–प्रा. डॉ. नितीन शिंदे
भारत करणार मंगळावर स्वारी…. दै.सकाळ 4 ऑगस्ट 2012 ‘क्युरिऑसिटी उलगडणार मंगळाचे अंतरंग… दै.सकाळ 7 ऑगस्ट 2012
कडक मंगळाच्या प्रभावाखाली असलेल्या बहुसंख्य भारतीय समाजमनाला विचार करायला लावणार्या या घटना आहेत. अर्थात हे फक्त विचार करणार्यांसाठीच आहे. दुसर्याच्या डोक्याने चालणार्या, कालबाह्य ठरलेल्या परंपरेचा पोकळ अभिमान बाळगणार्या संस्कृतीच्या ठेकेदारांना आणि आर्थिक उदरनिर्वाहाचे साधन बनलेल्यांना याचं कौतुक निश्चितच वाटणार नाही. शिक्षित वर्गात जास्त प्रभाव टाकणारा कडक मंगळ भारतीय समाजाला जखडून ठेवण्यात आजपर्यंत यशस्वी ठरला आहे यात शंकाच नाही. टी.व्ही.चॅनेलवरून व वृत्तपत्रातील फलज्योतिषाची भविष्यवाणी या सदराखाली आजही मती गुंग करणारी फसवणूक राजरोसपणे सुरू आहे. विज्ञानाला कायम नावे ठेवणारा वर्गच आज विज्ञानानं निर्माण केलेल्या वस्तूंचा उपभोग घेतो आहे. ज्या टी.व्ही.अथवा मोबाईलद्वारे ज्योतिषाचा प्रसार केला जातो ही माध्यमंच याची ग्वाही देतात.
दि.6 ऑगस्ट रोजी नासाचे क्युरिऑसिटी नावाचं रोव्हर अर्थात बग्गी मंगळावर उतरली आणि नासातील वैज्ञानिकांना झालेल्या आनंदाला पारावार राहिला नाही. कारण 57 कोटी किलोमीटरचा प्रवास करून 26 नोव्हेंबर 2011 ला प्रवासाला निघालेली ही बग्गी 6 ऑगस्ट 2012 रोजी सकाळी 11 वाजता मंगळावर सुखरूप उतरली. उतरण्यापूर्वी तिचा वेग होता ताशी 22 हजार किलोमीटर. मंगळावर उतरण्यापूर्वीची सात मिनिटे नासाच्या दृष्टीने महत्वाची होती. ‘सेव्हन मिनिटस ऑफ टेरर’ असा या वेळेचा उल्लेख केला जातो. मंगळाच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर 625 किलोमीटर अंतरावर असताना बग्गीचं तापमान होतं 2100 अंश से. आणि बग्गीचा वेग पॅराशुटच्या मदतीने ताशी 6 किलोमीटर केला गेला. हळूहळू वेग कमी करत सेकंदाला 125 मीटर व शेवटी 0.75 मीटर करून यशस्वीपणे मंगळावर बग्गी उतरवण्यात आली. अत्यंत साहसी असं या मोहिमेचं वर्णन केलं जातं. रशियाच्या मदतीने केलेली ही मोहीम मंगळासंदर्भातील अनेक प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मंगळाच्या भूपृष्ठाची रचना, खनिजांचे थर यांचा अभ्यास, जीवसृष्टी किंवा पाण्याच्या उपलब्धतेचा अंदाज बांधणे, रासायनिक पृथ्थकरणासाठी माती, खडकांचा अभ्यास, मंगळाभोवतील वातावरणाचा अभ्यास, किरणोत्सर्गाचा अभ्यास अशा वैविध्यपूर्ण माहितीच्या प्रतिक्षेत पृथ्वीवासीय असणार आहेत. अंदाजे 686 दिवस राहून व 19 किलोमीटर मंगळावरील पृष्ठभागावर प्रवास करून ही बग्गी माहितीचा अनमोल खजिना देणार आहे.
इथपर्यंतच्या प्रवासाचा लेखाजोखा पाहिला आणि विचार केला तर क्षणभर मन थक्क होऊन गेलंच पाहिजे. कारण पृथ्वीवर बसून आपल्यापासून 7 कोटी 80 लाख किलोमीटरवर असलेल्या, प्रत्यक्ष डोळ्याने न पाहिलेल्या दूरच्या ग्रहावरील पृष्ठभागावर यान सुखरूपपणे उतरवणे, त्याला आपल्या मनाप्रमाणे फिरवणे, किती जिकीरीचं आणि कष्टप्रद असेल याची कल्पना येते. आज बाबा, बुवा, मांत्रिक, नवसाला पावणारा राजा, दैववाद, कर्मकांडामध्ये जास्त रममाण होणार्या समाजाला याचं भान येण्याची गरज आहे. मुलांना या वैज्ञानिक माहितीचा आस्वाद देण्याची गरज आहे अन्यथा इतर देश शोध लावत जातील आणि आपण परावलंबित्वाच्या ओझ्याखाली कायमस्वरूपी येत राहू.
मंगळ हा भविष्यातील मानवी वसाहतीचं ठिकाण ठरण्याची शक्यता आहे. पृथ्वीवरील वाढते प्रदूषण, खनिजसंपत्तीचा होत असलेला र्हास, युद्धजन्य व दुष्काळसदृश्य परिस्थिती यामुळे पृथ्वी नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे पृथ्वीवासीयांना दुसरं घर असणं महत्वाचं आहे. त्यादृष्टीने हा सगळा खटाटोप आहे. काहींना हा कल्पनाविलास वाटणार किंवा आपल्या कालखंडात अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताच नाही असं वाटत असणार. असं वाटणार्याची मानसिकता काय असेल याचा विचार न केलेलाच बरा. भारतीय समाजामध्ये या वर्गाचे प्रमाण जास्त आहे. मी आणि माझं कुटुंब असा हेतू ठेवून मला काय इतरांचं अशी प्रवृत्ती समजाला फारच घातक आहे. आणि आपलं जर सध्या व्यवस्थित चालत असेल तर समाजाचही उत्तमच सुरू आहे असा विचार या वर्गामध्ये दृढ झालेला असतो. असं मानणार्या वर्गानं प्रगती होत नसते. अज्ञानाचा अंधकार शिक्षणाशिवाय दूर होणार नाही याची कल्पना असल्यामुळेच फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर आणि इतर समाजसुधारकांनी ते आत्मसात करण्याची संधी समाजाला उपलब्ध करून दिली म्हणून तर जातीबंधनात आणि दैववादात अडकलेल्या समाजाची तिसरी पिढी यातून मुक्त झाली. समाजसुधारकांनी त्यासाठी केलेला संघर्ष दृष्टीआड करून चालणार नाही. हा सामाजिक इतिहास विचारात घेतला तर वैज्ञानिक इतिहासही हेच सांगतो. विज्ञान हे मानवी विकासातील महत्वाचा टप्पा आहे. आज समाजाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जी क्रांती केलेली आहे ती आपल्या इतिहासकालीन वैज्ञानिक प्रयत्नांची फलश्रुती आहे. उद्याच्या समाजाकडून गौरवाचे शब्द ऐकायचे असतील तर भविष्यातील गरजा व अपेक्षांचे वेध घेणं क्रमप्राप्त असतं. दूरवरचा विचार करणाराच काहीतरी उपयुक्त करत असतो.
450 कोटी रूपये खर्चाच्या मंगळावर स्वारी करण्याची भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोच्या 2013 मधील मोहिमेला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवलेला आहे. त्यामुळे भारत आता या क्षेत्रामधील सहावा देश ठरलेला आहे. भारताने स्वारी केल्यानंतर तरी कडक मंगळाच्या फेर्यात अडकलेल्यांची सुटका होईल व त्यांना अडकवणार्यांची गच्छंती होईल अशी अपेक्षा धरायला हरकत नाही. परंतु या जर तर च्या गोष्टी आहेत. 2008 मध्ये भारताने चंद्रावर स्वारी केली व 2020 पर्यंत चंद्रावर भारतीय माणूस पाय ठेवणार आहे असं जरी असलं तरी आजही चंद्राशी निगडित संकष्टीमध्ये अडकलेला तथाकथित शिक्षित वर्ग यापासून मुक्त झालेला नाही हेही विसरून चालणार नाही. बदलायचं नाही असं ठरवलं तर मात्र नाईलाज आहे.
कडक मंगळ
मुलगा मुलगी पसंत नापसंतीनंतर सुरू होतो पत्रिका जुळविण्याचा खेळ. त्यामध्ये मंगळाची भूमिका फार महत्वाची असते. मंगळ कडक आहे की नाही हे सांगण्याचा अधिकार फक्त पंचांगवाल्यांचा. तो कसा ठरतो याची यत्कींचीतही कल्पना शिकलेले असो अथवा अशिक्षित दोघांनाही नाही. कडक मंगळ असेल आणि लग्न करण्याची इच्छाच असेल तर पुरोहित वर्ग काही मार्ग सांगतात. यात या वर्गाचा आर्थिक फायदा दडलेला असतो. मुलाला मंगळ असेल तर मात्र शांती केली की, मंगळदोष नाहीसा होतो. पण मुलीच्या बाबतीत मंगळ शांत होत नाही. मंगळाला कसे कळत असेल की, पुरोहिताने आपली शांती केली की, आपण आता शांत बसावे, पंचांगवालेच जाणोत. कडक मंगळ असणारा मुलगा शांती केल्यानंतर कुठल्याही मुलीशी लग्न करू शकतो. पण कडक मंगळ असलेल्या मुलीला ही मुभा नाही. तिला फक्त कडक मंगळवालाच मुलगा चालतो. अन्यथा विरोधात जाऊन लग्न केल्यास अपत्यसुख नाही. तेव्हा शिकणारे जास्त धोका पत्करायला नको म्हणून विरोध करणे टाळतात. मंगळ कडक असतो म्हणजे काय हे जाणून घेण्याची आच ना लग्न करणार्यांना! ना त्यांच्या पालकांना!

एक मात्र निश्चित की, कडक मंगळ आहे म्हणून मुलाचे पालक लग्नास नकार देतात. ज्यांना लग्न करायचे आहे अशा मुलांमुलींना पसंत नापसंतीचा अधिकार आमच्या महान संस्कृतीने दिलेला नाही. किती महान संस्कृतीचे वारसदार आहोत आम्ही! कडक मंगळाचा हा सर्व व्यवहार पंचांगवाले, भटजी किंवा पुरोहितांवर अवलंबून असतो. त्यामुळे भटजी सांगेल ते कर्मकांड करणे भाग पडते. डोके गहाण ठेवण्याचाच हा प्रकार.
जन्मपत्रिकेतील प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम, द्वादश यापैकी कोणत्याही एका स्थानात मंगळ आला तर कडक मंगळ असा शेरा पंचांगवाले मारतात. व्यक्तीच्या आयुष्यात अनंत अडचणी निर्माण करणारा आणि प्रगतीला मारक ठरणारा हा दोष पंचांगकर्त्यांचा की मंगळाचा? याचा विचार करणे गरजेचं आहे.
कडक मंगळ असलेल्या व्यक्तीची पत्रिका.(आकृती पहा) मंगळ चतुर्थ स्थानात आहे. 1(मेष) ते 12(मीन) अंक राशींचे अनुक्रमांक आहेत. प्रथम, द्वितीय…. यांना स्थान समजतात.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर कुंडलीतील एकूण बारा घरांपैकी वरील पाच घरांमध्ये मंगळ येण्याची शक्यता जवळपास पन्नास टक्के आहे. पण केवळ त्या घरात आला म्हणून तो व्यक्तींमध्ये काही दोष निर्माण करतो यावर विश्वास कसा ठेवायचा? चिकित्सकपणे विचार केला तर केवळ तीच घरे का निवडली याला काही आधार? अर्थात ही घरं काही स्वत: मंगळाने निवडलेली नाहीत, ती पंचांगकर्त्यांची कर्तबगारी. कोणताही ग्रह मानवामध्ये दोष निर्माण करायचा मोकळा आहे का? मुळात ग्रहांना भावना, विचार स्वातंत्र्य, शुभ, अशुभ इ. नाहीत हे आजही एकविसाव्या शतकात सांगावे लागते हेच दुर्दैव आहे.
पंचांगांमधील अनेक योग अथवा दोष बघितले तर ते महिला वर्गावर अन्यार करणारे आहेत. पण संस्कृतीच्या नावाखाली महिलावर्गच केवळ अज्ञानापोटी ते टिकवून ठेवत आहे असे खेदाने म्हणावे लागते. अर्थात पुरूषप्रधान संस्कृतीमुळे हे करावे लागते हेही तितकेच खरे आहे. मंगळदोष दूर करण्यासाठी शांती करावी लागते आणि त्यासाठी ब्राम्हणाची आवश्यकता असते. पृथ्वीवरील भारतातल्या एखाद्या गावात ब्राम्हणाने आपली शांती केलेली आहे हे मंगळाला कसे कळत असणार? त्या दोघांचा काही मोबाईल संपर्क होतो काय? होत असलाच तर भटजी महानच म्हणायला पाहिजे. अर्थात विचार केला तरच असे प्रश्न पडतात.
कडक मंगळाच्या बाबतीत आणखी काही धोरणात्मक निर्णय पंचांगवाल्यांनी घेतलेले आहेत. राज्यघटनेमध्ये घटनादुरूस्ती होते त्याप्रमाणे अधूनमधून ही घटनादुरूस्ती पंचांगवाले आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पंचांगामध्ये करत असतात. मुलगा आणि मुलगी दोघांच्याही कुंडल्यामध्ये कडक मंगळ असेल तर विवाह जमविण्यास हरकत नाही. फक्त त्यासाठी एक अट पूर्ण व्हावी लागते. एकाच्या कुंडलीत मंगळदोष असून जर दुसर्याच्या कुंडलीत प्रथम, चतुर्थ, पंचम, सप्तम, अष्टम, दशम, द्वादश यापैकी कोणत्याही एका स्थानी शनी असेल तर मंगळदोषाचा परिहार होतो. काय भन्नाट कल्पना आहे. एकाचा कडकपणा घालवण्यासाठी दुसर्याचा उपयोग, पंचांगवाले कोणाचा कसा वापर करून घेतील याचा अजिबात नेम नाही. आणि शनीला जर हे कळले की, मंगळाला शांत करण्यासाठी माझा उपयोग करतात तर तो गप्प बसेल काय? मुख्य म्हणजे पंचांगवाल्यांनी शनीची यासंदर्भात पूर्वपरवानगी घेतली होती का? आपल्या मर्जीनुसार ग्रहांना वापरून घेणे हे संस्कृतीचे गोडवे गाणार्यांना शोभत नाही.
आर्थिक फायदा करून घेण्यासाठी असली अतार्किक आकडेमोड सांगितली की, सर्वसामान्यांना काही कळत नाही. त्यांना फक्त लग्न जुळवून आणायचे असते एवढंच. मंगळ हा पापग्रह असून अनिष्ट असता तर नुकसानकारक आणि इष्ट असता राजवैभवासारखे अधिकार व्यक्तीस देतो असे फलज्योतिषवाले सांगतात. याची चिकित्सा करण्यासाठी फार डोकं लढवण्याची गरज नाही. शालेय जीवनातील अभ्यासाच्या आधारे सुद्धा ते करता येते.
मंगळ हा ग्रह आहे पृथ्वीपासून सरासरी साडेसात कोटी कि.मी.अंतरावर. या ग्रहाला भावना, दृष्टी नाही. त्याला सूर्याचा प्रकाश मिळतो आणि तिथून परावर्तीत होऊन पृथ्वीवर येतो. त्यामुळे सायंकाळी तांबड्या रंगाच्या चांदणीच्या स्वरूपामध्ये दिसतो. चांदणीसारखा दिसणारा मंगळ व्यक्तीला ओळखू शकेल काय? मंगळाला जर काही करता येत असतं तर मंगळावर पाठवलेले क्युरिऑसिटी यान मंगळाने स्वत:वर उतरूच कसे दिले हा प्रश्न उरतोच ना?