Categories
जात पंचायत

भय इथले संपत नाही…

जवखेडे दलित हत्याकांडाचे दाहक वास्तव
वार्षिकांक – २०१४

विधानसभेची निवडणूक नुकतीच संपली, ज्यामध्ये मतदारराजाने भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात तुलनेने जास्त मताधिक्य टाकले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या 15वर्षेसत्तेत असलेल्या आणि कथित फुलेशाहूआंबेडकरावादी सरकारचा जोरदार पराभव झाला. समतावादी भूमिका असलेल्या आघाडी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रात खैरलांजी दलित हत्याकांड घडलं, जिथे भोतमांगे कुटुंबियांना दीर्घ प्रतिक्षेनंतर तुटपुंजा न्याय मिळाला. जातीय अत्याचार आणि दलितांवरील हल्ल्यांचे सत्र सर्वत्र वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाच्या हिंसेचे क्रौर्य वाढलेले दिसते. नेवासा येथील सोनई हत्याकांड असो की, खर्डा येथे नितीन आगे या महाविद्यालयीन तरूणाचा केलेला खून, या प्रकारच्या हल्ल्यांमधून ना सरकारी यंत्रणा शहाणी झाली, ना अन्यायाला वाचा फोडणारे आपण यातून काही शिकलो आहोत!

सोनई येथील तीन दलित तरूणांच्या हत्येचा खटला मुंबईत चालवू, वर्षभरात न्याय मिळवून देऊ, अशा मोठ-मोठ्या घोषणा माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केल्या, पण प्रत्यक्षात सोनई हत्याकांडाचा खटला मोठ्या दहशतीत आज श्रीरामपूरमध्ये चालू आहे, या प्रक्रियेला काही काळात दोन वर्षेपूर्ण होतील. तिकडे खर्ड्याच्या जखमा अजून ताज्या आहेत. नितीन आगेच्या वेदनादायी किंकाळ्या संवेदनशील मनांची झोप उडवत असताना पाथर्डीतील जवखेडे खालसा गावात एका दलित कुटुंबियांची निर्घृण हत्या झाली आहे. याच मतदार संघातून भाजपच्या मोनिका राजळे विद्यमान आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. सेना आणि भाजपचे सरकार असताना रमाबाई हत्याकांड घडलं आणि जाहीरपणे सरकारने गोळीबार करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची बाजू घेतली होती.

दलितांमध्ये या निवडणुकीत आघाडी सरकारच्या काळात अत्याचार मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले नाहीत. याचा दृश्य परिणाम म्हणजे सरकारमध्ये असलेल्या पक्षांच्या विरोधात झालेले मोठ्या प्रमाणातील मतदान. नेवाश्यात सोनई हत्याकांडाचा रोष म्हणूनही दलित मतांचे धु्रवीकरण होताना दिसते ज्यामुळे शंकरराव गडाख हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले दिसतात. नवीन सरकार अजून स्थापन होते न होते तोच जवखेडे खालसाचे भयंकर हत्याकांड समोर येताना दिसले. अहमदनगर जिल्हा हा दलित अत्याचारासाठी संवेदनशील झाला आहे हे आता सरकारने जाहीर करो अथवा न करो पण हे वास्तव तुम्हाला आम्हाला मान्य करावेच लागणार आहे.

दोन वर्षांपूर्वी नवीन वर्षाचे स्वागत होत असताना सोनईतील तीन दलित तरूणांची हत्या झाली, आता दिवाळी तोंडावर असताना जवखेडे येथे हत्याकांड झाले. एकूण परिस्थिती पाहता जवखेडे हत्याकांड हे सोनई आणि खर्डा प्रकरणाची आवृत्ती आहे, असे दिसून येते.

हत्येची पार्श्वभूमी

संजय जगन्नाथ जाधव(42), जयश्री संजय जाधव(38) हे गावाबाहेर असलेल्या जाधव वस्तीवर त्यांच्या नातेवाईकांसोबत राहत होते, संजय यांना एक धाकटा व एक थोरला भाऊ आहे, यांचे मुख्य घर वस्तीत आहे. त्यांच्यात जमिनीच्या समान वाटण्या झाल्या असून प्रत्येकाच्या वाट्याला सव्वा एकर जमीन आलेली आहे. संजय जाधव हे गवंडी काम करीत असत, तसेच गावात मोलमजुरीचे कामही करत असत. शेताच्या आणि घराच्या योग्य वाटण्या झाल्यामुळे जमिनीवरून वाद नव्हते, असे त्यांचे नातेवाईक सांगतात. संजय आणि जयश्री यांचा सुनील(19) हा एकुलता एक मुलगा डेअरी सायन्स अभ्यासक्रमाचे मुंबई येथे दीड वर्षांपासून शिक्षण घेत होता. सुट्टीच्या काळात चार महिन्यांतून एकदा तो घरी आई-वडिलांना भेटायला येत असे. संजय जाधव यांचे शेत मुख्य घरापासून सुमारे 1 कि.मी.अंतरावर आहे, जेथे त्यांनी पत्र्याचे शेड असलेल्या दोन खोल्या बांधलेल्या आहेत.

संजय आणि जयश्री या दोघांचेही गावात कोणाशीही भांडणाचे वा ताणलेले संबंध नव्हते. आपण भलं आपलं काम भलं अशा पद्धतीने ते राहत व मुलाला शिक्षणासाठी पैसे पाठवत. संजय आणि जयश्री यांच्याबाबत गावातील इतर जातीय लोकांच्याही चांगल्या भावना होत्या, असंच लोकांशी संवाद साधल्यावर लक्षात येते. परंतु या उलट सुनील बाबत मात्र लोक फारसं चांगलं बोलताना दिसले नाहीत. त्याच्या गावातील प्रेमप्रकरणाबाबत मात्र लोक सूचक पद्धतीने सांगताना दिसतात. मात्र काही लोकप्रतिनिधी ही शक्यताही फेटाळून लावतात आणि त्याचे मुंबईलाच काही असेल, अशी शक्यता समोर आणतात. सुनीलबाबत परस्परविरोधी विधाने लोकांमधून येताना दिसतात. त्यामुळे या खुनाचा संबंध हा सुनीलशी जोडला गेला आहे, असं स्पष्टपणे समोर येते. या गोष्टीला स्वत: पोलीस निरीक्षक सुभाष अमनुलवार यांनी दुजोरा दिला आहे. त्याचे अनैतिक संबंध असण्याची शक्यता आहे, त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत, सुनीलच्या मोबाईलमध्ये त्या प्रकारचे फोटो आणि इतर माहिती सापडल्याचे ते सांगतात. परंतु ही इतर माहिती काय आहे, हे स्पष्टपणे तूर्तास कोणीच सांगत नाहीत.

घटना काय घडली?

दिवाळीच्या सुट्टीनिमित्त सुनील गावी आला होता आणि त्याच दरम्यान अर्ध्या शेतात लावलेल्या बाजरीच्या काढणीचे काम सुरू होते. त्यामुळे संजय, जयश्री आणि मुलगा सुनील हे शेतातल्या त्यांच्या खोलीमध्ये दोन दिवसांपूर्वी राहायला गेले होते. शेतातल्या केवळ अर्ध्या भागात बाजरी पीक होते. खुनाच्या आदल्या दिवशी शेजारील कुटुंबाच्या शेतातील राखणीसाठी आसलेल्या कुत्र्याला अज्ञात लोकांनी मारले. नेमके कोणी मारले, याची माहिती अजून उपलब्ध झाली नाही आणि दुसर्‍या दिवशी रात्री साधारण 12-2 च्या दरम्यान जाधव कुटुंबियांचा खून करण्यात आला. शेतातील घराच्या अंगणात त्या तिघांचा खून करण्यात आला असावा, कारण खून केल्यावर इथे रक्त पडलेले होते ते आरोपींनी माती टाकून बुजवून टाकले त्यावर बाजरीची वैरण टाकली गेली. तरी रात्रीत सगळे रक्त बुजवले जाणे शक्य नव्हते.

जयश्री आणि संजय यांच्या मृतदेहाचे तुकडे करून शेतापासून 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कोरड्या विहिरीत टाकले गेले, दरम्यान जयश्रीच्या शरीरात जीव असावा, कारण तिचा मृतदेह सापडला, तिच्या एका हातात जवळच्या झाडाची तुटलेली फांदी होती. पोलिसांना हे मृतदेह मंगळवारी उशिराने सापडले, त्यात सुनीलचे पाय आणि डोके शोधण्यासाठी आजूबाजूचा परिसर पोलिसांनी धुंडाळून काढला. बुधवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास सुनीलचे तोडलेले पाय आणि अर्धेतोडलेले डोके दुसर्‍याच्या शेतात असलेल्या कोरड्या बोअरवेल पाईपमध्ये सापडले.

खून केल्यावर मृतदेह नेस्तनाबूत करण्यासाठी गोठलेल्या रक्ताने हे काम अत्यंत सफाईने करण्याचा प्रयत्न केला गेला. दुसर्‍या दिवशी जाधव यांच्या घरातील शेळीच्या ओरडण्याने शेजारील वाघ बाई आपल्या मुलीबरोबर घास कापण्यासाठी जात असताना त्यांना अंगणात रक्त दिसले तेव्हा त्यांनी गावात जाऊन सांगितले. त्यांना साप चावला असावा, असा संशय आल्याने काही लोक पाथर्डी, तिसगाव आणि अहमदनगर मधील रूग्णालयात शोधण्यासाठी आले. परंतु विहिरीकडे गेलेल्या लोकांना त्यात मृतदेह दिसल्याने एकच खळबळ उडाली.

हत्या का झाली असावी?

हत्या का झाली, याबाबत शक्यता पलीकडे अजून काहीही गेलेले नाही, तपास करणार्‍या अधिकार्‍यांच्या मते, सुनीलचे अनैतिक संबंध असावेत, तशा बाबी त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आल्या, असे म्हटले आहे. परंतु या इतर गोष्टी कोणत्या याबाबत ते स्पष्ट बोलायला तयार नाहीत. सुनील दिसायला बर्‍यापैकी होता आणि त्याची राहणी ही खूप टापटीप होती. त्याचे तीसगावमधील मित्र त्याच्या दिलेरीची तारीफ करताना दिसले. त्याच्या फेसबुक अकाऊंटवर पाहिले तर लक्षात येते की, प्रेमाच्या भावना त्याच्या मनात होत्या आणि त्याचे प्रदर्शन आपल्याला त्यावर दिसूनही येते.

सुनीलचे चरित्र ठीक नव्हते असे पोलीस सोडता कोणीही बोललेले नाही. सुनीलच्या अनैतिक संबंधातून हा गुन्हा घडला आहे, असे सांगितले जात आहे. खरे तर सोनईच्या हत्याकांडात त्या तीन तरूणांचे अनैतिक संबंध होते, तसाच आरोप झाला, नितीन आगेवर ही त्याच प्रकारचा आरोप झाला, खैरलांजी मध्येही भोतमांगे कुटुंबाच्या चारित्र्याचे हनन करण्यात आले. दलित आहेत म्हणून अनैतिकच असणार अशी मानसिकता घडवली गेली आहे, त्यातून हे आरोप होताना दिसतात. त्याचा दुसरा उद्देश हा केस दुर्बल करण्याचा आणि त्यामागे आंदोलन उभे राहू नये, असा असतो. खून झालेल्या व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे फार सोपे असते, ते जातीयवादी मानसिकतेतून होताना दिसते.

खरं तर दलित तरूण शिकतो आहे, स्वाभिमानाने जगतो आहे, स्पर्धेत उतरून स्वत:चे स्थान निर्माण करतो आहे, त्यातून सामाजिक प्रतिष्ठा तो निर्माण करतो, अशा मुलाच्या प्रेमात कोणत्याही जातीची मुलगी पडणं हे फार स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. परंतु केवळ दलित उच्च जातीच्या मुलीशी प्रेम करून लग्न करू पाहण्याचं स्वप्न बाळगतो, हा विचारच उच्च जातीच्या मानसिकतेला आणि त्यांच्या खोट्या प्रतिष्ठेला धक्का लावतो. दलित माणूस उच्च जातीच्या मुलीशी लग्न करण्याचा विचारच त्यांना चुकीचा वाटतो. आणि मग ही खोटी प्रतिष्ठा आणि जातीचे ‘पावित्र्य’ वाचवण्यासाठी टोकाचा क्रूर विचार अंमलात आणला जातो. जात ही हिंसक संघटन शक्ती आहे, हे अशा घटनांतून वारंवार सिद्ध झाले आहे. दलितांवर होणार्‍या या प्रतिक्रियात्मक हिंसेचे कोणत्याही पद्धतीने समर्थन कोणतीही व्यक्ती करूच शकणार नाही.

काही अनुत्तरीत प्रश्न

1. ज्या व्यक्तीशी अनैतिक संबंध होते, त्या व्यक्तीच्या नवर्‍याला तातडीने चौकशीसाठी का ताब्यात घेतले नाही, की त्याच घरातील इतर मुलीशी सुनीलचे प्रेम संबंध होते, हे दडवून ठेवण्यासाठी हा प्रकार केला जात आहे?

2. वरकरणी पाहता तीन व्यक्तींची हत्या करण्यासाठी कमीत कमी 8 ते 10 व्यक्ती उपलब्ध असणे गरजेचे आहे. मग या व्यक्ती गावात बाहेरून आल्या असा दावा केला गेला आहे. परंतु गावाच्या विशिष्ट भागामध्ये इतक्या सराईतपणे त्या कशा वावरू शकल्या?(कोरडी विहीर, कोरडा बोअरवेल असे ठाऊक झाले.)

3. त्या 8 ते 10 व्यक्ती गावात आलेल्या कोणालाच कसे माहीत नाहीत? त्यांना लपायला जागा कोणी दिली? त्या व्यक्ती जर सुपारी घेऊन खून करणारी सराईत गुंडांची टोळी असेल तर त्यांना इतकी मोठी सुपारी कोणी दिली? त्यासाठीचा पैसा कसा उभा राहिला? त्यात गावातील इतर कोण मंडळी होती का?

4. जर गावातील, शेजारील माणसेच या हत्येमागे होती, तर त्या घरात एवढे पुरूष आहेत का? की गावातील कोणी मदत केली? आणि गावातीलच लोक असतील तर त्यांना पकडण्यासाठी एवढा वेळ का घालवला जात आहे? एवढे मोठे हत्याकांड घडत असताना रानातील आजूबाजूच्या लोकांना आवाज ऐकू गेला नाही का?

5. पत्रकारांसमोर येऊन पोलीस अधीक्षक लखमी गौतम प्रश्नांची उत्तरे द्यायला का घाबरतात? की यात बाहेरून दबाव आणला जात आहे?

गावाची पार्श्वभूमी

गावातील काही प्रतिष्ठीत आणि ग्रामपंचायत सदस्य असलेल्या व्यक्तींशी चर्चा झाल्यानंतर गावात कोणत्याही प्रकारचा जातीय तणाव या आधी निर्माण झाला नव्हता, असे ते सांगतात. दिवाणी खटल्याशिवाय इतर कोणताही खटला गावात नाही. या गावात जातीय द्वेष नसताना इतरांनीही त्या पद्धतीने रिपोर्टिंग करू नये, अशी त्यांची विनंती वजा इच्छा दिसून आली. पण मग दलितच का एवढ्या क्रूरतेने मारले गेले, या प्रश्नांचे उत्तर त्यांच्याकडे नाही. त्या ऐवजी इतर जातीचा कोणी असता किंवा उच्च जातीचा असता तर अशा प्रकारे त्याची क्रूर हत्या झाली असती का? दलित वस्ती अजूनही गावाबाहेरच का आहे?

राजाभाऊ राजळे यांना या गावातून लोकसभा निवडणुकीत 99 टक्के तर मोनिका राजळे यांना विधानसभा निवडणुकीत 95 टक्के मतदान या गावातून झाल्याचे समजते. गावात मराठा आणि वंजारी जातीची संख्या मोठी असून त्या मागोमाग दलित, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय लोकवस्ती आहे. दलित वस्तीतून गावाबाहेर पडण्याचा मार्ग हा पूर्ण कच्चाच आहे. तर मुख्य रस्ता डांबरी आहे. पाथर्डी हा मराठा आणि वंजारी यांची मोठी संख्या असलेला तालुका जिथे भगवानबाबांचा गड आहे व वंजारी जातीच्या राजकारणाचे केंद्र आहे. नाथ संप्रदायाची परंपरा असलेल्या या पाथर्डीत यावेळीही नवीन रीत झाली की काय, असा प्रश्न पडतो.

जाता जाता….

सोनई आणि खर्डा प्रकरणातील अनुभवातून अशा प्रकारे खून करणारे बनचुके झाले आहेत. सोनईची क्रूरता यात आहेच पण न्याय मागायलाही आई-वडिलांना त्यांनी मागे ठेवलेले नाही. पुरावेही त्यांनी नष्ट केले आहेत. हे प्रकरण सोनई आणि खर्ड्याचा पुढील भाग आहे की, काय हा प्रथमदर्शनी पडणारा सवाल आहे. जर तसे असेल तर गुन्हेगार अधिकाधिक सराईत होताना दिसतात. पण दलित व एकूण समाजच इतका असंवेदनशील राहताना का दिसतो असा प्रश्न पडतो.

शवविच्छेदन आणि अत्यसंस्कारच्यावेळी तणाव

मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी तिन्ही मृतदेह हे औरंगाबाद येथील घाटी या सरकारी रूग्णालयात पाठवले गेले. सुनील आणि संजय चा खून गळा दाबून करण्यात आला होता तर सुनीलच्या आईच्या खून डोक्यात जबरदस्त मार लागल्याने झाला होता. त्यांच्या डोक्यात जबर जखमा झाल्या होत्या. जेव्हा त्यांचा मृतदेह विहिरीत फेकला जात होता तेव्हा त्यांच्या हातात जवळच्या झाडाची फांदी आली होती. त्यामुळे विहिरीत फेकल्यावर त्यांचा जीव गेला असा प्राथमिक निष्कर्ष काढला गेला. जयश्री यांचा कान ही कापला होता. सुनील आणि संजय यांचा खून केल्यावर तासाभराने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले गेले. संजयच्या पोटापासून त्यांचा कंबर आणि पायाचा भाग वेगळा केला गेला व लिंगावरही जखमा केल्या गेल्या, तर सुनीलचे मांड्यापासून पाय कापले गेले तसेच त्यांचे हात खांद्यांपासून वेगळे केले गेले व मुंडके ही वेगळे केले. त्यांच्या लिंगावरही जखमा करण्यात आल्या. सुनीलच्या कापलेल्या पायाच्या चौड्याच्या जागी काप घेतलेले होते. तर मुंडक्याचे दोन तुकडे करण्यात आले होते. तिन्ही मृतदेह पाहता सगळ्यात जास्त क्रूर आणि जास्त तुकडे 19 वर्षीय सुनीलचेच करण्यात आले होते. गळा आवळून मारल्यानंतर अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून मृतदेहांची विटंबना करण्यात आली, याचा अर्थ हत्या करणे एवढाच नव्हता तर त्यातून दलितांमध्ये दहशत निर्माण करणे असाही या मागील उद्देश दिसतो.

मृतदेहांचे शव विच्छेदन करून आल्यावर कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेण्यास व अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यांची केवळ एकच मागणी होती की, आम्ही आरोपींची नावे दिलेली आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. कुटुंबियांच्या या भूमिकेने जिल्ह्यात तणाव निर्माण झाला. गावामध्ये दलित आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांचा दबाव आणि ओघही वाढला. पाथर्डी रस्त्यावर अचानक रास्ता रोको करण्यात आला. चिघळत चाललेली आणि तणावग्रस्त होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांनी कुटुंबियांशी चर्चा करून दोन दिवसात आरोपी पकडू अशी आश्वासने दिली. कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी तयार झाले आणि रात्री उशिरा हजारो कार्यकर्त्यांच्या आणि शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले. याच रात्री पोलिसांनी या घटनेत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याने गुन्हा नोंद केला. आरोपी कोण? हे पोलिसांना माहीत होते का? असा गुन्हा नोंद करणे कायद्याने योग्य आहे का? की यामागे गुप्त पद्धतीने काय शिजत होते याचा शोध सुरूच राहतो.

संशयितांचा तपास

हत्येनंतर लगेचच संजय यांचे भाऊ सुरेश जाधव, फिर्यादी प्रशांत जाधव यांनी पोलिसांना संशयितांची नावे दिली होती. जाधव यांच्या शेजारीच ज्यांचे घर आहे. त्याच घरातील महिलेशी गावातील अनेक पुरूषांचे लैंगिक संबंध असल्याचे तिने स्वत:हून पोलिसांसमोर मान्य केल्याचे पोलीस अधिकारी सांगतात. तिने एकूण 17 नावे सांगितली त्यात सुनीलचेही नाव असल्याचे पोलीस सांगतात, तसेच तो एकटाच दलित आहे. साधारण पोलिसांचा तपास या दिशेने चालू असल्याचे कळते. याच संदर्भात शिवसेना नगर जिल्हा उप प्रमुख अनिल कराळे यांचे नाव जाधव कुटुंबियांनी संशयित म्हणून समोर आणले. परंतु अनिल कराळे हे भाजपचे नवनिर्वाचित आमदार मोनिका राजळे यांच्या नात्यात असल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात राजकीय अडचण आहे, आरोपी सापडत नाहीत असा प्रश्न साधारण नसून सुनीलच्या हत्येचा मुख्य उद्देश लपवून ठेवून त्याच्या कुटुंबाचा खून हा बाईच्या अनैतिक संबंधातून झाला असा दाखवण्यासा पोलीस प्रयत्न करीत आहेत. सुरेश जाधव यांनी असेही सांगितले की, संजय जिथे जिथे कामाला जाई तिथे संबंधित असलेल्या सर्व महिलांशी त्यांचे संबंध होते असेही पोलीस भासवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मराठा मुलीशी असलेले प्रेम संबंध हा खुनाचा मुख्य मुद्दा पोलीस भरकटू पाहत आहेत असे अनेक राजकीय दलित नेते, सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सुनीलच्या फेसबुकसवरचे अनेक फोटो, कॉमेंटस् त्याचे प्रेम संबंध असल्याचे निर्देशित करतात. परंतु पोलिस जाणीवपूर्वक तपासाला वेगळे वळण देत आहेत असा आरोप अनेक सामाजिक कार्यकर्तेकरत आहेत. मुंबईच्या सत्यशोधन समितीला तशी माहिती उपलब्ध झाली आहे.

सुरेश जाधव यांच्याशी चर्चा करताना त्यांनी काही महत्वाच्या घटना आम्हाला सांगितल्या. हत्येच्या एक दिवस आधी कुत्रा मारून टाकला गेला तसेच घरात रात्री कोणी डोकावून गेल्याचा संशय संजयला आला होता. हातात पिशवी घेऊन ती व्यक्ती रानात आली होती, सुनीलच रात्री अंगणात असेल म्हणून संजयने त्या व्यक्तीला हाक मारली परंतु त्याने तिथून पळ काढला. सुनील दुसर्‍या खोलीत झोपलेला पाहून संजयने त्या व्यक्तीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने अंधाराचा फायदा घेत पळ काढला. संजय यांनी सुरेश यांना दुसर्‍या दिवशी हा प्रसंग सांगून वस्तीवर चोरीची शक्यता बोलून दाखवली होती. परंतु त्या व्यक्तीचा संबंध हा हत्येशी असू शकतो असेही सुरेश यांनी सांगितले.

मुख्य राजकीय संशयितांची नावे पोलिसांना दिल्यावर सुरेश जाधव यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले एम.एच.17 चे पासिंग असलेल्या गाडीची ही माहिती पोलिसांना देऊनही पोलिसांनी त्या दिशेने तपास केला नाही.

तसेच मिरी मधील काही लोक गावात येऊन तिथे भेट देणार्‍या कार्यकर्त्यांना तुमचा काय संबंध, गावाचा विषय आहे. गावातले लोक बघून घेतील अशा प्रकारे मोठ्याने बोलून धक्काबुक्की करत होते. त्यांना पकडून दिल्यावर पोलिसांनी त्यांना सोडून दिले. त्या लोकांचाही मुख्य संशयिताशी संबंध होता.

सुरेशचे वडील जगन्नाथ म्हणाले की, “घरातील लोकांना कधीही पोलीस तपासासाठी घेऊन जातात, प्रशांत जाधव यांच्यावर दबाव आणतात. एक प्रश्न विचारून तासन्तास बसून ठेवतात. मध्यरात्री 1-2 वाजता आणून सोडतात. पोलीस असा कोणता तपास करीत आहेत?”

एकूण पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचे कलम लावणे संशयास्पद आहे. आरोपींना अजूनही अटक होत नाही ही खरं तर पोलिसांची नामुष्की तर आहेच पण ते राजकीय दबावात काम करीत आहेत की, आरोपींना वाचवण्यासाठी काम करीत आहेत असा संशय निर्माण झाला आहे.

माध्यमांची व सामाजिक संघटनांची भूमिका

दिवाळीच्या दिवशी साम या मराठी वृत्त वाहिनीवर या हत्येच्या बाबत पहिली बातमी पहायला मिळाली पाठोपाठ अनेक वृत्त वाहिन्यांनी ती लावून धरली. सोनई हत्याकांडाबाबत मीडियाने जी भूमिका बजावली नव्हती ती प्रसिद्धीची भूमिका येथे त्यांनी लवकर बजावली. परंतु पोलिसांच्या माहिती पलिकडे त्यांनी स्वत:हून काही शोधण्याचा प्रयत्न केला नाही. अनेक वाहिन्यांवर दलित अत्याचाराबाबत लढण्यासाठी रिपब्लिकन चळवळ कमकुवत झाली आहे का? अशा प्रकारच्या चर्चा झडत होत्या पण अशा प्रकारे खून होणे ही समस्त समाजासाठी लाजीरवाणी बाब असून त्यासाठी सामुदायिक जबाबदारी निभावण्यासाठी भूमिका घेताना मीडिया दिसली नाही.

डॉ.बाबा आढाव, लोकभारतीचे आमदार कपील पाटील, आम आदमी पार्टीचे सुभाष वारे, लोकशाहीर संभाजी भगत, अन्वर राजन, शंकरराव घुले, कवी संतोष पवार, कॉ.बाबा आरगडे यांच्या भेटीनंतर अहमदनगर शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यात बाबा आढाव यांनी मृत मुलाच्या वृद्ध आई वडिलांना स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनची मागणी केली तर यापुढे होणार्‍या अत्याचारासाठी गावाला दंड केला जावा अशी सूचना केली. तसेच संभाजी भगत यांनी समाजात जातीअंताचा संवाद होण्याची गरज बोलून दाखवली.

पत्रकार परिषद सुरू असताना सकाळ वृत्त समूहाचे पत्रकार लांडगे यांनी बाबा आढाव यांना विचारले की, दलित अत्याचाराव्यतिरिक्त अनेक व्यक्तीगत खून होतात तुम्ही त्यांना का भेट देत नाही? नगरमध्ये अशा घटना घडल्या की, तुमच्यासारखे कार्यकर्तेयेतात नेमका काय उद्देश असतो तुमचा?

बाबा आढाव यांनी याला उत्तर देत दलितांवरचे अत्याचार हे ‘जात’ या अनिष्ट प्रथेमुळे होतात त्यामुळे हा सामाजिक गुन्हा आहे, तो समाजाला आणि माणसाला कलंक आहे, समाजातील दुर्बल असलेल्या आणि केवळ जात दलित आहे म्हणून होणार्‍या अत्याचाराबाबत आम्ही कायम संवेदनशील आहोत, असे अत्याचार होऊ नये, जात नष्ट व्हावी अशी आमची भूमिका आहे त्यामुळे दुर्बल घटकांसाठी आम्ही न्याय मागायला येतो अशी सविस्तर मांडणी केली. यावर पुढारीचे पत्रकार सचिन चोबे यांनी थेट दलित सवर्ण संघर्ष सामाजिक संघटना लावत असल्याचा आरोप करत आता कुठे जातीयता उरली आहे असा रोख प्रश्न विचारला. समोरून येणारे काही पत्रकारांचे प्रश्न हे हेतुपुरस्कर आहेत हे लक्षात येताच संभाजी भगत पुढारीच्या पत्रकाराला म्हणाले, मी दलित असून संवादाची भूमिका हवी असं म्हणतोय आणि तुम्ही आमच्यावर जातीय संघर्ष लावत असल्याचा आरोप करीत आहात. जातीयता काय असते असे मला विचार, मी दलित आहे, त्या कुटुंबांना जाऊन विचारा यांची केवळ दलित आहे म्हणून हत्या झाली. पत्रकार परिषदेत असलेल्या काही पत्रकारांच्या भूमिका या संशयास्पद होत्या अशी चर्चा पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांमध्ये चालू होती.

खर्डा हत्याकांडानंतर मराठा संघटना आणि दलित संघटनांमध्ये जो संघर्ष पत्रकबाजी, मोर्चेआंदोलनातून चालू होता त्याला पत्रकारांमधील काही मानसिकतेने हवा दिली होती.

अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, सचिव माधव बावगे, जात पंचायतीला मूठमाती आंदोलनाचे संयोजक कृष्णा चांदगुडे, बाबा आरगडे यांनीही जवखेडे खालसा येथे भेट देऊन पाथर्डीतील मोर्च्यात सहभाग घेतला.

दलित अत्याचार अहमदनगर मध्ये वाढत असताना केवळ प्रतिक्रियात्मक भूमिका न घेता हे अत्याचार होऊ नये यासाठी अहमदनगर जिल्ह्यात अंनिसतर्फे सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी विशेष प्रयत्न करण्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. गावपातळीवर जाऊन अत्याचाराबाबत प्रबोधन करणे आणि समाजात संवाद घडवून आणायला हवा अशी अविनाश पाटील यांची भूमिका आहे. समविचारी संघटनांना घेऊन नगर जिल्ह्यात व्यापक प्रबोधनाचे पुढील 5 वर्षासाठी नियोजनाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत असताना अंनिस आणि समविचारी संघटनांनी 7 ते 9 तारखेपर्यंत अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे धरले. यात बाबा आरगडे, रंजना गवांदे तसेच अंनिसचे सर्व कार्यकर्तेसहभागी झाले होते.

महाराष्ट्रातील अनेक नेते जवखेड्याला येऊन गेले त्यात चंद्रकांत हांडोरे, रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर, पंकजा पालवे-मुंडे, सामाजिक न्याय मंत्री दिपक कांबळे, मनसेचे नेते राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार इत्यादी अनेक नेत्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची व नगर जिल्हा अत्याचारग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली आहे.

भाजपच्या नेत्या पंकजा पालवे-मुंडे व सामाजिक न्याय मंत्री दीपक कांबळे आरोपींना दोन दिवसात अटक करू असे आश्वासन देऊन आता 8 दिवस उलटून गेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह खाते सांभाळत असलेले देवेंद्र फडणवीस यांनी एकदाही भेट दिली नाही. ते आता महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहे असा प्रश्न त्यांनाच विचारण्याची गरज आहे.

राजकीय अनास्था आणि पोलिसांवरील दबाव यामुळे जाधव कुटुंबीयांसाठी न्याय कोसो दूर आहे.

कुणाल शिरसाठे / हर्षल लोहकरे

लेखक संपर्क: 9767599934