मी एक सर्जन असून माझे हॉस्पिटल दोंडाईचा (जि.धुळे) येथे आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि माझा प्रथम परिचय साधारण वीस एक वर्षांपूर्वी जेव्हा डॉक्टर दाभोलकर आणि डॉ. श्रीराम लागू दोंडाईचा येथे एका कार्यक्रमास आले होते तेव्हा झाला.
त्यावेळी शिंदखेडा येथील अंनिसचे कार्यकर्ते प्रा. परेश शहा डॉक्टरांना घेऊन माझ्या घरी आले होते कारण प्रा. परेश शहा यांना कल्पना होती की 1985 सालापासून मी अंधश्रद्धेविरूद्ध काम करीत होतो.
1985 साली मी दोंडाईचा रोटरी क्लबचा अध्यक्ष असताना आम्ही श्याम मानव यांचा 3 दिवसांचा चमत्कार सादरीकरणाचा कार्यक्रम दोंडाईचे येथे केला होता. त्या कार्यक्रमास रोज 6000 ते 7000 गावकरी हजर राहात होते. याचे कारण आम्ही जे जाहिरातीचे परिपत्रक काढले होते. त्यात हे असे दैवी चमत्कार सादर करण्यात येतील असे जाहीर केले होते. त्या परिपत्रकाच्या मागे भारतातील अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे पितामह डॉ. अब्राहम कोवूर यांच्या ‘गॉड, डेमन्स अँड स्पिरीट’ या पुस्तकात दिलेल्या ‘चमत्कार सिद्ध करा आणि एक लाख रूपये घेऊन जा’ हे आव्हान आणि त्यातील एकवीस चमत्कारांची यादी दिली होती. हेच आव्हान आणि यादी याचा मोठा बॅनर करून मी तो माझ्या हॉस्पिटलबाहेर लावला होता.
प्रा. परेश शहांनी तो बॅनर डॉ. दाभोलकरांना आणि डॉ. लागूंना मोठ्या उत्साहाने दाखविला. डॉ. दाभोलकरांनी माझे मनापासून कौतुक केले होते. आणि मला शाबासकी दिली होती. ही माझी डॉक्टरांबरोबरची पहिली भेट! आजही असे बॅनर माझ्या हॉस्पिटलच्या बाहेर आपणास बघावयास मिळेल. फक्त त्या बक्षिसाची रक्कम आता 21 लाख रूपयांची झाली आहे. त्याला सुद्धा डॉ.दाभोलकरांचाच मोठा हातभार आहे. पूर्वीच्या रू.11 लाख बक्षिसांत डॉक्टरांना अमेरिकेतील त्यांच्या कार्यक्रमाकरिता तेथील महाराष्ट्र मंडळाने दिलेली 10 लाख रूपयांची भर पडली आहे.
माझ्याशी डॉक्टरांचा जसजसा परिचय वाढत गेला तशीतशी अधिक जबाबदारी ते माझ्यावर टाकत गेले. सुरवातीला नंदूरबार-धुळे या संयुक्त जिल्ह्याचे अंनिसचे अध्यक्षपद नंतर जिल्हा विभागला गेल्यानंतर धुळे जिल्ह्याचे अध्यक्षपद त्यांनी माझ्यावर सोपविले होते आणि शेवटी त्यांच्या दु:खद हत्येच्या 1 महिना अगोदरच मी माझ्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र पातळीवरील एका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. माझ्यावरील प्रेमाखातर पुणे येथे मला जेव्हा महाराष्ट्र सरकारतर्फे ‘सर्वोत्कृष्ट डॉक्टर’ म्हणून ‘आनंदीबाई जोशी पुरस्कार’ देण्यात आला होता तेव्हा ते आणि अविनाश पाटील हे दोघे जातीने हजर होते. डॉ. दाभोलकर यांना माणसे आणि कार्यकर्ते जोडण्याची आणि त्यांना धरून ठेवण्याची फार मोठी हातोटी होती. त्यांच्या कार्य पद्धतीचा आणखी एक महत्वाचा पैलू माझ्या लक्षात आला आणि तो म्हणजे कोणाच्याही देवा धर्माच्या बाबतच्या श्रद्धांना आणि कल्पनांना त्यांनी विरोध केला नाही.
असाच एक प्रसंग – अगदी सुरवातीच्या काळात जरी माझा देवावर विश्वास नव्हता आणि अंधश्रद्धांनाही माझा विरोध होता तरी भगवद्गीतेत दिलेल्या ‘आत्मा आणि पुनर्जन्मावर’ माझा पूर्ण विश्वास होता. माणूस मेल्यानंतर त्याचा आत्मा शक्तीच्या रूपात दुसर्या कशात तरी जातो यावर माझा ठाम विश्वास होता आणि एकदा दोंडाईचे-शहादा या प्रवासात मी याच विषयांवर डॉक्टरांशी चर्चा करीत होतो आणि माझे म्हणणे त्यांना विज्ञानाच्या आधारावर पटवून देण्याचा प्रयत्न करीत होतो. ते शांतपणे सर्व ऐकून घेत होते पण त्यांनी माझ्याशी कोणताही वितंडवाद घातला नाही किंवा माझे म्हणणे ‘चूक’ आहे. ‘हे सर्व थोतांड आहे’ असे कोणतेही वक्तव्य केले नाही. डॉक्टरांची ही एक खासियत होती. देवाधर्माबद्दल त्यांनी कोणालाही दुखावले नाही. मात्र कोणी देवाधर्माच्या नावावर गैरकृत्य-बुवाबाजी फसवणूक करीत असले तर मात्र अशा लोकांविरूद्ध रान उठविले तेही सौम्य शब्दात कधीही न चिडता.
कालांतराने त्यांची अनेक भाषणे, पुस्तके वाचून माझा ‘आत्मा आणि पुनर्जन्मावरचा’ विश्वास पूर्ण उडाला. मी तर या विषयावर ‘डॉक्टरेट’ करण्याकरिता(पी.एच.डी. मिळविणे) विद्यापीठाकडे जाण्याचा विचार केला होता. तेव्हा डॉक्टर दाभोलकर मला म्हणाले, “डॉक्टर तुम्ही पी.एच.डी.करण्यात कशाला वेळ वाया घालवता. तुमचा प्रबंध 8-10 लोक वाचतील इतर प्राध्यापकांसारखी तुम्हाला बढतीची किंवा पगारवाढीची आवश्यकता नाही. या ऐवजी तुम्ही पुस्तक लिहा.” हे मला पटलं आणि मी याविषयावर एक प्रदीर्घ लेख लिहिला आणि तो अनेकांनी वाचला.- असे होते डॉ. दाभोलकर!