नुकतीच पुणे येथे विवेकवाहिनी राज्यव्यापी व्यसनविरोधी युवा संकल्प परिषद झाली. प्रारंभी महाराष्ट्रातील विविध कॉलेजमधून आलेल्या विवेकवाहिनीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी चळवळीची प्रबोधनांची गाणी सादर केली. महाराष्ट्र विवेकवाहिनीचे राज्य समन्वयक डॉ.हमीद दाभोलकर यांनी परिषदेचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी ‘बलशाली युवा महाराष्ट्रासाठी, चला व्यसन बदनाम करू या’ ह्या मोहिमेमागची पार्श्वभूमी नमूद केली तसेच विवेकवाहिनीने राबवलेल्या व्यसनविरोधी मोहिमेचा आढावा घेतला.
अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी परिषदेला शुभेच्छापर संदेश दिला. व्यसनाला मिळणारी वाढती प्रतिष्ठा युवकांनी तोडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच व्यसनी व्यक्तीला मदत करण्यासाठी आपण त्याचे मानसमित्र बनू या अशी देखील अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. व्यसनी पदार्थांचे प्रतिक म्हणून दारूच्या बाटलीचे बॉक्स व गुटख्याच्या पाकीटांना अग्नी देऊन व्यसनमुक्ती क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.कल्याण गंगवाल ह्यांनी परिषदेचे उद्घाटन केले. उद्घाटनपर भाषणामध्ये डॉ.गंगवाल म्हणाले की, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यामधून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरूण व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ह्या विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.

तंबाखूचे व्यसन हे दारूच्या व्यसनाइतकेच घातक असून ह्या व्यसनाकडे आपण पुरेशा गांभीर्याने पाहत नाही ह्या विषयी त्यांनी खंत व्यक्त केली. तरूणांमध्ये तंबाखूविषयी जागृती करण्यासाठी तंबाखूमुळे उद्भवणार्या नपुंकत्वावरती प्रबोधनामध्ये भर द्यावा असेही त्यांनी सुचवले.
पुढच्या सत्रामध्ये व्यसनविरोधी संघर्षाचे अनुभवकथन करण्यात आले. पोपट धायगुडे व विशाल पोखरकर ह्या विवेकवाहिनीच्या विद्यार्थी संघटकांनी व्यसनाच्या विरोधात त्यांनी केलेल्या कामाविषयी मांडणी केली. श्री.विलास बाबा जवळ यांनी सातारा जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या दारूबंदी चळवळीचे अनुभवकथन केले. सातारा जिल्ह्यामधील जावळी तालुका दारू दुकानमुक्त करण्याच्या चळवळीमध्ये आलेले अनुभव मांडले. स्वत:च्या आयुष्यामध्ये वडिलांच्या व्यसनामुळे भोगाव्या लागलेल्या यातना व त्यामध्ून व्यसनमुक्तीच्या कामाविषयी आपल्यामध्ये निर्माण झालेली बांधिलकी याविषयीचे आपले मनोगत विवेकवाहिनीच्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरले.
नशाबंदी मंडळातर्फे श्रीमती वर्षा विद्या विलास ह्यांनी मनोगत व्यक्त केले. धान्यापासून दारू निर्मिती प्रकल्पांना आपण विरोध केला पाहिजे. महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र बनण्यापासून वाचवायचे असेल तर तरूणांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. नशाबंदी मंडळातर्फे युवकांमधील व्यसनाधीनता कमी व्हावी म्हणून केल्या जाणार्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली.
भोजनानंतरच्या सत्रामध्ये तंबाखूविषयी प्रबोधन करणारी ‘प्रतिज्ञा’ ही सुमित्रा भावे व सुनिल सुकथनकर दिग्दर्शित लघुफित दाखवण्यात आली. परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेतर्फे सचिन आफळे ह्यांनी स्वत:च्या आयुष्यामध्ये व्यसनामुळे आलेले दाहक अनुभव आणि त्यामधून व्यसनमुक्तीच्या उपचारामुळे आपण कसे सावरलो याविषयी मनोगत व्यक्त केले. समारोपाच्या कार्यक्रमांमध्ये सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे ह्यांचे परिषदेनिमित्त लिहिलेले भाषण वाचून दाखवण्यात आले. मंत्रीमहोदयांनी शासन व्यसनविरोधी धोरण राबवण्यात कमी पडत असल्याची प्रांजळ कबुली देत असतानाच समाजामधील वाढती व्यसनाधिनता रोखण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही देखील दिली.
राष्ट्रसेवा दलाचे कार्याध्यक्ष सुभाष वारे ह्यांचे समारोपाच्या समारंभामध्ये भाषण झाले. सिंहगड पार्टी व रेव्ह पार्टीला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देणार्या माध्यमांनी विवेकवाहिनीच्या युवकांनी पुकारलेल्या ह्या लढाईला देखील तितकेच महत्व द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दारूच्या ठेकेदाराला राजकीय पक्ष उमेदवारी देतात ह्याविषयी त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. डॉ.नरेंद्र दाभोलकर ह्यांनी महिला वर्गामध्ये वाढत्या व्यसनाधिनतेविषयी चिंता व्यक्त केली. पुढील वर्षामध्ये व्यसनाविषयी जोरदार प्रबोधन करून व्यसनविरोधी युवा संघर्षाचा विषय येत्या काळात राजकीय पटलावर आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर महाराष्ट्र विवेकवाहिनीच्या तरूण कार्यकर्त्यांच्या हस्ते व्यसनविरोधी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. प्राचार्या सविता शेटे ह्यांच्या सोबतीला सभागृहातील सर्व विवेक साथींनी हम होंगे कामयाब हे गीत गाऊन परिषदेचा समारोप झाला.
-प्रा. सुभाष वाघमारे
क्षणचित्रे : 1) सामाजिक न्याय मंत्र्यांना महत्वाच्या बैठकीमुळे उपस्थित रहाता आले नसले तरी त्यांनी परिषदेमध्ये वाचून दाखविण्यासाठी लिखीत भाषण पाठविले होते. 2) महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामधून विवेकवाहिनीच्या तरूण कार्यकर्त्यांनी परिषदेला दिलेल्या जोरदार प्रतिसादाबद्दल बहुतांश वक्त्यांनी समाधान व्यक्त केले. 3) साधना प्रकाशन व अं.नि.स.च्या पुस्तक प्रदर्शनामध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणावर पुस्तक खरेदी केली.