बायरन हा प्रख्यात आंग्ल कवी. सुसाट वादळ सुरू झाले व आकाशात विजा कडाडून धुवाधार पाऊस सुरू झाला की, तो घराबाहेर पडायचा. काळोख असला तरी. भीतीला दूर लोटून रौद्र निसर्गाला सामोरे जाणारा बायरन हा मानवी विजीगुषी वृत्तीचे प्रतीक वाटतो.
पण बहुतेक माणसं उलट वागतात. कडाडणार्या विजांनी भयभीत होऊन घराचे दरवाजे बंद करतात. भितीच्या छायेखाली दबून रहातात. अशा भित्र्या व दुबळ्या मनाला अधिक भयभीत करून स्वत:ची प्रसिद्धी करणारे महाभागही आपल्या आजूबाजूला वावरत असतात. हे आठवण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी घडलेल्या दोन महानाट्याच्या घटना. पहिली घटना म्हणजे जपानमधील त्सुनामी व दुसरी घटना म्हणजे चंद्र पृथ्वीला जवळ येणे.
जगभरच्या ज्योतिष्यांनी या घटनांना दैवी वलय चिकटवून त्यांचा बादरायणी संबंध लावण्याचा प्रयत्न केला. मात्र वैज्ञानिकांनी, भीतीच्या या दलालांच्या अज्ञानाचा बुरखा फाडून समस्त पृथ्वीवासियांचे प्रबोधन केले व अंधविश्वासाचे सावट दूर केले.
कुसुमाग्रजांनी कोलंबाचे गर्वगीत या कवितेतून मानवी शौर्याची व धैर्याची प्रशंसा केली आहे. ते लिहितात, चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा त्या खुळ्या सागराला। अनंत आमची धेयासक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला. नव्या जगाचा शोध घेणारा कोलंबस हा धैर्याचे प्रतीक होय. पृथ्वी व तिच्यावरील जीवसृष्टी उत्क्रांत होत असताना अनेकदा उत्पात घडले, कित्येक प्राणी नष्ट झाले. हिमयुगे आली आणि गेली, हजारो जीव व वनस्पती पृथ्वीच्या कवचात गाडल्या गेल्या पण अशा प्रतिकूलतेतही पृथ्वी उजाड झाली नाही. ती पुन्हा पुन्हा बहरत राहिली.
निसर्ग व माणूस यांच्यातील महायुद्धे व माणसामाणसातील महायुद्धे यांनी माणूस खचला नाही. अन्याय व अत्याचाराशी तो झुंजत राहिला. भूकंपाना व त्सुनामीला तो घाबरला नाही. छोटा माणूस पण त्यांचे महान मन व बौद्धिक झेप संकटांना पुरून उरली.
हे सगळे आठवायचे कारण म्हणजे ज्योतिषांनी केलेले नवे भाकित. म्हणजे 2012 मध्ये जगावर मोठे संकट येणार आहे. नॉस्ट्रॉडॅमस नावाच्या कुणा भविष्यवेत्त्यांच्या कानात देवाने हे सांगून ठेवलंय. आणि तेच ही फालतू मंडळी जगाला सांगत सुटलीत. चंद्र पृथ्वीला जवळ येणे ही पृथ्वीवासीयांना इशारा देणारी घटना आहे. याचा प्रत्यय 2012 पर्यंत जगाला येईल व त्सुनामी सारख्या संकटांनी पृथ्वीवर प्रलय अवतरेल अशी भविष्यवाणी ही ज्योतिषी मंडळी करीत आहेत.
या मंडळींना इशारा द्यावासा वाटतो- भीतीचा बागुलबुवा उभा करणार्या दलालांनो! माणसं आता तुमच्या इशार्यांना भीक घालणार नाहीत. जेव्हा निसर्गाचे ज्ञान त्याला नव्हते तेव्हा अस्मानी संकटांना तो घाबरणं साहजिक होतं. पण ज्ञानसूर्य आता तळपू लागला आहे. निसर्गरहस्ये माहीत करून घेऊन, निसर्गाला समजावून घेऊन त्याच्याशी तडजोड करीत माणूस नव्या रहस्यांचा शोध घेत आलाय. अणुमध्ये कोंडलेला उर्जाराक्षस आपला घास घेऊ शकतो हे त्यानं जाणलंय. त्सुनामीमुळे जपानमध्ये अणुभट्ट्यात जी आग पसरली आहे त्यातून त्याला इशारा मिळालाय. पण अणुराक्षसाला आवरायचे कसं हेही त्याला माहीत आहे. अपवादात्मक रितीने परिस्थितीवर मात करणं कधी कधी त्याला अवघड बनतं. पण तो धैर्य खचू देत नाही व परिस्थितीवर मात करतोच हा इतिहास आहे. त्याला आता हेही माहीत झालंय की, काही दिवसांपूर्वी चंद्र जसा पृथ्वीला अधिक जवळ आला तसा भूतकाळातही तो अनेकदा जवळ आलाय पण त्यामुळे पृथ्वीवर काहीही अघटीत घडलं नाही. तेव्हा जपानमधील त्सुनामीचा व चंद्र जवळ येण्याचा बादरायणी संबंध जोडू नका. अशी त्सुनामी येणे ही हजार वर्षांत घडू शकणारी घटना असते हे आता लोकांना माहीत झालंय. त्यामुळं विनाश घडतो पण तो धीराने स्वीकारावा हे माणसांना आता चांगलं कळतंय.
तेव्हा दैवी कोपाची भीती दाखवून अशा प्रसंगातून वाचण्यासाठी कर्मकांडे, यज्ञयाग, महापूजा अशी प्रलोभने, सामान्य माणसांना दाखवू नका. आतापर्यंत अंधविश्वासांना बाजूला सारीत माणूस परिस्थितीवर मात करण्याचा विवेक वाढवित आलाय. त्याचा प्रवास त्याच दिशेने पुढे चालू राहील. त्याला अंधार युगाकडे नेण्याची चूक करू नका. आमच्यातील कोलंबस सावध आहे.