Categories
रिंगणनाट्य

मतिमंद मुलगी व शोषण

सोलापूर गट
वार्षिकांक – २०१४

“मॅडम, गाणी आपणच लिहायची, रिंगणनाट्याची संहिताही आपणच तयार करायची, मग इथे शिबिरात काय शिकवणार?” शिबिराच्या पहिल्या दिवशी सहभागी मुलांमुलींच्या या प्रश्नाला नेमकं काय उत्तर द्यावं हे आम्हाला सुचेना. अतुल पेठेंची भन्नाट कल्पकता आणि कार्यक्षमता याविषयी आम्ही ऐकून होतो. पण लेखनातील अनुभवी किंवा फार तर किरकोळ स्फुट लेखन करणार्‍या आम्हा मंडळींकडून जाहीर सादरीकरण करण्याजोगी निर्मिती ते कशी करून घेणार हे कोडं आमच्याही मनात होतं.

सुरवातीला वाटेल त्या वस्तू वापरून गटागटाने फूल तयार करण्याचं आव्हान व अशा इतर उपायांनी आमची कल्पनाशक्ती चेतवली, फुलवली गेली. अंधश्रद्धेची कारणं, प्रकार, उपाय याचे तक्के आमच्याकडूनच करवून घेऊन आमचे विचार पक्के करण्यात आले. मग वेळ आली ती लिखाणाच्या परिक्षेत उतरण्याची!

आमच्या गटाला विषय मिळाला होता ‘जादूटोणा विरोधी कायदा’ असल्या रूक्ष विषयावर गाणं काय लिहिणार, कपाळ? हा आमच्या मनात प्रथम आलेला विचार. मग वेगवेगळ्या गाण्यांच्या चाली मनात घोळू लागल्या. “काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल रं दोस्ता” या चळवळीच्या गाण्याच्या चालीत ‘जादूटोणा विरोधी कायदा’ हे शब्द ओळीत चपखल बसतात याचा शोध शालिनी ओक यांना लागला आणि मग त्या अनुरोधानं शब्दांची पुढची झटापट सुरू झाली. हा कायदा नेमका काय आहे हे लोकांनी जाणून तरी घेतलंच पाहिजे या विचारातून ‘जरा जाणून घ्या ताई, दादा’ ही पुढची ओळ सुचली. त्यानी आमच्या काव्य(!) निर्मितीला गती आली. एकेका कडव्यात या कायद्याच्या एकेका कलमाची माहिती देत चार कडव्यांचं गाणं तयार झालं.(शिबिरानंतर शालिनीताईंनी उरलेल्या प्रत्येक कलमावर कडव्यांची भर घातली.)

रिंगणनाट्याची संहिताही अशीच प्रत्येकाच्या सूचना, चर्चा, काथ्याकूट होऊन तयार झाली आणि आमच्या निर्मितीनं आम्हीच चकीत झालो, हर्षित झालो. आम्हाला स्वत:चाचा शोध लागला होता.

मतीमंद मुलीला ‘देवी’ बनवून भक्तगणाकडून पैसे उकळणं आणि दुसरीकडे तिचं लैंगिक शोषण या गैरप्रकाराला जादूटोणाविरोधी कायद्यानं अटकाव करता येतो हे आम्ही आमच्या रिंगणनाट्यात दाखवलंय. आमच्या गटात नाटकात काम करणार्‍यांमध्ये महिलांचीच संख्या जास्त होती. 2-3 मुली आणि एकच तरूण मुलगा, एवढेच सहभागी. त्यामुळे संहितेत एकच पुरूषपात्र घालता येणं ही आमची मर्यादा होती. पण ही कसरत सांभाळून बर्‍यापैकी जमलं आणि अतुल पेठेंकडून फारशा काही सचूना, दुरूस्त्या न मिळता गाणं आणि रिंगणनाट्य संमतही झालं.

पुरूषपात्रांची कमतरता याखेरीज आमच्या नाटकाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे नायिका-मतिमंद मंदा हिच्या तोंडी संपूर्ण नाटकात एकही वाक्य नाही. पण नजर, चालण्याची ढब व एकंदर ‘बॉडी लँग्वेज’ यामधून मंदा ही धड ना शहाणी, धड ना वेडी अशी असल्याचं व्यक्त होणं आवश्यक होतं. मयुरा या मुलीनं ही भूमिका उत्तम वठवली आहे. तिच्या अनुपस्थितीत ‘फिझा’ ही देखील ती भूमिका तितक्याच समर्थपणे करते. एरवी ती मंदाची ‘आत्या’ समंजसपणे साकारते. मंदाच्या तुक्यामामाची भूमिका करणारा सूरज आणि नोकरीच्या अडसरामुळे त्याला येणं अशक्य झाल्यानंतर आलेला पराग हे दोघेही नाट्यक्षेत्रातीलच कलाकार असल्याने त्यांच्या अभिनयाने रिंगणनाट्याला चांगलाच उठाव मिळतो. ‘मंदा’ची आई साकारणार्‍या मधुरा सलवारू, सहकारी पोलिसाच्या भूमिकेतील उषा शहा, भक्तगणातील निशा भोसले, अंजली नानल या अनेक वर्षांपासूनच्या अंनिसच्या सक्रिय क्रियाशील असणार्‍या कार्यकर्त्या असल्याने त्या अनुभवाचा परिणाम भूमिकेतून विचार पोचवण्यात भरीवपणे होतो. कोणत्याही पात्राच्या अनुपस्थितीत(अगदी पुरूष पात्राच्याही) यात चौकडीतील कोणीही कोणतीही भूमिका सराईतपणे करू शकतात. भूमिकेला साजेशी शरीरयष्टी असणार्‍या स्नेहल पाटीलचा आत्मविश्वास आणि आवाजातील जरब यामुळे मी स्वत: नाट्यप्रकारात आणि अंनिसच्या प्रत्यक्ष कामात नवखी आहे. पण कधीतरी नाटकात काम करण्याची सुप्त इच्छा पूर्ण होत असल्याने एका भक्ताचं काम करताना मला मजा येते. आनंद मिळतो.

प्रत्येक ठिकाणी रिंगणनाट्य सादर केल्यावर लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो तो आमचा उत्साह वाढवणारा असतो. तरूणांकडून येणारा प्रतिसाद आम्हाला विशेष प्रेरित करतो. शाळा, कॉलेजमधील प्रयोगानंतर ‘तुमचे अंनिसचे सर्व कार्यक्रम इथे अवश्य आयोजित कराच” अशी शिक्षकवर्गाचं आणि मुख्याध्यापक/प्राचार्य यांचं आवर्जून सांगणं असतं. विद्यार्थ्यांना कार्यक्रम आवडल्याचं झोळी फिरवताना प्रत्येकाकडून ऐकायला मिळतं, त्यांच्या डोळ्यातही दिसतं आणि झोळीतही पडतं.

वस्त्यांमधून आमच्या प्रयोगाचं होणारं स्वागत आम्हाला समाजाभिमुख करणारं असतं. अशा वर्गात अंनिसच्या कार्यक्रमांची अधिक गरज असल्याचं आम्हाला जाणवतं; तर त्यांच्यातील अनेकांचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं काम आम्हाला समजतं. अज्ञानाचा अंधारही दिसतो आणि त्यांचा जगण्यातला संघर्षही. त्यांना कायद्याची जाणीव देताना, अंधश्रद्धा सोडण्याचं सांगताना त्यांनी आपुलकीनं केलेलं स्वागत पाहून आणि त्यांच्या समस्या कळून आम्हीही अनुभव समृद्ध होत जातो. एकंदरीत रिंगणनाट्यामळे आमचं जगणं अर्थपूर्ण होत चाललय असं आम्हाला वाटतं; आणि तेही गंभीरपणे नव्हे, तर चक्क एन्जॉय करत!

सुनीला बुद्धिसागर

लेखक संपर्क: 9975926956