अमेरिकेने दुसर्या महायुद्धात हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला तेव्हा सदको केवळ दोन वर्षांची होती, आणि त्या चिमुरडीला बॉम्बची आठवणही राहणे शक्य नव्हते. हिरोशिमा शहरापासून मैलभर दूर अंतरावर ती रहात असल्याने तिला काही झाले नाही पण त्या अग्नीसंहारात जवळजवळ दोन लाख लोक मरण पावले होते. हिरोशिमाचे पुनर्वसन झाल्यावर सदको शाळेत जाऊलागली. ती आता अकरा वर्षांची झाली होती.
एके दिवशी पळण्याच्या शर्यतीचा सराव करताना ती बेशुद्ध पडली. तिला ताबडतोब रूग्णालयात नेले. डॉक्टरांनी निदान केले की, तिला रक्ताचा कर्करोग-ल्युकेमिया झाला आहे. किरणोत्सर्गामुळे या रोगाने ग्रस्त झालेले कित्येकजण मृत्यूमुखी पडले होते.
सदकोला रूग्णालयात दाखल केले. तिला खूप भीती वाटत होती कारण यापूर्वी अनेक लोक ह्या रोगाने मृत्यूमुखी पडले आहेत याची तिला माहिती होती. सदकोला जगायचे होते. तिला मरायचे नव्हते.
एकदा तिची जिवलग मैत्रिण शिझुको तिला भेटायला आली. तिने येताना काही पांढर्या कागदाचे चौरस बरोबर आणले होते. शिझुकोने एक चौरस कागद घेतला व त्याला घड्या घालून त्यातून एक पक्षी बनवला- एक सुंदर बगळा! तिसे सदकोला सांगितले की जपानी लोक बगळ्याला फार पवित्र मानतात आणि तो हजार वर्षांहून जास्त काळ जगतो. तिने सदकोला सांगितले की एखाद्या आजारी व्यक्तीने कागदाच्या घड्या घालून असे हजार बगळे बनवले तर ती आजारातून नक्की बरी होते. सदको दररोज बगळे बनवण्याचा प्रयत्न करायची. पण या आजाराने ती फार अशक्त झाली होती. काही दिवशी ती वीस वीस बगळे करायची तर काही दिवशी ती केवळ तीन चार करू शकायची. आपण आता यातून बरे होणार नाही हे सदकोला समजले होते पण बगळे बनवण्याचा तिचा निग्रह मात्र कायम होता.
एके दिवशी तर ती एकच बगळा बनवू शकली. पण ती बगळे बनवतच राहिली. अखेर एके दिवशी तिचे बगळे बनवणे बंद झाले. तिने तोपर्यंत 644 बगळे बनवले होते. सदको सासकी 25 ऑक्टोबर 1955 या दिवशी मृत्यू पावली. तिच्या मित्रांनी उरलेले 356 बगळे बनवले. तिच्या निर्भय आणि आशावादी वृत्तीचे तिच्या मित्रांनी कौतुक केले. सदकोच्या मृत्यूचे त्यांना अतिशय दु:ख झाले. तिच्या मित्रांनी पैसे गोळा केले व सदकोच्या स्मरणार्थ ‘शांती व प्रेमाचे’ एक स्मारक उभारले. या स्मारकास ‘बालक शांती स्मारक’ असे संबोधले जाते आणि हिरोशिमा शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या- जिथे अणुबॉम्ब पडला होता-शांतीउद्यानात ते उभारले आहे. हे स्मारक म्हणजे शांतीपर्वतावर उभ्या असलेल्या सदकोचा पुतळा आहे. तिच्या हातांमध्ये एक सोनेरी बगळा आहे. प्रत्येक वर्षी, शांतीदिनाच्या दिवशी, मुले कागदाच्या बगळ्यांच्या माळा करतात व त्या पुतळ्याच्या खाली टांगून ठेवतात. त्या पुतळ्याच्या चौथर्यावर त्यांची सदिच्छा कोरलेली आहे.
हा आमचा टाहो आहे,
ही आमची प्रार्थना आहे
जगामध्ये शांती नांदू दे!