Categories
रिंगणनाट्य

मुक्तीची गाथा…

सातारा गट
वार्षिकांक – २०१४

‘परिवर्तन’नावाचा केंद्रबिंदू घेऊन समाजाच्या वर्तुळावर उभे असणार्‍या माझ्या मित्रांनो, तुम्हाला क्रांतीकारी सलाम.

आज सूर्य होणं अगदी गरजेचं आहे. नि स्वयंप्रकाशित तर झालाच पाहिजे हे माझं स्पष्ट मत. मात्र सूर्य होताना मला वाटतंय की, समाजाचा विचार करून प्रथमत: सूर्यकिरण होणं ही तितकंच महत्वाचं. नि अशीच काही विवेकी किरणं एकत्र येऊन नव्या परिवर्तनीय सूर्याची वाट पाहतायेत ‘रिंगणनाट्य’ नावाच्या रंगभूमी वरून.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती कित्येक वर्षं चळवळ वाढवत असतानाच सांस्कृतिक चळवळ देखील उभी करावी नि लोकांपर्यंत पोहचावी हाच निव्वळ हेतू घेऊन शहीद दाभोलकरांनंतर सर्व विवेकी कार्यकर्ते आणि त्यातूनही आमच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करणारा मोठा माणूस ‘अतुल पेठे’. मला अजूनही आठवतंय आमच्या गटातील प्रत्येक व्यक्ती ह्या माणसाला भेटल्यानंतर बदलला आहे. ही सुरवात सोनवडे नावाच्या गावात झालेल्या वर्कशॉपपासून झाली. मला वाटतंय रिंगणनाट्य चळवळीचीदेखील.

आयुष्यात नाटकाचा अभ्यास कुणी करवून घेतला असेल तर अतुल पेठे, राजू इनामदार नि मितभाषी बरंच काही बोलून जाणारा आश्विन यांनी. नाटकाबद्दल भरपूर माहिती आणि ज्ञान आम्हाला पेठे सरांनी दिलं. बोलणं कमी असावं हे सुद्धा पेठे सरांचं नेहमीचं वाक्य पगार किती नी बोलतोस किती? हे आजही आम्ही सगळे गटातच नाही तर बाहेरही वापरतो. आजही मी माझं नाव ओमेय-सावित्री-नाटक असंच सांगतो.

पेठे सरांच्या तीन दिवसांच्या शिबीरानंतर समजलं की, हे तीन दिवस पेठे सरांनी आम्हाला त्यांच्या 30 वर्षांतले अनुभव दिले आणि वैयक्तिक मला म्हणायचं तर माणूस अनुभवायला, वाचायला त्या शिबिराने शिकवलं. शिबीरातील सारेच माझ्यापेक्षा ज्येष्ठ नि श्रेष्ठ होते. मात्र ते आमच्याच वयाचे होते. एक त्यातला तरूण कार्यकर्ता म्हणजे बनसोडे सर. दिलखुलास गप्पा आणि अनुभव शिकवणारी माणसं या शिबिरात भेटली. हे दिवस पुन्हा यावेत असं देखील वाटतंय.

रिंगणची तयारी सुरू झाली. आमच्या गटातले सगळे युवक सकाळचा नाष्टा घेऊनच तालीम करायला यायची. म्हणण्याचा उद्देश असा की, सकाळी उठल्यानंतर आम्ही रोज तालीम करण्यासाठी तयार असायचो. आम्ही यात एकूण बारा कलाकार. आम्ही रिंगणसाठी ‘जादूटोणा विरोधी कायदा’ हा विषय निवडला आणि यावर एक रिंगण सार्‍यांनी मिळून सर्जनशीलतेने तयार केलीं. मुक्तीची गाथा नावाचं रिंगणनाट्य. या सगळ्यात एक झालं आम्ही खूप जवळ आलो. आम्ही आमच्या स्वत:त असे बदल करून घेतलेत की, आज आम्ही अगदी काहीही शेअर करतो, एकत्र पुस्तक वाचून चर्चा करतो. फिरायला आणि चित्रपटांनादेखील एकत्र जातो. यामुळे झालंय असं की, आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक कुटुंबापेक्षा तारांगण नावाच्या घरात हे रिंगण नावाचं कुटुंब आम्हाला प्रिय वाटू लागलंय. असो 10 ऑगस्टला सातार्‍यात सगळे रिंगण नाटकाचे कलाकार आले. ओळखी झाल्या, नाटकं पाहिली आणि त्यातली मजा घेत आमचं रिंगणच कुटुंब एवढं मोठं आहे हे उमगलं. त्या प्रयोगानंतर आम्हाला काही तरूण मिळाले त्यांनीही रिंगणमध्ये सहभागी व्हायची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर आम्ही रहिमतपूर, औंध याठिकाणी प्रयोग केले. अनेक जुने कार्यकर्ते तर मिळालेच, त्याचबरोबर नवीन कार्यकर्तेदेखील या चळवळीशी जोडले जाताहेत याचाही आनंद होतोय.

पुण्याच्या रिंगणनाट्य प्रयोगानंतर आम्ही समाज बदलवणार्‍या एका पात्राचं काम करतोय आणि ते रिंगणनाट्यामुळे, याची जाणीव होत आहे. त्यानंतर आम्ही सारेच आमचे शिक्षण सांभाळत रिंगणनाट्याचे प्रयोग करतोय. आमची प्रयोगाची संख्या 20 पर्यंत गेली आहे. आमच्या शिक्षणामुळे ही प्रयोगसंख्या कमी आहे याचा खेद पण ‘जिंकायची नशा’ आता सुटणार नाही हे तितकंच सत्य आहे.

रिंगणनाट्याने बरंच काही दिलं. मी या भावना लिहू शकत नाही. मात्र ‘बरंच काहीत’ सुद्धा आहे. पेठे सर, राजू सर, आश्विन, कुदळे सर, फारूक सर, बनसोडे सर, नांगरे सर आणि माजी रिंगणनाट्याच्या कुटुंबाला क्रांतिकारी सलाम. ही रिंगणनाट्याची चळवळ इतकी मोठी करूया की, पाठीमागून गोळ्या घालणार्‍या षंढ धर्माच्या गारद्यांनी थांबला ना सूर्य कधी, थांबला ना वारा. आम्ही याच परिवर्तनशील सुर्याची किरणं आहोत नि हीच किरणं उद्या विज्ञानाची नि विवेकाची पहाट आणल्याशिवाय राहणार नाही. तितक्याच धाडसाने सांगतो, अंनिस लोकरंगमंच झिंदाबाद!

-ओमेय साठे

लेखक संपर्क: 8624992983