Categories
भानामती

कपडे जाळणारी भानामतीअंनिसने केली बंद

मे - २०११

नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेले अलखेड गाव, शहाद्यापासून 7-8 कि.मी.अंतरावर असलेले हे गाव वृत्तपत्रातील बातम्यांमुळे जिल्हाभर चर्चेत होते. बातमी होती भानामतीची. घरात अचानकपणे आग लागते व कपडे जळतात, अंनिसला आव्हान. गावातील रामराजे कुटुंबात अचानक कपडे जळण्याचा प्रकार सुरू होता. दीड महिन्यांपेक्षाही अधिक काळ घरातील कपड्यांना अचानकपणे आग लागत होती, त्यांनी अंनिसच्या शहादा शाखेत लेखी तक्रार दिली. कार्यकर्त्यांनी हा प्रकार शोधून काढून ही तथाकथित भानामती बंद करण्यात यश मिळविले. रामराजे कुटुंबियांनी अंनिसचे आभार मानले असून परिसरातील भयाचे वातावरण आता नष्ट झाले आहे.

            याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जानेवारी महिन्यात येथील रामराजे कुटुंबात घरातील कपड्यांना अचानक आग लागण्याचा प्रकार सुरू झाला. सुरवातीस काही चुकीमुळे हे घडले असावे असा समज करून कुटुंबीय या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आपल्या दैनंदिन कामास लागले. पण एक दोनदा झालेला हा प्रकार मात्र सातत्याने घडायला लागला. घरातील मुलांचे शाळेतील गणवेश, महिलांच्या जुन्या नव्या साड्या, पुरूषांचे कपडे, गाद्या, गोधड्या, पडदे अशा सर्वांनाच ठराविक वेळाने आगी लागू लागल्या, अचानकपणे घडणारा व पूर्वी कधीही न घडलेल्या या प्रकारामुळे रामराजे कुटुंबीय प्रचंड भयभीत झाले.

            या भयामुळे कुटुंबिय बाहेर झोपू लागले व घरातील सर्व कपडे बाहेरच ठेवण्यात आले, अचानकपणे कपड्यांना लागणारी आग आपल्याला किंवा आपल्या लहान मुलांना तर लागणार नाही ना, अशा विचारांनी भयग्रस्तता अधिकच वाढली. या भयग्रस्त वातावरणामुळे पुरूषांना बाहेर कामाला जाणेही योग्य वाटले नाही, त्यामुळे याचा शेतीच्या कामासोबत, रोजगारावरही मोठा परिणाम झाला. अनेकांनी विविध मांत्रिकगिरीचे उपचार करण्याचा सल्ला दिला, अशा सर्व सल्ल्यांचा विचार करत तसे सर्व उपचारही कुटुंबातील प्रमुख सदस्यांनी केले; पण उपयोग झाला नाही, त्यात भरपूर पैसेही खर्च झाले, शेवटी या कुटुंबातील एक उच्चशिक्षित सदस्याने अंनिसच्या शहादा शाखेत या प्रकाराबाबत लेखी तक्रार दिली.

            लेखी तक्रार दिल्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या कपडे जाळणार्‍या तथाकथित भानामतीचा शोध घेतला व हा प्रकार बंद पाडण्यात अंनिसला यश आले.

            घरात दोन भाऊ  व त्यांचे कुटुंब असे सदस्य होते, कपड्यांना आग लागण्याचे प्रकार हे जेव्हा कुटुंबीय घराच्या बाहेर असत तेव्हाच घडत होते, म्हणजे हा प्रकार घरातीलच कोणी सदस्य करीत असावेत असा अंदाज आला. मग याविषयी चळवळीचे अनुभवी ज्येष्ठ कार्यकर्ते लातूरचे माधव बावगे यांचे मार्गदर्शन घेतले, त्यांच्या सूचनेप्रमाणे घरातीलच सर्व सदस्यांच्या स्वतंत्रपणे मुलाखती घेतल्या, मुलाखती सुरू असतानाच घरात आग लागण्याचा प्रकार घडला, त्यामुळे संशय आणि भय अधिकच वाढले. कुटुंबातील अडचणी कळत नव्हत्या. कुटुंब दोन्ही भावांचे पण त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद किंवा अविश्वास दिसून आला नाही. महिलांचे परस्परांशी नाते प्रेमाचे दिसून आले, पुरूष मंडळी बाहेर कामाला गेलेली असताना हे प्रकार घडले होते म्हणजे पुरूषांचा या प्रकारात सहभाग नव्हता हेही समजले होते, मग संशयाची सुई महिला व लहान मुलींकडे वळली. प्रश्नांच्या यादीतला सर्वात महत्वाचा प्रश्न जो मुलाखती दरम्यान सर्वांनाच विचारला गेला, तो प्रश्न होता, जळल्याचे सर्वात प्रथम कोणी पाहिले, याचे प्रत्येकाचे उत्तर वैशालीने पाहिले असे होते, (नाव बदललेले) संशयाचे रिंगण अधिक छोटे झाले. आता या रिंगणात केवळ वैशाली होती, मग वैशालीची कोणालाही न कळू देता अधिक वेळ मुलाखत घेतली आणि या प्रकरणाचे गूढ उलगडले.

            कुटुंबातील वैशाली ही पाचवीत जाणारी हुशार व चाणाक्ष मुलगी होती. शाळेतील वातावरण तिला असुरक्षित वाटत होते. गावाहून तालुक्याच्या गावी प्रवास करावा लागत होता. शाळेत शिक्षकांनी केलेली शिक्षा धाक निर्माण करीत होती. मैत्रिणी नव्हत्या. ज्या होत्या त्या अनेक कारणांनी अबोला धरत होत्या. शाळेसाठी आवश्यक शैक्षणिक गरजांकडे कुटुंबातील सदस्य लक्ष देत नव्हते. अशी काही कारणे यामागे दिसून आली. आम्ही मुलाखती दरम्यान तिला विश्वासात घेतले व या सर्व प्रश्नासाठी तिला सहकार्य करू असे आश्वासन दिले, जळगावचे मानसोपचार तज्ञ चळवळीचे मार्गदर्शक डॉ.प्रदीप जोशी यांच्याकडून मुलाखतीदरम्यान काय भूमिका घ्यावी याबाबत माहिती घेतली, त्याप्रमाणे अंमलबजावणी केली. वैशालीच्या मनात आम्ही विश्वास निर्माण केला. घडत असलेला प्रकार कुटुंबियांना किती त्रासदायक ठरत आहे याचीही जाणीव करून दिली, आपले प्रश्न सोडविण्याचा हा मार्ग नाही हेही समजावून सांगितले. आम्ही तुझे नाव कोणालाही सांगणार नाही पण तू हा प्रकार बंद कर असेही सांगितले व हा प्रकार बंद करण्यात यश मिळविले.

            वैशालीचे व्यक्तिमत्व हे इतके कणखर होते की, तिने स्पष्ट शब्दात अखेरपर्यंत आपण हे करत असल्याचे सांगितले नाही. मुलाखतीनंतर आता मला बरे वाटते आहे, आता कधी जळणार नाही असे वाटते, असे सूचक वाक्यच ती सांगत राहिली. तिच्यावर दबाव आणून तिला मान्य करायला लावण्यापेक्षा होणारा प्रकार तिच्यावर दोषारोप न करता थांबविणे अधिक महत्वाचे वाटले. आज घरातील कपडे जळण्याचा प्रकार पूर्णपणे थांबलाय. या कुटुंबातील सर्व सदस्यांनी चांगले सहकार्य केले व हा प्रकार थांबल्याबद्दल अंनिसचे आभार मानले.

            अशा प्रकारची तथाकथित भानामतीचे प्रकार हे कोणत्याही प्रकारच्या दैवी, मांत्रिकगिरीचा प्रकार असत नाहीत. त्यामागे मानवी सहभागच असतो, कुटुंबातील प्रश्न नीटपणे समजून घेतल्यास, त्यावर योग्य उत्तर शोधल्यास असले प्रकार बंद करता येतात, हे पुन्हा सिद्ध झाले. या प्रकरणाच्या शोधपथकात अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य विनायक सावळे, शहादा शाखा कार्यकर्ते सुभाष भुजबळ, आर.आर.जगताप, चुनिलाल ब्राम्हणे, जनार्थ आदिवासी विकास संस्थेचे रंजनाताई कान्हेरे, विक्रम कान्हेरे यांचा सहभाग होता. आय.बी.एन.लोकमत या वृत्तवाहिनीचे जिल्हाप्रतिनिधी रणजीत राजपूत, दै.सकाळचे शहादा प्रतिनिधी प्रा.डी.सी.पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.

-विनायक सावळे