Categories
पुस्तक परिचय

मराठी साहित्यिक दाभोलकरांचे विचार विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचविणार!

मार्च - २०१४

डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर साहित्य क्षेत्रही अस्वस्थ झाले. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार पुढे नेण्यासाठी मराठीतील नामवंत साहित्यिकांनी निधी संकलन करून डॉ. दाभोलकरांचे विद्यार्थ्यांना उपयोगी असणारे लेखन संजय भास्कर जोशी यांनी संकलित करून त्याची एक पुस्तिका तयार केली. या पुस्तिकेच्या पन्नास हजार प्रती राजहंस प्रकाशनने माफक दरात उपलब्ध केल्या. विद्यार्थ्यांना रूपये 5 या सवलतीच्या दरात या पुस्तिका मिळणार आहेत.

विज्ञान, विवेक आणि विद्यार्थी

सुखी होणे, आनंदी होणे हे तर आपल्या सर्वांचेच ध्येय असते. पण सुखी आणि आनंदी होण्याचा नेमका मार्ग मात्र सगळ्यांनाच माहीत असतो, असे नाही. नव्या युगात सुखी व्हायचे, तर भरपूर पैसे हवे असे काहींना वाटते. पण खूप पैसे असलेली कित्येक माणसे तर दु:खी असतात. पैसे तर हवेतच पण त्याचबरोबर असेही काहीतरी हवे, की ज्यामुळे आपण खर्‍या अर्थाने समाधानी होऊ. आपण, आपले कुटुंब आणि आजूबाजूचा समाज या सर्वांनी एकत्रितपणे सुखी-समाधानी व्हायचे, तर ते कसे?

डोळसपणे वैज्ञानिक दृष्टी ठेवून जगणे आणि नीतीमत्तेने वागणे यातच सर्वांचे अंतिम समाधान आहे; याचे ज्ञान विद्यार्थी दशेतच करून घ्यायला हवे. आजूबाजूला पसरलेल्या भयानक अंधश्रद्धा, बुवाबाजी, जाचक रूढी यातून मुक्तता करून घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत सुखी होता यायला हवे. आपला समाज आणि आपले पर्यावरण यांचा नैतिक आणि विवेकी दृष्टीने विचार करायला हवा.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे एक आधुनिक, पुरोगामी आणि विवेकवादी विचारवंत होते. सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि विवेकवादाचा अंगीकार केला, तर आपण सगळे अधिक सुखी-समाधानी होऊ, असा त्यांचा विचार होता. डॉ. दाभोलकरांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे ‘तिमिरातुनी तेजाकडे’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याच पुस्तकातील काही भाग तुम्हां विद्यार्थ्यांना आपले वैज्ञानिक आणि नैतिक विचार पक्के करायला फार उपयुक्त आहे असे वाटल्याने त्याच्या आधारे ही छोटी पुस्तिका तयार केली आहे.

विद्यार्थी मित्रांनो, मराठीमधल्या अनेक साहित्यिकांनी एकत्र येऊन ही चिमुकली पुस्तिका तुमच्यापर्यंत अल्प किंमतीत पोचवण्याचे काम केले आहे. त्या सर्वांची इच्छा आहे की, या पुस्तिकेत जे सांगितले आहे त्याचा विचार करा आणि आपले जगणे अधिक आनंदी आणि समाधानी करा. तीच खरी डॉ.दाभोलकरांना श्रद्धांजली. चला तर या छोट्याशा पुस्तिकेचा अभ्यास करा आणि मुख्य म्हणजे स्वत: विचार करायला सुरवात करा.

ऑल द बेस्ट

संजय भास्कर जोशी

दिलीप माजगावकर

(या पुस्तकाची प्रस्तावना)

पुस्तकाचे नाव : विज्ञान, विवेक आणि विद्यार्थी

संपादन : संजय भास्कर जोशी

लेखक : डॉ. नरेंद्र दाभोलकर

मुखपृष्ठ : रविमुकुल

किंमत – 25 रूपये, पृष्ठे – 40

प्रकाशक राजहंस प्रकाशन प्रा. लि.

1025, सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे. 30