Categories
फसवे विज्ञान

मधल्या मेंदूचे फसवे विज्ञान

जून – २०१४

शाळांच्या सुट्ट्यांच्या कालावधीत व्यक्तिमत्व विकास, विविध कौशल्यांची प्राप्ती, दोन दिवसांन स्मरणशक्ती वाढवा, अद्भूत कौशल्ये प्राप्त करा आदि शीर्षकाखाली विद्यार्थ्यांसाठी काही व्यावसायिक संस्था, व्यक्ती चलाखीने कार्यक्रमांचे आयोजन करतात. प्रचंड फी आकारून एक ते आठ दिवसांत वरील प्रकारची कौशल्ये प्राप्त करून देण्याची, काही अपवाद वगळता काही संस्था व व्यक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांना हमी देतात. याबाबत पालक वर्ग कोणतीही शहानिशा न करता, सर्व झटपट मिळविण्याच्या ह्या जमान्यात अशा फसवेगिरीला बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. सदर फसवे, अवैज्ञानिक, प्रशिक्षणाचा उत्साह पुढील दोन दिवसांत ओसरल्यानंतर विद्यार्थी व पालक यांना आपली घोर आर्थिक व मानसिक फसवणूक झाल्याचे लक्षात येते मात्र तोपर्यंत तथाकथित प्रशिक्षण देणार्‍या संस्था, व्यक्ती व त्यांचे प्रतिनिधी यांनी तोपर्यंत लाखो रूपयांची माया गोळा करून पोबारा केलेला असतो.

ओझर येथील आनंद मेळ्यात अशाच फसव्या विज्ञानाच्या आधारे, पालक व त्यांचे पाल्य यांना मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन(Midbrain Activation) ह्या नावाखाली प्रशिक्षण होणार असून त्यासाठी मोठ्या संख्येने 5 ते 15 वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मिळावेत, यासाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन, तथाकथित संस्थेच्या प्रतिनिधींमार्फत होणार असल्याची खबर अंनिसच्या ओझर शाखेच्या कार्यकर्त्यांना मिळाली अमित जोजारे, पवन कदम व इतर ओझरच्या कार्यकर्त्यांनी नाशिकच्या जिल्हा शाखेतील महेंद्र दातरंगे, कृष्णा चांदगुडे, डॉ. ठकसेन गोराणे व प्रा. डॉ. लक्ष्मीकांत कावळे यांना संपर्क केला सदर फसव्या, अवैज्ञानिक दाव्यांद्वारे पालक, विद्यार्थी यांची कशाप्रकारे आर्थिक व मानसिक फसवणूक केली जाते. अशा फसव्या विज्ञानाच्या आधारे केल्या जाणार्‍या दाव्यांचे प्रत्यक्ष कार्यक्रमात अंनिस सत्यशोधक व प्रबोधन करू इच्छिते अशा आशयाचे पत्र अंनिसतर्फे ओझर पोलिसांत दोन दिवस अगोदर देण्यात आले.

सोमवार दि.5/5/2014 रोजी सायंकाळी 8 च्या सुमारास Midbrain Activation तथा Five sense Activation च्या प्रतिनिधींमार्फत वय वर्षे 10 ते 12 वर्षांच्या दोन मुलींच्या(ज्या सदर प्रशिक्षणात फी भरून दोन दिवस शिकलेल्या होत्या) डोळ्यांवर काळ्या कपडाच्या पट्ट्या बांधून त्यांना स्टेजवर उभे केले. समोर किमान सातशे ते आठशे जनसमुदाय होता त्यानंतर ह्या मुलींना डोळ्यावर पट्टी बांधलेली असताना विविध रंगांचे चेंडू, त्यांच्या डोळ्यांच्या पातळीच्या खाली धरून, त्यांचे रंग, ओळखावयास सांगितले. अगोदर ते चेंडू त्या मुलींच्या नाकाजवळ धरून वास घेण्यास सांगण्यात आले. त्यानंतर डोळ्याच्या पातळीखाली धरून त्या त्या विविध रंगांच्या चेंडूंचे रंग ओळखण्यास सदर प्रतिनिधीने सांगितले. मुलींनी रंग ओळखले केवळ वास घेतल्यावर ह्या मुली वस्तूंचा रंग ओळखतात असा दावा सदर प्रतिनिधीने केला. गवताचा वास आला म्हणून चेंडूचा रंग हिरवा असल्याचे मुली म्हणाल्या. त्यानंतर ह्याच मुलींना मोबाईलमधील मॅसेज, नोटेचा क्रमांक, पुस्तकातील परिच्छेद यांच्या बांधलेल्या डोळ्यांच्या पातळीच्या खाली, ठराविक अंतरावर धरल्यावर वाचता आला. डोळे बांधलेले असताना केवळ कपाळावर असलेले तिसरे नेत्र जागरूक झाले. त्यामुळे वाचता आले असा दावा करण्यात आला. मात्र ह्याच वेळी अंनिसच्या वतीने अमित जोजारे, पवन कदम व इतर सर्वांनी ह्यामागील दाव्यांचे सत्यशोधन करू इच्छित असल्याची संयोजकांना विनंती केली त्यांनी परवानगी दिली.

वासावरून रंग ओळखणे, डोळ्यावर पट्टी असताना वाचन करणे, हे सर्व प्रशिक्षणात शिकलेल्या त्या दोन मुलींचे अमित जोजारे यांनी कौतुक केले. मला हे सर्व शिकण्यासाठी प्रचंड फी भरून प्रशिक्षण घेण्याची अजिबात गरज नाही, आम्ही अगदी दोन ते पाच मिनिटांत कोणालाही शिकवू शकतो, असे अमित जोजारे यांनी सांगून, प्रेक्षकांतून कुणीही मुलगा, मुलगी व तिचे पालक यांनी स्टेजवर यावे असे नम्र आवाहन केले. त्याप्रमाणे एक 10 ते 12 वर्षाची मुलगी व तिचे पालक स्टेजवर आले. प्रथम मुलीच्या डोळ्यावर तीच काळी पट्टी बांधण्यात आली नंतर विविध रंगांच्या वस्तू, तिला वास न देताही तिच्या डोळ्यांच्या पातळीखाली धरल्या तेव्हा त्या प्रशिक्षण न घेतलेल्या(तथाकथित संस्थेत) मुलीने अगदी बरोबर रंग ओळखले. एवढेच नव्हे तर वाचनही केले. स्टेजवर फिरताना बरोबर अमित जोजारे यांचा पाठलागही केला. तेव्हा प्रेक्षकांमधून प्रचंड टाळ्यांचा गजर झाला. ह्या अप्रशिक्षित पालकांच्या डोळ्यावर पट्टी बांधली असता. त्यांनीही वरीलप्रमाणे सगळ्या तंतोतंत कृती केल्या. पुन्हा प्रशिक्षित मुलींनी वस्तूचा रंग किंवा वाचन करावे मात्र त्यावेळी हे सर्व बांधलेल्या डोळ्यांच्या पातळीच्या वर धरले. नेत्र जर कार्यरत झाला आहे तर प्रचलित डोळ्यांशिवाय दिसते. वाचता येते असा संबंधित प्रतिनिधीचा दावा होता मात्र जेव्हा वस्तू डोळे बांधलेल्या, प्रशिक्षण झालेल्या मुलींच्या कपाळाच्या रेषेत धरल्या तेव्हा ह्या मुलींना रंग ओळखता आला नाही आणि वाचनही करता आले नाही.

यावेळी अंनिसच्या वतीने जमलेल्या प्रचंड जनसमुदायासमोर घडलेल्या घटनांचे सत्य काय आणि असत्य काय याचे बिंग फुटल्याचे जाहीर झाले. यावर आपण अशा फसव्या विज्ञानाचा आधार घेऊन प्रचंड फी उकळून अशा प्रकारचे खोटे प्रशिक्षण घ्यायचे की नाही, हे लोकांनी ठरवावे. अशा खोट्या, अवैज्ञानिक दाव्यांचे खंडन अंनिसच्या वतीने करण्यात आले अशा अवैज्ञानिक बाबींना फसू नये म्हणून अंनिवाच्या वतीने जाहीर आवाहनही करण्यात येत आहे. ते असे-

1) नुकत्याच झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनला एक दक्षता अधिकारी नेमल्याचे सांगण्यात आले आहे जर अशा प्रकारे फसवे, खोटे, अवैज्ञानिक दावे करून कोणत्याही प्रकारची फसवणूक कुणीही व्यक्ती, संस्था करीत असेल तर अशा दक्षता अधिकार्‍याने तत्काळ सदर कायद्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करावा.

2) आपल्या पाल्यांची सर्व प्रकारची क्षमता लक्षात न घेता आपल्या संपूर्ण इच्छा आपल्या पाल्यांकडून पूर्ण करून घेण्याच्या जीवघेण्या मानसिकतेचा पालकांनी अव्हेर करावा. कोणत्याही झटपट, भपकेबाज अमिषाला बळी पडू नये. शहानिशा, तपासणी, चौकशी करावी.

3) खरे तर हे शिक्षणप्रक्रियेचे अपयश आहे. शिक्षणातून जो वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हायला हवा होता तो झालेला नाही. असे अशा घटनांवरून दिसून येते. दुर्दैव हे की, शिक्षणप्रक्रियेतील अनेक घटकही याचे बळी ठरताना दिसतात. याचा सर्वांनी सखोल विचार करावा.

4) फसव्या विज्ञानाच्या आधारे जे जे प्रयोग करता येतात ते सर्व शाळांशाळांमधून शिक्षकांनी करून दाखवावे. त्यामागील वैज्ञानिक कारणे, चलाखी, बनवाबनवी विद्यार्थ्यांना सतत पटवून द्यावी. म्हणजे ते फसणार नाहीत. वरील मोहिमेत अंनिसच्या ओझर शाखेच्या वतीने अमित जोजारे, पवन कदम, वैभव जाधव, राहुल साळवे, संदीप पगारे, मयूर वालदे, निखील कोतवाल, विकास शिंदे, सोमनाथ निकम, नितीन पाटील तर नाशिकहून महेंद्र दातरंगे, डॉ.ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे, प्रा.डॉ.लक्ष्मीकांत कावळे हे सर्व सहभागी होते.

-डॉ. ठकसेन गोराणे

लेखक संपर्क : 9420827924