‘दै.लोकमत’विरूद्ध अब्रूनुकसानीचा आरोप करून दहा कोटी रूपयांची नुकसान भरपाई मागणार्या सनातन संस्थेचा खटला फोंडा येथील वरिष्ठ श्रेणी न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
‘वैफल्यामुळे आश्रमातून साधक गायब, सनातनचा करिश्मा’ या मथळ्याखाली 7/11/2009 रोजी दै.लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे आपली बदनामी होत असल्याचे सांगून सनातनने ‘दै.लोकमत’चे संपादक राजू नायक, तसेच दैनिकाच्या प्रकाशकांविरूद्ध अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. या बातमीतला मजकूर कोणत्याही प्रकारे तक्रारदाराची बदनामी करणारा नाही, असा स्पष्ट निवाडा न्यायमूर्ती सायोनारा टेलीस लाड यांनी दिला आहे. दै.‘लोकमत’ मधून प्रसिद्ध झालेले वृत्त बिनबुडाचे असते तर तक्रारदारांना त्यांचे म्हणणे त्या अथवा अन्य कुठल्याही दैनिकातून प्रसिद्ध करता आले असते. मात्र, या वृत्ताचे खंडन करणारे कोणतेही विधान तक्रारदाराने जाहीरपणे केलेले नाही. अशा परिस्थितीत वृत्तातील संदर्भ बदनामीकारक असू शकत नाही, असे निवाड्यात म्हटले आहे.
संबंधित वृत्त दै.‘लोकमत’ने सदूहेतूनेच प्रसिद्ध केले आहे. पूर्वग्रहविरहित बातम्या जनतेसाठी प्रसिद्ध करणे, हे वृत्तपत्रांचे कर्तव्यच आहे. असा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे. दै.‘लोकमत’विरोधात खटला दाखल करणार्या ‘सनातन संस्था’ या ट्रस्टच्या ट्रस्टींमध्ये झालेल्या बदलाची दखल घेत न्यायालयाने नव्या ट्रस्टींना खटला दाखल करण्याचा कोणताही अधिकार नाही; असेही म्हटले आहे. या करारात झालेले बदलही अग्राह्य आहेत, असे न्यायालयाने नोंदविले आहे. खटला दाखल करण्याजोगे कोणतेही कारण तक्रारदाराकडे नाही. संबंधित खटलाच अर्थहीन असून त्यान्वये न्यायालयाचा वेळच वाया जाईल, असे मत नोंदवत न्या.सायोनारा टेलीस लाड यांनी खटला रद्दबातल केला आहे. ‘लोकमत’ची बाजू अॅड.व्ही.ए.लवंदे यांनी मांडली.
(दै. लोकमतवरुन साभार)