नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाचा वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला. लगेचच या विधेयकाला शिवसेनेचा विरोध असल्याचं जाहीर करण्यात आलं. आदल्या दिवशी दाभोलकर यांना आदरांजली वाहणार्या शिवसेनेनं लगेचच आपला मुखवटा काढून चेहरा दाखवावा, तसंच हे झालं. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विज्ञाननिष्ठ भूमिका घेऊन जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाला संपूर्णपणे पाठिंबा देतात, त्याचवेळी शिवसेना मात्र दाभोलकरांच्या हत्येनंतरही कट्टरवाद्यांच्या तुष्टीकरणासाठी विधेयकाच्या विरोधाचं तुणतुणं लावूंन धरते. याचाच अर्थ, काळाची पावलं ओळखून भूमिकेत सुसंगत बदल न करता बुसरटलेल्या विचारधारेला धरून चालण्याचं शिवसेनेनं ठरवलं आहे. विधेयकाला समर्थन देताना राज ठाकरे आपले आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा संदर्भ देतात. प्रबोधनकार हे राज ठाकरे यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचेही आजोबा असले, तरी उद्धवजींच्या ते खिजगणतीत नसावे किंवा निवडणुकीच्या राजकारणासाठी आजोबांचे विचार त्यांना टाकाऊ वाटत असावेत. असो. दाभोलकरांच्या जाण्यामुळे नेमकं काय काय झालं? विविध माध्यमांमधून ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या पाहिल्या, तर दाभोलकरांचं कार्य किती व्यापक पातळीवर पोहोचलं होतं, हे लक्षात येतं. सोशल नेटवर्किंग साईटसच्या माध्यमांतून अनेकांनी संताप व्यक्त केला. तो स्वाभाविक होता. कुणाचीही हत्या वाईटच! त्यात पुन्हा ज्या माणसाने केवळ समाजप्रबोधनाची भूमिका घेऊन वाटचाल केली, समाजाचा विवेक जागृत करण्यासाठी प्रयत्न केला; असाच माणूस अविवेकी, अतिरेकी प्रवृत्तींच्या हल्ल्याचा बळी ठरावा, ही मनाला वेदना देणारी दुर्घटना आहे. दाभोलकरांच्या हत्येनंतर शोक किंवा संताप व्यक्त करणारे फक्त त्यांचे कार्यकर्तेकिंवा परिचित नव्हते. त्यांच्याशी ओळखदेखील नसलेल्या विवेकवादी, प्रगत विचारसरणीच्या लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या भावना प्रामाणिक असल्या तरी, उद्या एखाद्या विचारासाठी रस्त्यावर यायचं असेल, तर यातले एक टक्काही लोक येणार नाहीत, हे तितकंच खरं आहे. फार तर कुठेतरी मेणबत्त्या लावायला जमतील. असल्यांच्या पाठिंब्यावर भरोसा ठेवल्यामुळेच अण्णा हजारेंची क्रांती फसली, हे लक्षात घेण्याची गरज आहे. या निषेध प्रतिक्रिया पाहून महाराष्ट्र किती पुरोगामी आहे, अशा भ्रमात वावरण्याची गरज नाही. कारण महाराष्ट्र पुरोगामी राहिलेला नाही. आणि तसा तो होताच कधी? कारण या तथाकथित पुरोगामी राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासाठी दाभोलकरांची हत्या व्हावी लागते. विनोदाचा भाग म्हणजे, वारकरी संप्रदाय आणि सनातन संस्थेनेही दु:ख व्यक्त केलं. त्याचवेळी सनातन प्रभातमधून ‘सनातन’चे मुख्याधिकारी जयंत आठवले यांनी जी प्रतिक्रिया दिली, ती अमानुषपणाचा कळस गाठणारी आहे. जे कुणी हिंदू म्हणून गर्व मानतात, अशांनी शरमेने माना खाली घालाव्यात किंवा हिंदू धर्म म्हणजे हेच असेल तर हिंदू असण्याची लाज वाटावी, अशा प्रकारचं लेखन त्यांनी केलं आहे. त्यातून स्वत:ला सनतान विचारी म्हणवणारे किती निर्दयी आहेत आणि दाभोलकरांच्या हत्येमुळे त्यांना किती आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत, हे स्पष्ट होतं. डॉ. जयंत आठवले ‘मरणान्नानि वैराणि’ या शिर्षकाखाली लिहितात-
आज सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची बातमी समजली. तेव्हा गीतेतल जास्य हि ध्रुवो मृत्यु: । म्हणजे जो जन्माला आला, त्याचा मृत्यु निश्चितच असतो, या शिकवणीची आठवण झाली. नंतर कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून पुढील विचार मनात आले.
1. जन्म आणि मृत्यू हे प्रारब्धानुसारच होतात.
2. प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ मिळतं.
नंतर जुने दिवस आठवले. 20.9.2002 या दिवशी बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अहंकार हा ग्रंथ प्रकाशित केला होता. त्याचं पुनर्मुद्रण 9.10.2012 या दिवशी करण्यात आलं. त्यात डॉ. दाभोलकर यांच्या विचारांचं खंडण केलं आहे. तर्काला तर्काने, अंधश्रद्धेला श्रद्धेने उत्तर देणं, ही सनातन संस्थेची कार्यपद्धत पहिल्यापासून आहे.
समाजात धर्मशिक्षण देतांना डॉ. दाभोलकर यांच्या विचारांचा लाभ झाला. समाजात धर्मासंदर्भात कोणते गैरसमज असतात, हे त्यांच्यामुळेच कळलं. त्यामुळे अशा विचारांचं खंडण धर्मसत्संगात आणि विविध ग्रंथांत करता आलं.
आजाराने अंथरुणाला खिळून मरण्यापेक्षा किंवा शल्यकर्मानंतर वेदनादायी मृत्यू येण्यापेक्षा डॉ. दाभोलकरांना असा आलेला मृत्यू ही एकप्रकारे त्यांच्यावर ईश्वराने केलेली कृपाच आहे.
डॉ. दाभोलकर ईश्वर मानत नसले, तरी ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना
– डॉ. आठवले.
– नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येवरची ही प्रतिक्रिया म्हणजे डॉ. आठवलेंनी हिंदूंचा सर्वोच्च आदराचा धर्मग्रंथ असलेली ‘भगवद्गीता’ मधील तत्त्वज्ञान किती खुनशी आहे, ह्याचा साक्षात्कारच घडवला आहे. दाभोलकरांचा खून हे त्यांच्या कर्माचं (म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचं) फळ आहे, असं त्यांना म्हणायचे आहे. तशीच खून होणं, ही दाभोलकरांवर झालेली ‘ईश्वरी कृपा’च आहे! ह्याचा अर्थ, देह-धर्म-संस्कृती रक्षणासाठी ‘आलो ह्याच कारणासाठी’ अशा जोषात जगणारे जयंतराव साळगावकर यांना रुग्णालयात मरण आल्याने ते ‘ईश्वरी कृपे’ला अपात्र ठरतात. मरणाचं हे उलट-सुलट तत्वज्ञान हिंदूधर्मतत्वज्ञानाची बदनामी करणारं आहे. ह्या अतिरेकी फाजीलपणातून दाभोलकरांच्या हत्येला ईशकृपा ठरवतानाच, खून करणार्याला एकप्रकारे साथच दिली आहे. जयंत आठवलेंना सनातनचे साधक ‘संत’ म्हणतात. तथापि, महाराष्ट्राच्या संत परंपरेत खुनाला ‘ईशकृपा’ म्हणणारे कुणी संत नव्हते. ती उणीव जयंत आठवलेंनी भरून काढली असली तरी, त्यांची ही खुन्याचा गौरव करणारी साथीदारी ‘दखलपात्र गुन्हा’ ठरणारी आहे. असल्या प्रवृत्ती महाराष्ट्रात खुलेआम मिरवत आहेत. खुनाला ‘ईशकृपा’ म्हणत खुन्याचं समर्थन करीत आहेत आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण सगळे टेंभा मिरवत आहोत. वारकरी संप्रदायानेही दाभोलकरांच्या हत्येचा निषेध केला आहे. वारकरी संपद्रायातही भोंदूगिरी आणि संधिसाधूपणा वाढला आहे. स्वत:ला वारकरी म्हणवणार्या ‘हभप’ चा एक गट सनातन आणि हिंदू जनजागृतीच्या इशार्यावर ‘रामकृष्ण हरी’ चा गजर करीत सहिष्णू वारकर्यांत घुसून त्यांना धर्मांधतेच्या शिकवण्या देत आहे. खरं तर, अशा अतिरेकी प्रवृत्तींना रोखणं शक्य होतं. परंतु वारकरी संप्रदायातल्या पुढार्यांनी आपले भरमसाट मानधनावर कीर्तनाचा धंदा करणार्या धंदेवाईक कीर्तनकारांनी त्यांच्या विरोधात कधी ब्र काढला नाही. जणू काही ही मंडळी त्यांच्या मनातल्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठीच झटत आहेत. वारकर्यांचं कातडं पांघरून ही मंडळी संतांच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगत विचार परंपरेची लक्तरं वेशीवर टांगत असताना वारकर्यांचे पुढारी कुठल्या कीर्तनात दंग आहेत? ते जर वेळीच पुढे आले असते तर या बनावट वारकर्यांना त्यांनी उघडं पाडलं असतं. तर चित्र वेगळं दिसलं असतं. त्याने वारकरी चळवळ उजळून निघाली असती. सरकारनेही अंधश्रद्धा विरोधी कायद्याचं प्रकरण सकारात्मकतेने पुढे नेलं असतं आणि कदाचित दाभोलकरांची हत्याही टळू शकली असती. परंतु सज्जनांच्या निष्क्रियतेचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात, हेच यानिमित्ताने दिसून आलं. धन्य ते ज्ञानोबा तुकोबा आणि धन्य त्यांचे आजचे संधिसाधू अनुयायी!
-ज्ञानेश महाराव