Categories
भानामती

 महाराष्ट्र अंनिसने घेतला राजस्थानातील भानामतीचा शोध

सप्टेंबर - २०१२

            महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही महाराष्ट्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन जनसामान्यापर्यंत पोचवण्याच्या कार्याबरोबरच शोषण करणार्‍या, फसवणूक करणार्‍या, अघोरी अंधश्रद्धांच्या विरोधात कृतिशीलपणे वास्तवाचं ज्ञान आणि भान याची जाणीव करून देण्याचे महत्वपूर्ण कार्य करते. हे समजल्यानंतर राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील दातारामगड तालुक्यातील लामियाँ गावातील गोपाळलाल सैन या कुटुंबप्रमुखाचा अर्ज व लामियाँ गावचे सरपंच यांचे ग्रामपंचायत लेटर हेडवर लेखी विनंती पत्र महाराष्ट्र अंनिसच्या सातारा मुख्यालयात जुलै 2012 मध्ये पोचले.

            हकीकत अशी होती की, सातारा जिल्ह्यातील शिवडे गावचे सरपंच दीपक भोसले यांचे घरी सीकर जिल्ह्यातील राजस्थानी लोक भाड्याने राहतात. ते भोसले यांना राजस्थानात घेऊन गेले होते. गेल्यानंतर या घटनेची चर्चा निघाली. तेव्हा लामियाँचे सरपंचांनी शिवडे गावचे सरपंच दीपक भोसले यांना पीडित कुटुंबाच्या घरी घेऊन गेले. वस्तुस्थिती समजून घेतली सदर प्रकाराबाबत महाराष्ट्रात महाराष्ट्र अंनिस प्रभावी काम करते. हे सरपंचांनी सांगितल्यानंतर पीडित कुटुंबप्रमुख व लामियाँच्या सरपंचांनी लेखी विनंती पत्र दीपक भोसले यांच्याकडे देऊन लवकरात लवकर प्रतिनिधी पाठवण्याबाबत विनंती केली.

            अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचेकडे सदर लेखी निवेदन व वस्तुस्थिती दीपक भोसले यांनी कथन केली. तेव्हा डॉ.दाभोलकर, कार्याध्यक्ष अविनाश पाटील व कार्यकारी समितीच्या सदस्यांमध्ये चर्चा होऊन पर राज्यातून आलेली विनंती आपण मान्य करून टीम पाठवण्याचे निश्चित झाले. या टीममध्ये मिलिंद देशमुख, माधव बावगे, प्रशांत पोतदार, शहाजी भोसले, क्रांती पोतदार समवेत दीपक भोसले अशी टीम पाठवण्याचे ठरले. त्यात वाढ होऊन वसीम बागवान व रूक्साना मुल्ला यांची भर पडून एकूण 8 जणांची जम्बो टीम 3 ऑगस्ट रोजी मुंबईहून राजस्थानकडे मुंबई सेंट्रल-जयपूर रेल्वेने रवाना झाली. दुसरे दिवशी सकाळी लामियाँ गावी पोचलो जातेवेळी सोहनजी महाराज ज्यांनी या प्रकरणाची माहिती दिली त्यांना सोबत घेतले. लोक उत्सुकतेने वाट पहात होते. आम्ही गोपाळलाल हणमान सैन यांच्या वस्तीवर पोचलो. तोपर्यंत वस्तीतील बहुतांश लोक जमा झाले होते.

            धाब्यावर जशा खाटा असतात तशा खाटा टाकलेल्या होत्या. आम्ही पोचल्यावर आमच्या ओळखी करून दिल्या, तेथील उपस्थित कुटुंबीय काही प्रमुख लोकांच्या ओळखी करून घेतल्या आम्ही आमची कार्यपद्धती कशी असणार हे सांगितले व अन्य लोकांना घरी जाण्यास सांगितले. प्रकरणातील वस्तुस्थितीची माहिती करून घेतली. चार खोल्या व एक हॉल बाहेर मोठा व्हरांडा अशी नवीनच बांधलेली इमारत. त्यांच्या बाजूचा त्यांचा राहता कोटा पहिल्यांदा दोन वर्षांपूर्वी जळून खाक झाला होता. त्यानंतर त्यांनी हे घर बांधले. हे घर बांधण्यासाठी ग्रामस्थांनी मदत केली होती. भौतिक वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर मुलाखतीची तयारी केली. अगोदरच योजल्याप्रमाणे बंद खोलीत एकेकाच्या मुलाखती घ्यायच्या त्यावेळी प्रशांत पोतदार यांनी प्रत्येकाच्या मुलाखतीच्या वेळी फोटो घेतला. वसीम बागवान यांनी मुलाखतीची व्हिडीओ रेकॉर्डिंग करायची. शहाजी भोसले यांनी निरीक्षण करायचे क्रांती व रूक्साना यांनी रनिंग नोटस् घ्यायच्या, माधव बावगे, मिलिंद देशमुख यांनी प्रश्न विचारायचे, संजय बदाला यांनी दुभाषिकांची भूमिका बजावायची. मुलाखतीचा क्रम पहिल्यांदा कुटुंब प्रमुख गोपालाल सैन, रतनदेवी, गोपालाल सैन यांची मुलगी शोभा सैन, मुलगा धर्मेंद्र गोपाललान सैन असा क्रम ठरवला. अर्जातील मजकुरावरून एजंट कोण आहे हे आम्ही अगोदरच अंदाज काढला होता. म्हणून सूनबाई माया धर्मेंद्र सैन यांची मुलाखत शेवटी ठेवली होती. मायाच्या अगोदरच्या सर्व मुलाखती संपल्या. कुुटुंब प्रमुख गोपाललाल सैन(55) शिक्षण नाही. त्यांचे 5 भाऊ त्यापैकी दोघे शिकलेले एकजण दुबईत असतो. उर्वरित दोघेजण जवळच शेतात वस्ती करून राहतात. सर्वजण वेगवेगळे राहतात. गोपाललाल यांना 5 बिगा शेती. शेतातच घर वास्तव्य. पत्नी रतनदेवी अशिक्षित. गेली 10 वर्षांपासून मनोरूग्ण, एक मुलगा धर्मेंद्र(28) शिक्षण 8 वी व्यवसाय बार्बर(न्हावी) जयपूर येथे कारागिरी करतो. दोन तीन महिन्यांनी कधी तरी घरी येतो. दोन मुली लग्न झालेले दोघांचाही काही प्रश्न नाही पैकी शोभा बारावीपर्यंत शिक्षण. गेली काही महिन्यांपासून ती येथेच माहेरी राहते. सून माया(26) शिक्षण नाही.

            गोपाललाल सैन यांची मुलाखत संपल्यानंतर रतनदेवीची मुलाखत घ्यायची होती त्यांना आत बोलवलं तर त्यांच्या अंगात आलं. बडबड सुरू झाली आवाज काढू लागली. मग मिलिंद देशमुखांनी चर्चेतून त्यांना शांत केलं व पुढील मुलाखती सुरू झाल्या. माया व्यतिरिक्त सर्वांच्या मुलाखतीतून वस्तुस्थिती समजून आली. दोन वर्षांपूर्वी राहता कोटा जळाला भानामतीच्या प्रकारातून हे झाले असे सर्वत्र झाले, त्यामुळे ग्रामस्थांनी तात्पुरती घरासाठी मदत केली त्यातून हे घर बांधले गेले. गेल्या 10 महिन्यांपूर्वी रतनबाईंच्या सर्व साड्या जळाल्या. तेव्हापासून प्रकार वाढत गेले. मायाच्या खोलीतील कपडे जळू लागले. पडदा जळू लागला. पेटीतले कपडे पेटत नव्हते, पेटीच्या बाहेर काढल्यानंतर जळू लागले. नंतर मायाच्याच अंगावरची साडी पेटू लागली पेटली की विझवली जायची. नंतर मायाच्या रूममध्ये बंद खोलीत दगड पडू लागले. घरात दगड पडू लागले(साधारणत: 200 ग्रॅम वजनाचे) माया शेतात काम करण्यासाठी आली की, तिच्याभोवती दगड पडू लागले. दगड पडणे नित्याचे होऊन बसले पण एकदाही दगड कुणाला लागून कोणी जखमी झाले नाही. घरातील मोबाईल तर कधी  त्यातील सीम कार्ड गायब होऊ लागले ते चार आठ दिवसाच्या फरकाने परत येऊ लागले. मायाला लिहिता येत नाही. पण घरात माया नाव लिहिलेल्या चिठ्या येतात. त्यानंतर गोपाललाल यांच्याच पँटच्या खिशातून रूमालात बांधून ठेवलेले अनुक्रमे 2300, 1270, 5630, 3370, 4000 अशा रकमा रूमालासह गायब झाल्या. प्रत्येक वेळी रूमाल परत घरात येऊन पडू लागला पण रकमा परत आल्या नाहीत. स्वयंपाकामध्ये जेव्हा जेव्हा माया स्वयंपाक, चहा नास्ता करेल त्या प्रत्येक वेळी चपातीमध्ये वाळू येते. भाजीमध्ये वाळलेल्या शेणाचे तुकडे येतात. चहा दुधामध्ये शेण किंवा वाळलेले शेणाचे तुकडे येतात. माया जेव्हा जेव्हा जेवण वाढते तेव्हा तेव्हा जेवणाच्या ताटामध्ये वाळू किंवा वाळलेले शेण पडते. त्यामुळे स्वयंपाक व जेवण वाढण्यासाठी मुलगी शोभा हिला गेली सहा महिन्यांपासून माहेरीच बोलावून घेतले आहे. कधी तरी ती सासरी गेली की, मायाने स्वयंपाक बनवला की, हे हमखास घडणारच. या प्रकारावर कुटुंबियांनी रूपये 6 लाख खर्च केले असा दावा सांगतात. माया बाहेर होती. शहाजी भोसले बाहेर गेले होते निरीक्षण करतानाच मायाने दोन तीन दगड टाकले ते दगड शहाजीने प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवले.

            शेवटी मायाची मुलाखत सुरू केली. माया वय 26 वर्षे. लहानपणीच आई वडील गेले. दोन भाऊ दारू पितात. त्यामुळे माहेरचा रस्ता बंदच, लग्न झाले त्यावेळी नवर्‍या मुलाला पाहिलं नव्हतं. “इकडे लग्नासाठी मुलींना मुलगा दाखवत नाहीत. आईवडिलांनी ठरवून दिलं त्यांच्याबरोबर गुमान जायचं. हुंडा पद्धत आहे.” असं ती म्हणाली, सासू पागल आहे, पूर्वी नव्हती आमच्या लग्नानंतर झाली आहे. तिच्या संडास लघवीपासून ते अंघोळ घालणं सर्व काही मला करावे लागते. शेतातच घर असल्याने शेतात काम करावे लागते. पती 20 वर्षांपासून जयपूरला केस कापण्याचा धंदा करतात कधी महिना दोन महिन्यात घरी येतात. सासू सासर्‍यासमोर पती पत्नीनी बोलावण्यास इकडे मनाई आहे. पती माझ्याशी कधीच मोकळे बोलत नाहीत. ते जयपूरमध्ये कुठे राहतात, दुकान कसं आहे मी एकदाही पाहिले नाही. मला जयपूरला घेऊन चला म्हणून अनेकवेळा म्हणाले पण एकदाही घेऊन गेले नाहीत. घरी काम कोणी करायचे? असा प्रश्न आहे. मन लागत नाही. पण काय करावे घराची जिम्मेदारी आहे. मग घरात काय होतंय? केव्हापासून? असा प्रश्न विचारल्यानंतर तिने सरळ सांगितले पहिल्यांदा राहता कोटा जळाला नंतर लोकांच्या मदतीने हे घर बांधले. सासूच्या 10 महिन्यापूर्वी फक्त एकदाच सर्व साड्या जळाल्या, नंतर माझी साडी खालून पेटू लागली कधी मी विझवायचे, कधी सासरे विझवायचे, माझ्याच खोलीत लाईनमध्ये दगड पडायचे नंतर घरात शेतातही दगड पडू लागले. दगड वरून पडायचे दगड पडतांना कोणीही पाहिले नाहीत. पडल्यानंतरच दिसतात. दगड दररोेज पडतात पण कुणाला लागले नाहीत. साडी दररोजच पेटते, पण थोडीच पेटते नंतर विझवली जाते. स्वयंपाकात वाळू शेण पडते. मोबाईल कधी सिमकार्ड गायब होतं, ते परत येते. सासर्‍यांचे पैसे गायब होतात. हे सगळं क्रमाक्रमाने तिने सांगितले हे कशामुळे घडतं? असं विचारल्यानंतर जादूटोणा, देव देवतांचा कोप यामुळे होत असावे मला माहिती नाही. मी म्हणालो माया साक्षरता अभियानात लिहायला शिकवलंय तुझे नाव लिही बरे या कागदावर. तिनं नाव लिहिलं ते अक्षर आणि पडलेल्या चिठ्यांतील अक्षर एकच होते. हे कोण करते मला  माहीत नाही. पण मला एक 20-25 वर्षांचा तरूण मुलगा रात्री खिडकीतून बोलतो. मला 500 रू. दे नाहीतर तुला बरबाद करीन असे दोन वेळा घडले. दोनही वेळा रात्रीच बोलून गेला. मला भीती वाटते. मग मी किंचाळते सासरे व शेजारी येतात. समजूत घालतात. मग काय केले? तर शेजार्‍यांनी मला दाढीवाल्या बाबाकडे दाखवले त्यांनी दहा पैशाचे नाणे माझ्या तळ हातात ठेवले. मूठ बंद करायला सांगितली नाणं गरम लागू लागलं मूठ उघडताच नाण्यावर बरीचशी राख जमू लागली ती राख लावली, एक ताईत दंडाला बांधण्यासाठी दिला एक कडं दिले ते जोपर्यंत होतं तोपर्यंत बरं वाटलं. थोडे प्रकार कमी झाले होते. त्या बाबानी सांगितले की, “तू माझ्या नवर्‍याबरोबर झोपू नकोस. राहते घर सोडून दुसरीकडे राहण्यासाठी जा.” त्यानंतर अधूनमधून प्रकार घडू लागला त्यामुळे बर्‍याच देव देवतांचे केलं. मांत्रिक, जाणते, बुवा, बाबांना दाखवलं त्यात ते कडं काढून टाकलं परत हे जास्त वाढले. मग पुन्हा त्या बुवाकडे का जात नाहीत? कोणी घेऊन जात नाहीत. ती म्हणाली.

            एकूण सर्व मुलाखतीनंतर केंद्रबिंदू निश्चित झाला. मायाची उलट तपासणी सुरू केली. माया, हे सर्व कोण करतं? ती म्हणाली कोण करतं हे मला माहीत नाही ते कसं करतं हे ही माहीत नाही, मी म्हणालो, माया घरी गॅस किंवा चूल आपोआप पेटते का? घर आपोआप साफ होतं का? कपडे आपोआप धुतले जातात का? भांडी आपोआप घासली जातात का? शेतात पीक आपोआप येते का? स्वयंपाक आपोआप होतो का? तेव्हा ती म्हणाली ते आपोआप होत नाही. दगड आपोआप पडतात का? पडतात म्हणाली. तेव्हा शहाजी भोसलेंनी मला पुरावा सापडला आहे, माया तू बाहेर होतीस मी पण तिथे जवळच होतो. तू मला पाहिले नाहीस तू दोन तीन दगडं टाकलीस व कावरी बावरी होऊन पाहू लागलीस तेव्हा तू मला पाहिलंस हे तू टाकलेले दगड मी हात लावला नाही ते प्लॅस्टिक बॅगने पकडून आत टाकले आहेत. या दगडावर तुझ्या हाताचे ठसे आहेत. पोलिसांना व कुत्र्याला बोलावले तर या दगडाचा वास घेऊन त्याला तुझ्या हाताचा स्पर्श असल्याने तुला पकडेल म्हटल्यावर ती पुरती कावरी बावरी झाली. मग मी करते का हे सर्व? तेव्हा मी म्हणालो होय तूच हे सर्व करतेस आम्हाला सर्व काही कळते महाराष्ट्रात आम्ही असे अनेक प्रकार उघड केले आहेत, ते बंद केले आहेत. तिला भावी परिणामांची जाणीव करून दिली नवरा तुला सोडून दुसरी बायको करेल इतर कौटुंबिक सामाजिक परिणामांची जाणीव करून दिली. शहाजीने तू माझी बहीण आहेस म्हणून राखी बांधून घेतली आम्ही सर्वांनी तू यापुढे हा प्रकार बंद कर तुझे नाव गुप्त ठेवण्यात येईल. म्हटल्यानंतर तिने होय असे सांगितले मुलाखती संपवून आम्ही सर्वजण बाहेर हॉलमध्ये आलो. कुटुंबीयांना एकत्रित केले. त्यांना सांगितले कुठलीच घटना आपोआप घडत नसते. घडणार्‍या घटनेमागे कारण असते कोणाचा तरी हात असतो ह्या घटना कोणत्या तरी हाताने घडल्या आहेत. तो हात घरचा किंवा बाहेरचा असू शकतो परंतु तो हात आम्ही शोधला आहे. पण तो कोणाचा आहे हे आम्ही जाहीर करणार नाही. त्यामुळे ज्यांनी केलं त्यांनी आपण आता यातून सुटलो असे समजता कामा कये, यापुढे हा प्रकार बंद होईल. जर पुन्हा झालाच तर आम्हास पुढची स्टेप घ्यावी लागेल पोलिसात द्यावे लागेल. पोलीस पकडून नेतील शिक्षा करतील घराण्याची इज्जत जाईल. त्यामुळे हे थांबेलच हे कुठल्या मंत्र, तंत्र दैवी शक्तीने झालेले नाही. अशी कोणतीही अद्भुत शक्ती अस्तित्वात नाही. भीती बाळगण्याचं कारण नाही म्हटल्यावर सर्वांना नि:श्वास सोडला. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. भोजन शोभा व मावशीने केले होते. त्यामुळे त्यात काही आढळलं नाही. गोपाललाल व धर्मेंद्र यांना बाजूला बोलावून मायाला व रतनदेवीला मानसोपचार तज्ञाचा उपचार देणे व मायाला जयपूरला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

            सरपंचांनी व ग्रामस्थांनी गावात रात्री जाहीर कार्यक्रमाचे ग्रामपंचायतीत आयोजन केले. त्यात भानामतीचे चमत्कार करून दाखवले. भानामती विषय मांडला लोकांना वास्तवाचं ज्ञान आणि भान देण्याचा कार्यक्रम यशस्वी झाला. तोवर तिकडून निरोप आला घरात कागद पेटला. परत आम्ही कार्यक्रमानंतर लगेच पीडित घरी गेलो. तेथे मायाला चहा करायला सांगितलं. क्रांती तिथे नजर चकवून नकळत निरीक्षण करीत होती. मायानी चहा चांगला बनवला. कपात गाळला व खाली वाकून वाळवलेल्या शेण्याचा चुरा आपल्या हाताने चहात टाकत असताना क्रांतीने पाहिले. पुन्हा कुटुंबीयासमवेत बैठक बसवली. नाईलाजास्तव मायाचे नाव जाहीर करावे लागले. तिला तातडीने मानसोपचार तज्ञाकडे दाखल करू उद्या जयपूरला घेऊन या किंवा सरळ सातारला या असा सल्ला दिला. अशा केसेसमध्ये अंनिसची तिसरी अट महत्वाची असते अंनिसने सांगितलेला सल्ला त्यांनी मान्यच करायला पाहिजे परंतु इथे मायाला तिच्या नवर्‍याची साथ होती त्याची कमजोरी समजली नाही. शेवटी पर राज्यात असे प्रकरण हाताळण्यात काही मर्यादा येतात. परंतु एकूणच या प्रकाराचा शोध घेण्यात व हे जादूटोण्याद्वारे मंत्र तंत्राने होत नाही हे सांगण्यात चळवळ यशस्वी ठरली. कारणांचं निराकरण करणे हे कुटुंबियांवर अवलंबून असते ते निराकरण केले, अंनिसच्या सूचना त्यांनी पाळल्या तर प्रकरण 100 टक्के बंद करण्याचे आव्हान अंनिसने स्वीकारले आणि परत फिरलो.

माधव बावगे