विवेकी जीवनशैली अंगीकारण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलनाचे समाजात गतिमान संघटीत कार्याचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर शहीद झाले त्याला येत्या 20 ऑगस्ट 2014 रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या संघटीत कार्याला येत्या 9 ऑगस्ट 2014 रोजी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन महत्वपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मुलनाचा वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विचार सांस्कृतिक माध्यमातून महाराष्ट्रच्या जनमानसात रुजविण्यासाठी महाराष्ट्र अंनिस तर्फे लोक रंग मंच रिंगण नाट्य सादरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी कोल्हापूर व पुणे जिल्ह्याची कार्यशाळा सोनतळी (कोल्हापूर) येथे 20 ते 22 जून दरम्यान पार पडली. या कार्यशाळेचे प्रमुख अतुल पेठे सर, राजू सर, डॉ. चव्हाण सर होते.
कार्यशाळेचे उद्घाटन एका वेगळ्या प्रकारे झाले. कार्यशाळेचे 6 गट करुन प्रत्येक गटाने मैदानावर पडलेल्या वस्तू पासून जमिनीवर फुले बनवली. प्रत्येक गटाने त्याबाबतचे अनुभव सागितले. फुलांची पाहणी करताना राजू सर म्हणाले याठिकाणी आपण फुलाची नवनिर्मिती केली की जे या जगात अगोदर अस्तिवात नव्हते. या कार्यशाळेत आपण नवीन गाणे, नाटक यांचे नवसर्जन, नवसृष्टी, नवनिर्मिती करणार आहोत. त्यानंतर ती फुले जेवण विभागातील प्रमुख, व्यवस्थापनातील प्रमुख यांना भेट म्हणून दिली.
त्यानंतर पुढील कार्यक्रमाची सुरुवात ‘आम्ही प्रकाश बीजे’ या गाण्याने केली. परस्परांची ओळख करून घेताना प्रत्येकाने स्वतःचे नाव, आयुष्यातील प्रभावशाली स्त्रीचे नाव, गाव, आवड सांगितली . अतुल पेठे सरांनी नाटकातील महत्वाचे पैलू सांगत असताना लोक रंग मंच आणि रिंगण नाट्य संकल्पना, उद्देश, कार्य पद्धती. त्याचबरोबर आपली भाषा, आवाज, शब्द स्वर व्यंजने लावणे,पट्टी ओळखणे, पोत, आवाजाची जोपासना व तीव्रता , याबाबत सविस्तर माहिती दिली व त्याचे महत्व सागितले. अंधश्रद्धाची कारणे,परिणाम,उपाय यावर गटाने गटचर्चा केली व त्याचे सादरीकरण केले.
राजू सरांनी नवीन गाणे तयार होण्याकरता आवश्यक गोष्टीची माहिती देताना ते म्हणाले गाण्यातील शब्द, अर्थ, चाल, गाण्याचा उद्देश ह्या खूप महत्व आहेत कारण आपण चळवळीतील गाणी तयार करणार आहोत. त्यानंतर प्रत्येक गटाने गाणे तयार करण्यास सुरुवात केले. पहिल्या दिवसाची सांगता शाहीर निकम यांच्या ‘चळवळीतील शाहिरी’ या कार्यक्रमाने झाली.
दुसर्या दिवसाची सुरुवात व्यायामाने झाली. त्यानंतर प्रत्येक गटाने आपले नवीन गाणे सादर केले. अतुल पेठे सरांनी नाटकातील महत्वाची सूत्रे सांगताना रस्त्यावरील नाटकाची क्षमता व कौशल्ये , पंचेद्रियाचा सुयोग्य वापर, नाटक निर्माण प्रक्रिया, Jo-Harri-Window संकल्पना याबाबत सविस्तर माहिती दिली व त्याचे महत्व सागितले. डॉ. चव्हाण सरानी काही गाणी सादर केली. त्यानंतर प्रत्येक गटाने आपल्या नाटकाचा विषय निवडून त्याची तयार करण्यास सुरुवात केली. दुसर्या दिवसाची सांगता ‘सांस्कृतिक’ कार्यक्रमाने झाली.
कार्यशाळेच्या तिसर्या व शेवटच्या दिवशी प्रत्येक गटाने आपल्या नवीन नाटकाची रंगीत तालीम करून सर्वांसमोर अगदी उत्साहाने व आत्मविश्वासाने सादर केले. डॉ चव्हाण सरानी त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग नाटकाच्या स्वरुपात सादर केला. पुण्याच्या काही मुलांनी बोलक्या बाहुल्याच्या सहाय्याने अंनिस चा विचार व्यक्त केला.
रिंगण नाटकाचे पुढील प्रयोग 9 व 10 ऑगस्ट ला सातार्यात करण्याचे निश्चित केले. 11 ते 19 ऑगस्ट पर्यंत गटाने आपल्या नजीकच्या ठिकाणी प्रयोग करण्याचे ठरले. 20 ऑगस्ट ला पुण्यामध्ये सर्व गटाचे रिंगण नाटकाचे प्रयोग एकत्रित सादर केले जाणार आहेत.
यावेळी डॉ. हमीद दाभोलकर यांनी कार्यशाळेला भेट दिली. ते म्हणाले रिंगण नाट्य संकल्पना द्वारे आपण एका वेगळ्या व प्रभावी स्वरूपात अंनिस चा विचार लोकांसमोर मांडणार आहोत. कोल्हापुरातील अंनिसचे काही जेष्ठ कार्यकर्ते त्याचबरोबर कॉ. मेघा पानसरे यांनी ही कार्यशाळेला भेट दिली.
– स्वाती कोरे