Categories
प्रासंगिक

चिकित्सेचे धर्मकारण का प्रसिद्धीचे राजकारण?

मे - २०११

धर्माभिमानाला जास्तीत जास्त तीव्रता व धर्मविचाराला ओहोटी असे महाराष्ट्रातले आजचे स्वरूप आहे. धर्माचा अभिमान-अस्मिता-अभिनिवेश-अहंकार अधिकाधिक बलवान करण्याचा प्रयत्न सर्वच धर्मांत चालू आहे. देवळात जाणे, यात्रा करणे, धर्माची प्रवचने-कीर्तने, देवतांचे व धर्माचे उत्सव यांचे उदंड पीक समाजात आले आहे. त्याकडे धर्मातील सर्वसामान्य समाजच नव्हे तर सुशिक्षित तरुण पिढीही आकर्षित झालेली दिसते. संतांनी धर्मभावना नैतिकतेकडे वळवली. ती आता धर्मांधतेकडे वळवली जात आहे, शिवाय हा सर्व अब्जावधी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. धर्मभावनेचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण करणे चालू आहे. लोकांच्या प्रश्नावर काम करून मते मागण्याऐवजी लोकांची धर्मभावना उद्दीपित करून व ठेवून सत्येकडे जाण्याचा राजकीय शॉर्टकट शोधला जात आहे.

            धर्मनिरपेक्ष समाजनिर्मितीसाठी धर्मचिकित्सा अपरिहार्य बनते. यात भावनेतून शनिशिंगणापूर येथील शनी देवाच्या चौथर्‍यावर महिलांना असलेला बंदी प्रवेश उठवावा यासाठी इ.स.2000 साली महाराष्ट्रात सत्याग्रह झाला. या कल्पनेला भाजप व शिवसेना या पक्षांच्या सर्व आघाड्यांनी टोकाचा विरोध केला. वातावरण इतके प्रक्षुब्ध होते की नगरहून 50 कि.मी.वर असलेल्या शनिशिंगणापूरकडे निघालेल्या हजार सत्याग्रहींना नगरपासून अवघ्या 50 पावलांवर अटक झाली. त्यामध्ये प्रा. एन.डी. पाटील, डॉ. श्रीराम लागू, डॉ. बाबा आढाव, प्रा. पुष्पाताई भावे अशा दिग्गजांचा समावेश होता. यामुळेच नंतर शनिशिंगणापूर व अंबाबाईच्या गाभार्‍यातील महिलांचा प्रवेश यावर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली ती आता सुनावणीच्या अंतिम टप्प्यावर आहे.

            एवढ्यात ‘अगा नवल वर्तले’ याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांनी विधानसभेत अंबाबाईच्या देवळात महिलांना प्रवेश मिळण्याची मागणी केली आणि नंतर दोनच दिवसांत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष सहकार्‍यांना घेऊन मंदिराच्या गाभार्‍यात घुसल्यादेखील. यामागे प्रसिद्धीचा भाग आहेच पण स्त्री-पुरुष समतेच्या आग्रहाची तात्त्विक झालरही त्याला आहे. परंतु ही घटना अधिक गांभीर्याने पाहावयास हवी ती व्यापक व साक्षेपी धर्मचिकित्सेच्या अंगाने.

            असा एक प्रश्न सहजच विचारता येण्यासारखा आहे की महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिदे, न्या. रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा या सर्वांनी कठोर धर्मचिकित्सा करूनही धर्मभावनेलाच नकार का दिला नाही? आढळते ते असे की या सर्वांनी धर्माचा विचार आस्थेने व शोध घेण्याच्या बुद्धीने केला. त्यामधून त्यांनी समाजविन्मुख धर्म समाजसन्मुख केला. परलोकवादी धर्म ईहलोकवादी केला. ईश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री केला. धर्माचे भ्रष्टीकरण व साधनीकरण होण्याचे भय वाढले आहे. अशा वेळी तर या स्वरूपाची विधायक धर्मचिकित्सा हा महत्त्वाचा प्रश्न मानावयास हवा.

            महाराष्ट्रातील आजच्या प्रबोधनातून हा प्रश्न जवळजवळ रद्दबातल झाला आहे. धर्मनिरपेक्षतेच्या अंगाने तो उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तरी धर्माचे अघोषित प्रवक्ते त्याला तीव्र व हिंसक विरोध करतात. ‘समाजाचे धारण करतो तो धर्म’ ही आदर्श धर्माची व्याख्या झाली. जगात असा आदर्श धर्म कुठेही नाही. पण प्रत्येक धर्म स्वत:ला आदर्श मानतो. समाजाचे कल्याण कशामुळे होते? ते प्रत्यक्षात होते की नाही हे प्रत्येक धर्म स्वत: ठरवत असतो. आमचा धर्म धारणा करणाराच आहे असा प्रत्येक धर्माचा ठाम सिद्धांत असल्याने धर्माने धारणा होते की नाही ही शंका उपस्थित करणे धर्मद्रोहाचे लक्षण असते. धर्मासंबंधातील वादाचा खरा मुद्दा आदर्श धर्म कसा असावा हे सांगणे नाही तर धर्म आदर्श नसल्यास तसे ठरवावे कोणी आणि ते बदलावे कोणी हा आहे. कोणताच धर्म असे अधार्मिक व धर्मद्रोही प्रश्न उपस्थित करू देणार नाही. भारताची राज्यघटना आज समाजाची धारणा करते, म्हणून राज्य घटनेला धर्मग्रंथ मानण्यास व त्यातील आदेशाला धर्म मानण्यास कोणताही धार्मिक तयार होत नाही. धर्मचिकित्सा सुरू केली की धर्माचा पगडा असलेल्या फार मोठ्या जनसमूहाला ही धर्मचिकित्सा म्हणजे धर्मद्रोह वाटतो.

            व्यवहारात जी धार्मिकता असते त्यात प्रथा, रूढी, कर्मकांडे, उपासना, पुरोहितशाही व अहिंसा, सत्य, अपरिग्रह ही मूल्ये व याच बरोबर समाजव्यवस्थेचे नियमन असे सर्वकाही असते; या सर्वांच्या मिलाफातूनच धर्म साकार होतो. असे ‘धर्मपण’ व्यक्तिमानसात, समाजमानसात एकवट मुरलेले असते. धर्मनिरपेक्ष पद्धतीने समाज घडवताना धर्माच्याच नावाने बळकट झालेल्या रूढी परंपरा सर्वच धर्मांत प्रगतीचे अडथळे ठरतात. चुकीच्या मार्गाने समाजाला नेतात. कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या मस्तकावर नागलिंगयोगी हे तांत्रिक स्वरूपाचे चिन्ह आहे. या प्रकारच्या मूर्तीची पूजा महिलांना नाकारली जाते. हे आक्षेपार्ह मानून तेथे सत्याग्रह झाला हे चांगलेच झाले, पण मग मुलगी ही दानपात्र वस्तू समजून मोठ्या हौसेने कन्यादान केले जाते, स्वत:च्या पोटात मूल वाढवणार्‍या आईला वैधव्यामुळे तो (चुकीचा) हक्कही नाकारला जातो. हळदी-कुंकवात विधवेला अघोषित मज्जाव असतो आणि शुभकार्यात तिचे पांढरे पाऊल न पडेल याची दक्षता घेतली जाते. मासिक पाळीच्या शरीरधर्मात स्त्री सर्व धर्म व मंगल कार्यात अपवित्र असते. या सर्वच बाबींना सक्रिय विरोध करणे आवश्यक आहे.

            धर्माची चिकित्सा सुरू झाली की पुरोहितशाही तपासावी लागतेच. परमेश्वराला जे जे काही द्यावयाचे ते पुरोहितामार्फत देण्यात येते. व्यवहारात पुरोहितच त्याचा उपभोग घेतो, अशी ही दलाल व्यवस्था आहे. देवाची जी गुणवैशिष्ट्ये आणि थोरवी वर्णिली जाते त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी कोणत्याही स्वरूपातील मध्यस्थाची कल्पनाही अनावश्यक व विसंगत ठरते. पुरोहित स्वत:चे घट्ट हितसंबंध तयार करतात. महिलांना महालक्ष्मीच्या गाभार्‍यात प्रवेश नाकारणारे तेथील पुजारी स्वत:च्या घरातील स्त्रियांना मात्र पूजेची मुभा देतात. त्या वेळी पुरोहितशाहीच्या ढोंगाचे दर्शन होते. विधायक धर्मचिकित्सेबरोबर पुरोहितशाहीला तडाखा देखील देणे आवश्यक आहे. समाजमानसाच्या दबावाखाली पुजारीवर्गाने माघार घेतली आहे हे खरे, पण हे पुरोहितांचे मतपरिवर्तन नव्हे. नाईलाजाने केलेले आचरण आहे. तसे नसते तर त्यांनी मुंबई उच्चन्यायालयातील याबाबतच्या जनहितयाचिकेत महिलांना गाभारा प्रवेशबंदीचे समर्थन करणारे जे प्रतिज्ञापत्र दाखल केले ते मागे घेतले असते.

            या पलीकडे देखील धर्मचिकित्सेचा एक गंभीर पैलू राहतो. सर्व धर्मांत ज्याला खरा धर्म म्हणतात त्यात, सर्व बाबींचे पवित्र-अपवित्र व लौकिक अशा तीन गटांत वर्गीकरण केलेले असते. उदा. धर्मग्रंथ, मंदिर, पुरोहित हे पवित्र. प्रेत, रजस्वला स्त्री अपवित्र. भाजीपाला, कागद या लौकिक वस्तू. सामान्य लौकिक अथवा अपवित्र वस्तूंचा व्यवहार हा पवित्र गोष्टीकडून नियत केला जातो अशी धर्मकल्पनेची ठाम धारणा असते. ज्याला खरा धर्म मानले जाते त्यामध्ये अपरिहार्यपणे अस्तित्वात असलेल्या पावित्र्याच्या या संकल्पनेमुळे वस्तूंच्या बाबतीत धर्मातील अंधश्रद्धेवर आधारलेली एक विषमता तयार होते. याच दांभिक पावित्र्य कल्पनेतून एक व्यक्ती जन्मजात इतकी पवित्र बनते की तिच्या पायाचे पाणी घेतले तर ते तीर्थ असते. दुसरी व्यक्ती इतकी अपवित्र ठरते की तिच्या सावलीचा विटाळ होतो. या विषमतेवर आघात करावयाचा तर धर्माच्या नीतीची निर्मिती ज्या पावित्र्याच्या कल्पनेतून झालेली असते तीच नाकारावी लागेल. ती नाकारली तर, नीती म्हणजेच खरा धर्म, म्हणजेच सुरळीत समाजजीवन कोसळून पडेल असा धाक दाखवला जातो. तेव्हा याबाबत अशी स्पष्ट भूमिका घ्यावयास हवी की पावित्र्याची संकल्पना व नीतिमूल्ये यांच्यामध्ये अंतर असते. समाज धारणेसाठी पावित्र्याच्या संकल्पनेची आवश्यकता नाही. नीतिमूल्ये मात्र समाजधारणेला आवश्यक असतात. अर्थात त्याचे स्वरूप देश-काल सापेक्ष, परिवर्तनशील व न्याय आणि विवेकावर आधारलेले असे असते, असावयास हवे. समाजातील नीतिमूल्ये जर नीतीच्या नावाने कोणाचे अन्यायी हितसंबंध जपत असतील, कोणाला श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरवीत असतील; तर ती नीतिमूल्ये ही त्याज्यच मानावी लागतील. थोडक्यात, कोणताही ‘खरा धर्म’ त्याला ‘खरा’ आणि ‘धर्म’ ही विशेषणे प्राप्त करून घ्यावयाची असतील तर पावित्र्याच्या संकल्पनेच्या आधारे विषमतेचे समर्थन करणारी मूल्ये स्वीकारावयास सांगू शकत नाही.

            ही सर्व धर्मचिकित्सा भारतीय जनता पक्षालाच काय पण मनसेला आणि दोन्ही काँग्रेसनाही न पचणारी, न परवडणारी आहे. महाराष्ट्रातील अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांच्या विरोधातील कायदा तब्बल 16 वर्षे एकमेकांकडे बोट दाखवत या पक्षांनी बासनात बांधून ठेवला आहे. अशा वेळी महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या धडक मोर्चाने एक पाऊल पुढे पडले असले तरी त्याकडे चिकित्सेचे धर्मकारण या ऐवजी प्रसिद्धीचे राजकारण असेच बघावे लागते.

– डॉ.नरेंद्र दाभोलकर