– नवनाथ लोंढे
“देहू गावाच्या जवळ, माळवाडीच्या शिवारातील एका शेतात एक भला मोठा खविसाचा दगड आहे. त्याच्याखाली सात रांजण भरून धन पुरून ठेवलं असून, त्याच्यावर अंगावर केस असलेला मोठा नाग, त्या धनाचे रक्षण करीत आहे. व त्या सर्वावर तो आक्राळ विक्राळ ‘खविस’ पहारा करीत आहे.” ही बातमी आदर्श विद्यालय, भारतपूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती संचलित, सत्यशोध प्रज्ञा परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना सनलो नावाच्या सद्गृहस्थाकडून कळली व त्यांनी तात्काळ त्यांचे मार्गदर्शक सर बोरकर यांना गाठले.
बोरकर सर खूप शिकलेले. प्रयोगावर, स्वप्रयत्नावर, विज्ञानावर विश्वास ठेवणारे तार्किक गृहस्थ. त्यांनीच विद्यार्थ्यांवर वैज्ञानिक दृष्टिकोन रूजावा, दैववाद सोडून प्रयत्नवादाचे संस्कार व्हावेत म्हणून ‘सत्यशोध प्रज्ञा परीक्षा’ हा नवीन उपक्रम आपल्या आदर्श विद्यालयात राबवायला सुरवात केली होती. त्यांच्याभोवती सर्व विद्यार्थी स्टाफरूममध्ये जमा झाले.
खविसाची बातमी ऐकल्यापासून, ती सरांना कधी सांगतेय असं वाटणारी उत्साही उज्वला सर्वांच्या पुढे येऊन घाईघाईत सांगू लागली, “बघा सर! जगात भूत असतं, भानामती घडते तसंच खविससुद्धा असतं, आणि ते देहू गावाजवळच्या माळवाडीच्या शिवारात आहे.” एका दमात उज्वलाने सांगितले.
“खरंच सर आम्ही ऐकलंय, आणि असं म्हणतात दर अमावास्या, पौर्णिमेला तो खविस तेथे दिसतो.”-मिलिंद.
“हो सर! तो खविस कितीही दूर असला तरी त्या दगडाजवळ फक्त तीनच पावलात येतो व त्या धनाचे रक्षण करतो.”-शरद
“त्या मोठ्या दगडाखाली(ज्याच्यावर खविस बसतो) 7 रांजण भरून धन पुरून ठेवलं आहे.”-नीता
“हा पहा त्याच गावचा-माळवाडीचा एक माणूसच आलाय त्याच्याच तोंडून ऐका.”-मिलिंदा
एवढा वेळ गप्प बसलेला तानाजी मध्येच म्हणाला, “सर! माझा यावर अजिबात विश्वास नाही.”
“पण आपण जरा त्या माणसाचे ऐकू या.” शांतपणे ऐकणारा अनिल म्हणाला.
बोरकर सरांनाही तेच म्हणायचं होतं. पण त्यांच्या आवडत्या विद्यार्थ्यांनी प्रश्नांच्या फैरी झाडायला सुरवात केल्यानंतर शांत बसून ऐकणेच पसंत केले. सर्वांना गप्प करून मिलिंदाने त्या माणसाला पुढे उभे केले.
बोरकर सर : “तुमचं नाव काय?”
गृहस्थ : “सनलो”
बोरकर सर : “सनलो म्हणजे?”
गृहस्थ : “मला सगळे ‘सनलो’च म्हणतात. का? ते नंतर सांगतो. महत्वाचे म्हणजे खविसाचे पहिलं पाहू या…”

सर्वजण शांत बसले. सनलो सांगू लागला. “… त्या खविसाबद्दल बरेच लोक काही बाही सांगतात, पण त्याचा खरा व थोडक्यात इतिहास असा आहे… छत्रपती शिवाजी महाराजांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना नजराणा पाठविला. त्यात भरजरी किंमती कपडे, सोन्या चांदीचे दागिने इ. भेटवस्तू होत्या. परंतु तुकाराम महाराज खर्या अर्थाने ‘संत’ असल्याने ‘सोनं नाणं आम्हा मृतिकेसमान’ असे म्हणून तो नजराणा नम्रपणे न स्वीकारता माघारी पाठविला. मावळे नाईलाजाने तो नजराणा घेऊन परत रायगडाकडे निघाले. पण काही मावळ्यांना वाटले की हा नजराणा परत नेला तर छ.शिवाजी महाराज आपणाला सजा देतील. म्हणून त्या सेवकांनी तो नजराणा देहू गावाजवळील माळवाडी शिवारात 7 रांजणात भरून खोल जमिनीत पुरून ठेवला. त्याचे रक्षण करण्यासाठी एक मावळा ठेवून बाकीच्या मावळ्यांनी रायगडाकडे कूच केली. राखण करणार्या मावळ्याचा नंतर मृत्यू झाला. मृत्यूनंतर तो तेथेच ‘खविस’ होऊन त्या धनाची राखण करीत आहे. त्या पुरून ठेवलेल्या धनावरच्या मोठ्या दगडाला आपण कोणीही हात जरी लावला, तरी तो खविस कितीही. कि.मी.दूर असला तरी फक्त तीन पावलात तेथे येतो व दगडाला हात लावणार्याला भिती दाखवतो. धनावरचा केसाळ नाग चावतो व दगडाला स्पर्श करणारा घाबरून, रक्ताची उलटी होऊन मरतो, नाहीतर भयंकर आजारी पडतो. दर अमावास्या, पौर्णिमेला तो खविस त्या मोठ्या दगडावर बसून असतो. म्हणून त्या दगडाला आम्ही परिसरातील सर्व लोक ‘खविसाचा दगड’ म्हणतो.
बोरकर सर : “तुम्ही तो खविस पाहिला आहे का?”
सनलो : मी नाही पाहिला, त्यावर माझा विश्वास नाही. पण एकदा गणपा मोरे अमावास्याच्या रात्री तेथून जात होता, तेव्हा आक्राळ विक्राळ खविस त्याला दिसला, गणपा घाबरला व जागच्या जागी रक्त ओकून मेला. बिचारा गणपा.”
हे ऐकून पराग, जितेंद्र, शुभांगी, प्रमोद, अनिल घाबरले व आपले तसे होऊ नये म्हणून डोळे बंद करून दोन्ही हात कानावर ठेवून खाली माना घालून गप्प उभे राहिले. थोडा विचार करून सर म्हणाले, “काय रे माझ्या मित्रांनो, जायचं का त्या खविसाच्या दगडाला हलवायला आणि त्या खालचा खजिना आणायला?”
सर्वत्र शांतता पसरली. खाली माना घालून ते उभे राहिलेले तसेच स्तब्ध होते. खविसाचा दगड हलवून त्या खालचा नजराणा घेऊन आणू म्हणणारे बोरकर सर त्या विद्यार्थ्यांना तो काल्पनिक खविसच वाटू लागले. त्यांच्या नजरेला आपली नजर भिडली तर आपलाही गणपा मोरे होईल, तसे होऊ नये म्हणून ते विद्यार्थी खालीच पाहात होते.
बोरकर सर व सनलोनी थोडी चर्चा केली व “13 जुलै रोजी अमावास्या, त्याच दिवशी रात्री 11 वाजता जाऊन तो खविसाचा दगड हलवून, गुप्तधनाचा शोध घ्यायचा.” हा निर्णय ऐकताच विद्यार्थ्यांची खात्री झाली की, “बोरकर सर व सनलो हे दोन खविस आपल्या मानगुटीवर बसणार याची.” म्हणून मुलं गुपचूप तेथून निघून चालली. तर बोरकर सर म्हणाले, “काय रे मित्रांनो, तुमच्या मौनाचा अर्थ मी काय समजू?”
सर : “अरे! सत्यशोध प्रज्ञा परिक्षेच्या पुस्तकात आपण वाचलं की नाही, या जगात भूत, हडळ, खविस नसतात ते काल्पनिक आहेत.”
शुभांगी : “होय सर! पण ते झालं पुस्तकात लिहिलेलं, प्रत्यक्षात त्याचा काय संबंध?”
मिलिंद : “भूत, हडळ, खविस हे खोटं व काल्पनिक आहेत, तर मग गणपा मोरे जागच्या जागी रक्त ओकून का मेला?”
मग धीर धरून सर्व विद्यार्थी म्हणाले, “हा हा गणपा कसा मेला. खविस असल्याशिवाय का?”
उज्वला : “पुस्तकात लिहायला कुणाचं काय जातंय. ते काय थोडंच 13 जुलैला बघायला येणार आहेत का?”
बोरकर सर : “अरे भित्र्यांनो… त्या गणपाचा मृत्यू घाबरल्यामुळे, हार्ट अटॅकमुळे झाला नसेल कशावरून. अमावास्येच्या रात्री एकटाच त्या दगडाजवळून जाताना त्याला खविसाची आठवण झाली. तो मोठा दगड अंधारात खविसाच्या आकाराचा भासला असणार. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ म्हणीप्रमाणे त्याच्या मनात अनेक वाईट विचार आले. ‘भित्यापाठी ब्रम्हराक्षस’ म्हणीनुसार तो घाबरूनच मेला असणार असे मी ठामपणे सांगतो. खविसाचा अन् गणपाच्या मृत्यूचा काहीच संबंध नाही.
गणपाच्या मृत्यूचे शास्त्रीय स्पष्टीकरण ऐकून तानाजी, अनिल, मिलिंदा, शुभांगी यांना जरा धीर आला. धीर धरूनच अनिल म्हणाला, “होय सर! तुम्ही म्हणता तसंच घडलं असावं.”
यावर पराग लगेच म्हणाला, “कदाचित गणपाच्या मृत्यूमागं घातपाताची शक्यताही असू शकेल.”
“नाही, नाही घातपात काही नाही पण गणपा मोरे हा दारू खूप प्यायचा. अल्सरचा त्रास होता. डॉक्टरांनी दारू बंद करायला सांगितली होती.” सनलोनी माहिती पुरविली.
तानाजी : “मग गणपा अटॅकने गेला का?”
बोरकर सर : “अटॅक हे एक कारण असू शकतं किंवा अल्सरमुळे रक्ताची उलटी होऊ शकते. गणपाच्या मृत्यूचे कारण खविस नाही. यावर सर्वांचं एक मत झालं. मग बोरकर सरांनी “धाडस, पराक्रम, पुरूषार्थ हे अलौकिक गुण ज्यांच्याकडे आहेत तेच इतिहास घडवू शकतात. आणि आता आपण इतिहास घडविणारे छ.शिवाजी महाराजांच्या भूमीतील मर्द मावळे आहोत. ज्यांना या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हायचे आहे, त्यांनी हात वर करा.” असे म्हणताच अनिल, शरद, तानाजी, मिलिंदानी हात वर केले. यांचे हसरे व निर्भय चेहरे पाहून उज्वला, शुभांगीसह सर्वांनी इतिहासाचे साक्षीदार होण्याचे मनापासून कबूल केले.
13 जुलैच्या रात्री 11 वाजता माळवाडी परिसरातील “खविसाच्या दगडा”जवळ जमायचं ठरवून सनलो निघाले. जाता जाता बोरकर सर त्या गृहस्थाला म्हणाले, “काय हो ‘सनलो’ म्हणजे काय? नाही सांगितलं.”
सनलो : “नंतर सवडीनं सांगतो आता उशीर झालाय.”

13 जुलै, अमावास्येची काळीकुट्ट रात्र. पावसाचे दिवस असल्याने हवेत गारठा होता. माळवाडीच्या माळावर, खविसाच्या दगडाजवळ तात्पुरत्या प्रखर लाईटीची सोय केली होती. सनलो, मिलिंदा टिकाव, फावडं, घमेली, पहार घेऊन हजर होते. रात्रीचा माळावर साप दिसला तर पकडण्यासाठी एक तज्ञ सर्पमित्रही आणला होता. माळवाडीच्या परिसरातील खविसावर विश्वास असणारे बघे जमले. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना खविस कसा ‘इंगा दाखवितूय’ हे थरार नाट्य पाहण्यासाठी काहीजण आतुरतेने जमले होते. बोरकर सर विद्यार्थ्यांना न घाबरण्याविषयी. निर्भयतेच्या छ.शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत होते. पण थंडीने गारठलेली मुलं मनातल्या मनात सरांवर चिडत होती. मुलांच्या नजरेपुढे सनलो व बोरकर सरांचा चेहरा काल्पनिक भूतासारखे दिसत होते. 250 ते 300 बघे, आलाच खविस 3 पावलात तर आपणही 10 पावलांत आपलं घर गाठायचं म्हणून आपला पळण्याचा रस्ता हेरून त्या त्या मोक्याच्या ठिकाणी मोटर सायकली तयारीत ठेवल्या होत्या.
रात्रीचे 11 वाजून गेले, बोरकर सर सर्वांना उद्देशून म्हणाले, “पंचक्रोशीतील माझ्या मित्रांनो भारताच्या राज्यघटनेत असे एक कलम आहे, त्यात असे लिहिले आहे की, ‘समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, चिकित्सक बुद्धी व सुधारणावाद याचा प्रसार व प्रचार करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. त्यानुसार आपण येथे तपासणी करतोय व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसारही करीत आहोत. जगात भूत, खविस नसतं हे सुद्धा यातून सिद्ध होणार आहे.”
“तो केसाळ नाग आला तर?” गर्दीतून आवाज.
“आमच्याबरोबर सर्पमित्र राजू त्याला पकडण्यासाठी आले आहेत.-बोरकर सर.
“आवो सर! तो खविस आन् नाग दोनीबी एकदम आलं तर पळताभुई थोडी हुईल, आन् तुमच्या पोरांच्या चड्ड्या वल्या व्हतील.” परत एक आवाज.
बोरकर सरांनी परत एकदा मुलांवरून नजर फिरविली.. “धाडस, पराक्रम, पुरूषार्थ हे अलौकिक गुण ज्याच्याकडे आहेत तेच इतिहास घडवू शकतात…” शाळेत बोरकर सरांचे ऐकलेले वाक्य अनिलला आठवले त्याने ते सर्वांना सांगितले. मग अनिल, तानाजी, शरद, सनलो इ.सर्वांनी छातीवर हात ठेवून आत्मविश्वासाने सरांना सांगितले, “सर! आम्ही नाही घाबरत, आम्हाला ‘इतिहास’ घडवायचा आहे. “करा खोदायला सुरवात.”
खोदायला सुरवात झाली. 7/8 तरूणांच्या मदतीने सनलोंनी 15/20 मिनिटांत खविसाच्या दगडाभोवती 2 फूट खोल खड्डा खोदला. खोदणाराला प्रोत्साहन देण्यासाठी बाकीचे विद्यार्थी “वीर उतरले, उतरले हो, उतरले रणमैदानी”
“नव्या युगाची पहाट झाली, विज्ञानाची कास खरू
या मित्रांनो, या देशातील अंधश्रद्धा दूर करू.”
“घेऊन कुदळ, खोरं, चला जाऊ म्होरं, देऊ देशाला जीवनदान चल उचल हत्यार, गड्या होऊन हुशार तुला नव्या जगाची आन” अशी स्फूर्तीदायक गाणी म्हणत होती. गाण्यामुळे व गाण्यातील अर्थामुळे जमलेल्या बघ्याचं प्रबोधन व मनोरंजनही होत होतं.
रात्रीचे 11.45 वाजले होते, खड्डा खोदण्याचे काम नवीन दमाचे व शेतकर्यांची मुलं असलेले अनिल, तानाजी, शरद, मिलिंदा इ.विद्यार्थी उत्साहाने करीत होते, बोरकर सर प्रोत्साहन देत होते. सनलो खोदण्याला, माती उचलण्याला, गाणी म्हणण्याला मदत करीत होते. तर बघ्यापैकी काहीजण चर्चा करीत होते की, “आता खविस आला तर आपून पळून जाणार.” “पळून कुठं जातोस, तो खविस तुझा हितच गणपा मोरे करणार”, “केसाळ नाग तर पळता भुई थोडी करंल.” चर्चा रंगात आली होती.
खोदता खोदता टिकाव दगडावर आदळून ठिणग्या उडाल्या. टिकावाचे टोक वाकले. आवाज ऐकून सर्वजण घाबरले. कोण पळायला सुरूवात करणार तर एकजण म्हणाला, “आरं पळू नका थांबा. धन सापडलं आसंल.”
दुसरा म्हणाला, “आरं बाबा कसलं धन घेऊन बसलास, तो बघ खविस येतोय, घरं गाठायचं बगा पयलं.”
खविसाच्या दिशेने पाहिलं तर दोन प्रखर दिवं अंधारातून त्यांच्याच दिशेने येताना दिसले. गोंगाट शांत झाला. काहींना वाटले ‘गुप्तधनाजवळ इतका जमाव बघून खविसाला संताप झाला व बेभान होऊन तो आपल्याकडे धावत सुटलाय. आता आपली धडगत न्हाय. आता आपला गणपा मोरे हुनार!
एकजण म्हणाला, “अरे हा ट्रॅक्टर हाय.”
सनलो : “मीच सांगितलं होतं शिरपाला. दगड हालवायला कोणीच मदत करणार नाही, तर तो अवजड दगड ट्रॅक्टरनेच हलवणे सोपं जाईल म्हणून तुझा ट्रॅक्टर आण.”
दोरखंडांनी व साखळदंडांनी दगड बांधून ट्रॅक्टरला हुक अडकविले व दगड चुटकीसरशी दूर केला. परत खोदायच्या कामाला सुरवात केली. कोणी खोदत होते, कोणी माती, दगड घमेल्यात भरून देत होते. कोणी ती दगड, माती दूर नेऊन टाकीत होते. दगडमातीची एक टेकडीच तयार झाली होती. बोरकर बारकाईने सर्वांकडे लक्ष देत होते. मुलंही किरकोळ कामात मदत करत होते. टिंगल करणारेही मदत करीत होते. कारण त्यांचाही आता भूत व खविसावरचा विश्वास उडू लागला होता. कारण दगडाला हात लावताच 3 पावलांत येणारा खविस तो दगड 15 फूट अंतरावर नेऊन ठेवला, 8/9 फूट खोल खड्डा खोदला तरी खविस आला नाही, नाग निघाला नाही, सात रांजण भरून ठेवलेलं धनही सापडलं नाही.
काहीतरी अघटीत, थरार घडेल, असं वाटत होतं. पण अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना खविसाचा इंगा कुणालाच बसला नाही. याचं बघ्यांना आश्चर्य वाटलं. आपला गणपा मोरे झाला नाही म्हणून सर्व विद्यार्थी खूष होते. सगळे व्यवस्थित पार पडलं म्हणून सनलो व बोरकर आनंदात होते.
10 फूट खोल खड्डा खोदल्यानंतर खोद काम बंद केले व सनलो सर्वांना उद्देशून म्हणाला, “माझ्या गावकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगत होतो की, येथे धन, साप व खविस नाही. मी स्वत: 8/10 वेळा येथे अमावास्येला व पौर्णिमेला येऊन दगडाला हात लावून, दगडावर बसून गेलो पण मला काहीच झालं नाही. हे तुम्हाला पटत नव्हतं, म्हणून मी हे तार्किक व भुताटकीवर विश्वास नसलेल्या आदर्श विद्यालय, भरतपूरचे बोरकर सर व त्यांचे विद्यार्थी यांना घेऊन आलो. व त्यांनी येऊन ‘जगात भूत, खविस नसतं’ हे कृतीनं पटवून दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानू.”
सनलोनी आभार मानताच गर्दीत गडबड झाली. आरडाओरड झाली. अघटीत काहीच झालं नाही म्हणून नाराजीने निघालेल्या बघ्यांना वाटलं “त्यो केसाळ नाग निघाला काय रं” त्यांना गडबडीचं कारण समजण्या अगोदरच दगडू आडमुठ्यांनी सनलो व बोरकर सरांना उद्देशून अपशब्द वापरले व म्हणाला, “ये अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यानो खविस आसू दे न्हाय तर नसू दे, पन आमचा रोजचा रस्ता खराब केला त्यो पयला नीट करून द्या. न्हायतर चाप्टर केसच करतो तुमच्यावर.”
आडमुठ्यांनी गर्जना केल्यावर 2/3 आवाज आले, “व्हय, व्हय बरूबर हाय त्या दगड्याचं, आमचा रस्ता नीट करा न्हाय तर बगा.”
वातावरण चिघळणार असं वाटू लागलं. सनलो व बोरकर सरांच्या मनात आलं “खविस, नाग, भूत आडवं येत नाहीत काही पिडा करीत नाहीत पण ही माणसंच का बरं ‘भूता’सारखी वागतात.”
“आयला त्ये खविस एकवेळ परवडलं पण ह्यो दगड्या न्हाय परवाडायचा.” गर्दीतून एक आवाज.
हे ऐकताच दगडू त्याच्या अंगावर धावून गेला आणि त्याची गचांडी पकडली. आता मारामारी होणार, पण वातावरणाचं गांभीर्य राखून सनलो व बोरकर सर मधी पडले व भांडण मिटविले.
सनलो व बोरकर सरांनी रस्ता नीट केला व खड्डा बुजवताना बोरकर सर सर्वांना उद्देशून म्हणाले, “गावकर्यांनो तुमच्या मनात साप, गुप्तधन, खविस याबद्दल जी भीती होती, जे गैरसमज होते ते दूर व्हावेत म्हणून आम्ही हा प्रयोग केला. तुमचा दररोजचा रस्ता दुरूस्त केलाच पण हा खड्डा बुजविताना आपण आपापल्या मनातील अंधश्रद्धा, गैरसमज, अज्ञान, भूत, भानामती व खविस इ.गैरविचार या खड्ड्यात गाडून टाकू व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मनापासून स्वीकार करू या. एकमेकांबद्दल प्रेम, बंधुता व विश्वास बाळगू या तो वृद्धिंगत करू या. आम्हाला आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आभारी आहोत.”
गावकरी बघे आपापल्या घरी निघाले. “जगात खरंच भूत, भानामती नसते” हे सर्व विद्यार्थ्यांना प्रयोगातून दाखवून दिले म्हणून बोरकर सर खुष. विद्यार्थ्यांच्या मनातील भुतासारख्या अंधश्रद्धा होत्या त्या त्यांच्या मनातून गेल्या व वैज्ञानिक दृष्टिकोनाची ज्योत नव्या नागरिकांच्या मनात पेटवली गेली. विज्ञानयुगात वैज्ञानिक विचाराने अंधश्रद्धा गळून पडतात हा धडा मुलांना मिळाला. ते या ऐतिहासिक घटनेचे खरेखुरे साक्षीदार बनले व आनंदात रात्री 1 नंतर निघाले.
बोरकर सर : “सनलो म्हणजे काय आता तरी सांगा.”
सनलो : “सप्रेम नमस्कार लोभ (असावा).”