वार्तापत्र ग्रामीण भागासाठी वाचनीय असावे
अं.नि.वा.चा प्रत्येक अंक दर्जेदार असून प्रत्येक लेख सामाजिक उद्बोधनासाठी अत्यंत उपयोगी असतो. ग्रामीण भागातील घटनांवर विशेष भर देऊन लेख देण्यात यावेत. कारण ग्रामीण भागामध्येच जास्त अंधश्रद्धा असल्यामुळे समाजविघातक कृत्य घडत असतात म्हणून ग्रामीण घटनांचा उल्लेख असावा आणि प्रत्येक जिल्ह्यातील घटनांवरील लेख प्रकाशित करावे.
–उत्तम नागोराव ढाकरे, हिंगोली.
आपला अंक जनप्रबोधनाचं पुढचं पाऊल
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा एप्रिल 2011 चा अंक वाचला. आपला प्रत्येक अंक जनप्रबोधनाचं पुढचं पाऊल असतं. या अंकातील ‘काशीच्या पंडितांची नवी बुवाबाजी’ ही कव्हर स्टोरी डॉ.लक्ष्मीकांत कावळे यांनी लिहिली आहे. आणि अम्मा भगवानांच्या चमत्कारावर अनिल चव्हाण यांनी लिहिलं आहे. या दोन्ही घटना संपूर्ण भारतभर कुठे ना कुठे सुरूच आहेत. लोकांची फसवणूक करून त्यांना धर्म आणि चमत्कारांच्या नावाखाली दडपून ठेवलं जात आहे. सत्ताधारी आणि राजकारणी मंडळी या अंधश्रद्धांचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेत आहे. त्यामुळेच ही प्रबोधनाची लढाई अवघड होऊन बसते. तरीसुद्धा आपले अंनिसचे कार्यकर्ते अत्यंत मेहनतीने हे कार्य करीत आहेत. या कव्हरस्टोरीतील सर्व कार्यकर्त्यांना पाठिंब्याचा निरोप द्यावा.
–दिलीप सुरवाडे, भुसावळ, जि.जळगाव
स्त्रियांनी घातला जलाभिषेक
इचलकरंजी (जि.कोल्हापूर) शहरात चौंडेश्वरी देवी मंदिर असून देवीच्या उत्सवादिवशी पंचगंगेचे पाणी घागरीने स्त्रिया आणतात. मात्र देवीला जलाभिषेक पुरूष घालतात. देवांग कोष्टी समाजाचे दैवत चौंडेश्वरी माता असून उत्सव समारंभात स्त्रियांचा सहभाग अधिक असतो परंतु जलाभिषेकावेळी स्त्रियांना दुय्यम स्थान का? अशा भेदाला समाजातील काही स्त्रियांनी विरोध केला की, ‘ज्यांना जलाभिषेक करायचा असेल त्यांनी नदीवरून घागरी भरून आणून करावा. आम्ही स्त्रियांनी आणलेल्या पाण्याने आम्हीच अभिषेक करणार ही भूमिका घेतली व अनेक स्त्रियांनी या मागणीला, विचाराला पाठींबा देऊन तो उपक्रम यशस्वी करून स्त्री पुरूष समानतेचा संदेश समाजामध्ये रूढ केला. त्याबद्दल त्या भगिनींचे अभिनंदन.
–बजरंग लोणारी, इचलकरंजी, जि.कोल्हापूर
बाधामुक्ती यंत्रावर बंदी आणावी
अं.नि.वार्तापत्राची अनेक वर्षांपासून मी वर्गणीदार आहे. अंक नेहमीच दर्जेदार, वैज्ञानिक जाणिवांचा प्रसार करणारा, अनेक अंधश्रद्धांचा भांडाफोड करणारा असतो. दिवाळी अंक तर मेजवानीच. हे पत्र लिहिण्याचे कारण की, बी फोर यू या चॅनेलवर एक प्रचंड मोठी जाहिरात अलिकडेच लागते आहे. ‘बाधामुक्ती यंत्र’ याची किंमत 2375 रू. तीस दिवसांत गुण नाही आला तर मनीबॅक 09229147147 हा नंबर दिलेला असतो. बिगडा हुआ भाग्य, खराब सपने, दुष्ट शक्ती पासून सुटका. घरात घुसलेल्या विनाशकारी शक्तीला पळवून लावणारे यंत्र. एक स्त्री म्हणते, ‘मला 8 वर्षे मूल नव्हते. सासू सासरे इतर ‘बाझणी’ म्हणून छळत. पण या यंत्रामुळे मला दिवस गेले. मै मॉ बनी.’ अनेक अशिक्षित. अज्ञानी संकटग्रस्त, शिकलेले तरी अंधश्रद्ध फसत आहेत. कृपया या जाहिरातींवर बंदी आणण्यासाठी काही प्रयत्न करावेत. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
–सौ.लिला शहा, डोंबिवली.
(अशा जाहिरातींवर बंदी आणण्यासाठी अंनिसने सह्यांची मोहीम सुरू केली आहे. या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री अंबिका सोनी यांना पाठविण्यात आले आहे. – संपादक )
धीर देणारे मासिक…..
गेली तीस वर्षे मी नास्तिकतेवर ठाम आहे. ग्रामीण भागात प्रबोधन करणारे कार्यक्रम व लेखन करणार्या माझ्यासारख्या व्यक्तीला आपल्या मासिकामुळे धीर येतो. एकाकीपणा येत नाही. माझे आचारविचार बरोबर आहेत याची खात्री पटते.
कोकणाचे सर्व वर्ष सण उत्सवांतच जाते. नोकरसुद्धा धड काम करत नाहीत. दापोलीसारख्या ठिकाणी ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण भयानक आहे. अशा अंधारलेल्या वातावरणात दिवा लावताना, विज्ञाननिष्ठा जपताना माझ्यापेक्षा शतपटीने जास्त काम करणारे लोक या क्षेत्रात आहेत हे पत्रिका वाचून समजते. त्यामुळे फुकाचा अहंकार निर्माण होत नाही हा पण फायदाच!
–माधव गवाणकर, दापोली, जि.रत्नागिरी.