मुंबई! भारताची औद्योगिक व व्यापारी राजधानी असलेले जगातील एक प्रमुख शहर! विविध भाषा, विविध चालीरिती, विविध कला, विद्या व संस्कृतींचा बोलबाला असणारे शहर! गगनचुंबी इमारतीद्वारे वैभवाचे प्रदर्शन करणारे शहर. पण धारावी सारख्या आशियातील झोपडपट्टीद्वारे दारिद्र्याचे दर्शन घडवणारे हेच शहर! अशा विविध कारणासाठी दररोज बातमीत झळकणार्या या शहरात काही दिवसांपूर्वी एक बातमी झळकली. अंदाज करा पाहू? कशाची ही बातमी असेल? बाँबस्फोटाची की जातीय दंगलीची? राजकीय भ्रष्टाचाराची की जागतिक किर्तीच्या कलाकारांच्या कार्यक्रमाची? पण यापैकी कशाचीच ती बातमी नव्हती. सुशिक्षित, विद्वान, कलावंत, किर्तीवंत यांनी गजबजलेल्या या शहरात म्हणे ‘मंकी मॅन घुसला!’ आणि मुंबईमधल्या काही उपनगरातील लोकांची या मंकी मॅनच्या आगमनाने झोप उडवून दिली. मुंबईकर अफवांना भीक घालणारे नाहीत अशी आमची समजूत ‘मंकी मॅन’ अफवेने खोटी ठरविली. अफवावर विश्वास ठेवण्यात मुंबईकर इतरांपेक्षा कुठेच कमी नाहीत हे जगाला कळून चुकले. कोण होता हा मंकी मॅन? कसा होता तो? तो काय करत होता?
हा ‘मंकी मॅन’ अस्तित्वात नव्हताच मुळी! तो नव्हताच मग तो कसा होता हा प्रश्न उरत नाही व तो काय करीत होता हा प्रश्नही अर्थहीन ठरतो. मग ‘मंकी मॅन’ घटनेने मुंबईत एवढी खळबळ कशी उडाली?
अफवेची सुरवात
कांदिवली पश्चिमेकडील तुळसकरवाडीत एका रात्री अशा ‘मंकी मॅन’ला प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा दहावीत शिकणार्या एका विद्यार्थिनीने केला. रात्री साडेआठच्या सुमारास खिडकीजवळ अभ्यास करीत असताना एक धिप्पाड काळीकभिन्न दिसणारी व्यक्ती आपण पाहिली व तिने आपल्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण आपण कशीबशी सुटका करून घेतली असे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर ही व्यक्ती पळून गेली असा तिचा दावा होता. पण पोलिसांनी ही अफवा असल्याचे सांगून याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला. असंतुलित व्यक्तीमत्वाची मुले कधी कधी आम्हाला भूल देऊन पळवून नेले अशा थापा मारतात. संमोहित केल्याची भाषा करतात. असाच हा प्रकार असण्याची दाट शक्यता आहे. अभ्यासात मन लागत नसलेली मुले आपल्या घरातच गूढ प्रकार करतात किंवा गूढ घटनांचे वर्णन करतात. या मुलीच्या भ्रमाचे हे किंवा अन्य काही कारणही असू शकते.
अफवा कशी पसरली?
एक वेळ सुरवात झाली की, थांबेल ती अफवा कसली? काडी टाकल्यावर डोंगरातील गवत पेटत जाऊन वणवा पसरू लागतो तसेच अफवेच्या बाबतीत घडते. मग अतिशयोक्तीपूर्ण वर्णने, चविष्ट बातम्या, न पाहिलेली दृश्ये यांना ऊत येतो. हा ‘मंकी मॅन’ आदिवासी जमातीचा असून कुणीतरी त्याच्या बायकोची हत्या केल्याने तो दुखावला आहे. त्याची उंची 10 ते 12 फूट आहे अशाही बातम्या पसरवल्या गेल्या. बायकोच्या खुन्याला तिकडे जंगलात शोधायचा सोडून तो आदिवासी इकडे मुंबईत कशाला तडफडेल? पण असा विचार कोण करतंय? अफवा पसरविण्यात व त्यात आपल्या कल्पनेने भर टाकण्यात माणसाइतका भित्रा प्राणी अन्य कोणी नसेल हेच वास्तव याही घटनेत दिसून आले.
चड्डी बनियन गँग
‘मंकी मॅन’च्या अगोदर ‘चड्डी बनियन गँग’च्या अफवेने भांडुप-कांजूरमार्ग परिसरात सुरवात झाली. चट्टेरी पट्टेरी अर्धी चड्डी आणि पांढरा बनियन असा पोशाख केलेली काही धिप्पाड माणसे मुंबईत घुसली आहेत व ती दरोडेखोर असून घरात घुसून लूटमार करतात अशी चर्चा सुरू झाली. या गँगचे किस्से रंगवून सांगितले जाऊ लागले. हे ‘चड्डी बनियन’वाले अंगाला ग्रीस लावून फिरतात, त्यांना कोणत्याही छपरावर किंवा खिडकीवर सहज चढता येते. इथपासून ते हे लोक नरभक्षक आदिवासी आहेत अशाही वावड्या उठल्या. अखेरीस या सर्व अफवांचे रूपांतर ‘मंकी मॅन’पर्यंत येऊन ठेपले.

भयभीत समाज
‘मंकी मॅन’ व ‘चड्डी बनियन गँग’च्या भीतीने बोरिवलीपासून भांडुपपर्यंत उपनगरात घबराट पसरू लागली. लोक रात्रभर घराबाहेर राहून जागता पहारा देऊ लागले. यात सुशिक्षित, पॉश टॉवरवालेही मागे राहिले नाहीत. रात्रपाळी करून घरी येणारे या गस्तवाल्यांच्या भीतीने रात्री घरी येण्याऐवजी कंपनीतच राहू लागले. न जाणो आपणालाच दरोडेखोर समजून मारून टाकले तर?… या भीतीने! आणि अशा काही घटना घडल्याही. गस्तवाले गल्ली बोळांतून जाणारा कोणी अनोळखी इसम दिसला तर त्याला मारहाण करण्याइतपत मजल जाऊ लागली. मंकी मॅन अफवेच्या अगोदर काही दिवसांपूर्वी वसई-विरार परिसरात दोन कारचालक रस्ता चुकले आणि भलत्याच गावात शिरले. तिथे त्यांना मुले पळवणारी टोळी समजून लोकांनी बेदम मारहाण केली ही मारहाण एवढी अमानुष होती की, दोघांना प्राण गमवावे लागले. नंतर पोलीस आले व तपास सुरू झाला.
कांदिवलीमधील विद्यार्थिनीमुळे ‘मंकी मॅन’ अफवा, परिसरातील रहिवाश्यांमध्ये पसरू लागली. लोक रात्री एकत्रित पहारा देऊ लागले. त्याच दिवशी सायंकाळी एका महिलेने ‘मंकी मॅन’ दिसल्याचा दावा केला. ही बातमी तिने आपला मुलगा नरेंद्र याला फोन करून सांगितली. तो लगबगीने घरी परतत असताना त्याची मोटारसायकल एका ट्रकला धडकली त्यात तो ठार झाला. त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता ‘मंकी मॅन’ ला पकडण्यासाठी बाहेर पडलेला राजेश चव्हाण पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाला. 12 फेबु्रवारी रोजी आपल्या भावाला भेटण्यासाठी गेलेल्या रवींद्र मोरे याला चड्डी बनियन टोळीचा सदस्य समजून मारहाण करण्यात आली. 8 फेबु्रवारी रोजी एका मतीमंद मुलाला चोर समजून लोकांनी मारहाण केली. ‘मंकी मॅन’ची अफवा अशा तर्हेने अनेक निरपराध लोकांच्या बळीला वा त्रासाला कारण ठरली.
अतिरिक्त आयुक्त रामराव पवार व पोलीस यंत्रणा मंकी मॅन ही अफवाच आहे असे लोकांना समजावून सांगत होते. पण अफवा केवढे अराजकसदृश्य वातावरण निर्माण करू शकते याचे मुंबईतील मंकी मॅन हे उदाहरण ठरावे. मंकी मॅन प्रत्यक्ष दिसल्याचा पोलिसांना कोणताही पुरावा मिळालेला नाही. काही लोक त्याला पाहिल्याचे सांगतात मग तो पोलिसांना का दिसत नाही? असुरक्षिततेच्या अतिरेकी भयापोटी लोक पोलिसांचा आदेश धुडकावून पहारा देणे, गस्त घालणे, निरपराध लोकांना मारहाण करणे असे प्रकार करत असतील तर ते अक्षम्य आहे. मग माणूस आणि माकड यांच्यात काय तो फरक राहिला? अकारण भीतीपोटी समाजाने खुळचटपणाचे आचरण करणे एकूण सामाजिक शांततेच्या मुळावर येते याचा मुंबईकरांनी घेतलेला हा अनुभव तसा नवीन नाही. अशा घटना अधूनमधून घडून गेल्यात हे वास्तव आहे.
मंकी मॅन मॅनिया
मुंबईमधील ‘मंकी मॅन’ वेडाची लहर(Mania) ही एकमेव घटना नाही. दिल्लीतही असाच ‘मंकी मॅन’ अवतरला होता हे आपणास माहीत आहे का? मे 2001 च्या पहिल्या तीन आठवड्याच्या काळात दिल्लीच्या परिसरात अशाच ‘मंकी मॅन’ ने दिल्लीकरांना घाबरवून सोडले होते. प्रसारमाध्यमातून व ऐकीव कहाण्यातून मंकीमॅनची रसभरीत वर्णने त्यावेळी प्रसिद्ध झाली होती. मे महिना म्हणजे दिल्लीकरांना कडक उन्हाळाच. दिल्लीच्या उपनगरात लोक घराच्या छतावर रात्रीचे झोपत होते कारण रात्री वीजेचा ब्लॅकआऊट घोषीत झाला होता. असह्य उकाडा टाळण्यासाठी लोक टेरेसवर थांबत. त्यावेळच्या वर्णनानुसार ‘मंकी मॅन’ कसा होता? अर्धा माणूस व अर्धा माकड, त्याला ब्लेडसारखी लांब नखं होती. प्रचंड ताकदवान असा हा प्राणी सहजपणे एका छपरावरून दुसर्या छपर्यावर झेप घेई. काही बातम्याप्रमाणे त्याची नखे पोलादाप्रमाणे कठीण होती. आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या कमरेजवळ एक बटण होते, जे दाबताच तो अदृश्य होई. बहुतेक वर्णनात त्याची उंची 3 फूट ते 6 फुटादरम्यान तर काहीजणांना तो मांजराएवढाच वाटला होता. मे महिन्याच्या मध्यास, दिल्लीकर मंडळी हातात सोटे घेऊन रस्त्यारस्त्यात गस्त घालीत फिरत होती. या मंकी मॅनच्या पकडीतून सुटका करण्याच्या केविलवाण्या धडपडीत दोघांनी प्राण गमावल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. शेजार्यांच्या आरडाओरड्यामुळे धावत सुटलेल्या त्या दोघांपैकी एकाने पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली तर दुसरी व्यक्ती जी गरोदर बाई होती, जिन्यातून पळताना घसरून पडली. दोघांनीही या धडपडीत प्राण गमावले. 16 मे 2001 या दिवशी तर कहरच झाला. या दिवशी पोलिसांना एकाच वेळी मंकी मॅन दिसल्याचे चाळीस जणांचे फोन आले. मात्र सखोल तपासांती ते सर्व फोन बोगस निघाले. एका व्यक्तीबाबत त्याला उंदीर चावल्याने जखम झाल्याचे निष्पन्न झाले तर दुसरी एक व्यक्ती, मंकीमॅनने पकडले तर पोलीस किती वेगाने कृती करणार याची चाचणी घेत असताना आढळला. एकजण माकडाचा मुखवटा तोंडावर लावून एका घरात शिरताना पकडला गेला. तीन आठवड्यानंतर ‘मंकी मॅन’ बाबतच्या येणार्या तक्रारी शून्यावर आल्या व पोलिसांनी नि:श्वास सोडला.
सामुहिक वेडाचार किंवा विचारभ्रम (Social Delusion)

मुंबईतील किंवा दिल्लीतील ‘मंकी मॅन’ घटना हा सामूहिक वेडाचाराचा भन्नाट नमुना आहे. प्रसारमाध्यमात याला सामूहिक उन्माद असे म्हटले जाते. पण मंकीमॅन हा सामूहिक उन्माद(Mass Hysteria) नव्हे. उन्मादावस्थेतील व्यक्तीत शारीरिक कारण नसताना देखील आजाराची लक्षणे दिसतात. पण चुकीचा किंवा फाजील अविचार हा ‘मंकी मॅन’सारख्या भयगंडाला जन्म देतो. हा सामाजिक विचार भ्रमाचा प्रकार म्हणता येईल. अशा फाजील भयगंडामागे अफवांचे पीक असते. त्याला प्रसारमाध्यमांमधील सनसनाटी बातम्या व कल्पनाशक्तीची जोड मिळाली की, ही अवास्तव भीतीची लाट वेगाने पसरत जाते. आपल्या भीतीचे कारण शोधताना लोक भोवतालच्या परिस्थितीबद्दल फाजील सजग होतात आणि मग 10-12 फूट उंचीचा, लांब नखाचा मंकी मॅन(नसलेला) दिसायला लागतो. कशालाही मंकीमॅनचे रूप मिळू लागते. हे भारतातच घडते असं नव्हे. जगात सर्वत्र सामाजिक विचारभ्रमाचे प्रकार दृष्टोत्पतीस येतात. फरक इतकाच की, अमेरिकन लोक भारतातील लोकांना नावे ठेवतात तर भारतीय इतरांना वेडपट ठरवितात. ‘मंकी मॅन’ घटनांचे बळी अडाणी लोक असतात असं नव्हे तर तो अतिशहाण्यांचाही वेडेपणा असतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा हेच खरे!
जर्सी डेव्हील
एका घरावरून दुसर्या घरावर उड्या मारत जाणारा मंकी मॅन भारतात धुमाकूळ घालतो तर तिकडे अमेरिकेमध्ये तीन ते चार फूटाचा, घोड्याचे डोके असलेला आणि वटवाघळासारखे पंख असलेला जर्सी डेव्हील लोकांना भयभीत करतो. विविध समुदायातील जवळपास शंभर लोकांनी हा जर्सी डेव्हील पाहिल्याच्या बातम्या तेथील प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. जर्सी डेव्हीलची घटना अमेरिकीतेील न्यू.जर्सी मधील कुठल्या तरी कोपर्यातील मागास जमातीत घडली नाही तर ती 20 व्या शतकात प्रगत समजल्या जाणार्या अमेरिकन लोकांमध्ये घडली. या ‘जर्सी डेव्हील’ वरूनच न्यू जर्सी आईस हॉकी टीम हा शब्द प्रयोग तेथील हॉकी संघासाठी रूढ झालाय. मध्य आणि दक्षिण न्यू जर्सी विभागातील लोकांमध्ये 1730 सालापासून एक विचित्र प्राणी दिसल्याची कुजबूज व अफवा चालू होत्या. त्याला मोठे स्वरूप प्राप्त झाले ते 1909 मध्ये. त्या वर्षी काही दिवस जिकडे तिकडे अफवांचे पीक आले. ‘जर्सी डेव्हील’ दिसू लागल्याच्या बातम्या पसरल्या. लोक दारे बंद करून घरात बसून राहिले, कारखाने व शाळांना कुलपे लागली आणि जर्सी डेव्हीलचा शोध सुरू झाला. शेवटी ती अफवाच ठरली. या ‘डेव्हील’ प्रमाणेच, मंगळावरचे प्रवासी पृथ्वीवर आले किंवा काही लोकांना पर्यांचे दर्शन झाले अशाही अफवा पाश्चात्य देशात पसरल्या होत्या. हा झाला पाश्चात्यांचा खुळचटपणा तर मंकी मॅन भारतीयाचा वेडाचार!
अनेक समाजशास्त्रज्ञ सामाजिक विचारभ्रमातून निर्माण झालेल्या मंकी मॅनसारख्या प्रकारास मूर्खपणा किंवा अविवेकी वर्तन म्हणून झटकून मोकळे होतात. पण या प्रकारचे भ्रम हे समाजात सद्या अस्तित्वात असलेल्या समजुती, प्रवृत्ती आणि चालीरीती यातून मिळालेल्या सूचनांनी प्रभावित असतात. त्याकडे गांभीर्याने पहायला हवे. अशा घटनेकडे ती सत्यच आहे किंवा ती खुळ्यांचा बाजार आहे अशा दृष्टीने न बघता, तो मानवी उत्क्रांतीचा वारसा म्हणून त्याची कारणे समजून घ्यायला हवीत.
कोणत्या परिस्थितीत आपण भ्रम निर्माण करतो हे ओळखायला हवे. तरच त्यापासून सुटका होऊ शकेल. मंकी मॅन घटनेची कारणे मुंबई किंवा दिल्लीच्या रस्त्यावर शोधण्यात अर्थ नाही तर त्यासाठी आपल्या मनाची ठेवण व मनाच्या खेळातून निर्माण होणारी भीती याचा शोध घ्यायला हवा. दिल्ली किंवा मुंबईत झाडीत मर्कटांचे कळप राहतात विशेषत: उपनगरातील सीमेवरील भागात त्यांचा वावर असतो. अधून मधून ही माकडे रहिवाशांच्या घरात वा व्हरांड्यात उतरतात. क्वचितप्रसंगी कुणाचा तरी चावा घेतात. असह्य उकाड्याच्या मोसमात, नाईलाजाने गच्चीवर झोपलेल्या लोकांवर अशा माकडांचा हल्ला होणे शक्य असते. त्यामुळे लोकांमध्ये कुजबुजीचे आणि कुणावरच्या तरी हल्ल्याचे कुतूहल मिश्रीत वर्णन व भीती यांचे मिश्रण असते. स्वसंरक्षण ही माणसाची उपजत प्रेरणा आहे. त्यात कल्पनेचा भर पडल्यास मंकी मॅन दिसणे अशक्य नाही. सारांश, सामाजिक भ्रमाचा प्रकार हवेत निर्माण होत नाही. त्यामागे भीती व सुरक्षिततेची भावना असते. उत्क्रांतीने दिलेल्या वारशातून मानवी मेंदू स्वत:च्या अस्तित्वासाठी सुरक्षेची जी वलये निर्माण करतो तीमधून खरेखोटे सैतान, भुते व मंकी मॅन निर्माण होतात जे अंधारात मन:चक्षुपुढे प्रगट होतात. ते आभासी असतात पण त्या त्या व्यक्तीसाठी ते खरे असतात. थोडक्यात आपणच निर्माण केलेली ती मायायी रूपे असतात. हे ओळखणे व त्यांचे भासमान स्वरूप उघड करणे यासाठी चिकित्सक दृष्टीचा वापर वाढवायला हवा. केवळ मूर्खपणा अशी त्यांची संभावना करून चालणार नाही.
विचारभ्रमांचे मानसशास्त्र व प्रकार
विचारभ्रम(ऊशर्श्रीीळेप) हा शब्दप्रयोग मनोविकारतज्ज्ञ मानसिक असुंतलन पीडित व्यक्तीने स्वीकारलेल्या विकृत विश्वासासाठी वापरतात. हा सायकोसिस या प्रकारातील गंभीर आजार होय. उदाहरण द्यायचे तर रामन राघव या खुनी व्यक्तीचे देता येईल. सैतानाची आज्ञा म्हणून तो धारदार सळीने लोकांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांना ठार करी. ‘मंकी मॅन’ हा विचारभ्रम वरील व्यक्तीगत प्रकारात मोडत नाही. समाजशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ(Social Psychologists) अशा सामूहिक विचारभ्रमाला Social Delusion किंवा Collective Delusion किंवा Mass Delusion या नावाने संबोधतात. सामाजिक विचारभ्रम किंवा सामूहिक वेडाचार हा विशिष्ट समुदायाने काही काळापुरता स्वीकारलेला चुकीचा उत्स्फूर्त विश्वास असतो. ‘मंकी मॅन’ हे त्याचे उत्तम उदाहरण ठरावे.

सामुहिक विचारभ्रमाचे प्रकार व ते ओळखायचे कसे हे समजून घेतले तर त्यांच्यावर मात करता येणे शक्य होईल. धार्मिक विखार व श्रद्धेपोटी निर्माण झालेल्या लोकसमजुती या प्रकारात मोडत नाहीत. कारण मंकीमॅन सारखे भ्रम हे विस्कळीत स्वरूपाचे व अचानकपणे उद्भवलेल्या भीती व स्वसंरक्षणाच्या भावनेतून निर्माण होतात. उलट धार्मिक विखार व वेडाचार यांना नियोजनपूर्वक प्रचार व संघटीत प्रयत्नाचे पाठबळ असते.
सामुहिक विचारभ्रमाचे अनेक दाखले इतिहासातून मिळतात. इतिहासातील याचे गंमतीशीर उदाहरण म्हणजे 1806 मध्ये लीड्स (इंग्लंड) येथे घडलेला प्रकार. एक कोंबडी अशी अंडी घालणार आहे की, ज्यावर ‘ख्रिस्ताचे पुनरागमन होणार’ (Christ is Comin) असे वाक्य कोरलेले असेल अशी अफवा तेथील रहिवाशांमध्ये पसरली. या घटनेनंतर जगाचा अंत होणार अशी भीतीची लाट सर्वत्र पसरली. ही चमत्कार करणारी कोंबडी व तिचे ते अंडे पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. अखेरीस तपासांती असे निदर्शनास आले की, अंड्यावर न पुसली जाणार्या शाईने ते वाक्य लिहून तेच अंडे तिच्या गुद्द्वारातून तिच्या शरीरात घुसवले होते. हे जेव्हा लोकांना समजून देण्यात आले तेव्हा हा वेडाचाराचा झटका ओसरला.
समूहाच्या अशा वेडामागे अनेक कारणे लपलेली असतात. त्या समूहाच्या सामाजिक व सांस्कृतिक विश्वासाचा आधार घेऊन, शक्य भासणारे पण अतिरंजीत प्रकार वेगाने पसरवणे हे अशा वेडाचे प्रमुख कारण होय. असा विचार भ्रम लोकांच्या सुप्त भावना व आकांक्षाना भुरळ पाडणारा असतो. पण बहुतेक वेळा तो नकारात्मक व भितीला खतपाणी घालणारा असतो. ह्या सर्व भ्रमामागे अफवांचे हत्यार प्रभावीपणे वापरले जाते. या अफवांचा परिणाम म्हणून नेहमीच्या साध्या साध्या घटनेत वा प्रसंगात माणसं निर्बुद्धपणे अर्थ शोधण्याचा अट्टाहास करतात आणि त्या घटनांना गांभीर्याने घेतात. त्या प्रसंगांना व घटनांना नवा अर्थ देण्याचा प्रयत्न चालू होतो ज्यातून त्यांना एक प्रकारचे फसवे समाधान तरी मिळते किंवा भीतीचे कारण तरी मिळते. यासाठी प्रसारमाध्यमे, फसवे इंद्रिय अनुभव समूहाचा विचार स्वीकारण्याची मानसिकता यांचा उपयोग होतो. यात भर म्हणून समाजातील राजकीय वा धार्मिक किंवा मिलिटरी सत्ताधार्यांची विधाने ग्राह्य मानली जातात.
सामुहिक भ्रमाचे चार प्रकार
(1) तातडीची सामाजिक आपत्ती (mmediate Community Threat)
1946 मध्ये स्वीडिश जनतेत अशी भीतीची लाट आली होती. रशियाने दुसर्या महायुद्धात हस्तगत केलेल्या जर्मनीच्या व्ही-रॉकेटचा उपयोग आपल्या विरोधात केला जाणार असा भ्रम स्वीडनमध्ये फैलावला. सैन्याधिकार्यांनी त्यात भर घातली. स्वीडनशी रशियाचे संबंध सुरळीत नव्हते हेही एक कारण त्यामागे होते. काही लोकांनी आकाशात अशी रॉकेटस पाहिल्याचा दावा केला होता. पण एकही रॉकेट तपासांती सापडले नाही. काही सरोवरे कोरडी करून शोध घेतला गेला पण अशा रॉकेटचा साधा अवशेषही सापडला नाही. खरं तर उल्कापाताला रॉकेटस् समजून हा भ्रम लोकांमध्ये पसरला होता. स्वराष्ट्राचे संरक्षण, दृष्टीभ्रम, अफवा व रशियाशी शत्रुत्व अशा कारणांनी हा भ्रम स्वीडिश लोकांनी बाळगला. अशा प्रकारचे भ्रम हे काही काळासाठी होतात. लोक भीतीच्या छायेखाली रहातात पण स्थलांतर करत नाहीत.
2) सामुहिक पलायन भ्रम (Community Flight Panic)
या प्रकारच्या भ्रमात विशिष्ट समूह भीतीमुळे स्थलांतर करतो. ज्योतिषांच्या भविष्यवाणीतून लंडनवासीयांनी 1524 मध्ये स्थलांतर केले होते. लंडन पुरात बुडणार अशी ती भविष्यवाणी होती. आपल्याकडे काही वर्षांपूर्वी कोयना धरण भूकंपाने फुटणार अशी भविष्यवाणी पुण्याच्या एका ज्योतिषाने वर्तवली होती. त्यावेळीही महिनाभर कोयना काठ ओस पडला होता. ही पण अफवाच ठरली.
3) प्रतिकात्मक सामाजिक भयगंड (Symbolic Community Scares)
काही अल्पसंख्य समुहाला दुष्ट ठरवून, समाजाच्या नैतिक मूल्याच्या घसरणीला त्यानाच दोषी ठरवून शिक्षा देण्याचा अमानुष प्रकार असा हा भ्रम आहे. युरोप खंडात 1400 ते 1650 या काळात निरपराध स्त्रियांना चेटकिणी समजून त्यांची अमानुष हत्या केली गेली.
4) सामुहिक इच्छापूर्ती भ्रम (Collective wish-ful fillment)
माणसांना अमरत्वाची ओढ असते. वास्तवापलीकडच्या जगाची ओढ किंवा भुरळ असते. पॉल कुर्टझ् हा तत्त्वज्ञ याला अतित जगाची भुरळ (Transcedental temptation) असे म्हणतो. उडत्या तबकड्यावरचा विश्वास, पर्यांचे दर्शन घडणे, हे अशा प्रकारचे भ्रम होत.
उत्क्रांती व संस्कृती यातून माणसांनी उरी बाळगलेल्या अनेक प्रकारच्या अवास्तव इच्छापूर्ती किंवा अकारण भीती यातून वरील प्रकारच्या सामाजिक भ्रमांना उत्तेजन मिळते. हे भ्रम लाखो लोकांच्या जीवाशी निगडित असतात. त्यातील धोके ओळखणे व अशा भ्रमांची शिकार न होणे यासाठी हवा चिकित्सक दृष्टीकोन. मंकी मॅन सारखे सामाजिक भ्रम तुलनेने कमी धोकेदायक पण वर वर्णन केलेले सामाजिक भ्रम अधिक धोकेदायक. आशा, स्वप्नपूर्ती आणि भीती ही मानवाला उत्क्रांतीतून मिळालेली प्रगतीची व संरक्षणाची साधने असली तरी खोटी स्वप्ने व खोटी भीती केव्हाही धोकेदायकच. व्यक्तीला व समाजाला या भ्रमातून बाहेर काढणे यासाठी हवे चिकित्सक दृष्टिकोनाचे शिक्षण व त्याचा जीवनात हरघडी वापर. ‘मंकीमॅन’ भ्रमाचा हाच अन्वयार्थ आहे.
–प्रा.प.रा.आर्डे