Categories
अभिवादन

कष्टकर्‍यांचा आधारवड कोसळला!

एप्रिल - २०१२

            स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत राहून ब्रिटीशांविरूद्ध लढणारा लढवय्या व स्वातंत्र्यानंतर दलित, वंचित व न्यायासाठी आसुसलेल्या सर्वसामान्यांसाठी दुसरे स्वातंत्र्ययुद्ध छेडणारे नागनाथअण्णा दि.22 मार्च रोजी वयाच्या 90 व्या वर्षी अनंतात विलीन झाले.

            15 जुलै 1922 रोजी जन्मलेल्या नागनाथअण्णांवर बालवयातच क्रांतसिंह नाना पाटील व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा प्रभाव पडला. 1942 च्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी सशस्त्र क्रांतीकारकाची साथ केली. नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचा झेंडा त्यांनी हाती घेतला होता.

            स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कष्टकर्‍यांना स्वातंत्र्यांची अपेक्षित फळे मिळत नाहीत हे पाहून त्यांनी समाजवादी व नंतर साम्यवादी चळवळीत झोकून दिले. शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी-कामगार, धरणग्रस्त, दलित, आदिवासी व महिलांच्या विविध प्रश्नांवर अण्णांनी सातत्याने संघर्ष केला.

            फुले-शाहू आंबेडकरांचे नाव आज अनेकजण घेतात. पण या त्रयीचे खरे वारसदार म्हणून नागनाथआण्णा कृतीशील राहिले. दुष्काळी भागातील पाणीप्रश्नासाठी त्यांनी उभा केलेला संघर्ष हा सर्वांच्या स्मरणात राहील.

            हुतात्मा शिक्षण व उद्योगसमूहातील ‘हुतात्मा पॅटर्न’ रूपाने सहकारी चळवळीत आण्णांनी आदर्श पर्व निर्माण केले. 1984 मध्ये सुरू झालेल्या हुतात्मा किसन अहिरराव साखर कारखान्याने उसाला चांगला दर देता येतो हे दाखवून दिले. त्यामुळे इतर साखर कारखान्यांना, शेतकर्‍यांना उसास योग्य भाव द्यावा लागला. या कारखान्याला गुणवत्तेचे 50 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत.

            स्वातंत्र्य चळवळीत घर सोडलेल्या आण्णांनी पुन्हा घरात पाऊल ठेवले नाही. अखेरपर्यंत हुतात्मा साखर कारखान्यासमोरच्या दोन खोल्यांमध्ये ते रहात.

            शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार अशा विविध क्षेत्रात बहुजनांसाठी संघर्ष करणार्‍या आण्णांना अनेक पुरस्कार मिळाले 2009 साली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पद्मभूषण हा सर्वोच्च पुरस्कार आण्णांना बहाल करण्यात आला.

            आण्णा अंधश्रद्धांच्या विरोधी होते. कारखान्याचा गळीत आरंभ करताना त्यांनी मुहूर्त पाळला नाही. 1949 साली कुसुमताई यांच्याशी केवळ एक रूपया खर्चात लग्न केले. आण्राच्या पुरोगामी विचारसरणीचा एक अनुभव सांगावा वाटतो. कराड येथे स.गा.म.महाविद्यालयात मी प्राध्यापक म्हणून सेवेत होतो. अंदाजे 1994 साल असावे. कराड येथील एक बांधकाम व्यावसायिक मला भेटायला आला. मोठा पैसा बाळगून असलेला हा गृहस्थ त्याच्या घरातील एका अंधश्रद्धेने पीडित होता. त्याचा 6 वीत शिकणारा मुलगा शाळेत जायला नाखूष असायचा. त्याच्या डोक्यावर यल्लमाच्या जटा आल्या होत्या. हा गृहस्थ काही कामानिमित्त आण्णाकडे गेला व त्याच्या कौटुंबिक प्रश्नाबाबत आण्णाशी बोलला. आण्णांनी त्याला ताबडतोब अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे पाठवून दिले व मुलाचे केस कापून टाकण्याची आज्ञाच दिली. तो गृहस्थ मला भेटल्यावर मी त्याच्या मुलाच्या जटा कापून टाकण्यास मदत केली व एका तरूणाचे अंधश्रद्धेपायी होणारे नुकसान टळले.

            असे होते नागनाथ आण्णा. कष्टकरी व शेतकरी यांना सुखाचे दिवस दाखविणारे, वंचिताच्या न्याय हक्कासाठी लढणारे, अंधश्रद्धा झुगारून देणारे तत्त्वनिष्ठ व त्यागी व्यक्तीमत्व. त्यांच्या निधनाने सामाजिक न्यायाच्या लढ्याची मोठी हानी झाली आहे.

            अंनिस परिवारातर्फे आण्णांना आमचा सलाम!

प्रा.प.रा.आर्डे