
सूक्ष्म वा विशाल
अभ्यासून तथ्य
फोडतसे मिथ्य
ज्ञानपंथ।
विज्ञान पंथाने
चौफेर निघती
याने यात्रेसाठी
अंतरिक्षी।
मंगळ ग्रहाला
लाभली की थेट
भारताची भेट
यानरूपी।
पितरांच्या दिशी
मंगळ ग्रहाला
कवेत घेतला
विज्ञानाने।
-प्रदीप वैद्य, गडचिरोली
देवळांचा धर्म
कोणाला काय सत्य
गवसते हे त्यांच्या
सहवासात कळते।
आम्ही देवळं व धर्मापासून दूर राहिलो
हे आज सांगतो॥
देवळं आज मोठमोठी
संपन्न पावन झाली,
आणि देव मानणारा करोड
पती दिसतो।
आम्हाला देव पावणार
की आम्ही देवाला पाहणार
असा प्रश्न करतो।
माणसानं देव मंदिर।
आणि धर्म बनविले।
मग सांगितले पावतो।
प्रगती करणारी माणसं
देव मानणारी माणसं
देवळं बांधणारी माणसं
सर्व माणसाचा खेळमेळ
दिसतो चोहीकडे
हाच अनुभव सांगतो।
-डी.एस.घोडेस्वार, भुसावळ
दगड आणि माती
दगड म्हणाला मातीला
सारेच तुझे कौतुक करतात
तू माणसे घडवितेस
असा सार्वत्रिक गैरसमज आहे
माती म्हणाली माणसे घडविली
जात नसतात
मी माणसांना जन्म देते
माणसे भुईतून उगवत असतात.
हे मला पक्के ठाऊक आहे
त्यावर दगड म्हणाला
माणसे ज्याच्यापुढे नतमस्तक होतात
तो देव मी घडवित असतो.
तुझी खुळी माणसे
माझ्या देवाच्या पाया पडतात
हे ध्यानी असू दे.
-गोविंद मोतलग, अकोला
मो.9420839575
मुहुर्त कधी पाहिलाच नाही
केली हजार कामे.
दिवस कधी शोधला नाही.
अमावस्या असो वा पौर्णिमा
मुहुर्त कधी पाहिलाच नाही.
वास्तूत कधी दोष नसतो.
दोष असतो कर्तृत्वाचा.
तोच दोष शोधत राहिलो
वास्तूशांती कधी केलीच नाही.
जात, धर्म यामुळे
एकात्मता उरली नाही.
मानवताच जपत आलो.
धर्मग्रंथ कधी पाहिलाच नाही.
माणसातच देव शोधला
इतर देवावाचून अडलंच नाही.
आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी
गोंधळ, जागर कधी घातलाच नाही
प्रत्येक दिवस सारखाच असतो
मुहूर्त कधी पाहिलाच नाही.
-विकास आदलिले, पंढरपूर

सावित्री
जुनं गाडून
नवं जग घडवण्याची तुझी उर्मी
बाईला मोकळा श्वास घेता यावा म्हणून
तू जीवाची कुरवंडी केलीस
बेदरकारपणे सामोरे गेलीस
हर एक प्रसंगाला
गंजपेठेतला पाण्याचा हौद खुला केलास
हा वंचिसांसाठीचा मुक्तीसंग्रामच.
खिंडार पाडलेच तू संस्कृती नावाच्या
नटवीच्या अधमतेला.
तू बेड्या तोडल्यास
शतकानुशतकांच्या अनिष्ट प्रथा-परंपरेच्या
बाई अपवित्र कशी असू शकते?
बाई पापाचं भांडार कसे?
बाई पांढर्या पायाची अवदसा कशी?
बाईच फक्त….. नादान कशी?
अशा कितीएक प्रश्नांना
तू सुरूंग लावलास.
अक्षरांच्या दारूगोळ्यातून
तुझी ही प्रकाशअक्षरे घेऊनच
निघालो आहोत आम्ही सार्याजणी
भोवतीचा काळोख तुडवीत!
-प्राचार्य सीताराम गोसावी, बारामती, मोबा.9850156166
चारोळ्या
1) देशाच्या समस्या जणू
आता झाल्या आहेत बाद
म्हणून उकरून काढतात ते
नवीन धार्मिक वितंडवाद
2) प्रगतीपाठी धावतांना
निसर्गाचं असावं भान
तलवार हाती आली म्हणून
कापायची नसते स्वत:ची मान
3) श्रद्धा-अंधश्रद्धेचा
सुटत नाही गुंता
श्रीमंत झाली देवस्थानं
गरीब झाली जनता
4) अखेर जादूटोणा विरोधी
कायदा महाराष्ट्रात आला
इतका उशीर काय कामाचा
गड आला पण सिंह गेला.
5) सगळेच म्हणतात जीव तोडून
‘भारत माझा देश आहे’
परस्तरांबद्दल मग
एवढा कसा द्वेष आहे?
-आनंद देशमुख, शिरपूर, मोबा.9860630230
स्त्री
स्त्री म्हणजे नवनिर्मितीची प्रेरणा
स्त्री म्हणजे युक्ती,
स्त्री म्हणजे शक्ती,
स्त्री म्हणजे क्षमा,
स्त्री म्हणजे शांती,
स्त्री म्हणजे माया,
स्त्री म्हणजे दया,
स्त्री म्हणजे सावली,
स्त्री म्हणजे माऊली,
स्त्री म्हणजे घराची शान,
स्त्री म्हणजे पतीचा मान,
स्त्री म्हणजे जीवनाची आस,
स्त्री म्हणजे सत्याची कास,
अन् स्त्रीभृणहत्या म्हणजे
सार्या जगाचा र्हास
सार्या जगाचा र्हास
-डॉ. जयश्री श्रेणीक पाटील, सांगली, मोबा.9860092132

डॉक्टर दाभोलकर
यांचेवरील गझल….
दाभोलकर खुनाने, बेनाम कोतवाली
मोकाट वर्ष गेले…. मोकाट का मवाली
अंधार दूर करण्या झाला शहीद कोणी
पाप्यास शोधणार्या विझल्या का मशाली
होतो तपास का हो आत्म्यास कॉल करूनी?
प्लँचेटशी न रूसवा पुसतील ते खुशाली
न्यायालयी यमाला… साक्षीस करावे
मागेल वाटखर्ची वाचेल पण दलाली!
क्रांतीच ध्यास ज्याचा द्यावी त्यास फाशी!
व्हावाच कायदा हा! नाही जनास वाली…
निर्दोष(?) कायद्यांनी दावा निघे निकाली!
सडकी अशी व्यवस्था तारील काय साली?
पारित कायद्याची काढून धिंड झाली
द्यावीच लोकशाही बाबा-बुवा हवाली!
गझलकार- दे.भा.इंगळे, मोबा.8698156116

जागर विवेकाचा
अंनिसचे सैनिक आम्ही
विज्ञानाची कास धरू
बुवाबाज अन् षंढ जनांचा.
विवेकाने प्रतिकार करू॥1॥
नको आता गंडे-दोरे
अन् नकोच जादूमंत्र
विज्ञाननिष्ठ होऊ सारे
हेचि आमचे तंत्र॥2॥
ज्योतिषी अन् ढोंगीच्या नादी
नको माणसा लागू
असे वासना ठायी तयांच्या
सारे विवेकाने वागू॥3॥
निष्पांपाचा बळी देऊनि
नवस फेडिती देवींचा
तरीही न लाभे सुख तयांना
मानतो कोप हा दैवाचा॥4॥
लिंबू मिरची टांगी दारी
उपाय हे बहुतची करीती
पण वैद्यावाचून बंधू अमुचे
गांजत गांजत मरिती॥5॥
करा जन हो संकल्प आता
द्या अंधश्रद्धांना मूठमाती
करू या जागर विवेकाचा
अंनिस तुम्हा सोबती॥6॥
-पुरूषोत्तम बी.ठाकरे, गडचिरोली. मोबा.9421856763

काकस्पर्श
स्मशान घाटावर
मृत आत्म्याला मुक्ती द्यायला
पिंड दानाला स्पर्श करा
समस्त कावळ्यांनो!
घासून पुसून चोच
नेमके उचला घास आवडीचे
सण जाऊ द्या निघून
सार्या सग्या सोयर्यांना उठून
स्मशान घाटावरून!
निषेधाचा कृष्ण रंगाचा
पंख पिसारा
घासून पुसून बघा
पांढरा होतोय का?
ध्यानस्थ बगळ्या सारखा
पण,
कृष्णही होताच ना
काळा?
तुमचा झालाच स्पर्श माणसाला
विटाळतो देह नि
जाऊन करतात आंघोळ
मग, मुक्तीद्वार
कसे उघडते
तुमच्या स्पर्शाने!
चला, जाऊ द्या
पोटा पाण्याची तर समस्या
सुटली!
अपवित्र माणसाच्या
क्षुद्र धर्म रूढींनी
खाऊ द्या पोटभर
काक मित्रांनो-
माझ्या,
पिंडदान!
-विजय गायकवाड, पुणे मोबा. 9028974413