कोणत्याही कुटुंबात मूल जन्माला आले की, त्या कुटुंबात एक उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण होते. त्या मुलाचे आईवडील आपल्या नवगत मुलाच्या भवितव्याविषयी स्वप्ने रंगवतात. आपल्या कुटुंबाचा भविष्यातील ‘आधार’ म्हणून त्या मुलाकडे पाहिले जाते. परंतु आपले मूल इतरांपेक्षा वेगळे आहे, त्याच्यात बौद्धिकदृष्ट्या काही कमतरता आहे, त्याची ‘समज’ कमी आहे असे त्याचे निदान झाल्यावर जेव्हा त्यांचे डॉक्टर सांगतात की, तुमचे मूल ‘मतिमंद’ आहे. तेव्हा साहजिकच पालकांना मोठा धक्का बसतो. त्यांनी या नव्या मुलाविषयी रंगवलेली भविष्यविषयक स्वप्ने भंग पावतात व यामुळेच पालक अत्यंत निराश होतात, कोलमडून पडतात.
पालकांना या विशेष मुलाबाबत त्वरीत सुयोग्य, शास्त्रीय असे मार्गदर्शन मिळत नाही. या मुलाच्या उपचाराबाबत शिक्षण-प्रशिक्षणाबाबत, त्यांच्या पुनर्वसनाबाबत शास्त्रीय मार्गदर्शन कोणीही करत नाही. यामुळे पालक स्वत:च्या समजुतीनुसारच व सभोवतालच्या काही लोकांच्या चुकीच्या सल्ल्यानुसार अशास्त्रीय व अंधश्रद्धायुक्त उपाय योजनांकडे वळतात. बर्याच पालकांवर धार्मिक पगडा असल्यामुळे ते त्या मुलावर धार्मिक उपचारही करतात. परंतु या उपायामुळे मुलावर सकारात्मक असा बदल दिसून येत नाही. व याच मुळे पालक अधिकच निराश होतात यामध्ये पालकांचा पैसा, वेळ व शक्ती निरर्थकपणे खर्च होते व अंती निराशाच पदरी पडते.
मी गेली पंचवीस वर्षे ‘विशेष शिक्षक’ म्हणून या मुलांच्या विशेष शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन कार्यक्रमात कार्यरत आहे. तसेच आर.सी.आय.मान्य पालक प्रशिक्षण वर्गाचे सुयोग्य संचलन केले आहे. त्यामुळे पालकांमध्ये आढळणार्या काही ठळक अंधश्रद्धा माझ्या निदर्शनास आल्या आहेत. त्यांचा परामर्श पुढीलप्रमाणे.-
मागच्या जन्माचे पाप
बर्याच पालक वर्गास असे वाटते की, आपण मागच्या जन्मात काही भयंकर पाप केले होते. त्यामुळेच आपल्या पोटी असे मूल जन्माला आले आहे. व यामुळेच पालकांमध्ये, त्यांच्या संवेदनशील मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते व यामुळेच अशा विशेष मुलांचे सुयोग्य पुनर्वसन करण्यासाठी जे योग्य असे प्रयत्न करावे लागतात त्यासाठी पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत नाही. कारण आपण मागील जन्माचे पापाचे प्रायश्चित्त भोगत आहोत व त्याला आता काही इलाज नाही अशी पालकांच्या मनाची धारणा होते. व यामुळेच पालकांची प्रयत्नवादी मानसिकता कमी होते. व ते नकळतच बुवाबाजी-अंधश्रद्धायुक्त उपायाला बळी पडतात.
औषधाने मतिमंदत्व बरे होते
मतिमंदत्व ही एक स्थिर व कायम टिकणारी अवस्था आहे. आणि ही अवस्था कोणत्याही औषधाने कमी होत नाही. हे आता गेल्या अनेक वर्षांच्या संशोधनाने सिद्ध झालेले आहे. परंतु समाजातील काही अशिक्षित व सुशिक्षित भोंदू लोक पालकांने असे सांगतात की, आमच्याजवळ असणार्या औषधांमुळे ‘मतिमंदत्व’ कमी झाले आहे, आम्ही अशी बरीच मुले चांगली केली आहेत, मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ केली आहे व यामुळे पालक या अंधश्रद्धामय विचारांवर विश्वास ठेवतात. व हजारो रूपये खर्चून काही जडीबुटींची औषधे किंवा काही औषधे, गोळ्या त्या मुलांना देतात पण ही एक अंधश्रद्धा आहे हे ते सोयीस्करदृष्ट्या विचारात घेत नाहीत व यामुळे मतिमंद मुलांमध्ये अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत व पालक अधिकच निराश होतात. दरम्यान यात पालकांचा पैसा, वेळ व शक्ती विनाकारण वाया जाते.

मुलाचा शांतीविधी करणे
सर्वसामान्य मुलाच्याबाबत पालक जे करतात तीच चूक पालक या ‘मतिमंद’ मुलांबाबत करतात. एखादे नॉर्मल मूल जर अभ्यासात मागे असेल किंवा त्यास वर्तनसमस्या असतील तर काही लोक त्याचा शांतीविधी करण्याचा सल्ला देतात व त्याचप्रमाणे या मतिमंद मुलाच्या बाबतही शांतीविधी करतात. अमूक एका ग्रहाची शांंती केली की, आपल्या मुलात सुधारणा होईल अशी अंधश्रद्धा पालक बाळगतात व या विधी कर्मासाठी हजारो रूपये नाहक खर्च करतात व अर्थातच पालकांचा यात भ्रमनिरास होतो.
मुलाचा विवाह करणे (मतिमंदत्वावरील एक अघोरी उपाय)
मुलाचे लग्न केल्यावर त्याच्यात फरक पडेल असे काही पालकांना वाटते. त्यांच्या सभोवतालचे लोक पालकांना असा सल्ला देतात. वास्तविक ‘मतिमंदत्व’ ही एक स्थिर व कायमस्वरूपी असणारी अवस्था आहे व ती मुलाच्या विवाहामुळे समूळ नष्ट होईल ही एक अंधश्रद्धाच आहे. कारण मतिमंद मुलाचे लग्न केल्यावर त्यास होणारी संतती मतिमंद होण्याची शक्यता जास्त असते असे संशोधनांती तज्ञांचे ठाम मत आहे. तसेच लग्नानंतरच्या जबाबदार्या मुलास पेलवणार नाहीत. उदा.होणार्या संततीचे पालनपोषण, कौटुंबिक खर्च भागवणे, परिणामकारक व योग्य प्रकारचे सहजीवन या यासारख्या अनेक जबाबदार्या पेलण्यास मतिमंद व्यक्ती सक्षम नसतात या सर्व बाबींचा विचार करता मतिमंद व्यक्तीचा विवाह करणे हे या समस्येचे उत्तर नव्हे.
औषधाने बुद्ध्यांक वाढतो
काही पालकांची प्राधान्याने मागणी असते की, आमच्या मुलाच्या बुद्ध्यांकामध्ये वाढ होण्यासाठी औषधे देण्यात यावीत. व अशी औषधे असतात असे समाजातील काही व्यक्तींनी त्यांना सांगितलेले असते. अर्थात बुद्ध्यांक वरचा असणे म्हणजे मुलाची सर्वांगीण प्रगती झाली आहे असा चुकीचा समज ते करून घेतात. कारण व्यक्तीमत्वाची अनेक अंगे असतात. केवळ बुद्ध्यांकावर व्यक्तीची प्रगती मापता येत नाही. तरी पण केवळ औषधाने बुद्ध्यांक वाढतो असा पालकांमध्ये गैरसमज असतो. वस्तुत: मतिमंद मुलाचे मानसिक वय त्याच्या शारीरिक वयापेक्षा कमी असते. त्यामुळे सर्वसामान्य मुलाच्या मानाने या मुलाचा बुध्यांक कमी असतो. या मुलांना योग्य असे विशेष शिक्षण, प्रशिक्षण दिल्यानंतरच त्याच्या अनेक कौशल्यांमध्ये वाढ होते ते नवनवीन कौशल्ये शिकतात त्यांचे वाढते शारीरिक वय व न वाढणारे मानसिक वय यामुळे पुढे पुढे या मुलांचा बुध्यांक कमी दर्शवला जातो. या तांत्रिक/शास्त्रीय बाबीही पालकांना समाजवून सांगायला हव्यात. तसेच पालकांना हे देखील समजावून सांगायला हवे की, मुलाच्या बुध्यांकाला आपण अतिरिक्त/अवास्तव महत्व न देता मुलांचे वर्तन कितपत समायोजित आहे, मुलाला रोजच्या जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये अवगत आहेत का? याकडे जास्त लक्ष द्यायला हवे.
मतिमंद मूल पदरी असलेल्या पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बर्याचवेळा समाजात त्यांची कुचंबणा होते. आपल्यानंतर या मुलाकडे कोण लक्ष देणार त्याचे कसे होणार याची काळजी सतत पालकांना सतावत असते. या आगतिकतेच्या मानसिकतेच्यापोटी पालक आपल्या मुलाच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी स्वत:ला सुचेल तसे व समाज सुचवेल तसे अशास्त्रीय व अंधश्रद्धा आधारित उपायांच्या मागे धावतात व सरतेशेवटी पालकांचाच वेळ, पैसा व शक्ती नाहक खर्च होते व त्यांच्या पदरी फक्त निराशाच येते. व यामुळे ‘मतिमंद’ मूल योग्य त्या उपचारापासून व विशेष शिक्षणापासून वंचित राहते. यासाठी पालकांनी या मुलांच्या ‘विशेष शाळेत’ संपर्क साधून व शाळेने अशा पालकांना एकत्रित करून त्यांना शिबीराद्वारे, कार्यक्रमाद्वारे त्यांचे सुयोग्य प्रबोधन केले तर अनेक पालकांची शक्ती, वेळ, पैसा वाचून मतिमंद मुलाचे पुनर्वसन योग्य प्रकारे होईल असे वाटते.
– सुभाष कळसे