काही दिवसांपूर्वी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या दोनशेव्या प्रयोगाला गेलो होतो. नाटकाच्या प्रयोगानंतर आयोजित केलेल्या चर्चेत भाग घेताना प्रसिद्ध नाटककार शफाअत खान म्हणाले, ‘हे नाटक मला महत्वाचं वाटतं, कारण ते आपल्या मेंदूला त्रास देतं. अलिकडे मेंदूला त्रास देणारी नाटकं पहायला मिळत नाहीत. प्रेक्षकांना शरीराला गुदगुल्या करणारी नाटकं आवडतात.
अलिकडच्या काळात निरनिराळे बाबा, गुरू, स्वामी, बापू यांचे वाढत चाललेले प्रस्थ आणि त्यांच्या भोवती गोळा होणारी गर्दी; किंवा वास्तुशास्त्र, ज्योतिष असल्या(तथाकथित) शास्त्रांवर लोकांचा वाढता विश्वास, या सर्व गोष्टी याच, मेंदूला त्रास न देण्यचाया, प्रवृत्तीचे प्रतिबिंब आहेत. या सार्या प्रकारांत आर्थिक परिस्थितीने गांजलेली, अज्ञानी, भोळीभाबडी माणसे जशी आणि जितकी असतात तशीच आणि तितकीच सुखवस्तू घरांतली, शिक्षित, शहाणीसुरती माणसेदेखील असतात. त्यातल्या काहींना या खटाटोपातला फोलपणा समजण्याइतका अनुभव आलेला असतो. एखाद्या बाबाने सांगितलेल्या सर्व गोष्टी केल्यानंतरही अपेक्षित फळ मिळालेले नसते. तरीही ही माणसे हा मार्ग सोडत नाहीत: त्याच वाटेने जात राहतात. शहाणी वाटणारी ही माणसे असे का करतात? कारण आलेल्या अनुभवाने बुद्धी वापरून विश्लेषण ती करत नाहीत. त्यातून काही शिकण्याची त्यांची तयारी आणि इच्छा नसते, असे म्हणणे प्राप्त आहे. एरवी ‘कोणत्या बँकेत पैसा गुंतवणे अधिक लाभदायक आहे’ इथंपासून ते ‘मुलांच्या पुढील करिअर आणि आयुष्याच्या दृष्टीनं कोणता अभ्यासक्रम अधिक उपयुक्त आहे’ अशा रोजच्या जीनांतल्या महत्वाच्या प्रश्नांवर शक्य तेवढी माहिती मिळवून, विश्लेषण करून, मगच योग्य तो निर्णय घेणारी ही माणसे या एका बाबतीत मात्र बुद्धीचा, स्वत:च्या विश्लेषण क्षमतेचा वापर करत नाहीत. जीवनातला हा एक कप्पा(श्रद्धेचा?) त्यांनी बुद्धीच्या वापराकरता बंद केलेला असतो.
जीवनव्यवहारातल्या अन्य क्षेत्रांप्रमाणेच याही बाबतीत लोकांनी तर्कशुद्ध विचार करावा, असे आवाहन परिवर्तनाच्या चळवळीतले अनेक कार्यकर्तेसातत्याने लोकांना करीत असतात. परंतु बर्याच वेळा लोक त्यांचे ऐकत नाहीत यासाठी त्यांच्याकडे बहुधा दोन युक्तिवाद असतात. ‘हा आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे आणि श्रद्धेला बुद्धिवादी पद्धतीने समजून घेता येणार नाही; तेव्हा असले काही आम्हाला सांगू नका’, हा एक आणि ‘देशातले मोठे राजकीय नेते आणि काही वैज्ञानिक, प्राध्यापक, हे सगळे या बाबांच्या दर्शनाला येतात, त्यांचे आशिर्वाद घेतात. ही सगळी मोठी मंडळी काय मूर्ख आहेत?’ हा दुसरा. यापैकी पहिल्या युक्तिवादाचा प्रतिवाद करून ‘श्रद्धेची आणि अंधश्रद्धेची चिकित्सा करता येते आणि वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून केलेल्या अशा चिकित्सेतून आपल्या विचारांना योग्य दिशा मिळू शकते’ हे दाखले आणि उदाहरणे देऊन मांडता येते, आणि अंधविश्वासातला फोलपणा पटवून देता येतो. पण दुसरा युक्तीवाद मात्र या कार्यकर्त्यांसाठी मोठाच अडचणीचा असतो. विशेषत: देशातले काही मोठे, राष्ट्रीय(आणि काही वेळा आंतरराष्ट्रीय देखील) किर्ती मिळवलेले वैज्ञानिक जेव्हा एखाद्या बाबाचा किंवा स्वामीचा आशीर्वाद घेण्यासाठी जातात, किंवा मुहुर्त, ज्योतिष, वास्तुशास्त्र असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि त्यांची उघडपणे किंवा प्रच्छन्नपणे भलावण करतात, तेव्हा कार्यकर्त्यांची पंचाईत होते. कारण तो कार्यकर्ता या असल्या कृतकशास्त्रांमधला(pseudo-science) भंपकपणा वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून दाखवून देत असतो. आणि दुसर्या बाजूला विज्ञान-संशोधनाच्या आपल्या कामामध्ये सतत वैज्ञानिक पद्धतच वापरणारे वैज्ञानिक मात्र या असल्याच शास्त्रांची भलावण करत असतात! त्यांच्या व्यवहारातल्या(किंवा वर्तनातल्या) या विसंगतीची कारणमीमांसा अनेक कार्यकर्त्यांना नीटपणे मांडता येत नाही.
मी तीस वर्षे मुंबईतील एका प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या विज्ञान-संशोधन संस्थेमध्ये संशोधन शास्त्रज्ञ म्हणून काम केले. अशा संस्थेत काम करणारे वैज्ञानिक आपल्या जीवनव्यवहारात विज्ञाननिष्ठ असावेत असे आपल्याला (स्वाभाविकपणेच) वाटते. परंतु वस्तुस्थिती तशी नसते. आमच्या विभागात(आणि अन्य विभागांतसुद्धा) अनेक वैज्ञानिक शुभअशुभ, मुहूर्त, ज्योतिष, इत्यादी गोष्टींवर विश्वास ठेवणारे होते. अन्य काही वैज्ञानिक तर सत्यसाईबाबांचे भक्त होते. सत्यसाईबाबा मुंबईत आले की यातले काही त्यांच्या दर्शनाला जात. या त्यांच्या अवैज्ञानिक वर्तनाचे प्रतिबिंब त्यांच्या प्रयोगशाळेतल्या कामातही पडत असे. आमचे एक सहकारी वैज्ञानिक नवीन प्रयोगाची सुरवात आठवड्यातल्या गुरूवारीच करत. गुरूवार हा चांगला(शुभ) वार असल्यामुळे गुरूवारी सुरवात केली तर प्रयोग कोणतेही अडथळे न येता शेवटपर्यंत पार पडतो अशी त्यांची धारणा होती. एकदा मी त्यांना म्हणालो की, “तुम्ही वैज्ञानिक आहात. गुरूवारीच सुरू केलेला प्रयोग नीट पार पडतो, हा तुमचा सिद्धांत वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करायचा असेल, तर आठवड्यातल्या अन्य दिवशी प्रवेश सुरू करून त्यांत अडचणी येतात का ते तपासावे लागेल. आणि एका विशिष्ट प्रयोगसंख्येनंतर मिळालेल्या सर्व माहितीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करून मगच तुम्हाला निश्चितपणे निष्कर्ष काढता येईल.” यावर ते म्हणाले, “विषाची परीक्षा कशाला घ्या? त्यापेक्षा जे आहे ते बरे आहे.” या सगळ्यांतला अंतर्विरोध हा आहे की, प्रयोगाची मांडणी करताना, तो सुरू करून त्यातल्या नोंदी करताना हे वैज्ञानिक पूर्णपणे विज्ञाननिष्ठ असत, पण प्रयोगाची सुरवात मात्र त्यांना गुरूवारीच करायची असे. म्हणजे प्रयोगशाळेत वैज्ञानिक आणि एरवीच्या जीवनात श्रद्धाळू, अशी त्यांनी आपल्या जीवनव्यवहाराची सोयीस्कर वाटणी करून टाकली होती, आणि या दोहोंमध्ये काही विसंगती आहे हे त्यांना जाणवतसुद्धा नव्हते.
असे अनेक वैज्ञानिक आहेत जे या विसंगतीसकट सुखेनैव जगत असतात. विज्ञान म्हणजे त्यांच्या दृष्टीने निसर्गनियमांचे ज्ञान करून देणारी एक ज्ञानाची शाखा असते. ते पेशाने वैज्ञानिक असतात, कारण त्यांनी विज्ञानसंशोधनाचे क्षेत्र आपल्या करिअरसाठी निवडलेले असते. पण विज्ञानसंशोधनाचा पाया म्हणजे विज्ञानाची पद्धत आहे. (method of science) आणि हीच पद्धत वापरून आपल्याला आपल्या जीवनातले अन्य प्रश्न सोडवता येतात हे त्यांना उमजलेले नसते. निसर्गनियमांचे स्वरूप समजून घेण्यासाठी निरीक्षणे करणे आणि आवश्यक असेल तेव्हा प्रत्यक्ष प्रयोग करणे, आणि या सगळ्यातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून त्याच्या आधारे निष्कर्ष काढणे ही विज्ञानाची पद्धत आहे. आणि माणसाने अगदी आदिमानवाच्या अवस्थेपासून ते आजपर्यंत याच पद्धतीच्या आधारे आपल्याला पडणार्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढली आहेत. माणूस हे करू शकला, कारण जीवशास्त्रीय उत्क्रांतीच्या ओघात माणसाच्या मेंदूच्या आकारमानात आणि ज्ञान मिळविण्याच्या क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ झाली.
उत्क्रांतीच्या ओघात झालेल्या बदलांमुळे माणसाला मिळालेल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर रोजच्या जीवनात लोकांनी करावा हे लोकांना समजावून सांगणार्या अनेक कार्यकर्त्यांपैकी चंद्रसेन टिळेकर हे अग्रगण्य मानावेत असे कार्यकर्तेआहेत. गेली अनेक वर्षे ते व्याख्याने, पुस्तके आणि वर्तमापत्रांतले किंवा अन्य नियतकालिकांमधले लेखन; चर्चा-परिसंवाद यामध्ये सहभाग अशा विविध माध्यमांतून लोकांशी संवाद साधताहेत. या प्रयत्नांना लोकांकडून काही वेळा सकारात्मक प्रतिसाद मिळतो, तर बर्याच वेळा त्यांना नकारात्मक प्रतिसादाला तोंड द्यावे लागते. तरीही अथकपणे, न कंटाळता लोकांच्याकडे उपजतच असलेल्या शहाणपणाची त्यांना जाणीव करून देण्याचे काम ते निष्ठेने करताहेत. ‘कुंभार व्हा, गाढवांना तोटा नाही!’ हे त्यांचे पुस्तक याच प्रयत्नांचा भाग आहे. या पुस्तकातल्या कथांसाठी आणि लेखांसाठी त्यांनी विनोदी, उपरोधपूर्ण लेखनशैली वापरलेली असली, तरी वाचून केवळ हसण्यावारी सोडून देण्यासाठी लिहिलेले हे लेखन नव्हे. या लेखनापाठीमागे प्रबोधनाचा हेतू आहे आणि त्यामुळे या संग्रहातल्या सर्वच लेखांना एक गंभीर आशयाचा अंत:प्रवाह आहे.
चंद्रसेन टिळेकर यांच्या आधीच्या लेखनाप्रमाणे हेही लेखन वाचकांना आवडेल. टिळेकर यांच्या प्रस्तुत लेखसंग्रहात स्वामी, बाबा, गुरू यांच्याबरोबर राजकीय पुढारी, आमदार यांच्या सदोष वर्तनाची खिल्ली उडवणारे लेखदेखील आहेत.
–हेमू अधिकारी
पुस्तकाचे नाव : ‘कुंभार व्हा, गाढवांना तोटा नाही!’
लेखक : निलिमा टिळेकर/चंद्रसेन टिळेकर
प्रकाशक : मीना कर्णिक, अक्षर प्रकाशन
किंमत : 130 रू.