महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यकारीणी बैठक दि. 7 व 8 फेबु्रवारी 2014 रोजी चेतना कॉलेज, बांद्रा, मुंबई येथे झाली. बैठकीस राज्य कार्यकारीणीचे पदाधिकारी, कार्यकारी समितीचे पदाधिकारी, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष व सचिव उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला राज्य प्रधान सचिव सुशीला मुंडे यांनी मागील पुणे येथे झालेल्या राज्यकार्यकारीणीचा वृत्तांत मांडला. राज्याच्या पाचही विभागातून एकूण 22 जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व जिल्हा कार्याध्यक्षांनी आपल्या जिल्ह्याचा मागील चारमाही अहवाल वाचला. या अहवालातून विविध उपक्रमांतर्गत फटाकेमुक्त दिवाळी, संविधान बांधिलकी महोत्सव, विवेकाचा आवाज बुलंद करू या अभियान, चमत्कार सादरीकरण इ. उपक्रम प्रभावीपणे पार पडल्याचे स्पष्ट झाले.
कायदा अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे शासनास मागणीपत्र व घोेषणापत्र सादर करण्याचे ठरले. मागणी पत्रात चार सूत्रे मांडण्यात आली. 1) अंनिस तर्फे प्रचार साहित्य निर्मिती उदा. चार्टस, स्टिकर्स, पोस्टर्स इ., 2)अंनिस पातळीवर राज्यव्यापी प्रबोधन मोहीम राबविणे. यात एक चार चाकी सुसज्ज वाहनाच्या मध्ये एल.सी.डी. स्क्रीन, माईक व्यवस्था, बारा कलमांचे कायद्याचे पोस्टर्स व तीन प्रशिक्षित कार्यकर्ते असतील. 3)विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश व दशिण पश्चिम महाराष्ट्र या पाचही विभागात कायद्यासंदर्भात प्रशिक्षकांचे सखोल प्रशिक्षण घेण्याचे ठरले. 4)गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी वकीलांचे संघटन व प्रमुख कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करण्याचे ठरले.
कायदा अंमबजावणीच्या संदर्भात बुवाबाबाकडून होणारे महिलांचे लैंगिक शोषण, डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा उल्लेख, ग्रामसभेत कायदा वाचन व्हावे असे मत मांडले गेले. वृत्तपत्रे व अन्य माध्यमातून आजवर दाखल केलेले गुन्हे प्रसिद्धीस आणण्याचे ठरले. व शाखांपर्यंत त्याची प्रत पाठवण्याचे ठरले. कायदा हा जर राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरायचा असेल तर एखादी हाय प्रोफाईल केस हाती घ्यावी असे मत डॉ. हमीद दाभोलकर यांनी मांडले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये कायद्याचा मुद्दा विविध पक्षांच्या अजेंड्यावर असावा तसेच इतर राज्यात जादूटोणा विरोधी कायदा व्हावा यासाठी अंनिसनी प्रयत्नशील असावे असे ठरले. कायदा अंमलबजावणी प्रचार मोहिमेचे उद्घाटन चवदार तळे, महाड, जि. रायगड येथून 9 मार्च रोजी करण्याचे ठरले. कायदा प्रचाराचा भाग म्हणून 12 पानांचे 150 रू. छापील किंमत असलेले रंगीत कॅलेंडर काढण्याचे ठरले. ज्या वर कायद्याची 12 कलमे व त्याला अनुसरून संतांची वचने त्यामध्ये असतील. रू.1500 पर्यंत जाहिरात देणार्या सर्व वर्गणीदारांना हे कॅलेंडर देण्याचे ठरले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे पूर्व निकाल जाहीर करण्याचे आव्हान ज्योतिषांना करण्याचे ठरले. पुस्तक प्रकाशन विभागाचे चर्चेत इतर भाषेत पुस्तके पोहचविण्यासाठी प्रकाशन विभागाने गुंतवणूक करण्याचे ठरले. राष्ट्रीय अनुसंधान विभागामध्ये कार्यकर्त्यांना इतर राज्यात निमंत्रण आल्यास मध्यवर्तीला कळविल्याशिवाय आमंत्रण स्वीकारू नये.
नभांगण व विज्ञानबोध वाहिनी हा उपक्रम पुढील शैक्षणिक वर्षात एकत्रितपणे राबविण्यात येईल असे ठरले. अंनिसच्या वेबसाईटसाठी नवीन संपादकीय मंडळ नेमणे व त्यास व्यावसायिक स्वरूप देण्याचे ठरले.
दर महिन्याच्या 20 तारखेला डॉक्टरांचा जिथे खून झाला तिथे पुणे शाखेतर्फे काही ना काही कृती कार्यक्रम असतो या संदर्भात आलेल्या सूचनांपैकी खालील सूचना स्वीकारल्या गेल्या. तपास कार्यात दबाव म्हणून ओंकारेश्वर पुलावर दरमहा 100 वेगळी माणसे बसवावीत. 2)स्वरक्ताने पत्र लिहून वेदना पोहचवावी. 3)रक्तदान करून इतरांचे प्राण वाचवावे.
ज्या शाखांच्या कार्यकारण्या आल्या नाहीत त्या 10 मार्चपर्यंत नाव, पत्ता, फोन, ईमेल आयडीसह शहाजी भोसले यांचेकडे जमा करण्याचे ठरले. वार्तापत्रामध्ये छद्म विज्ञान नावाने सुरू असलेल्या बुवाबाजीवर प्रकाशझोत टाकण्याचे ठरले तसेच 20 ऑगस्टला विशेष अंक काढण्याचे ठरले. जाहिरातदारांची यादी वार्तापत्र विभागाकडे पाठवणे इ. बाबी ठरल्या. तारांगण येथे चालू असलेल्या प्रशिक्षण केंद्रावर पूर्व नोंदणी करून वर्ष भरात किमान 6 शिबीरे घेण्याचे ठरले यास वार्तापत्राद्वारे नोंदणी करण्याचे ठरले.
संघटनेस 25 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे कार्यकर्त्यांकडून साजरीकरणासंबंधी विविध सूचना मागविण्यात आल्या. चाळीसगाव येथे डॉ. प्रदीप जोशी व स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत चालविल्या जाणार्या मानसिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले गेले. मानसमित्र प्रशिक्षण घेण्याचे डॉ. हमीद यांनी जाहीर केले.
– सुशीला मुंडे