Categories
कार्याध्यक्षांची डायरी

महासत्संग नव्हे तर बुद्धिभेद करण्याचा कार्यक्रम

फेब्रुवारी – २०१२

            धुळ्यात दि.18 व 19 जानेवारी रोजी आयोजित योगशिरोमणी व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते प.पू.श्री श्री रविशंकरजी यांचा महासत्संग झाला. त्यानिमित्ताने केल्या जाणार्‍या प्रचार, प्रसार व दाव्यांविषयी आपली भूमिका जनहिताच्या दृष्टीने व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. विवेकाधिष्ठीत व मानवतावादी सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून विचार करता अशा स्वरूपाच्या तथाकथित अध्यात्मिक संप्रदायांकडून केले जाणारे पारलौकिक कल्याणाचे व भौतिक सुखाचे दावे तपासून पहा. अशा अध्यात्माच्या नावाखाली रूजवल्या जाणार्‍या दैववादी संस्कारांच्या पगड्यामुळे होणारी आपली दिशाभूल फसवणूक व शोषण थांबवा असे आवाहन सर्वसामान्य जनतेला करण्यात येत आहे.

            महाराष्ट्रातील सर्वात लहान व विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षित असणार्‍या धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सरकारी आकडेवारीनुसार दारिद्य्ररेषेखाली 1,67,273 कुटुंबे आहेत, त्यातील 1,08,663 कुटुंबांचे मासिक उत्पन्न 500 रू.च्या आसपास आहे. म्हणजे वर्षाला सरासरी सहा हजार रूपये आहे. त्यातीलही 1,00,000 कुटुंबांचे दरडोई/दरदिवशी उत्पन्न रू.1.67 इतके आहे. अशा अत्यंत हलाखीत आपले जीवन जगणार्‍या कुटुंबांचे दारिद्य्र आपल्या अध्यात्मिक योगशक्तीने दूर करण्याचा उपाय रविशंकरजी सांगणार आहेत का? असा सवाल या गरीब जनतेच्या वतीने आम्ही उपस्थित करीत आहोत, असे ज्येष्ठ विधीतज्ञ व समितीचे कायदेशीर सल्लागार निर्मलकुमार सुर्यवंशी यांनी केला आहे. याप्रसंगी राज्य कार्यवाह परेश शहा आणि धुळे जिल्ह्याचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

            ‘जीवन जगण्याची कला’ शिकविण्याचा दावा करणारे रविशंकर ज्या स्वरूपाची ध्यानधारणा व योगसाधना करायला सांगतात. त्यामधील फोलपणा आणि त्यामागील वैज्ञानिक विश्लेषण, स्वतंत्रपणे खानदेशातील ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ.रविंद्र टोणगावकर(दोंडाईचा) यांच्या अनुभवांच्या आधारावर आम्ही सोबत जोडले आहे. त्यामुळे ‘सुदर्शन क्रिया’ आणि त्या आधारे मिळवायची मन:शांती व मुक्ती या आभासी संकल्पना आहेत हे सिद्ध होते. त्यापासून परावृत्त झाल्याशिवाय आपण आपल्या जीवनातील प्रश्न सोडवायला प्रवृत्त होऊ शकणार नाही.

अंतर्विसंगत अध्यात्म

            ‘अध्यात्म’ म्हणजे आधी आपल्यामधील सुधारणा व स्वत:बद्दलचा विचार. त्यामध्ये काम, क्रोध, मोह, मत्सर, असुया, स्पर्धा, चंगळवाद यांचा अतिरेक न करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात योगशिरोमणी म्हणवून घेणारे रविशंकर असोत की अन्य स्वयंघोषित अध्यात्मिक स्त्री-पुरूष, त्यांचे आजचे जीवन तपासले तर सर्व सुखसोयींनी युक्त अशीच त्यांची जीवनशैली दिसते. आपापले संप्रदाय थाटून त्याचा अनुयायी वर्ग वाढविण्यासाठी खर्चिक प्रचार, प्रसार यंत्रणा राबवायची आणि त्यासाठी विविध चमत्कारी दावे करायचे, परिस्थितीने गांजलेल्या अगतिक जनतेला आकर्षित करायचे अशी व्यूहरचना आध्यात्मिक संप्रदायांकडून राबविली जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी मोठमोठे शक्तीप्रदर्शनाचे कार्यक्रम स्थानिक धनवानांच्या सहकार्याने आयोजित करण्याचे पीक आले आहे. खर्‍या आध्यात्मिक जीवनशैलीला अभिप्रेत असणार्‍या ‘साधनसूचिता’ अंगिकारण्याचा यामध्ये पूर्ण अभाव या तथाकथित मंडळींमध्ये दिसतो. त्यामुळे सामान्यांना जीवनातील समस्या सोडवणुकीसाठी कर्मवादी, इहवादी भूमिकेतून योग्य पर्यायांचा विचार करण्याची उसंत न देता त्यांना दैववादी बनविण्याचे षडयंत्र या हितसंबंधी मंडळींकडून राबविले जात आहे. अशा तथाकथित अध्यात्माच्या चक्रव्युहात सर्वसामान्यांनी अडकू नये असे विनम्र आवाहन महाराष्ट्र अंनिसतर्फे करण्यात येत आहे.

प्रवाहपतीत राजकारणी

            ‘गर्दी तिथे दर्दी’ ऐवजी गर्दी तिथे राजकारणी अशीच सध्या स्थिती आहे. त्यामुळे चमत्कारी दावे, पारलौकिक कल्याणाची लालुच, दु:ख दारिद्र्य संपविण्याचे फसवे कार्यक्रम करून अगतिक जनतेची गर्दी खेचणार्‍या तथाकथित अध्यात्मिक संप्रदायांकडे पैसा-प्रसिद्धी सोबत राजकारणीदेखील जाताना दिसतात. त्यामुळे आपल्या देशात सर्वसामान्य माणूस दिवसेंदिवस गरीब होतो आहे आणि दैववाद पसरविणारे आध्यात्मिक संप्रदाय दिवसेंदिवस श्रीमंत होताना दिसत आहेत. सत्तेच्या राजकारणातील प्रमुख पक्षीय नेते यासाठी खरे तर जबाबदार आहेत. त्यांच्यावर असणारी कल्याणकारी राज्य चालविण्याची संवैधानिक जबाबदारी न पाळता उलट ती मंडळी गरीब शोषित, श्रमिक जनतेची दिशाभूल करीत आहेत. शोषितांनी आपल्यावर होणार्‍या अन्याय व पिळवणुकीच्या विरोधात आवाज उठवू नये आणि व्यवस्था परिवर्तनासाठी बंड करू नये म्हणून सत्तेच्या राजकारणातील सर्वांनाच तथाकथित अध्यात्माची गुंगी समाजाला आणणे सोईचे वाटते. भारतीय संविधानानुसार धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, लोकशाही राष्ट्र म्हणून आपला कारभार चालविण्याची गरज आहे. प्रत्यक्षात स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणारे आणि धर्माधिष्ठीत राष्ट्रनिर्मितीचा अजेंडा राबविणारे, तथाकथित आध्यात्मिक संप्रदाय व त्यातील बुवा-बाबा-महाराजांच्या नादी लागलेले दिसत आहेत.

            प्रत्यक्षात जगातील मानवी उत्क्रांतीची वाटचाल ही चिकित्सेतून, प्रश्न विचारण्यातून, तपासण्यातून झाली आहे. त्यामुळे भारतीय संविधानाला अभिप्रेत मानवतावादी, शोषणमुक्त, समताधिष्ठत समाज निर्मितीमध्ये दैववादी, मानसिक गुलामगिरी रूजविणारे तथाकथित अध्यात्मिक संप्रदाय अडसर ठरणारे आहेत हे समाजाने ओळखावे व त्यापासून होणारी आपली फसवणूक, दिशाभूल, शोषण थांबवावे असे विनम्र आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात येत आहे.

अविनाश पाटील