काही वर्षांपुर्वीची गोष्ट. नगर जिल्ह्यातील शनी-शिंगणापूरचे दर्शन महिलांना घेता येणार नाही असा पुजार्यांचा दंडक ऐकून डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी पुरूषाला जर दर्शन घ्यायला परवानगी आहे तर स्त्रियांना का नको? असा साधा प्रश्न पुजार्याला विचारला. ‘ही जुनी परंपरा आहे. कुणालाही त्याबद्दल सवाल करता येणार नाही.’ असे उत्तर पुजारी मंडळींनी दिले. दाभोलकरांनी त्या भागात अनेक गावी जाऊन सभा घेतल्या. नगर शहरातही सभा झाल्या. सहकार्यांशी बोलून त्यांनी सत्याग्रहाचा कार्यक्रम आखला. मी व वीणा त्यात सहभागी व्हायचे ठरवले. पुण्यात प्रा.देवदत्त दाभोलकरांची (पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, समाज प्रबोधन संस्थेतील आमचे ज्येष्ठ सहकारी) भेट झाली. ते मला म्हणाले, “शनी-शिंगणापूरच्या प्रश्नावर नरेंद्रने खूप रान तापवले आहे. मला भीती वाटते की, ते लोक त्याच्यावर हल्ला करतील. तुम्ही त्याच्यासोबत रहा. काळजी घ्या.”
त्यांची ती भीती त्यावेळी खोटी ठरली. पण ता.20 ऑगस्टला सकाळी सात वाजता पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर खरी ठरली!
अशी काही बातमी वाचावी लागेल असे वाटले नव्हते. मनाला विलक्षण खिन्नता आली.
1972-73 च्या दुष्काळात प्रा.ग.प्र.प्रधान, मृणालताई गोरे, प्रा.मधु दंडवते यांचे अनेक दौरे आम्ही आखले होते. खटाव, म्हसवड, जत या भागातही गेलो होतो.
सातार्यात त्यावेळी दाभोलकर समाजवादी युवक दल चालवत होते. दुष्काळी कामे, रोजगार हमी योजना(जिची त्यावेळी चर्चा चालली होती. पागे समितीचा अहवालही आला होता.) यावर समाजवादी युवक दलाच्या बैठकीत त्यांनी मला एक दोन वेळा चर्चेला बोलवले. डॉ.बाबा आढावांच्या पुढाकाराने होणार्या विषमता निर्मूलन शिबिरात मधूनमधून भेट व्हायची. वैद्यकीय व्यवसाय व अशा प्रकारचे समाजकार्य फार काळ करता येणार नाही असे दाभोलकरांना वाटू लागले. 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी अंतर्गत आणीबाणी लादली. विरोधी पक्षांचे अनेकजण मिसाबंदी बनवले गेले. आम्ही काही थोडेजण भूमिगत राहून देशभर घडलेल्या सरकारी दडपशाहीच्या घटना व त्याविरूद्ध ठिकठिकाणी चाललेले लोकसंघर्ष यांच्या बातम्या गुप्त पत्रकांच्या रूपाने समविचारी लोकांना पाठवत होतो. मधूनमधून रेल्वेने जाता येईल अशा ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायचो. पुण्याच्या एकदोन बैठकांना नरेंद्र आले होते.
आणीबाणीच्या शेवटी 1977 च्या लोकसभा निवडणुका झाल्या. जनता लाटेत असंख्य तरूणतरूणी आले. ग्रामीण-शहरी कष्टकर्यांच्या चळवळींनाही उधाण आले. पण जनता पार्टीतील भांडणे, सरकार कोसळणे वगैरे मुळे तरूणशक्तीची विखरण झाली. काही जनआंदोलने चालत राहिली. मेधा पाटकरांचे नर्मदा बचाव आंदोलन उफाळले. काही तरूण-तरूणींनी त्याच उडी घेतली. कालांतराने त्या चळवळींचा जोरही कमी झाला. “आंदोलने का मंदावली?” यावर जाहीर चर्चा, वादविवाद होऊ लागले.
त्याच सुमारास डॉ.बाबा आढाव, जळगावचे डॉ.राम आपटे यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक कृतज्ञता निधीची उभारणी करण्याचे ठरवले. डॉ.दाभोलकरांनी सचिवपदाची जबाबदारी उचलली. डॉ.श्रीराम लागू, निळूभाऊ फुले, राम नगरकर, रोहिणी हट्टंगडी आदींच्या सहकार्याने ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे प्रयोग ठिकठिकाणी केले. दाभोलकरांच्या संघटना चातुर्याने सगळे स्तिमीत व्हायचे. सा.कृ.नि.च्या सचिवपदाची धुरा पाव शतकापेक्षा अधिक काळ दाभोलकरांनी सांभाळली. स्थायी निधी एक कोटीच्या वर गेला. व्याजाच्या उत्पन्नातून दरमहा चाळीस-पन्नास कार्यकर्त्यांना नियमितपणे मानधन देण्याची व्यवस्था सुरळीत चालते आहे. वर्षातून एकदा कार्यकर्त्यांचे शिबिर घेतले जाते. त्यांचा हुरूप व क्षमता वाढत चालली आहे. त्या निधीत भर घालण्याच्या हेतूने ‘एक दिवस कृतज्ञतेचा उपवास’ हा उपक्रम नरेंद्रनी सातारा जिल्ह्यात राबवला. कष्टकर्यांना न्याय मिळावा यासाठी राबणार्या कार्यकर्त्यांविषयी आपल्या मनात आदराची भावना ठसवावी व त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणन एक दिवस उपास करायचा व त्यामुळे वाचलेले पाच रूपये सा.कृ.नि.ला द्यायचे. शालेय विद्यार्थ्यांत ही अभिनव चळवळ चालवून नरेंद्रनी काही लाखांची भर सा.कृ.नि.च्या मूळ निधीत घातली. अनेकांना स्फूर्ती देणारा तो उपक्रम होता.
त्याच काळात नरेंद्रनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम सुरू केले. जादूटोणा, देवदासी, नरबळी, नवस फेडण्यासाठी देखील कोंबडे-बकर्याचा बळी देणे अशा सगळ्या गरीब, निरक्षर, कष्टकर्यांची फसवणूक व पिळवणूक करणार्या अंधश्रद्धांवर आपल्या लेखणीवाणीने ते कोरडे ओढू लागले. त्यांच्या पुस्तकाच्या आठ-आठ, दहा-दहा आवृत्त्या निघू लागल्या. महाविद्यालये व विद्यापीठातील अध्यापक व विद्यार्थी या चळवळीत प्रचंड प्रमाणावर भाग घेऊ लागले. जनजागरण, आवश्यक तेथे व तेव्हा संघर्ष अशा अंगांनी ती वाढली. समाजमनावर प्रभाव पाडू लागली. धर्माच्या ठेकेदारांनी ‘हे आमच्या धर्मावर उठलेत’ अशी हाकाटी करायला सुरवात केली. अनेक ठिकाणी निदर्शने झाली. धमक्या येत राहिल्या. कोकणापासून ते विदर्भापर्यंत सर्व भाग ढवळून निघाला. डोळस व कार्यक्षम कार्यकर्त्यांची संघटना बांधली गेली.
त्याला आंतरजातीय विवाहांना उत्तेजन देण्याची व महाविद्यालयांत विवेकवाहिनी चालवण्याची जोड दिली गेली. कुठेकुठे ती कामे चिकाटीने चालताहेत. चळवळीत चढउतार येतच राहतात. दाभोलकर ना कधी यशाने हुरळून गेले, ना कधी अपयशाने निराश झाले.
–पन्नालाल सुराणा