Categories
मानसमित्र

मानसमैत्री : पूरग्रस्त आपत्तीबाधितांशी

सप्टेंबर- २०१९

महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला गेल्या महिन्यात महापुराने झोडपले. मनुष्यहानी जरी खूप मोठ्या प्रमाणात झाली नसली, तरी बाकीची हानी खूप मोठी आहे. यामध्ये प्रामुख्याने लोकांची राहती घरे, कपडे, पशुधन, शेती यांची मोठी हानी झाली आहे.

पुराच्यामुळे भौतिक पातळीवर झालेली पडझड नजरेला दिसून येते आणि त्यामुळे त्या बाबतीत मदत करणे हे देखील शक्य होते; पण पुरासारख्या आपत्तीमुळे माणसाच्या मानसिकतेवर होणारे परिणाम सहजासहजी दिसून येत नाहीत. जागतिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या मध्ये लोकांना मनोसामाजिक आधार देण्याची यंत्रणा कार्यरत असते. आपल्याकडे मात्र अशी यंत्रणा जवळजवळ अस्तित्वात नाही, असे म्हटले तरी चालेल. या पार्श्वभूमीवर आपत्तीमधून होणारे मानसिक परिणाम आणि त्याला कसा प्रतिसाद द्यावा, याविषयी आपण समजून घेतले पाहिजे. आपल्या आयुष्यात कोणतीही धक्कादायक गोष्ट घडल्यानंतर माणसाचे मन एका ठराविक आवर्तनातून जाते. आपत्तीला सामोर्‍या जाणार्‍या लोकांच्यामध्ये देखील ही आवर्तने दिसून येतात. यातील पहिलाा टप्पा हा मनाला तीव्र धक्का बसल्याचा असतो. या टप्प्याच्या मध्ये माणसाच्या मनाला एक बधीरपण आल्यासारखे होते. शरीराला जोरदार फटका बसल्यावर ज्याप्रमाणे होते, तशीच ही अवस्था असते. या टप्प्यामध्ये, ‘हे काय झाले?’ ‘कसे झाले?’ ‘खरंच हे झाले आहे का?’ अशा अनेक प्रश्नांच्या मधून माणसाचे मन जाते. झालेल्या गोष्टीविषयी अविश्वास वाटणे हे प्रामुख्याने या टप्प्यामध्ये घडते. ‘हा सगळा प्रसंग म्हणजे एक दु:खद स्वप्न तर नाही ना..’ अशी वाक्ये आपण या टप्प्यात असलेल्या व्यक्तीच्या तोंडी ऐकतो. यानंतर दुसरा टप्पा येतो राग येण्याचा. यामध्ये आपत्तीबाधित व्यक्तीला आपल्या सभोवतालचा खूप राग येऊ लागतो. ‘ही आपत्ती माझ्याच वाट्याला का आली?’ हा प्रश्न त्या व्यक्तीला सतावू लागतो. मदत मिळण्यात आलेल्या अडचणीच्या आणि काही ठिकाणी झालेली असंवेदनशीलता ही रागाच्यामध्ये भर घालते. तिसर्‍या टप्प्यामध्ये, मानवी मन हे आशा आणि निराशा यांच्यामध्ये दोलायमान होत राहते. मदत कार्य सुरू झाल्याने, आलेल्या चांगल्या अनुभवांच्या मधून एका बाजूला मनाला भविष्याच्या विषयी आशा वाटू लागते, तर झालेले नुकसान आणि शिल्लक आव्हानांच्या मधून निराशा वाटते. चौथा टप्पा असतो निराशा आणि अपेक्षाभंगाचा. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येते, तसा मदतकार्याचा वेग मंदावतो. बाकीचे लोक आपापल्या आयुष्यात व्यग्र होऊ लागतात आणि त्यामधून आपत्तीबाधित लोकांना अपेक्षाभंगाची आणि निराशेची भावना ग्रासू लागते. शेवटचा पाचवा टप्पा असतो परिस्थितीच्या स्वीकाराचा. या टप्प्यांमध्ये, ती व्यक्ती झालेली सर्व हानी स्वीकारून आपत्तीच्या मानसिक प्रभावाच्या मधून बाहेर पडून दैनंदिन जीवन जगू लागते.

आपत्तीला सामोरे जाणारे बहुतांश लोक या पाचही टप्प्यांमधून जात असतात. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू; तसेच पाळीव जनावरांच्या मृत्यूच्या शोकामधून ही प्रक्रिया आणखी त्रासदायक होऊ शकते. शेतीसंबंधित पाळीव प्राणी हे शेतकरी कुटुंबातील घटक समजले जातात. कोल्हापूर-सांगलीमधील शेतीपट्ट्यामध्ये पुरात मोठ्या प्रमाणात पशुधन वाहून गेले. त्यातून होणारे आर्थिक नुकसान हे तर आहेच; पण जीवाभावाचे सोबती गमावल्याचे दु:ख देखील आपल्याला समजून घ्यावे लागते. काही ठिकाणी गडबडीत दाव्याला बांधलेली जनावरे सोडायचे राहून गेल्यावर त्यामधून यांच्या मृत्यूला आपण कारणीभूत झालो, अशी अपराधीपणाची भावना देखील मनाला ग्रासून टाकू शकते.

आपत्तीला सामोरे जाणारे बहुतांश लोक हे या टप्प्यामधून स्वत:चे स्वत: मार्ग काढतात, हे जरी खरे असले तरी आपत्ती व्यवस्थापनामध्ये सहभागी असणारे स्वयंसेवक हे जर या मानवी मनाच्या अवस्थांच्या विषयी जागरूक असतील, तर त्यांनी केलेल्या मदतीने आपत्तीबाधित व्यक्तींना यामधून अधिक वेगाने आणि सकारात्मक भाव ठेवून बाहेर पडता येऊ शकते.

पण साधारणत: 30 टक्के आपत्तीबाधित लोकांना आपत्तीच्या मानसिक परिणामांमधून लगेच बाहेर येणे कमी-अधिक प्रमाणात अवघड जाते. या मानसिक त्रासांमध्ये मनात सातत्याने भीतीची भावना राहणे, चिंता आणि निराशेचे आजार या गोष्टी येतात. आपत्तीबाधित व्यक्ती ही वाढलेल्या ताण-तणावांच्या मुळे व्यसनाच्या अधीन होण्याची शक्यता वाढते. ताण-तणाव सहन न झाल्याने काही वेळा स्वत:चे जीवन संपवून घ्यावे, असे विचार देखील लोकांच्या मनामध्ये येऊ शकतात. काही लोकांच्या मध्ये आपत्तीचे प्रसंग ‘फ्लॅशबॅक’ प्रमाणे परत-परत नजरे समोर तरळत राहतात. त्यामधून जिथे आपत्ती झाली त्या ठिकाणी परत कधीच जाऊ नये, अशी भावना देखील काही लोकांच्या मनामध्ये जोर धरू लागते. खासकरून लहान मुले, आधीच आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती, वृद्ध, अपंग, गरोदर आणि नुकत्याच बाळंत झालेल्या स्त्रिया यांना अधिक काळजीपूर्वक मानसिक आधार देण्याची गरज या प्रसंगात निर्माण होते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आपत्तीग्रस्तांना मानसिक पातळीवर आधार देण्यासाठी एक यंत्रणा उभी करणे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तीन पातळ्यांवर ही यंत्रणा निर्माण करणे आवश्यक वाटते.

1. आपत्तीबाधित भागात मदतकार्य करणार्‍या जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी आपत्तीचे मानसिक परिणाम आणि त्या बाबतीत करायची मदत, याविषयी संवेदनशील असणे आणि शक्य झाल्यास त्याविषयी त्यांना तोंडओळख होईल, असे प्रशिक्षण देता येऊ शकते. हे स्वयंसेवक जास्तीत जास्त आपत्तीबाधित लोकांपर्यंत पोचत असल्याने त्यांना जर आपत्तीच्या मानसिक परिणामांविषयी माहिती असेल तर त्याचा उपयोग खूप मोठ्या जनतेला होऊ शकतो.

2. आपत्तीबाधित जनतेला मानसिक आधार देण्यासाठी वेगळे प्रयत्न करू इच्छिणार्‍या स्वयंसेवकांना मानसमित्र/मैत्रीण म्हणून देखील काम करता येऊ शकते. यामध्ये त्या भागातील स्थानिक रहिवासी असलेल्या आणि या प्रकारचे काम करू इच्छिणार्‍या व्यक्तीला सहभागी होता येते. अशी एक मोहीम अंनिसचा मानसमैत्री विभाग आणि परिवर्तन स्थानिक संस्थांच्या मदतीने सुरू करीत आहे. या मानसमित्रांना, भावनिकदृष्ट्या व्यक्तीला भावनिक प्रथमोपचार कसे देता येतात, याविषयी चार तासांचे प्रशिक्षण देऊन भावनिक प्रथमोपचार आणि मनोसामाजिक आधाराची एक यंत्रणा उभी करणे, हे त्या मागचे सूत्र आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या आशा सेविका, अंगणवाडी सेविका; तसेच शिक्षक, जागरूक नागरिक, प्रशासनाच्या मधील व्यक्ती यामधील कोणीही अशा उपक्रमात सहभागी होऊ शकतो.

3. या सगळ्याच्या पलिकडे ज्यांना तीव्र स्वरुपाचे त्रास आहेत त्यांच्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची मदत मिळवून देणे हे देखील करता येऊ शकते. सांगली-कोल्हापूरमधील मानसतज्ज्ञांनी या विषयी पुढाकार घेऊन काम देखील चालू केले आहे.

काही वेळा आपत्तींच्या मधून झालेल्या हानीच्या दर्शनाने मदत करणार्‍या व्यक्तींना देखील सातत्याने त्याच परिस्थितीशी सामोरे जाऊन अस्वस्थता येऊ शकते. ती कशी हाताळायची, या विषयी देखील आपण सजग होऊ शकतो.

यामध्ये ‘मानसमित्रां’नी काही छोटी-छोटी पथ्ये पाळणे खूप महत्त्वाचे ठरते. आपल्याला शक्य नसेल त्या गोष्टीची आश्वासने न देणे, कमी बोलणे आणि जास्त निरीक्षण करणे व ऐकणे, शब्दांच्या पेक्षा आश्वासक स्पर्श अनेक वेळा अशा परिस्थितीत महत्त्वाचा ठरतो हे लक्षात ठेवणे, वेदानादायी आठवणी कोणी बोलू इच्छित नसेल तर मुद्दाम त्याला परत-परत त्याविषयी उद्युक्त करणे, टाळणे हे आपण करू शकतो. यातील अनेक गोष्टी आपण गप्पांच्या स्वरुपात आणि अनौपचारिक चर्चांच्यामध्ये देखील करता येतात. आपत्तीबाधित लोकांशी मानसमैत्री करणे आणि त्या आधारे त्यांचे आयुष्य पूर्वपदावर येण्यासाठी मदत करणे हे देखील आपत्ती व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे अंग आहे, हे समजून घेऊन त्या दिशेने देखील आपण प्रयत्नशील राहायला हवे.