंतर मारण्यासाठी 10 हजार रूपये सांगण्यात आले. वरील दोनही व्यवहाराची रक्कम ज्योतिषाने एका कागदावर स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून दिली. यासाठी अघोरी विद्या करावी लागेल व ती भाविकांच्या घरी येऊन करावी लागेल असं सांगण्यात आलं. नंतर पैशाची जुळवाजुळव झाल्यावर फोन करा असं ज्योतिषांनी सांगून स्वत:चा मोबाईल नंबर दिला.

            सदरच्या प्रकरणाचा भांडाफोड करण्यासाठी व्यवस्थित सापळा रचण्यात आला. कृष्णा चांदगुडे यांचे मुळ गाव चासनळी हे तेथून जवळच असल्यामुळे ते निवडण्यात आले. कोपरगाव पोलीस स्टेशनला कळविण्यात आलं. अंनिसचं काम म्हटल्यावर पोलीस निरीक्षक औटी यांनी पोलीस बंदोबस्त देण्याचं मान्य केलं. वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांचे प्रतिनिधी पण उपस्थित राहण्यासाठी उत्साहाने तयार झाले. अघोरी विद्या करण्यासाठीचा दिवस निवडण्यात आला. त्यासाठी पैसे थोडेसे कमी करून दोनही व्यवहार चार हजार पाचशे व साडे नऊ हजार रू. इतक्या रकमेमध्ये करण्याचे ठरले. गावातील मुख्य चौकाजवळील एक बंद खोलीत कार्यक्रम करण्याचे ठरले. खोलीत रेकॉर्डिंगचा कॅमेरा छुप्या पद्धतीने ठेवण्यात आला. आजुबाजुच्या इतर ठिकाणी इतर सर्व जण लपून बसले. मोबाईल कॉल आल्यानंतर सर्वांनी एकत्र येण्याचे ठरले.

            दि.30 जानेवारी 2011 रोजी दोन ज्योतिषी चासनळी येथे आले. आल्यानंतर घरचे अन्नपदार्थ आम्ही सेवन करत नाही असे सांगून विधीलाच सुरूवात केली; परंतु विधी सुरू होण्याअगोदरच पैशाची मागणी केली. शिवाय आम्ही स्वखुषीने विधी करत आहोत व आमची तक्रार नाही असंही ज्योतिषांनी लिहून घेतलं. कार्यकर्त्यांच्या इतके जास्त पैसे का घेता या प्रश्नाचे त्याचं विश्लेषण अतिशय मार्मिक होते. ते म्हणाले, “बस इसी वक्त हमारे कुछ पंडीत आपले लिए काशीमें पूजा कर रहे है.” तिकडे इतक्या दूर पूजा वगैरे केल्याने येथील व्यक्ती कशी मृत होऊ शकते या बालिश प्रश्नावर मात्र चांदगुडे यांना एका ज्योतिष्याने लगेचच उत्तर दिले. “तुम्हारे घर मे टी.व्ही.पर जो औरत नाचती है, वह रहती है मुंबई में, लेकीन दिखती तो तुम्हारे घर में ना? बस इफेक्ट तो मिलता है ना?”(बनावट) भक्तांनी म्हणजे आम्ही समाधान झाल्याचे सोंग केले.

            त्यांनी काहीतरी करायचे म्हणून एक खिळा मारून आणला होता. तो घराच्या दरवाज्यावर ठोकणार होते. त्यांनी पैसे घेऊन पूजा सुरू केली. संमोहित करण्याचा प्रयत्न केला. 15-20 मिनिटानंतर ठरल्याप्रमाणे एकच गराडा पडाला. क्षणभर दोन्ही ज्योतिषांना काहीच कळाले नाही. पोलीस पाहून त्यांना घाम फुटला होता यावेळी त्यांना मुख्य चौकात आणून चारशे-पाचशेच्या जमावासमोर कृष्णा चांदगुडे यांनी त्यांना अंनिसच्या वतीने जाहीर आव्हान दिले. त्यांनी त्यातून सपशेल माघार घेतली व त्यांना अक्षरश: रडू कोसळले. जमलेल्या लोकांसमोर त्यांनी माफी मागितली. आम्हास कोणतीही विद्या येत नाही. आम्ही लोकांस फसविले. पुढे असं करणार नाही असा माफीनामा त्यांनी लिहून दिला. कोपरगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी भा.दं.वि.420, 36 नुसार त्यांना अटक केली. कोणत्या कलमानुसार अटक करावी असा संभ्रम पोलिसांमध्ये झाला. जादूटोणा विरोधी विधेयकाची गरज यानिमित्त पुन्हा प्रकर्षाने जाणवली.

            ज्योतिषांच्या बॅगमध्ये जादूटोण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आढळून आले. त्यांच्या मोबाईलमध्ये अश्लिल दृश्यांच्या क्लिप्स् आढळून आल्या.

            या मोहिमेसाठी कृष्णा चांदगुडे यांच्या मित्रांनी(अंनिसचे कार्यकर्ते नव्हेत) मोठी मदत केली. यामध्ये सरपंच सचिन चांदगुडे, विजय चव्हाणके, किरण चांदगुडे, महेश चांदगुडे, कमलेश गायकवाड, संजय चव्हाणके, विनोद राक्षे, रविंद्र कांबळे आदी सहभागी होते.

            अंनिसचा एक कार्यकर्ता म्हणजे शंभर कार्यकर्ते असतात, असं अंनिस नाशिकचे मुख्य मार्गदर्शक महेंद्र दातरंगे गंमतीने म्हणत असतात. अंनिसचा एकटा कार्यकर्ता ठरल्याप्रमाणे सापळा रचत गेला तरी भांडाफोड करू शकतो हे या निमित्ताने सिद्ध होत आहे.

– डॉ. लक्ष्मीकांत कावळे