Categories
बालविभाग

कोंबडा भल्या पहाटे का आरवतो?

वार्षिकांक – २०१२

रात्र झाली की झोपायचे, सकाळ झाली की उठायचे, भूक लागली की खायचे, तहान लागली की प्यायचे- क्या बात है! हे कोणी ठरवले की या सर्व गोष्टी आपोआप होतात? – या आपोआप होणार्‍या गोष्टी नाहीत. या सर्व गोष्टींवर नियंत्रण राखणारी एक ग्रंथी मेंदूच्या मध्यभागी असते. तिला ‘हायपोथॅलॅमस’ म्हणतात. या ग्रंथीमध्ये ‘सुप्राकियास्मॅटिक’ असे भले कठीण नाव दिलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या चेतापेशींचा एक गड्डा असतो. हा चेतापेशींचा गड्डा किंवा समूह संपूर्ण शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचे, शरीराच्या तापमानाचे, भुकेचे, झोपेचे एवढेच नव्हे तर वयोमानाप्रमाणे होणार्‍या शारीरिक बदलांचे(वयात येणे, वार्धक्य इत्यादी) समागमाच्या, प्रजोत्पादनाच्या इच्छांचे नियंत्रण करतो. या कामात त्याला ‘हार्मोन’ नावाची विविध रसायने, मराठीत आपण ज्यांना ‘संप्रेरके’ म्हणतो ती मदत करतात. शरीरातील पेशींना जणू जागवून, त्यांच्याकडून हवे ते विवक्षित काम करून घेणे, हे या संप्रेरकाचे मुख्य काम असते.

            ‘मेलॅटोनिन’ हे असेच एक संप्रेरक-हार्मोन. मेंदूच्या मध्यभागी ‘हायपोथॅलॅमस’च्या शेजारीच वाटाण्याएवढी पण शंकूसारखी एका बाजूला टोकदार होत जाणारी ‘पीनियल’ ग्रंथी असते. हिला ग्रंथी म्हणावे की नाही याबाबत शास्त्रज्ञांमध्ये मतभेद असल्याने तिला फक्त ‘पीनियल बॉडी’ असे म्हणायचा प्रघात आहे.

            अंधार पडला की, आपल्या किंवा कोणत्याही प्राण्याच्या डोळ्यांमुळे, ते अगदी पापण्या मिटलेल्या असल्यातरी दृष्टिकेंद्राच्या मेंदूतील केंद्राकडून जाणून घेतले जाते आणि तो संदेश ‘पीनियल बॉडी’ ला कळतो. त्यामुळे अंधार पडला की नैसर्गिकरित्या ‘पीनिअल’मधून ‘मेलॅटोनिन’ स्त्रवू लागते. त्याचा प्रभाव ‘थॅलॅमस’वर पडतो. थॅलॅमस मेलॅटोनिन या संप्रेरकाची किती मात्रा शरीरात सोडायची ते ठरवतो. याच संप्रेरकामुळे आपल्याला झोप येते. दिवसा उजेडामुळे ‘पीनियल’मधून मेलॅटोनिन स्त्रवणे बंद होते. त्यामुळे आपण जागे राहतो.

            मेलॅटोनिनचे रोजचे दिवस-रात्रीचे शरीरातील प्रमाण जन्मल्यापासून पहिल्या काही वर्षात जणू स्वयंचलित गजराच्या घड्याळाप्रमाणे ‘सेट’ होते, ठरवले जाऊन नियमित होते. लहान मुले पाहा, कधीही झोपतात, कधीही उठतात. पण साधारणत: तीन ते साडेतीन वर्षांनंतर हे ‘जैविक घड्याळ’(बायालॉजिकल क्लॉक) नीटपणे सुरू झालेले दिसून येते. ठराविक भूक-तहान-झोपेचे जे हे वेळापत्रक-चक्र कार्यान्वित होते, ‘सेट’ होते, ते दिवस-रात्रीच्या उजेड-अंधारामुळे आणि त्या त्या प्रमाणात स्त्रवणार्‍या मेलॅटोनिनमुळे.

            ‘पीनियल बॉडी’ हे सर्वच प्राण्यांच्या मेंदूतील ‘जैविक घड्याळ’ म्हटले जाते ते याचमुळे. विशेषत: पक्ष्यांच्या आयुष्यक्रमात त्यांचा विणीचा हंगाम हा या दिवस-रात्रीच्या लहान-मोठे असण्यावर अवलंबून असतो असे दिसून येते. रात्र लहान आणि दिवस मोठा होणे हे वसंताच्या आगमनाच्या वेळी होते. त्यानंतर उन्हाळा येत असतो… याच सुमारास पक्ष्यांच्या विणीचा हंगाम सुरू होतो.

            आपला कोंबडाही याच ‘जैविक घड्याळा’नुसार पहाटे, अंधार दूर व्हायला लागला की ‘मेलॅटोनिन’ स्त्रवणे बंद झाल्या झाल्या जागा होतो. अर्थात तो पहाटेची बांग देण्यासाठी उठत नाही, तर त्याच्या शरीरातील या जैविक घड्याळाचा ‘गजर’ झाल्याने तो पहाटे वेळेवर उठतो आणि बहुधा आळस झटकून जागे होताना ‘बांग’ देतो…. “कुकूऽचकूऽ… चला मी जागा झालो आहे, आता तुम्ही पण जागे व्हा दोस्तांनो….” असे बहुधा सांगण्यासाठी! असो. विनोद अलाहिदा…. पण कोंबड्याची बांग, चिमण्यांचा सकाळचा चिवचिवाट, त्यांचे विशिष्ट हंगामात अंडी देणे, घरट्यातून दूर गेल्यावर संध्याकाळ पडताच परतणे, या सार्‍या गोष्टी ‘जैविक घड्याळानुसार’ चालत असतात. याबाबतचे एक गमतीदार निरीक्षण म्हणजे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी अंधार पडू लागताच पक्षी घरट्याकडे परतू लागतात!