सांगलीमध्ये सुबराव पाटील, पवार गुरूजी व त्यांचे सहकारी ‘मराठा परिवार’ ही सामाजिक कार्य करणारी संस्था चालवितात. या संस्थेतर्फे मराठा समाजातील अनिष्ट व कालबाह्य प्रथा बदलण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जातो. विवाहातील कालबाह्य गोष्टी, मृत्यूनंतरचे कर्मकांड, पर्यावरणपूरक गणेश विसर्जन असे उपक्रम ही मंडळी गेली अनेक वर्षे राबवित आहेत. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. या परिवारातर्फे खालील निवेदन प्रसिद्धीस देत आहोत.
सध्या व्यक्तीच्या निधनानंतर मराठा समाजामध्ये दहा दिवसांचे सुतक पाळले जाते. परंतु सध्याच्या गतिमान आणि धावपळीच्या काळात दहा दिवसांचे सुतक पाळणे, तेराव्या दिवशी उत्तर कार्य करणे व चौदाव्या दिवशी गोड करणे गैरसोईचे व अडचणीचे झाले आहे. शिवाय वरील सर्व विधी करताना लोकांच्या मनाची फारच कुचंबना होत आहे. यातून मार्ग काढणेसाठी अभ्यासू लोकांशी चर्चा करून, अंतेष्ठीचे सर्व विधी तिसर्या दिवशी पूर्ण करणेचा निर्णय परिवारामार्फत घेणेत आला आहे. परिवाराचे सभासद गावोगावी जाऊन या संदर्भात समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत. याचाच परिणाम म्हणून सांगली जिल्ह्यातील बर्याच आणि कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील काही गावातील लोकांनी अंतेष्ठीचे विधी तीन दिवसात पूर्ण करणेचा निर्णय घेऊन त्याची कार्यवाही सुरू केली आहे.
अंतेष्टीचे सर्व विधी तीन दिवसांत पूर्ण करणेची आवश्यकता आणि धर्मशास्त्राची या बाबतीतील नोंद घेऊन मराठा समाजाच्या इतर संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही अंतेष्टीचे सर्व विधी रक्षा विसर्जन, सुतक, पिंडदान व उत्तरकार्य तीन दिवसांत पूर्ण करणेसाठी जनजागृती सुरू केली आहे. त्याचा परिणाम मराठा समाजामध्ये दिसून येत असून अंतेष्ठीचे सर्व विधी तीन दिवसांत करणेत येऊ लागले आहेत.
तीन दिवसांत अंतेष्टीचे सर्व विधी कसे पूर्ण करावयाचे याबाबतीत समाजातून विचारणा होत आहे. अंतेष्टीचे सर्व विधी तीन दिवसांत पुढीलप्रमाणे करावेत.
* तिसरे दिवशी शुर्चिभूत होऊन फक्त घरच्या व जवळच्या संबंधित लोकांनी रक्षाविसर्जनास जावे. सर्व रक्षा गोळा करून प्रदूषण वाढू नये म्हणून रक्षा नदी, ओढ्यात न टाकता अगोदर काढलेल्या शेतातील अगर सार्वजनिक ठिकाणच्या खड्यात घालून तेथे वृक्षारोपण करावे. * अन्नाची नासाडी टाळण्यासाठी प्रचलित पद्धतीचा नैवेद्य न दाखवता साधी भाजी-भाकरी, वरण-भात असा नैवेद्य असावा. * रक्षा विसर्जन सकाळी 10 वाजेपर्यंत करावे. * एक अस्थिकलश घरी आणावा. * पै पाहुणे, स्नेही, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांची घरी किंवा सोयीच्या ठिकाणी थांबणेची व्यवस्था करावी. आणलेला अस्थिकलश तेथे दर्शनास ठेवावा. * सकाळी 10.30 वाजता श्रद्धांजली वाहून प्रार्थना सभेचे आयोजन करावे. त्यावेळी संत तुकाराम महाराज यांचा ‘आम्ही जातो आमुच्या गावा।’ हा अभंग म्हणावा आणि त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम करावा.
–सुबराव पाटील(परिवार प्रमुख) फोन नं.(02346)255540
शिवाजीराव पाटील फोन नं.(0233) 2310514
एन.बी.धनवडे, बी.एम.खराडे-पाटील, ए.के.पाटील