Categories
व्यक्तिविशेष

किरकोळ गोष्टीतूनही विवेकी, शांत, संयमी आचरणाचा धडा

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला जावा म्हणून महाराष्ट्रातून लोकविज्ञान जथ्थाच्या माध्यमातून कार्यक्रमांचे जाहीर आयोजन केले जात होते. तेव्हा धुळ्यातील नियोजित कार्यक्रमात डॉ. दाभोलकरांची उपस्थिती ही पहिली भेट. नंतर डॉक्टरांची दुसरी धुळे भेट “लग्नाची बेडी” या नाटकाच्या वेळी कलामंदिर, धुळे येथे सामाजिक कृतज्ञता निधी जमा करणेसाठी. या कार्यक्रमावेळी डॉक्टरांची प्रत्यक्ष भेट झाली. सामाजिक कार्यात सेवा देणार्‍या कार्यकर्त्यांना आर्थिक आधार देणेसाठी सदर निधी उभा करण्यात आला होता. त्यात डॉक्टरांचा सिंहाचा वाटा आहे.

डॉक्टरांची समाजसेवा देणार्‍यांसाठी आंतरिक तळमळ मनात तसेच हृदयात साठून राहिली, आपणही समाजाचे देणे लागतो ही जाणीव निर्माण झाली. सदर जाणीव कृतीत आणण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमांना प्राधान्य देणार्‍या शिबीरात, सहभागी होत राहिलो. याचा फायदा असा झाला की, छद्म विज्ञानाचा बोध झाला, परिणामी राशी भविष्य सांगणारे ज्योतीषशास्त्र हे शास्त्र नाही, तसेच चुंबकीय चिकित्सा किती फोल आहे. याचे भान आले व वैयक्तिक आणि सामुहिक जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन वापरण्याचे धाडस अंगी बाणले. डॉ.दाभोलकर यांच्या प्रेरणेने जीवन जगण्याच्या वास्तव प्रयत्नास सुरवात झाली.

लोणावळा शिबीरातील आठवण सांगतो. सायंकाळचे सत्र संपले. डॉ. दाभोलकरांनी जवळ जवळ दीड तास भाषण केलेले, खुर्चीवर निवांत बसलेले, मी डॉक्टरांना सरळ प्रश्न विचारला की, आपण व श्याम मानव मिळून तरूणांना प्रबोधित करतात, मात्र तुमचे आपसात जमत नाही, डॉक्टर शांतपणे उत्तरले की, तुम्हाला(शिबीरार्थींना) संमोहनाचे प्रयोग दाखवले जातात पण जगात या संमोहन शास्त्राला शास्त्र म्हणून मान्यता नाही, म्हणूनच आमचा वैयक्तिक मतभेद आहे. तो आमच्या कामातील अडथळा नाही, म्हणजे काम करीत असताना अडथळे येतील पण त्यातूनही मार्ग असतो असा दृढ निश्चय झाला.

आपणही या मान्यवरांचे शिबीर धुळ्यात घेण्याचे मनात ठरविले. मी व प्रा. हिराजी आण्णा पाटील यांनी शिबीराचे आयोजन केले. आर्थिक भार आण्णांनी घेतला, तरूणांसाठी प्रवेश फॉर्म तयार करून महाविद्यालय तसेच माध्यमातून तरूणांना आवाहन केले. उत्तम प्रतिसाद मिळाला, शिबीरात समारोप वेळी मा. जिल्हाधिकारी यांना पाचारण केले होते, प्रथम कोण भाषण करणार या बाबत चर्चा झाली, श्याम मानवांचे मत होते की, आपण दोघांनी अध्यक्षीय भाषणानंतर शेवटी बोलावे, पण डॉक्टर सरळ मनाचे. त्यांनी म्हटले की, अध्यक्षांच्या भाषणाच्या आधी आपण बोलायचे, श्याम मानवांनी नकार दिला, पण डॉक्टरांनी प्रथम भाषण केले, आणि नंतर जिल्हाधिकार्‍यांनी, डॉक्टरांचे म्हणणे कसे अयोग्य आहे असे मत मांडले, पण डॉक्टर अतिशय शांतपणे ते ऐकत होते. शेवटी श्याम मानवांनी जिल्हाधिकार्‍यांचे म्हणणे कसे विसंगत व चूक आहे ते स्पष्ट केले, दोघे किती निश्चयपूर्वक, निष्ठापूर्वक आपले मत मांडत होते. हे शिकायला मिळाले, शिबीरानंतर दोघांनी शिबीर, छान आयोजन नियोजनबाबत, हिराजीअण्णा व मला प्रत्यक्ष भेटून, अंनिसच्या कामात आपण सहभागी व्हावे असे आवाहन केले आणि हे आव्हान आम्ही स्वीकारले व प्रथम बुवाबाजी, भूत भानामती विरूद्ध माध्यमातून प्रबोधन सुरू झाले, आमचा परिचय वर्धिष्णू झाला. प्रा. हिराजी आण्णांच्या निधनाने, कामाची जबाबदारी वाढली. पेलवेल तशी जबाबदारी पार पाडत राहिलो.

डॉक्टर धुळ्यात आले असताना एकदा मुक्कामाची व्यवस्था माझ्या मोठ्या मुलीकडे, शिवनेरी बंगल्यात केली, जेवणाबाबत डॉक्टर फारच मोकळे होते, भोजन आस्वाद घेत, संपवायचे, जेवणानंतर अभिप्राय असायचा छान स्वयंपाक झाला. मुक्कामी असतांना डॉक्टर सकाळी चार वाजता उठले, सरळ बाथरूम गाठले, आवाजामुळे मला जाग आली, बाथरूम जवळ गेलो, डॉक्टरांना विचारले आंघोळीसाठी गरम पाणी आणतो, पण त्यांनी गार पाणीच वापरले. डॉक्टरांना सतत भटकंती करावी लागत असल्याने त्या योग्य वातावरणात समायोजन करण्याची उर्मी शिकायला मिळाली.

एकदा धुळे ते औरंगाबाद प्रवासात डॉक्टरांसोबत कारने प्रवासाचा अनुभव आला. सकाळी प्रवास सुरू झाला. आवधानला पोहोचलो तर रेल्वे गेट बंद होते. डॉक्टर कारमधून उतरले व सरळ पायी चालत निघाले, पाच दहा मिनिटांनी रेल्वे गेट उघडले तर तेवढ्या वेळेत डॉक्टरांनी किमान अर्धा कि.मी.रस्ता पार केला होता.

कारमध्ये लिफ्ट घेतल्यानंतर डॉक्टर म्हणाले, म.गांधी कसे मोठे होते. मी म्हटले जगात स्वत:वर प्रयोग करणारा माणूस(गिनीपीग) होते, डॉक्टरांनी शांतपणे विचार करता ऐकून घेतले. दुसर्‍याचे मत ऐकून घेणे किती गरजेचे असते याची जाणीव झाली.

डॉ. दाभोलकरांमुळे अंनिस चळवळ, भांडाफोड पासून सुरू झाली, चळवळीसाठी कायदा आवश्यक म्हणून तसा पाठपुरावा डॉक्टरांनी केला, पुढे धर्मनिरपेक्षतेसाठी धर्माची चिकित्सा करण्याची तयारी, तशा कार्यक्रमांचे आयोजन, करून धर्मांधतेसाठी, जात्यंधता कशी कारणीभूत आहे याची जाणीव होऊन, स्वत:मध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये विवेकी आचरण रूजवण्यास सुरवात केली, आक्रमक पद्धतीने समस्या सुटत नाही हे डॉक्टरांना माहीत होते. कार्यकर्त्यांत विवेकी दृष्टिकोन निर्माण होणेस व त्याचे दृढीकरण होणेस मदत झाली.

असे आपले डॉ. नरेंद्र दाभोलकर, अंनिस कार्यकर्त्यांना दाभोलकर बनवून, शांत झाले. चळवळीस जोर मिळाला. राज्यात, देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर चळवळ पोहोचली.

. . पाटील, धुळे