15 एप्रिल 2014. देशातील तृतीयपंथीयांना पुरूष आणि स्त्री शिवाय ‘तृतीयलिंगी’ अशी स्वतंत्र ओळख देणारा जगाच्या मानवी हक्कांच्या इतिहासातला महत्वाचा निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं दिला. आतापर्यंत तृतीयपंथीयांच्या जगण्याला किडामुंगीपेक्षा अधिक किंमत नव्हती. ना ती कधी समाजानं दिली ना कायद्यानं. इतिहास आणि साहित्यात सन्मानानं वावरलेल्या तृतीयपंथियांना ब्रिटीश काळात 1871 मध्ये चक्क गुन्हेगारी जमातींमध्ये ढकलण्यात आलं. सार्वजनिक ठिकाणी बायकांच्या कपड्यांत वावरणं आणि नाचगाणी करणं हा अजामीनपात्र गुन्हा ठरला. तेव्हापासून तृतीयपंथी लोक समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटत गेले. त्यांच्याभोवती गुप्तता आणि रहस्याचं एक वलय तयार झालं. मग सुरू झाली ती अपमान, अवहेलना आणि शोषणाची प्रदीर्घ कहाणी. या निकालामुळे त्यांच्या अस्तित्वाला कायद्यानं मान्यता मिळाली आहे. यापूर्वी फक्त नेपाळ(2007), पाकिस्तान(2009), ऑस्ट्रेलिया(2011), न्यूझीलंड(2012), बांग्लादेश आणि जर्मनी(2013) या सहा देशांनीच ‘तृतीयलिंगी’ अशी स्वतंत्र ओळख अधिकृतपणे मान्य केली होती. आता अशी स्वतंत्र ओळख मान्य करणारा भारत हा जगातला सातवा देश ठरला आहे. आता त्यांना घटनात्मकदृष्ट्या सर्व ठिकाणी वैध पद्धतीनं आपली लिंगओळख देता येईल आणि त्यांना विविध अधिकारही प्राप्त होतील. या निकालाचा गाभा आहे कोणत्याही व्यक्तीला स्वत:चं लिंग ठरवण्याचा देण्यात आलेला हक्क! जन्मत: मिळालेल्या लैंगिक ओळखीपेक्षा ही ओळख वेगळी असू शकते, याला न्यायालयाच्या निकालानं कायदेशीर मान्यता दिली. तृतीयपंथी या छत्राखाली खूप व्यापक समुदायाला न्यायालयानं मान्यता दिली आहे. यात हिजडे, खच्चीकरण केलेले, उभयलिंगी, ज्यांना लिंगबदलाची शस्त्रक्रिया करायची आहे ते, शस्त्रक्रिया केलेले आणि (तीन वर्षं चालणार्या शस्त्रक्रियेच्या) त्या प्रक्रियेमध्ये असलेले, एवढेच नाही तर भिन्नलिंगी व्यक्तींप्रमाणे कपडे आणि वागणूक असणारे(transvestile) यांचा समावेश केलाय.
आपल्याकडे लैंगिकता आणि एकंदर लैंगिक वर्तन याबद्दल बोलणंही निषिद्ध समजलं जातं, त्याबाबतीत खूप गैरसमज आढळतात. तृतीयपंथी हा तर वेगळाच विषय. त्यामुळे त्याबद्दल गैरसमज तरी असतात नाही तर पूर्ण अज्ञान तरी दिसतं. हे सगळं वास्तव आपण इथं समजून घेऊ या. तृतीयपंथी म्हणजे कोण? एक म्हणजे निसर्गत: ज्यांच्या जननेंद्रियामध्ये दोष असतो आणि सम किंवा भिन्न लिंगी व्यक्तीबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याची मानसिकता असते असे लोक आणि दुसरे म्हणजे जननेंद्रियांमध्ये कसलाही दोष नाही पण लिंगभाव मात्र भिन्न लिंगाचा असतो असे लोक. याचे प्रकार अनेक आहेत. त्यापैकी सगळ्यांना जास्त परिचित शब्द आहे तो ‘हिजडा’.
‘हिजडा’ म्हणजे काय? ‘हिजडा’ हा मूळ उर्दू शब्द आहे. ‘हिज्र’ या (जमातीपासून) वियोग किंवा जुदाई या अर्थाच्या अरबी शब्दावरून तो आला आहे. हिजडा म्हणजे आपला लिंगभाव सोडलेला. हिजडा जन्म घेतो आणि वाढतो तो पुरूष म्हणूनच. पण वाढत्या वयाबरोबर त्याचे हावभाव, हालचाली स्त्रीसारख्या व्हायला लागतात. त्यांना स्वत:लाही ते जाणवायला लागतं. मनानं स्त्री पण शरीरानं मात्र पुरूष, असा प्रकार असतो. त्यामुळे त्यांची लैंगिक ओळख, वेशभूषा आणि लैंगिक भूमिका स्त्रीप्रमाणे असते. ही मानसिक विकृती आहे असा अनेकांचा समज असतो. अर्थातच तो पूर्णत: चुकीचा आहे. प्रत्यक्षात त्यामागे जनुकीय पातळीवर होणारी गडबड आहे.
गर्भधारणा होते तेव्हा जर XX गुणसूत्रं एकत्र आली तर मुलगी होते आणि XY गुणसूत्रं एकत्र आली तर मुलगा होतो. मात्र गर्भावस्थेतील पहिले सहा आठवडे लिंगाचं स्वरूप मुलगा आणि मुलगी दोघांतही सारखंच असतं. पुरूष आणि स्त्री असा लिंगभेद हा प्रामुख्यानं Y गुणसुत्रावरील SRY या जनुकाच्या कार्यान्वित होण्यावर अवलंबून असतो. ते कार्यान्वित झालं तर संबंधित पेशींमध्ये विशिष्ट बदल होऊन गर्भावस्थेतील आठव्या आठवड्यापासून पुरूषी हार्मोन्स (अँड्रोजन) तयार होतात. त्यातलं टेस्टोस्टेरॉन हे महत्वाचं. SRY जनुक कार्यान्वित झालं नाही तर गर्भावस्थेतील दुसर्या महिन्यापासून अंडकोश विकसित होऊ लागतात आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही स्त्री हार्मोन्स तयार होतात. पुरूष आणि स्त्री यांच्यामधील या भिन्न हार्मोन्सच्या प्रभावामुळे बाह्य जननेंद्रियं आणि दुय्यम लैंगिक लक्षणं विकसित होतात. हे झालं लिंग(सेक्स) भेदाबद्दल. लिंगभावाचं काय? मानवी मेंदूमध्ये अँड्रोजेन आणि इस्ट्रोजेन यांना प्रतिसाद देणार्या ग्राहक चेतापेशी(receptors) आढळतात. त्यांना संबंधित हार्मोन्सच्या पातळीची जाणीव होत असते. शिवाय या हार्मोन्सवर अवलंबून नसणारी बरीच जनुकं ही स्त्री आणि पुरूषाच्या मेंदूवर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रभाव टाकतात. साधारणपणे वयाच्या दुसर्या वर्षापासून मेंदूंमधल्या ‘कॉर्पस कॅलोझम’ आणि ‘स्ट्राया टर्मिनॅलिस’ यांच्या आकारमान आणि आकार यांच्यातही फरक आढळले आहेत.
एखादा माणूस हिजडा असतो म्हणजे काय असतं? X गुणूसत्रावर NR3C4 हे जनुक असतं. पुरूषामधली लैंगिक लक्षणं आणि लिंगभाव निर्माण होण्यामध्ये ते महत्वाची भूमिका बजावतं. टेस्टोस्टेरॉन किंवा डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन या पुरूषी हार्मोन्सच्या संपर्कात आलं की, ते कार्यान्वित होतं. या जनुकाची जास्त वेळा पुनरावृत्ती झाली तर अँड्रोजेन्सशी बांधलं जाण्याची त्याची परिणामकारकता कमी होते. त्यामुळे टेस्टोस्टेरॉनचा प्रभाव कमी होतो. याचा परिणाम अर्थातच मेंदूमधल्या वर सांगितलेल्या भागांवर होतो. पुरूष असूनही स्त्रीचा लिंगभाव असणार्या व्यक्तींच्या मेंदूतील अशा भागांचा आकृतीबंध स्त्रियांप्रमाणे असतो असं आढळून आलं आहे. साहजिकच जननेंदियं पुरूषाची असली तरी विचार आणि भावना यांच्यात स्त्रीत्व दिसतं. अशा व्यक्तींना स्त्रीसारखं राहायला, वागायला आवडतं. वयात आलं की, मुलांना पुरूषांचंच आकर्षण वाटू लागतं. हिजडा होण्यामागचा हा कार्यकारणभाव समजला की, हिजडा कोणात्याही घरी जन्माला येऊ शकतो हे लक्षात येईल.
‘हिजडा’ होण्याची प्रक्रिया मोठी आणि कठीण असते. एखाद्यानं हिजडा व्हायचं ठरवलं की, कुठल्या घराण्याचा हिजडा व्हायचं हे त्याला ठरवावं लागतं. साधारणत: तो ज्या भागात राहतो, त्यातील घराणं तो निवडतो. भेंडीबाजारवाला, बुलाकवाला, लालनवाला, लखनौवाला, पुनावाला, दिल्लीवाला, हादीर इब्राहिमवाला अशी हिजड्यांची मुख्य सात घराणी आहेत. हिजडा यापैकी एका घराण्यातील गुरूची निवड करतो. हा गुरू हिजडा होण्यासाठी जो विधी करतो त्याला ‘रीत’ असा सरळसोट शब्द आहे. या विधीत त्या घराण्याचा दुपट्टा डोक्यावर दिला जातो. साडी दिली जाते आणि घराण्याची निशाणी व नियम समजावून सांगितले जातात. त्यानंतर भीक मागण्याचं, टाळ्या वाजवण्याचं, गोड बोलण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. हिजड्यांच्या काही घराण्यांमध्ये ‘निर्वाण’ केलं तरच हिजडा परिपूर्ण झाल्याचं मानतात. निर्वाण हा पूजाविधी असल्याचं मानलं जातं खरं, पण त्यातला मुख्य विधी अमानुषच आहे. त्यात त्यांचे ‘पुजारी’ एका वारात हिजड्यांचं लिंग कापून टाकतात. ही जखम भरून यायला खूप वेळ लागतो. त्या जखमेवर तेल आणि वनौषधींचा लेप लावला जातो. काही जणांचा त्यात मृत्यूही होतो. मात्र निर्वाण करण्याची जबरदस्ती कोणावर केली जात नाही, असं सांगण्यात येतं.
हे सगळं इथं विस्तारानं सांगायचं कारण असं की, 15 एप्रिलचा ऐतिहासिक निकाल जिनं दाखल केलेल्या याचिकेवर दिला गेला ती लक्ष्मीनारायण त्रिपाठी एक हिजडा आहे. तिचं “मी हिजडा…. मी लक्ष्मी!” हे आत्मकथन सध्या गाजतंय. त्यामुळे फारशी माहिती नसणार्यांमध्ये तृतीयपंथी आणि हिजडा हे समानार्थी शब्द झाले आहेत. कायद्याला अभिप्रेत अर्थ तेवढाच नाही हे आपण वर पाहिलंच. पण जगभरातील अशा समस्यांबाबत कार्य करणार्या चळवळी सर्वच आंतरलैंगिक(intersex) व्यक्तींचा विचार करतात; त्या त्या व्यक्तीला योग्य आणि सुखावह वाटेल अशा लिंगभावानुसार जगता यावं यासाठी प्रयत्न करतात. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे समर्थक असल्यामुळे आपण हाही कार्यकारणभाव समजून घ्यायला हवा.
माणूस हा स्त्री किंवा पुरूष यामध्ये कोणत्या आधारावर विभागला जातो? एक म्हणजे त्याची लैंगिक गुणसूत्रं, दुसरं म्हणजे स्त्रवणारी लैंगिक हार्मोन्स आणि तिसरं म्हणजे बाह्य जननेंद्रियं व दुय्यम लैंगिक लक्षणं. सामान्यत: या तिन्ही गोष्टींमध्ये सुसूत्रता असते आणि त्यामुळे लैंगिक वर्गीकरण सोपं होतं. पण नेहमीच तसं होत नाही. धड स्त्रीही नाही आणि पुरूषही नाही अशा स्थितीही उद्भवतात आणि त्यांचं प्रमाणही काही कमी नाही. दर 1500 जन्मांमागे एक मुलाच्या लिंगनिश्चितीबद्दल संदिग्धता असू शकते आणि इतर कित्येक मुलांमध्ये तर प्रौढ होईपर्यंत लक्षातच येणार नाही इतकी सूक्ष्म कमतरता असते.(इथे मूल हा शब्द लिंगनिरपेक्ष आहे) जनुकीय पातळीवर सगळं काही आलबेल असलं तरी काही वेळा जन्मत:च बाह्य जननेंद्रियं अजिबात विकसित झालेली नसतात (vaginal or penile agenesis) किंवा अर्धवट विकसित झालेली असतात(gondadal dysgenesis). याला विकृती समजून मुलांना तृतीयपंथाला लावल्याच्या घटना आहेत. अशा मुलांचा लिंगभाव हा लैंगिक गुणसूत्रांनुसार असू शकतो, मात्र पालकांच्या पूर्वग्रहदूषित आक्रमक ‘संस्कारां’नी ती गोंधळून जाऊ शकतात.
जनुकीय पातळीवरच जर काही गडबड झाली असेल तर त्याचे परिणाम वेगवेगळ्या प्रकारे झालेले आढळतात. महाभारतात सांगितली गेलेली जन्मत: मुलगी असलेल्या ‘शिखंडी’ची कथा हा याचाच नमुना असावा. हिजड्याच्या अगदी उलट स्थितीही आढळते. म्हणजे जननेंद्रियं स्त्रीची पण लिंगभाव पुरूषाचा. एखाद्या स्त्रीमध्ये CYP17 या जनुकाचं उत्परिवर्तन (mutation) झालं तर असं होऊ शकतं. क्लाइनफेल्टर सिन्ड्रोम: या प्रकारात पुरूष गर्भात नेहमीच्या XY गुणसूत्रांच्या जोडीला आणखी एक X गुणसूत्र आई किंवा वडिलांपैकी एकाकडून येतं. दर पाचशे ते हजार पुरूषांमागे एकामध्ये अशी स्थिती आढळते. अशा व्यक्तींच्या मुख्य आणि दुय्यम लैंगिक लक्षणांमध्ये कमतरता आढळते. वीर्यात शुक्रजंतू नसतात. काही वेळा स्तनांची वाढ होते. यांचा लिंगभाव बहुधा पुरूषाचा असला तरी काही वेळा स्त्रीचा आणि काही वेळा तर गोंधळलेलाही असू शकतो.
अँड्रोजेन इन्सेन्सिटिव्हिटी सिन्ड्रोम: या प्रकारात टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनला गर्भ अंशत: किंवा पूर्णत: प्रतिसाद देत नाही. त्यामुळे XY गुणसूत्रं असली तरी त्याची पुरूष जननेंद्रियं विकसित होत नाहीत. जन्माला आलेल्या मुलाला जननेंद्रिय स्त्रीची असतात, पण अंडकोश, गर्भाशय नसतात. स्तनांची वाढ मात्र आढळते. जनुक पातळीवर मुलगा असला तरी बाह्यत: पाळी न येणारी, मूल न होणारी स्त्री दिसते. त्यामुळे लिंगभाव स्त्रीचा असतो. सुमारे वीस हजार जनुकीय पुरूषांमागे एक असं याचं प्रमाण आहे.
टर्नर सिन्ड्रोम: या प्रकारात(45, X) वडिलांकडून येणारं Y गुणसूत्र अजिबात नसतं किंवा अपूर्ण असतं. त्यामुळे बाह्य जननेंद्रिय स्त्रीचं दिसतं पण दोन X नसल्यामुळे अंतर्गत जननेंद्रियं म्हणजे अंडकोश आणि गर्भाशय विकसित होत नाहीत. त्यामुळे तिला मूल होऊ शकत नाही. लिंगभाव स्त्रीचा असतो. दर अडीच हजार स्त्रियांमागे एक इतक्या प्रमाणात अशी स्थिती आढळते.
हायपरअॅन्ड्रोजेनिझम: या प्रकारात पुरूष हार्मोन्सची पातळी खूप वाढते. अशावेळी गर्भ स्त्रीचा असेल तर दुय्यम लैंगिक लक्षणं पुरूषांप्रमाणे दिसतात. सगळ्याच स्त्रियांचा लिंगभाव बदलत नसला तरी पुरूषी लिंगभाव असणार्या स्त्रियांमध्ये या प्रकाराचं प्रमाण जास्त आहे.
डे ला चॅपेल सिन्ड्रोम: दद गुणसूत्रं असली आणि वडिलांमध्ये गुणसूत्रांचं XY अर्धसूत्री विभाजन(meiosis) झालं तर SRY जनुक वडिलांकडून येणार्या X वर येतं, त्यामुळे बाह्यत: मुलगा वाटला तरी दुय्यम लैंगिक लक्षणं काहीशी कमी दिसतात किंवा काही वेळा स्तनांची वाढही (gynaecomastia) संभवते. यांचा लिंगभाव पुरूषाचा असतो. दर वीस हजार पुरूषांमागे एक या प्रमाणात अशी स्थिती आढळते.
स्वायर सिन्ड्रोम: XY गुणसूत्रं असली पण SRY जनुक कार्यान्वित झालंच नाही तर बाह्यत: मुलगी वाटते पण तिला पाळी येऊ शकत नाही. लिंगभाव स्त्रीचा असतो. एक लाख जन्मांमागे एखाद्या वेळी असा प्रकार होतो. उभयलिंगत्व(hermaphroditism): या प्रकारात बाह्य जननेंद्रियं पुरूषाची की स्त्रीची ते सांगता येत नाही अशी दिसतात. दोन स्त्रीबीजांचं फलन एकावर X आणि एकावर Y असणार्या दोन शुक्रजंतूंकडून झालं आणि नंतर त्या बीजांचं एकत्रीकरण झालं तर जननेंद्रियं, जननग्रंथी आणि जनुकीय या तिन्ही पातळ्यांवर दोन्ही लिंगांचे गुणधर्म व्यक्त होतात. किंवा डे ला चॅपेल सारख्या स्थितीत SRY जनुक कमी-जास्त प्रमाणात कार्यान्वित झालं, तरीही असं होऊ शकतं.
यापैकी ज्यांचं नैसर्गिक लिंग आणि लिंगभाव हे वेगळे आहेत अशा व्यक्तीला परलैंगिक(transgender) असं म्हणतात. त्यांच्यामध्ये फक्त भिन्नलिंगी वेषभूषा करण्यापासून (transvestile) ते पूर्णत: उभयलिंगत्वापर्यंत (hermaphrodite) सर्व प्रकारांचा समावेश होतो. अजूनही आपल्याकडे जनुकीय पातळीवरचं लिंग आणि लिंगबदलाची शस्त्रक्रिया याला आणखी मजबूत आधार मिळेल.
हे झाले जनुकीय गोंधळ. पण मानवी हस्तक्षेपानं एखाद्या व्यक्तीला तृतीयपंथाला लावलं जाण्याची(खच्चीकरण) उदाहरणंही इतिहासकाळापासून काही कमी नाहीत. लहान वयात मुलांचे वृषण काढून टाकले गेले तर त्या व्यक्तीमध्ये पुरूषी अंत:स्त्राव निर्माण होत नाहीत. त्यामुळे पुरूषी लैंगिक प्रेरणाच नव्हे तर दुय्यम लैंगिक लक्षणंही दिसत नाहीत. अशा माणसांना प्राचीन संस्कृत वाङमयात ‘क्लीब’ म्हटलं गेलंय, यावरून ही ‘परंपरा’ किती जुनी आहे हे लक्षात येईल. इंग्रजीत याला र्शीर्पीलह तर उर्दूत खोजा असं म्हटलं जातं. प्राचीन काळापासून मोठमोठ्या राजांच्या आणि सम्राटांच्या जनानखान्याची राखण करण्यासाठी पुरूषांचं खच्चीकरण केलं जात असे. जनानखान्याशी संबंध असल्यामुळे त्यांच्यापैकी ‘चतुर’ व्यक्ती अप्रत्यक्ष सत्ताधिकार मिळवत. देवगिरी आणि वारंगलच्या लढायांत अप्रतिम शौर्य दाखवणारा अल्लाउद्दीन खिलजीचा ‘लाडका’ सेनापती मलिक काफूर हा खोजा होता.
सर्वोच्च न्यायालयानं आपला ऐतिहासिक निकाल देताना मानवी हक्कांचे अनेक संदर्भ दिलेत. पण त्याच वेळी समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवणारं 377 वं कलमही कायम आहे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अस्तित्वात असणं ही विसंगती आहे. हा विरोधाभास फार काळ राहणार नाही आणि समलिंगी संबंधांच्या स्वीकारार्हतेविषयी असाच खुलेपणा कायद्यात येईल अशी आशा करायला हरकत नाही. माणसाची माणूस हीच ओळख सगळ्यात जास्त महत्वाची आहे या दिशेच्या प्रवासातलं हे दमदार पाऊल. त्याचा स्वीकार करायलाच हवा!
–डॉ. आशुतोष मुळ्ये