दरवर्षी अक्षयतृतीयेच्या दिवशी कोपरगाव तालुक्यातील संवत्सर व कोकणठाण या दोन गावांच्या शिवेवर गोदावरी पात्रात गोफण धोंड्याची लढाई होत असे. ही लढाई खेळली नाही तर पाऊस पडत नाही, अशी लोकांची धारणा होती. त्यामुळे वर्षानुवर्षापासून या प्रथेचे पालन होत होते. दोन्ही गावचे लोक नदीपात्राजवळ जमून एकमेकांवर गोफणीद्वारे दगडांचा वर्षाव करत. यात अनेकजण गंभीर जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच इतर मालमत्तेचेही नुकसान होत असे. ही जीवघेणी प्रथा बंद व्हावी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे, विजय चव्हाणके यांनी गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला होता. कोपरगाव पोलीस व तहसीलदार यांना निवेदन देऊन प्रसारमाध्यमांच्या मदतीने ही प्रथा बंद करण्यासाठी वेळोवेळी विनंती व प्रबोधन केले होते. मागील वर्षी डॉ.दाभोलकरांनी ही प्रथा बंद करण्यासाठी प्रशासनासोबत प्रबोधन परिषद घेण्याचे जाहीर केले होते. पोलिसांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला होता. दोन वर्षांपूर्वी विजयी पक्षाने युद्धाचे नियम मोडून, उन्मादाने, पराभूत पक्षाच्या शेती, घर, वीटभट्टी आदींचे नुकसान केले होते. प्रवाशी बस लुटण्याचा प्रयत्नही झाला होता. क्रौर्याला शौर्य समजण्याच्या मानसिकतेमुळे विध्वंसक प्रवृत्ती वाढली होती. त्यामुळे काहींनी पोलिसांत धाव घेतली होती. पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील यांना अंनिसबद्दल आपुलकी आहे. पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी युद्धाच्या आदल्या दिवशी दोन्ही गावांतील लोकांची बैठक घेतली. प्रबोधन व प्राप्त तक्रारींवर चर्चा करत त्यांनी कालसुसंगत नसलेली प्रथा बंद करण्याचे आवाहन केले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे ही प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न झाले. दिवसेंदिवस या प्रथेचे तोटे ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनीच सहमतीने ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. दोन गावांनी गोफणधोंडा लढाई कायमची ‘तह’कूब करत प्रथेला तिलांजली देण्यात आली. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी लक्ष्मण साबळे, भाऊसाहेब कासार, मधुकर साबळे, राजेश परजणे आदींनी ‘गोफण धोंडा’ बंद करण्यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. प्रसारमाध्यमांनी या घटनेने ‘महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांचे आणखी एक पाऊल’ असा उल्लेख करीत अंनिसच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
काय होती गोफणधोंडा युद्धाची प्रथा?
दक्षिणकाशी समजल्या जाणार्या गोदावरी काठावर वसलेल्या संवत्सर व कोकणठाण या दोन गावांत दगड युद्धाची प्रथा आहे. गोफण या अस्त्राने प्रतिपक्षास वेगाने दगड मारले जातात. या प्रथेला पौराणिक आधार असल्याचे गावकरी सांगतात. शृंगऋषीच्या येथील आश्रमात एकदा देव व दानव भोजन करण्यास बसले होते. त्यावेळी अचानक पाऊस सुरू झाला. मग सर्वांनी इंद्रदेवाला पाऊस थांबविण्याचे साकडे घातले. इंद्रदेवाने पाऊस थांबविला; मात्र पुन्हा पाऊस पडणार नाही, असा शापही दिला. सर्व ऋषींचे भोजन झाल्यावर ऋषींनी इंद्रदेवाकडे उ:शाप मागितला. त्यावेळी इंद्रदेवाने कोकणठाण व संवत्सर या गावात अक्षयतृत्तीयेपासून पाच दिवस गोफण धोंडा युद्ध खेळले तरच पाऊस पडेल, असे सांगितले. तेव्हापासून गावकरी हे युद्ध खेळत आहेत. युद्ध खेळले नाही तर त्या वर्षी दोन्ही गावात पाऊस पडत नाही अशी अंधश्रद्धा त्यांच्यात होती. त्यामुळे पीकपाण्याच्या भीतीने ही प्रथा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात असे. अशी अनोखी मध्ययुगीन प्रथा पाहण्यास दुरून लोक येत असत. अक्षयतृत्तीयेनंतर पहिला दिवस लहान मुलांचा असे. दोन्ही गावातील लहान मुले नदीपात्रात समोरासमोर येत एकमेकांवर ओरडत व हुर्योकरत. खरे तर योद्धे होण्याची ती तयारी असे. दुसरा दिवस तरूणांचा. त्या दिवसापासून युद्धाची खरी सुरवात होत असे. चामड्याने बनविलेल्या गोफणीत नदीपात्रातील दगडगोटे ठेवून शत्रूपक्षावर वेगाने भिरकावले जात. त्यामुळे योद्धे रक्तबंबाळ होत असत. जखमी झालेल्या योध्यांना संवत्सरचे ग्रामस्थ म्हसोबाच्या मंदिरात, तर कोकमठाणच्या योध्यांना लक्ष्मीआईच्या मंदिरात आणून टाकत असत. त्यांच्या जखमांवर(अंगारा) लावला जात असे. त्यामुळे ते बरे होतात अशी त्यांची(गैर)समजूत असे. मात्र अनेकांच्या अंगावर कायमच्या जखमा व कपाळावर टेंगुळ असल्याचे आम्हाला दिसून आले. डोळ्यांना जखमा झालेल्याशी आम्ही चर्चा केली. एका बाजूने कोपाची भीती तर दुसर्या बाजूने आपल्या मुलांना असे व्यंग होऊ नये असं वाटणं, अशा द्विधा मन:स्थितीत काही गावकरी होेते. तिसर्या दिवसांपासून खरे अनुभवी व सर्वच गावकरी युद्धात सहभागी होत असत. अचुक नेमबाजी ही येथील योध्यांची खासीयत. प्रतिपक्षावर हल्ला करून त्यांना दूरवर पिटाळून लावले जाई. नदीपात्रातील लढाई रस्त्यावर आल्यानंतर पराभूत पक्षाच्या शेती, घर, पाण्याच्या मोटारी, वीटभट्टी आदीचे नुकसान केले जात असे. हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर होत होता, हे विशेष! प्रथेच्या भीतीने नुकसान झालेल्यांनी तक्रार करण्याची शक्यता नव्हती. पराभूत पक्षाने पांढरे निशाण दाखवल्यावर युद्ध थांबविण्याचा संकेत होता. परंतु अगोदरच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हा नियम अलिकडच्या काळात पाळला जात नसे. वैयक्तिक हेवेदाव्यामुळे खुन्नस काढण्याची प्रवृत्ती काही लोकांत वाढीला लागली होती. पाचव्या दिवशी सत्यनारायणच्या पुजेने सांगता होत असे. दोन वर्षांपूर्वी प्रवाशी आरामगाडीवर दगडफेक करत लूटमारीचा प्रयत्न झाला होता. गेल्या वर्षीचे कोपरगावचे पोलीस निरीक्षक मधुकर औटी हे अंनिसचे हितचिंतक होते. मागील वर्षी आम्ही नुकसान झालेल्यांशी बोलून प्रथा बंद करण्याच्या तयारीत होतो. पोलिसांची सुद्धा इच्छाशक्ती होती. मात्र उपलब्ध वेळेच्या अपुरेपणामुळे तेव्हा ते शक्य झाले नाही. परंतु प्रथा बंद करण्यासाठी एकत्रित बैठक घेण्याची तयारी पोलिसांनी दाखवली होती. त्यानुसार या वर्षी मात्र ही प्रथा बंद झाली. सध्या राज्यातील अनेक जातपंचायती बरखास्त होत आहेत. सामाजिक परिवर्तनाची एक नवी पहाट उजाडत असताना हा निर्णय आश्वासक व उभारी देणारा आहे. या वर्षी अक्षयतृत्तीयेनंतर दोन्ही गावातील तरूणांनी नदीपात्राची स्वच्छता केली. अंत्यविधी झाल्यानंतर पडलेल्या वस्तू, देवाचे खराब झालेले फोटो, कचरा आदी एकत्रित केले. बाबा आमटे यांनी म्हटल्याप्रमाणे हात हे उगारण्यासाठी नसून उभारण्यासाठी असतात, हे या तरूणांनी कृतीतून दाखवून दिले. हे निश्चितच अभिनंदनीय आहे. खरे तर या पाच दिवसांत दोन्ही गावातील लोकांनी एकत्र येऊन सामाजिक हिताचा लोकोत्सव साजरा करावा, अशी इच्छा महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी कोपरगाव भेटीत व्यक्त केली. लवकरच अंनिसच्या वतीने दोन्ही गावात कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
–कृष्णा चांदगुडे