सप्टेंबर 1993 साली वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प शिबीर नाशिकच्या म.वि.प्र.समाजाच्या मराठा हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते. अंनिसचे काम जाणून घेण्याची उत्सुकता असल्याने इतर 25 माध्यमिक शिक्षकांबरोबर माझ्यासह माझी पत्नी व माझी तीनही मुलं यांनी दोन दिवसीय पूर्ण शिबीर केले. डॉक्टरांनी आमच्याशी जेव्हा ‘संवाद’ सुरू केला तेव्हा आम्ही अगदी ‘भारावून’ गेलो. डॉक्टरांनी सलग 2-3 विषय घेतले. माझा सर्वांत लहान 11 वर्षांचा मुलगा डायरीत नोंदी करत होता. डॉक्टरांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी आवर्जून त्याचा उल्लेख केला. तेव्हापासून आमचे संपूर्ण कुटुंब अंनिसशी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष जोडले गेले. पाच ऑक्टोंबर सर्वपित्री अमावास्येच्या मध्यरात्री मी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांची ‘स्मशान सहल’ काढली. त्याही सहलीस माझे संपूर्ण कुटुंब हजर होते. लग्नाआधीच सोळा सोमवारचे व्रत करणारी माझी पत्नी डॉक्टरांच्या व्याख्यानानंतर ‘क्रांती’ व्हावी तशी बदलली. मी स्वत:ला ‘विज्ञानवादी’ म्हणवून घेत असलो तरी काठावरच होतो. डॉक्टरांच्या संपर्कात राहिल्याने माझेही विचार पक्के होत गेले. शाळेत तसेच परिचितांमध्ये माझी स्वतंत्र ‘ओळख’(Image) तयार झाली. आमच्या कुटुंबात कुठल्याही प्रकारच्या तथाकथित कर्मकांडांना स्थान उरले नाही. माझ्या तिन्ही मुलांनी (2 मुलगे, 1 मुलगी) जाणीवपूर्वक ठरवून ‘नोंदणी पद्धतीने’(रजिस्टर्ड) विवाह केलेत. ही ‘निर्भयता’ अंनिस-म्हणजे डॉक्टरांमुळे आली असावी.
कार्यकर्त्यांच्या क्षमता व उणिवांची डॉक्टरांना चांगली जाण होती. शिक्षक असूनही ‘वक्तृत्वकला’ मला अवगत नसल्याने डॉक्टर मला ‘लिहिते व्हा’ म्हणून सल्ला देत. 2003-04 च्या नाशिक सिंहस्थपर्वणीवर(कुंभमेळा) समितीसाठी पुस्तिका मी लिहावी म्हणून त्यांनी मला सुचविले नव्हे, तसा आग्रहच धरला. सुरवातीला मला थोडी भीती वाटली. परंतु डॉक्टरांनी काही संदर्भ दिले. तरीही 36 पानांची पुस्तिका काढण्यासाठी मी, अनुप गोसावी यांची मदत घेतली. आणि घाई-गर्दीत पुस्तिका तयार झाली. डॉक्टरांची प्रस्तावना असलेल्या या पुस्तिकेचे प्रकाशन मा.उत्तम कांबळे व डॉ.कैलास कमोद यांच्या उपस्थितीत पार पडले.
पेठे विद्यालयाचा मुख्याध्यापक झाल्यावर लगेच माझ्यासमोर एक ‘संकट’ उभे राहिले. 17 फेबु्रवारी 2006 रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध खगोल अभ्यासक सुधाकर भालेराव शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व शिक्षक उपस्थित होते. शाळेच्या प्रथेप्रमाणे ‘सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन’ प्रमुख पाहुण्यांचे हस्ते झाले. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. त्यानंतर 10 दिवसांनी मराठी ‘राजभाषा दिन’(27 फेब्रु.) ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’(28 फेबु्रवारी) हे दोन्ही कार्यक्रम दै.सकाळच्या सहकार्याने पार पडले. त्यांच्या फोटोसह बातम्या स्थानिक वृत्तपत्रात आल्या. मात्र दै.लोकमतने बनावट बातमी ‘प्राचार्यांचा सरस्वती पुजनास नकार’ असे शिर्षक असलेली(10-12 दिवसांनंतर) लोकमतच्या सर्व आवृत्त्यांत दिली. त्या बातमीचा 3-4 दिवस पाठपुरावा करून लोकांच्या ‘प्रतिक्रिया’ घेतल्या. त्या प्रकरणाने सत्यशोधन केले असता वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे होती…..
नाशिक दै. लोकमतचे तत्कालीन संपादक हेमंत कुलकर्णींचा(पाल्य) मुलगा/मुलगी मार्च 2005 च्या बारावी बोर्डाच्या परिक्षेसाठी आमच्या केंद्रातून परीक्षा देत होता/होती. मी बिल्डींग कंडक्टर असल्याने इमारतीतून आत येण्यासाठी त्यांना ‘मज्जाव’ केला होता. तेव्हाच, तुम्ही मला ओळखलेले नाही, मी तुम्हाला बघून घेईन अशी ‘धमकी’ देऊन ते निघून गेले. मात्र वर्षभराने माझ्याबद्दल ‘असूया’ असलेल्या काही शिक्षकांना हाताशी धरून व्यक्तीगत द्वेषापोटी त्यांनी हे ‘षडयंत्र’ रचले होते. 15-20 तरूणांचा गट(टोळके) माझ्या ‘तोंडाला काळे फासण्यासाठी’ शाळेत लोकमतचा वार्ताहर व कॅमेरामन यांच्यासह आला होता. मी त्यांच्यासमोर सरस्वतीला हार घालावा अशी त्यांची मागणी होती. या सर्व प्रकरणाची माहिती मी डॉक्टरांना फोनवर देऊन त्यांच्या संपर्कात होतो. डॉक्टरांनी त्यावेळी मला दिलेला सल्ला असा… “तुम्हाला काळे फासले तर तुमचीच प्रतिमा अधिक उजळून निघेल. तुमची तयारी असेल तर महाराष्ट्रात हे प्रकरण मी उचलून धरेन. परंतु माझ्या असे लक्षात येते की, संस्थेतील फार थोडे लोक तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे शक्यता वाटते की, तुमच्या संस्थेची बदनामी झाली म्हणून तुमच्यावरच ‘निलंबनाची कारवाई’ होईल. तुमची रिटायरमेंट आता जवळ आली आहे. तेव्हा फार टोकाची भूमिका न घेता, सबुरीने घ्या. जीवनात क्वचित प्रसंगी तडजोड करावी लागते.” असाही (पाच वर्षांनीच मोठे असल्याने) वडीलकीचा सल्ला दिला. मुलांच्या लग्नासंबंधीसुद्धा “मुलांच्या सहमतीने निर्णय घ्या. संबंध तुटतील इथपर्यंत आपल्या मतासाठी आग्रही राहू नका. ताणू नका.” स्वत:च्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची तडजोड न स्वीकारणारा हा भला माणूस कार्यकर्त्यांबाबत मात्र फारच ‘संवेदनशील’ होता. कुटुंबाची वाताहत होऊ नये हीच भावना डॉक्टरांची असेल असे मला वाटते.
– व्ही. टी. जाधव, नाशिक
मोबा. 9850440947