Categories
चिकित्सा

सायकिक, पोलीस आणि वैज्ञानिक

वार्षिकांक – २०१४

मनाला डोळे असतात? साध्या डोळ्यांना जे दिसत नाही ते या डोळ्यांना दिसतं म्हणे! याला दूरदृष्टी (Remote viewing) असं नाव आहे. तसंच मनाच्या कानांना दूरचे ऐकता येते. उदा.स्वर्गातील आत्मा त्या मनाशी बोलतो. मनाने वस्तू हलविता येतात, पुढे काय घडेल ते सांगता येते. या सर्व प्रकारांना परामानसशास्त्र म्हणतात.

या सामर्थ्याचा दावा करणारे ते परामानसी किंवा सायकिक बुवा. हे प्लँचेटद्वारे आत्म्याशी बोलतात, आत्म्याचे दरबार भरवितात, गुन्हेगाराचे नाव पोलिसांना सांगतात, नजरेने वस्तू वाकवितात इ..

याबाबत सत्य काय? मोठे दावे करण्यासाठी तसाच मोठा विश्वसनीय पुरावा हवा. गृहीत हे पुराव्याशिवाय सिद्ध होत नाही. अतिंद्रिय सामर्थ्याचे व परामानसशास्त्राचे समर्थक त्यांनी केलेल्या दाव्याबाबत खात्रीशीर पुरावा आजपर्यंत देऊ शकले नाहीत. हजारो वर्षांपासून ज्याचे समर्थन केलं जातंय ते आपल्या प्रचलीत शिक्षण अभ्यासक्रमात का समाविष्ट नाही? आधुनिक मानसविज्ञानात परामानसशास्त्राचा समावेश नाही. ज्ञानेंद्रियापलिकडच्या जगातील घटनांचे आकलन झाले असं सांगणारी मंडळी बुवाबाजीच करतात. अशा सायकिकना पोलीसही फशी पडतात हे डॉ.दाभोलकरांच्या खुनासंदर्भात जो प्लँचेटचा प्रयोग झाला त्यातून आपल्या लक्षात आले. यावर डॉ.विजय भटकरांची प्रतिक्रियाही प्रसारमाध्यमात चर्चेला आली. या प्रतिक्रियेला उत्तर द्यायलाच हवे.

सायकिक मंडळींना, भले भले लोक व विद्वान फशी पडतात तर काही वैज्ञानिक त्यांच्या टोळीत सामीलही असतात. सायकिक मंडळींचे आत्म्यांचे दरबार, प्लँचेट, पोलीस व वैज्ञानिक याबाबतच्या संशोधनातून साकार झालेला हा लेख.

आशिष खेतान या मुक्त पत्रकाराने डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्याला शोधून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘प्लँचेट’ या गूढविद्येची कशी मदत घेतली याचे स्टिंग ऑपरेशन केले. दूरदर्शन आणि प्रिंट मीडियात या विषयावर उलटसुलट चर्चाही झाली. याच दरम्यान संगणक क्षेत्रातील प्रख्यात वैज्ञानिक डॉ.विजय भटकर यांनी प्लँचेटचे समर्थन केल्याची बातमी प्रसार माध्यमात झळकली. त्यांच्या विधानावर टीकेचा गदारोळ उठला. याला प्रत्युत्तर म्हणून विजय भटकरनी आपली भूमिका दैनिक लोकमतच्या मंथन पुरवणीत(10 ऑगस्ट 2014) विस्तृत लेख लिहून स्पष्ट केली. प्लँचेटचे भूत आणि संशोधनाची प्रेरणा या शिर्षकाच्या लेखात भटकर लिहितात, ‘मी प्लँचेटवर विश्वास ठेवतो का? मी त्याचे समर्थन करतो का? मी स्वत: ते कधी करून पाहिले आहे का? याचे एकच उत्तर, ते म्हणजे अजिबात नाही. ब्लॅक मॅजिक, प्लँचेट असल्या कुठल्याही विषयात कुणीही पडू नये’ याच लेखात त्यांनी डॉ.दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भलावण केली आहे. ‘अंधश्रद्धेच्या विरोधात जागर करणार्‍या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याचे मोठेपण लक्षात घेऊन त्यांना शासनाने महाराष्ट्र भूषण द्यावे ही मागणी प्रथमत: मी केली होती. ती त्यांच्या कार्याचे महत्व व गरज पटल्यामुळेच. अंनिससारख्या संस्था समाजात असणे अत्यंत आवश्यक आहे.’

डॉ.भटकर यांनी लेखी स्वरूपात प्लँचेट व ब्लॅक मॅजिक यांच्या विरोधी भूमिका मांडली याबद्दल त्यांना धन्यवाद. पण याच लेखात पुढे त्यांनी एकूणच अतीनैसर्गिक जग, गूढ विद्या, परामानसशास्त्र, पुनर्जन्म आदी प्रश्नाबाबत जे विचार मांडलेत त्याची गंभीर चिकित्सा करायला हवी. ते लिहितात, ‘गूढ विद्येबाबत पाश्चिमात्य देशात संशोधन चालते. अमेरिकेने यासाठी ‘स्टार गेट’ नावाचा संशोधन प्रकल्प ‘स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्युट’मध्ये राबविला होता. ब्रिटन, रशिया व युरोपमध्येही असे संशोधन केले जात आहे. मन:सामर्थ्यानं दूर अंतरावर काय चाललय ते पहाता येते. (Remote viewing) गुन्ह्याच्या तपासात अतिंद्रिय शक्तीचा वापर करून गुन्हेगार शोधता येतो. पाश्चात्य गुप्तहेर संस्था अतिंद्रिय शक्ती असणार्‍या लोकांचा उपयोग करतात.’

सुरवातीला प्लँचेट मानत नाही असं म्हणून प्लँचेट तत्सम गूढविद्यांचे एक प्रकारे समर्थनच वरील विधानातून व्यक्त होत नाही काय? वरवर पहाता असं वाटतं की खरंच असं संशोधन जगभर होत असेल तर आपण ते का नाकारावे? मला हा विषय अधिक खोलात जाऊन माहीत करून घ्यावा असं तीव्रपणे जाणवलं. परिणामी मी गूढविद्येबाबतच्या पाश्चात्य राष्ट्रातील संशोधनाची माहिती घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. आजवर मिळविलेल्या ज्ञानाबाबतचे आपले निष्कर्ष चूक असतील तर त्यात आपण सुधारणा करावी असे माझ्या विज्ञाननिष्ठेने मला बजावलं. मात्र विविध ज्ञानकोश व संशोधन जर्नल्समधून मला जे निष्कर्ष मिळाले ते भटकराच्या भूमिकेबाबत शंका निर्माण करणारे ठरले. प्रथम या बाबतचे खात्रीशीर पुरावे मांडायला हवेत आणि मग डॉ.भटकरांच्या विधानांबाबत वस्तुनिष्ठ भूमिका मांडायला हवी.

पोलीस आणि सायकिक

डॉ.भटकरानी अतिंद्रिय गूढ शक्तीचा पोलीस व गुप्तहेर उपयोग करतात असं म्हटलंय. त्याचा प्रथम समाचार घेऊ या. ज्या पाश्चात्य देशात गुन्हेगारीचा शोध घेण्यासाठी गूढविद्यावाल्याना पोलीस मदतीला घेतात तेथील माहितीचा चिकित्सक शोध घेण्यासाठी खात्रीशीर माहिती दोन विश्वकोशातून मला मिळाली. त्यापैकी एक आहे जेम्स रँडी या जादूगाराने लिहिलेला विश्वकोश ‘अ‍ॅन एनसायक्लोपीडिया ऑफ क्लेमस्, फ्रॉडस् अ‍ॅण्ड होक्सेस ऑफ दि सुपरनॅचरल.’ अती महत्वाच्या संशोधनाबाबत तेवढेच महत्वाचे पुरावे द्यायला हवेत.( Extra Ordinary claims demand extraordinary evidence). श्रद्धावादी लोक जे महत्वाचे दावे करतात ते पूर्वग्रहदूषित असण्याचा संभव नाकारता येत नाही. उलट बुद्विवादी मंडळीसुद्धा हटवादी असू शकतात. या दोन्ही प्रकारच्या मंडळींच्या ठाम समजुती असतील तर त्यांच्या समर्थनार्थ उपयुक्त पुरावे शोधले जातात परंतु उलट पुरावे दुर्लक्षिले जातात. म्हणून अशा मोठ्या दाव्यांबाबत वस्तुनिष्ठ निरपेक्ष बुद्धीने घेतलेला शोध सत्याकडे नेणारा ठरतो. असे पुरावे शोधले तर गूढ मन:सामर्थ्याच्या घटनाबाबतचे सत्य आपल्याला कळू शकते.

जेम्स रँडीच्या विश्वकोशातून मिळालेली माहिती खरं काय ते सिद्ध करण्यास महत्वाची आहे.

ही घटना अमेरिकेतील एका शहरात घडलेली आहे. एका कारखान्याला भीषण आग लागलेली होती. ही आग लावणार्‍या व्यक्तीला मी मन:सामर्थ्याने शोधू शकतो अशा बढाया मारत एक सायकिक पोलिसांना भेटला. पोलिसांनी त्याचे म्हणणे कुतूहलपूर्वक ऐकून घेतले. या आगीच्या घटनेत काय काय घडले, कोणते नुकसान झाले याची बिनचूक माहिती घटनास्थळी न जाता तो पोलिसांना सांगू लागला. ही माहिती इतकी बिनचूक हेती की, चलाख पोलिसांना त्याची शंका आली. त्यांनी या गृहस्थाला अटक केली आणि त्याची सखोल चौकशी केल्यावर तो स्वत:च घटनास्थळी आग लावण्यासाठी हजर असल्याचा पुरावा मिळाला आणि या महाशयाच्या अतिंद्रिय शक्तीचे बिंग फुटलं.

प्लँचेट करणारे, परामानस शक्तीवाले, अतिंद्रिय गूढ सामर्थ्याचा दावा करणारे पोलिसांना मदत करतात का याचा शोध अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉ.मार्टीन रिझर यांनी घेतला. यासाठी त्यांनी दोन विशेष मोहिमा राबविल्या. लॉस अँजेलिस पोलीस विभागामध्ये संपर्क साधून कित्येक वर्षाच्या संशोधनानंतर त्यांचे निष्कर्ष नकारात्मक निघाले. गूढविद्येचे जाणकार सायकिक, पोलिसांना कोणतीही उपयुक्त माहिती मिळण्यास अपात्र असल्याचा त्यांचा निष्कर्ष होता. गूढ विद्यावाले प्रसारमाध्यमांना हाताशी धरून आपल्या तथाकथित सामर्थ्याचा गवगवा करीत असल्याचे दिसून आले. एक निरीक्षण डॉ.रिझर यांच्या संशोधनातील आत्महत्येत वापरली जाणारी हत्यारे ओळखण्या संदर्भात होते. आत्महत्येसाठी प्रत्यक्ष वापरलेले हत्यार व त्याच्या जोडीने तसलेच न वापरलेले डमी हत्यार यांच्यातील योग्य हत्यार ओळखण्यास गूढविद्यावाल्यांना सांगण्यात आले. त्यांना अशा दोन हत्यार्‍यातील आत्महत्येसाठीचे हत्यार ओळखता आलं नाही.

स्कॉटलंड यार्डचा अभिप्राय

इंग्लंडमधील पोलीस यंत्रणा ‘स्कॉटलंड यार्ड’मधील एडवर्ड एलीसन या अधिकार्‍याने गूढविद्या जाणकार सायकिक पोलीसांना मदत करतात काय या प्रश्नावर आपला स्पष्ट अभिप्राय दिला आहे. ते लिहितात-

(1) ‘स्कॉटलंड यार्ड’ पोलीस गुन्हे अन्वेषणासाठी कधीही गूढविद्या जाणकारांचा सल्ला मानत नाहीत.

(2) इंग्लंडमधील पोलीस दलात गूढविद्या जाणकार पोलीस नाहीत.

(3) स्कॉटलंड यार्ड कोणत्याही गूढविद्या जाणकाराचे मत मानत नाहीत व अशा मताला मान्यता देत नाहीत

(4) इंग्लंडमधील गुन्हे अन्वेषण नोंदीत असं एकही उदाहरण सापडत नाही ज्यामध्ये गूढविद्या जाणकारांनी दिलेल्या माहितीमुळे व पुराव्यामुळे गुन्ह्याचा तपास लागला.

इन्स्पेक्टर एलिसन यांनी आपल्या विभागामध्ये काम करणार्‍या पोलीस अधिकार्‍यापैकी कुणी सायकिक मंडळींची मदत घेतली का याचा तपास केला. लंडन विभागात ‘स्कॉटलंड यार्ड’चे आठ विभाग आहेत. या सर्व विभागात कोणीही सायकिककडे जात नव्हते. उलट ही मंडळीच पोलिसांशी संपर्क साधून स्वत:ची जाहिरात करण्याचा प्रयत्न करत होती.

यॉर्कशायर रिपर केस

ब्रिटनमध्ये गाजलेली गुन्हेगारीची घटना म्हणजे प्रख्यात यॉर्कशायर रिपर केस. रिपर या व्यक्तीच्या खुनाबाबतची ही घटना होती. दि संडे पीपल्स या दैनिकाने त्यावेळच्या ब्रिटनमधील प्रसिद्ध अशा सायकिकस्ची रिपर घटना तपासात मदत घेतली. एका सायकिक बाईने रिपरचे मित्र, नातेवाईक आणि त्याच्या गाडीचा मेकॅनिक यांची आंतरज्ञानाने काढलेली चित्रे पोलिसांना पुरविली. ही सगळी माहिती निरूपयोगी व चुकीची निघाली.

वेस्ट यॉर्कशायर पोलीसमधील मुख्य प्रेस अधिकारी बॉब बॅक्स्टर याने यॉर्कशायर रिपर केस संदर्भात शंभरच्या आसपास गूढविद्या जाणकारांच्या सूचनांनी छाननी केली. तथापि त्यांच्या माहितीचा रिपर केस सोडविण्यास काहीही उपयोग झाला नाही. पण आम्हीच या केसचा उलगडा करण्यास मदत केली असं निर्लज्जपणे सांगणारे अनेक सायकिक निघाले.

1980 ते 1981 च्या दरम्यान अमेरिकेतील अटलांटा जार्जीया या राज्यात तरूण निग्रो मुलांच्या खुनांची मालिका सुरू होती. या खुनात सहभागी असणार्‍याबाबत अनेक गूढविद्या तज्ञ मंडळींची 19 हजारापेक्षा जास्त पत्रे आणि दोन हजारापेक्षा जास्त रेखाचित्रे पोलिसांना पाठविली गेली. यातील बहुतेक पत्रे व रेखाचित्रे ही अमेरिकन गोर्‍यांची होती. परंतु जो खरा खुनी पोलिसांनी शोधून काढला तो आफ्रो-अमेरिकन तरूण निघाला. त्याचे रेखाचित्र किंवा नाव कुणीही दिले नव्हते.

स्टार गेट प्रोजेक्ट

डॉ.विजय भटकर यांनी अतिइंद्रिय शक्तींच्या बाबतीत अमेरिकन सरकारने ‘स्टार गेट प्रोजेक्ट’ राबविला होता. याचा उल्लेख केलाय. या उल्लेखातून भटकरांना असे सुचवायचे आहे की, सरकार आणि वैज्ञानिक यांना अतिंद्रिय शक्ती आणि परामानसशास्त्रात संशोधन करण्याची गरज वाटते. 1950 च्या सुरवातीला अमेरिकेच्या सी.आय.ए.या संघटनेने अशा संशोधनाला सुरवात केली. ज्यातून ‘स्टार गेट प्रोजेक्ट’ची निर्मिती झालली. या प्रोजेक्टद्वारे अमेरिकन, फेडरल सरकारने टेलिपथी, दूरदृष्टी, मनोगतिकी आदी अतिंद्रिय शक्तीच्या संशोधनास प्रोत्साहन दिले. पण या प्रोजेक्टचा शेवट काय? तो आपणासाठी महत्वाचा आहे. स्टार गेट प्रोजेक्ट 1995 मध्ये बंद करण्यात आला. या संशोधनाचा निष्कर्ष असा की, हेरगिरीसाठीची माहिती मिळविण्यासाठी त्याचा काहीही उपयोग नाही. मिळालेली माहिती अती संदिग्ध, परस्परांशी मेळ नसलेली आणि चुकीची निघते. महत्वाचं म्हणजे हा प्रोजेक्ट ज्याचे हातात होता त्यांनी त्यांना अनुकूल असे पुरावे रिपोर्टमध्ये घुसडले होते. वस्तुनिष्ठ, प्रामाणिक संशोधनाशिवाय निष्कर्ष काढल्यामुळे स्टार गेट प्रोजेक्ट बंद करावा लागला.

‘स्टार गेट प्रोजेक्ट’ निरूपयोगी ठरल्याचा उल्लेख डॉ.भटकर यांनी आपल्या लेखात का केला नाही? संशोधन होणं ही एक बाब पण संशोधनातून नकारात्मक निष्कर्ष मिळणं म्हणजे ते संशोधन टाकाऊ आहे. काटेकोर संशोधनात वैज्ञानिक उपपत्ती मांडल्या जातात. परंतु त्यांना विश्वसनीय पुरावा द्यावाच लागतो. नाहीतर ते संशोधन केराच्या टोपलीत टाकावं लागतं.

टाकाऊ ते टाकाऊच

अमेरिकेत काय, किंवा जगभर काय अतिंद्रिय शक्तीचे संशोधन करणार्‍यांना विरोध नाही. विज्ञानपूर्व काळापासून अतिंद्रिय शक्तीच्या अस्तित्वाचे पुरावे शोधण्याचा अध्यात्मवाद्यांचा प्रयत्न अजूनही केविलवाण्या अवस्थेत आहे. गेल्या 500 वर्षांत ज्ञानेंद्रियांच्या मदतीने विज्ञानाने अणू-रेणूपासून ते आकाशगंगेपर्यंत विश्वाचे ज्ञान पुराव्यासहीत मिळविले आहे. यात मानसशास्त्राचाही समावेश आहे. आधुनिक मानसशास्त्र व ज्ञानकोश यामध्ये तथाकथित, आध्यात्मिक गूढ विद्या व परामानसशास्त्र यांना मान्यता का नाही याचे कारण त्यांना विश्वसनीय पुरावा नाही हेच आहे. म्हणूनच प्रचलीत औपचारिक मानसशास्त्रीय शिक्षणात परामानसशास्त्र शिकवित नाहीत. विज्ञान शिक्षणात उत्क्रांतीवाद शिकवितात, अणुविज्ञान शिकवितात, खगोल विज्ञान शिकवितात. पण पराविज्ञान नाही. अतिंद्रिय, परामानसशास्त्र टाकाऊ असल्याने विज्ञानजगतात समाविष्ट नाही. त्याला भ्रामक विज्ञान किंवा छद्मविज्ञान म्हणतात.

एखादे संशोधन टाकाऊ असेल तर ते सोडून द्यावे. अमेरिकेत डी.डी.टी.ही पावडर मानवी आरोग्याला हानीकारक आहे हे लक्षात आल्याने त्यावर बंदी घालण्यात आली. पाश्चात्य जगातील पोलीस गूढ शक्तीवाल्यांना विचारत नाहीत. असे असताना आपल्याकडे डी.डी.टी.चा वापर किटकनाशक म्हणून केला जातो आणि पुण्यातले पोलीस प्लँचेट नामक गूढ विद्येचा उपयोग खुनाच्या तपासासाठी करतात. अशा टाकाऊ गोष्टींचे समर्थन शहाण्या व विद्वान मंडळींनी केलं तर त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका उपस्थित होतात.

मृतात्म्यांच्या शोधात वैज्ञानिक

आपल्या प्रिय व्यक्तीचा वियोग माणसांना सहन होत नाही. कदाचित यातूनच मृत्यू नंतरही आत्मा अस्तित्वात असतो ही कल्पना निर्माण झाली असेल, पुढे मग अशा आत्म्याशी बोलता येते किंवा त्यांच्याशी संपर्क साधता येतो यासाठीच्या विविध युक्त्या चतुर लोकांनी व धर्ममार्तंडांनी निर्माण केल्या असाव्यात. यातूनच पुढे प्लँचेट आणि आत्म्याचे दरबार, गूढविद्या समर्थकांनी सुरू केले. डॉ.भटकरांनी मृत्यूपश्चात जीवन, पुनर्जन्म अशा गोष्टींवर विज्ञानाच्या अंगाने जगभर संशोधन होत आहे असा उल्लेख आपल्या लेखात केला आहे.

अतीनैसर्गिक शक्ती व आत्म्याचा शोध प्रसिद्ध अशा वैज्ञानिकांनी पण घेतला आहे. त्याचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. अनेक वैज्ञानिकांनी गूढ विद्येच्या क्षेत्रात उडी घेऊन आपलं कसं हसू करून घेतलं याची माहिती आपण विविध ज्ञानकोशातून वाचू शकतो.

ज्ञानअज्ञानाचा संग्राम

सदा सर्वकाळ सर्व माणसांना फसवता येत नाही हेच खरं. कारण चलाख मंडळींचा पर्दाफाश करणारं दुसरे प्रामाणिक प्रतिभावान असतातच. बहुतेक चक्रम माणसं लोकांना फसवत रहातात पण काही थोडे चक्रम जगाला सत्य सांगून जातात. गूढविद्येच्या क्षेत्रात याची उदाहरणे पदोपदी आढळतात.

सर विल्यम क्रूक्स(1852-1919) हा प्रसिद्ध वैज्ञानिक आध्यात्मिक गूढ घटनांचा समर्थक होता. क्रूक्सने विज्ञानात मोलाची भर घातली आहे. त्याने कॅथोड किरण निर्माण करणारी क्रूक्स ट्यूब बनविली. क्रूक्सने थॅलियम या मौलाचा शोध लावला.

आपल्या भावाच्या अकाली निधनाने शोकाकुल क्रूक्स सैरभैर झाला. क्रूक्सच्या काळात मृतात्म्यांना बोलावून त्यांच्याशी संवाद करण्याचे दरबार(Seance) जोरात चालू होते. आत्म्याचा. संचार झालेल्या व्यक्तीला संचार माध्यम(Medium) म्हणतात. अशा व्यक्ती अंधार्‍या खोलीत वस्तु आपोआप हलणे, टेबल आपोआप अधांतरी होणे, आत्म्याचे आवाज येणे, आत्म्याने मानवी रूप घेणे असे चमत्कार करीत. हे चमत्कार इतके बेमालूम असत की, भल्याभल्यांना ते खरे वाटत. दु:खात बुडालेले मृतात्म्याचे नातेवाईक अशा गोष्टीवर विश्वास ठेवीत. क्रूक्सही या चमत्कारांना बळी पडला. डॅनियल होम या संचार माध्यमाचे दरबार क्रूक्सला खरे वाटत. क्रूक्स त्याचे समर्थन करी. होमचा फ्रॉड म्हणून पर्दाफाश झाल्यावरही क्रूक्स त्याचे समर्थन करीत राहिला. त्यामुळे विज्ञानजगतात क्रूक्सवर टीका होऊ लागली. मेरी रोझिना शॉवर्स आणि लॉरेन्स कुक या सायकिक बाया क्रूक्सच्या घरी आत्म्यांचे दरबार भरवीत. पण क्रूक्सना त्यांचे हातचलाखीचे प्रयोग कळले नाहीत. या दोघींचे बिंग फुटल्यावरही तो या बायावर श्रद्धा ठेवून राहिला अ‍ॅना फे या संचार माध्यम बाईचे बिंग तिचाच सहाय्यक वॉशिग्टन बिशप याने प्रसिद्धी माध्यमांना लेख लिहून उघड केले. या बाईचा देखील क्रूक्स समर्थक होता. अ‍ॅना फे बाईंचा पर्दाफाश प्रख्यात जादूगार हुडिनी यानेही केला. अखेरीस आपल्या निवृत्तीच्या वेळी आपण लोकांना फसवत होतो याची जाहीर कबुलीपण या बाईने दिली.

आत्म्याच्या खेळाचे फसवे समर्थन करणार्‍या वैज्ञानिकांचे व चिकित्सकाचे तीन प्रकार करता येतील. पहिला प्रकार हा दु:ख वियोगाने विवेक हरवलेले वैज्ञानिक. दुसरा प्रकार हा बुवाबाजी करणार्‍या मंडळीत सामील झालेले वैज्ञानिक आणि तिसरा प्रकार हा प्रामाणिक चिकित्सावादी सत्यशोधक वैज्ञानिक व जादूगार.

ऑलीव्हर लॉज व इथर

क्रूक्सप्रमाणे सर ऑलिव्हर लॉज हा 19 व्या शतकातील प्रसिद्ध वैज्ञानिक आध्यात्मवादाचा बळी होता. लॉजचा मुलगा रेमंड पहिल्या महायुद्धात मारला गेला होता. त्याच्या शोकामुळे लॉज हळवा बनला. पहिल्या महायुद्धात ठार झालेल्या अनेक तरूणांच्या वियोगाने सैरभैर झालेले त्यांचे नातेवाईक मृतात्म्यांचे दरबार भरविणार्‍या टोळ्यांच्या चमत्काराला बळी पडत. लॉजही या जाळ्यात अडकला.

लॉज हा वायरलेस टेलिग्राफीचा निर्माता. लॉजने वायरलेस टेलिग्राफीचा संबंध टेलिपथीशी जोडला. विद्युत चुंबकीय लहरी इधर नावाच्या माध्यमातून प्रवास करतात अशी शास्त्रज्ञांची समजूत होती. याच इथरमधून मानवी मेंदूतून निघालेल्या लहरी प्रवास करतात व त्या दुसर्‍या मेंदूने पकडल्या की, टेलिग्राफप्रमाणे दुसर्‍या माणसाला संदेश कळतो. म्हणून टेलिपथी शक्य आहे असा त्याचा दावा होता.

1916 मध्ये लॉजने अध्यात्मावरचा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यात त्याने वेगवेगळ्या माध्यम व्यक्तीद्वारे त्याच्या मुलाच्या आत्म्याने त्याच्याशी संवाद साधल्याचे वर्णन केले होते. स्वर्गात रेमंड खास अशा कपड्यात वावरत होता असं त्यानं लिहिलंय.

ज्युलियस सिग् हा सायकिक पत्नीच्या साथीने मन:सामर्थ्याचे स्टेज शो करत असे. डेली मेल या प्रख्यात ब्रिटीश दैनिकाचा प्रकाशक लॉर्ड नॉर्थक्लिफ याने ज्युलियसच्या टेलीपथीच्या प्रयोगाला अवास्तव प्रसिद्धी दिली. ज्युलियसची पत्नी डोळे बांधून स्टेजवरून प्रेक्षकांच्या जवळील वस्तू ओळखत असे. कागदावरील मजकूरही वाचत असे. सराव व चलाखीद्वारे जादूगारही हा प्रयोग करतात. त्यासाठी टेलिपथीची आवश्यकता नाही. ज्युलियसचा स्टेज शो ऑलिव्हर लॉज व प्रख्यात रहस्यकथा लेखक सर ऑर्थर कॉनन डॉयल यांनी पाहिला. या दोघांनी हा टेलिपथीचा अद्भूत प्रकार असल्याचे जाहीर केले. जादू आणि टेलिपथी यातील फरक या दोघांना कळला नाही. टोकाची श्रद्धा व तीव्र इच्छा यातून हे दोघे अंधश्रद्ध वर्तन करीत होते. याच कारणानी त्या काळातील अनेक चलाख माध्यमांच्या मृतात्म्याशी संवाद करण्याच्या प्रयोगाला ते बळी पडले.

आत्म्याच्या अस्तित्वावरील श्रद्धा विज्ञानाला जोडून लॉजने इथरमधून आत्म्यांचा संचार होत असेल असं मत मांडलं. पण पुढे विज्ञानात इथर कल्पना नाकारली गेली. मायकेलसन मोर्लेप्रयोगातून इथरचे अस्तित्व निकालात निघाले. रेडिओ लहरींना इथरची गरज नाही हे सत्य स्वीकारले गेले. पण लॉजचे आत्मे मात्र इथरमधूनच भटकत राहिले. संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलेला पातळ अदृश्य डिंक म्हणजे इथर ही श्रद्धा लॉजने सोडली नाही. 1940 साली ऑलिव्हर लॉजचे निधन झाले. त्याच काळात इथर कल्पनेचा त्याग करून प्रसिद्ध झालेल्या सापेक्षता वादातून E = mc2 हे अणुबाँबचे तत्व पूर्णत्वास गेले होते. इथरमधले प्रवासी आत्मे मात्र कुणालाच सापडले नाहीत.

डॉयलही का फसला?

सर ऑर्थर कॉनन डॉयल हा प्रख्यात ‘शेरलॉक होम्स’ हा रहस्य कथांचा लेखक. डेव्हन पोर्ट बंधूंनी इंग्लंडमध्ये भरविलेल्या आत्म्यांच्या दरबारात डॉयलने हजेरी लावली. आत्म्याच्या दरबारातील फसवे प्रयोग डॉयलला कळले नाहीत परिणामी तो गूढवादाचा समर्थक झाला. 1906 मध्ये त्याची पत्नी वारली. मुलगा महायुद्धात जखमी झाला. त्यात बर्ड फ्ल्यूची भर पडून त्याचा मृत्यू झाला. आईपण त्याला सोडून गेली. या सर्व घटनांचा परिणाम म्हणून विरह व्यथेने अस्वस्थ डॉयल अध्यात्माकडे वळला नसता तरच नवल.

सत्यशोधक हुडिनी

विरह व्यथेमुळे थोरामोठ्यांची मानसिकता हळवी होते. ही मंडळी विवेक गमावतात. हे एकवेळ क्षम्य मानता येईल पण विवेकशून्यतेचा अतिरेक योग्य नाही कारण अशा वर्तनातून सामान्य लोकही असंच वागू लागतात व त्याचे दुष्परिणाम समाजावर होतात. मानसिक विकृती व शोषण यांना मुक्तद्वार मिळते. पण याबाबतीत काही वेगळ्या प्रतिक्रियाही पहायला मिळतात. विवेक शाबूत ठेवून विरहाला सामोरे जाऊन प्रामाणिक सत्यशोधनकरणारी मंडळी गूढवादाला शरण जात नाहीत. जादूगार हुडिनी हा असाच एक अवलिया. डॉयल व हुडिनी हे एकाच ध्यासातून मित्र बनले. दोघांनाही आपल्या प्रिय दिवंगत आईच्या आत्म्याशी संवाद करायचा होता. पण हुडिनी गूढवादाचा विरोधक बनला तर डॉयल गूढवादाचा शिकार झाला.

पहिल्या महायुद्धात व त्यानंतरच्या काही काळात युरोप खंडात मृत्यूचे थैमान चालू होते. युद्धात ठार झालेल्या 80 लाख तरूणांची माहिती जेव्हा जाहीर झाली तेव्हा वाचलेल्या लोकांची मने गारठून गेली. संवेदना आटल्या. वडिलधार्‍यांना आपल्या मुलांचे दफन करावे लागले. युद्धानंतर युरोपमध्ये फ्ल्यूच्या साथीने हैदोस घातला. त्यात 2 कोटी लोकांचा बळी गेला. जिवंत राहिले त्यांची मने भ्रमिष्ट होऊ लागली आणि अंधश्रद्धांचे बळी वाढू लागले.

प्रिय जनांच्या विरहाच्या दु:खावर उपाय शोधण्यासाठी अनेकजण प्लँचेटद्वारे आत्म्याच्या दरबारात मृतात्म्यांशी संवाद साधण्याच्या फसव्या प्रयोगात हजेरी लावू लागले. हुडिनीच्या आईच्या मृत्यूवेळी तिच्याशी भेट झाली नव्हती. हे शल्य त्याला अस्वस्थ करीत होते. परिणामी तो अशा दरबारात आईचा आत्मा भेटेल म्हणून हजेरी लावू लागला.

1848 मध्ये मार्गारेट फॉक्स व तिची बहीण कॅथेरीन यांनी अमेरिकेत अध्यात्मवादाची सुरवात गूढ घटना घडवून सुरू केली. न्यूयॉर्कमधील वडिलांच्या भाड्याच्या घरात अतिंद्रिय शक्तीचे गूढ आवाज येत असल्याचा त्यांनी दावा केला. कॅथेरीन पायाचा अंगठा लाकडी जमिनीवर घासून कट असा आवाज करी व तो गूढशक्तीचा आवाज आहे असं सांगी. फॉक्स भगिनींना पी.टी.बार्नर या व्यक्तीने वारेमाप प्रसिद्धी दिली आणि अमेरिकेत आत्म्यांच्या दरबाराची लाट सुरू झाली. प्लँचेट करणार्‍या गूढविद्या तज्ञांचा सुळसुळाट वाढला. त्या काळात विल्यम डेव्हनपोर्ट हा गूढविद्या समर्थक प्रसिद्ध पावला होता. बंद कपाटातून घंटेचे आवाज आपोआप येणे, अंधार्‍या खोलीत चित्रविचित्र आकृतीद्वारे आत्मा प्रकट होणे असे चमत्कार डेव्हनपोर्ट लोकांना दाखवी. डग्लस होम ही माध्यम व्यक्ती मृतात्म्यांना हजर करण्यात वाक्बगार होता. होम आणि फॉक्स भगिनी हे हातचलाखीच करतात हे चिकित्सक मंडळींनी उघड केले होते. आपल्या आईच्या आत्म्याशी बोलायला मिळावे यासाठी हुडिनी संचार माध्यमांच्या दरबारात हजेरी लावू लागला. पण हुडिनी डॉयल, क्रूक्स किंवा ऑलिव्हर लॉजप्रमाणे फसला नाही. कारण तो जादूगार होता व त्याला स्वत:लाच हातचलाखी व जादूच्या प्रयोगाचे कौशल्य होते. परिणामी श्रद्धाळूंची फसवणूक करणार्‍या अशा संचारमाध्यमांच्या विरोधात हुडिनीने मोहीम सुरू केली. त्याच्या असं लक्षात आलं की, शास्त्रज्ञ असो की, बुद्धिवान लेखक असो, चलाख संचार व्यक्ती त्यांना सहज फसवू शकतात. आत्म्यांच्या दरबारात हजेरी लावणारा जादूगार हुडिनी हा सत्यशोधक झाला तर डॉयल अंधश्रद्धाळू बनला. आईच्या आत्म्याची भेट होण्यासाठी अधीर झालेले हे दोघे एका दरबारात भेटले व मित्र झाले होते. पण डॉयल अंधश्रद्धेचा बळी होतोय हे लक्षात आल्यावर हुडिनीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण डॉयलवर अपेक्षित परिणाम झालाच नाही.

डॉ.भटकर, भूत आणि आत्मे

डॉ.भटकर आपल्या लेखाच्या सुरवातीला म्हणतात, भूत असतं की नसतं हे मला माहीत नाही पण मग मृत्यूनंतर आत्मा असतो की, नसतो हेही मला माहीत नाही असं ते पुढं का म्हणत नाहीत? भौतिकदृष्ट्या जे आहे ते दाखवावेच लागेल व ते नसेल तर त्याचं अस्तित्व अप्रत्यक्षरित्या अमान्यच केलं पाहिजे. पुढे जेव्हा ते सिद्ध होईल तेव्हा स्वीकारण्याची मानसिकता सच्च्या सत्यशोधकाची असायला हवी. पण याबाबत बोटचेपी भूमिका वैज्ञानिक दृष्टिकोनाला व बुद्धिप्रामाण्यवादाला शोभत नाही. लेखाच्या पुढच्या भागात ते मृत्यूनंतरच्या जगाचे समर्थनच करताना दिसतात आणि त्यावर जगभर संशोधन होत असल्याचे दाखले देतात. हे संशोधन कोणत्या प्रकारचे आहे याची झलक वाचकांना ध्यानात यावी.

ब्रॅडफोर्ड या इंग्लंडमधील गावच्या रहिवाशी एल्सी राईट व तिची चुलत बहीण फ्रँसिस यांनी 1917 मध्ये पर्‍यांना पाहिल्याचे व त्यांचे फोटोपण घेतल्याचे सांगायला सुरवात केली. डॉयलने या पर्‍यांच्या स्लाईडस् बनविल्या व त्या खर्‍या असल्याचा जोरदार प्रचार केला. 1978 मध्ये म्हणजे 60 वर्षांनी एल्सीने पर्‍यांचे फोटो खरे नसून तो गंमतीचा खोडकर प्रकार होता अशी जाहीर कबुली दिली. जवळजवळ 60 वर्षे पर्‍या असतात हा भ्रम पसरविणारा डॉयल या गोष्टीला जबाबदार होता. ज्या फॉक्स भगिनींनी पायाचा अंगठा वाजवून गूढ आत्म्यांचे दरबार भरविले त्यांनीही नंतर ही आपली बनवेगिरी होती अशी जाहीर कबुली दिली. पण ही माहिती भटकर विचारात घेत नाहीत. त्यांना दिसतात ते पाश्चातांचे आत्म्याचे दरबार, त्यांचे समर्थन करणारे वैज्ञानिक व संचारमाध्यमे.

दूरदृष्टी

मन:सामर्थ्याने दूर अंतरावर काय चाललंय हे पाहता येतं. याला दूरदृष्टी (Remote viewing) असं म्हणतात. अमेरिकेत असे प्रयोग झालेत असं भटकर म्हणतात. पण या प्रयोगांचे फलित ते का सांगत नाहीत? ज्या स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये असं संशोधन झालं असं भटकर लिहितात त्याची माहिती घेऊ या.

अतिंद्रिय शक्तीचा शोध घेण्यात काही शास्त्रज्ञ व चलाख जादूगार, सायकिक व संचारमाध्यमे यांची अभद्र युती झाल्याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. त्यातील महत्वाचा दाखला आहे. युरी गिलर, ह्या चलाख सायकीकचा तसेच जॉन टेलर व डॉ.पुरीख या वैज्ञानिकांचा. सत्यशोधक जादूगार जेम्स रँडी यांनी या महाभागांचा पर्दाफाश कसा केला याची हकीकत भटकर व वाचक दोघांनाही समजून घेण्यासारखी आहे.

युरी गिलर! आपल्या तथाकथित गूढ मन:सामर्थ्याने सार्‍या युरोप व अमेरिकेला वेड लावलेला एक बनिया!

दुसर्‍याच्या मनातील विचार ओळखणे म्हणजे टेलिपथी. मन:सामर्थ्याने वस्तू वाकविणे किंवा मोडणे म्हणजे सायकोकायनेसीस. भविष्यकालीन घटनांचे पूर्वज्ञान म्हणजे प्रेकग्निशन. अशा मन:सामर्थ्याचे प्रयोग युरी गिलरने युरोपात व अमेरिकेत धुमधडाक्यात सुरू केले. या प्रयोगात सामील होता डॉ.पुरीख हा शास्त्रज्ञ. स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्युटमधील अग्रगण्य अधिकारी आणि संशोधक युरीच्या सामर्थ्याने प्रभावित झाले होते. एवढंच नव्हे तर एके काळचा अंतराळवीर एडवीन मिचल पण या प्रयोगात सामील होता. युरीच्या प्रयोगासाठी याच मिचलने मोठी रक्कम मिळवून दिली होती.

युरी आणि रँडी

भल्याभल्यांना शेंडी लावणार्‍या युरीची ढोंगबाजी जेम्स रँडी या जादूगाराने उघड केली. ओव्हरकोटात टेपरेकॉर्डर लपवून रँडी वार्ताहराचे सोंग घेऊन युरीच्या दरबारात हजर झाला. युरीचे प्रयोग मन:सामर्थ्याचे नसून ते हातचलाखीचे व जादू कलेचे आहेत याचे पुरावे रँडीने मिळविले. मन:सामर्थ्याने किल्ली वाकविण्याचा प्रयेग युरीने टेबलाच्या कडेवर किल्ली दाबून केला होता. स्टॅनफोर्ड इन्स्टिट्युटमधील असल्या मन:सामर्थ्याचा उल्लेख भटकरांनी आपल्या लेखात केलाय. रिमोट व्ह्यू कसला डोंबलाचा! भटकरांना रँडी-युरी प्रकरण कसं माहीत नाही?

इंग्लंडमधील जॉन टेलर या वैज्ञानिकाला देखील युरीने आपल्या मन:सामर्थ्याच्या प्रयोगांनी प्रभावित केले. टेलर युरीच्या भक्तात सामील झाला. त्याने सुपर माईंड हे पुस्तक लिहून युरीला जगप्रसिद्ध केले.

जेम्स रँडीने प्राध्यापक टेलर यांची भेट मागितली व युरीचे प्रयोग आपणही करू शकतो असे सांगितलं. पण टेलरने रँडी नामक एका(मामुली?) जादूगाराची भेट नाकारली. मग रँडीने गनिमी कावा केला. त्याने आपलं नाव बदललं. वेश बदलला व वार्ताहर बनून तो टेलरला भेटला. टेलरची मुलाखत प्रसिद्ध करण्याची इच्छा रँडीने व्यक्त केली. टेलर खुलला. मुलाखतीवेळी, युरीने वाकविलेला(नळीत सील केलेला चमचा) हातचलाखीने काढून त्या नळीत रँडीने स्वत: वाकविलेला चमचा घातला व त्यावर लिहिले, ‘इशपीं लू ठरपवळ’ या घटनेला प्रसिद्धी देणारे मॅजीक ऑफ युरी गिलर हे पुस्तक रँडीने प्रसिद्ध केले व युरीचा भोपळा फुटला.

अभद्र युती

प्रश्न असा उपस्थित होतो की, टेलर किंवा पुरीख सारखे शास्त्रज्ञ आणि एडविन मिचलसारखे अंतराळवीर अशा जादूच्या प्रयोगांचे; अतिंद्रिय शक्ती म्हणून समर्थन का करतात? माझ्या मते याचे खरे कारण असावे प्रसिद्धी आणि पैसा यासाठी चलाख मंडळी व वैज्ञानिक यांची अभद्र युती. भारतात एकेकाळी डॉ.भगवंतम(एके काळचे भारत सरकारचे संरक्षण सल्लागार) सत्यसाईबाबाचे चमत्काराचे समर्थन करीत. प्रख्यात विवेकवादी डॉ.कोवूर यांनी या भगवंतमचा पर्दाफाश केला होता. निष्कर्ष असा की- तथाकथित आध्यात्मिक दरबार भरवून चमत्कार करणार्‍या सायकिकना वैज्ञानिक नामक मंडळी विकली गेलेली असतात किंवा ती भावनिक गरजेची शिकार तरी असतात.

निसर्ग लबाड नाही माणूस लबाड

जेम्स रँडीनं म्हटलंय ते खरं आहे. निसर्ग लबाडी करीत नाही. पण माणूस लबाडी करू शकतो. झोपेची वेळ सोडली तर प्राणी डोळे व कान उघडे ठेवून असतात. पण झोपेचे सोंग घेणारी तथाकथीत मोठी माणसं डोळ्यावरचे कातडे अधिक घट्ट करतात व अज्ञानाचे समर्थन करतात. पण अशा मंडळींना उघडे करणारे सत्यशोधकही समाजात असतात. त्यांच्या सत्यनिष्ठेमुळे समाज जागृत राहण्यास व अज्ञानाचा बुरखा फाटण्यास मदत होते. अशा सत्यनिष्ठांना त्रास दिला जातो, त्यांची अवहेलनाही होते. त्यांच्यावर खटलेही भरले जातात. युरी गिलरने रँडीवर खटला भरला. पण तो रँडीनेच जिंकला.

अतिनैसर्गिकाचे मृगजळ

अगदी प्राचीन काळापासून ज्ञानेंद्रियांना प्रतित होणारं जग म्हणजेच नैसर्गिक जग आणि ज्ञानेंद्रियापलिकडच तथाकथित अतिनैसर्गिक जग आकलन करण्याची माणसांची धडपड चालू आहे. विज्ञानपूर्व काळात साहजिकच अति नैसर्गिक गोष्टींबद्दल माहिती घेण्याची मानवी मनाची ओढ प्रभावी होती. कल्पनाशक्ती, तथाकथित साक्षात्कार व काही अनुभव याद्वारे भूत-खेत, विविध देवदेवता, चेटूक, सैतान अशा विविध अतिनैसर्गिक शक्तीचं अस्तित्व माणसांनी मानले. पण अशा मानलेल्या गोष्टीबद्दल माणसांना शंकाही येत होत्या. अशा शंका, व तपासून पाहण्याची इच्छा, तर्कशक्ती व प्रयोगशिलता यातूनच 16 व्या शतकात जगाविषयीचा एक नवा दृष्टिकोन माणसाने मिळविला तो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. वैज्ञानिक दृष्टिकोन व विज्ञानाची पद्धत हिचा पाया बुद्धिप्रामाण्य हाच आहे. गूढविद्येचे समर्थक अतिंद्रिय शक्ती, भौतिक जगात हस्तक्षेप करतात असं मानतात. आणि इथेच विज्ञान आपल्या मदतीला येते. कारण भौतिक जगात घडणार्‍या घटनांची कारणे, भौतिक नियमाने किंवा वैज्ञानिक पद्धतीने पडताळता येतात. आत्मा शरीर रूप धारण करीत असेल तर असे शरीर तपासता येते. आत्मा आवाज करीत असेल तर तो ही तपासता येतो. आत्म्यांचे खेळ किंवा आत्म्यांचे दरबार किंवा प्लँचेटसारखे प्रकार यामागे अतिनैसर्गिक कारण नसते तर नैसर्गिक भौतिक कारणच असते हे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे ज्याचा विश्वसनीय पुरावा नाही असं गूढ जग अप्रत्यक्षपणे नाकारावे लागते. प्लेटोपासून ते आजतागाईत भौतिक जगापलिकडच्या सुष्ट व दुष्ट आत्म्याचा पाठलाग हे मृगजळच ठरले आहे. याबाबत मानवी मनाच्या दुबळेपणाला गोंजारणे, तथाकथित संशोधनाचे नवे नवे प्रकल्प सरकारला व उद्योजकाला सुचविणे व त्यातून पैसा आणि प्रसिद्धी मिळविणे योग्य नाही.

अध्यात्माने भौतिक सृष्टीत आक्रमण करू नये हा विज्ञानाचा संदेश आहे. परंतु माणसाला मन आहे व भावना आहेत. माणसाला नैतिक भावनाही आहे. त्यासाठी अध्यात्माचा वापर होणे क्षम्य आहे. संतांनी व समाजसुधारकांनी अध्यात्माचा वापर समाजाच्या नैतिक भरण पोेषणासाठी केला. परंतु आध्यात्मिक आधाराशिवाय नैतिक आदर्श अनेक महामानवांनी विवेकाच्या आधारे आपणास घालून दिला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील कधीही देवळात गेले नाहीत. त्यांनी शाळांनाच मंदिर मानले. तीच गोष्ट गाडगेबाबांची. गाडगेबाबा विठ्ठल मंदिरात गेले नाहीत. तर त्यांनी यात्रेकरूंनी अस्वच्छ केलेले वाळवंट झाडले. बाबा आमटे व त्यांचे चिरंजीव प्रकाश आमटे यांनी कुष्ठरोग्यांचे सडलेले हात बरे केले. आनंदवनात कुठेही मंदिर नाही. विवेकाच्या व करूणेच्या आधारे सामाजिक जीवन उन्नत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वास्तवाच्या व सत्याच्या पायावर त्यांची नैतिकता उभी होती. म्हणून आत्मा, प्लँचेट, कल्पीत सुष्ट व दुष्ट गोष्टी बाजूला सारून विज्ञानाच्या प्रकाशात नैतिक जीवनाचा आदर्श साकार करणे हेच खरे अध्यात्म. संशोधनाची प्रेरणा ज्ञान मार्गानेच नीतीकडे नेणारी असावी. बंगलोर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रख्यात वैज्ञानिक नरसिंहय्या यांची आमच्या विशेषांकासाठी खास मुलाखत घेतली होती. त्यांना आम्ही विचारले, ‘What is Spiritualism?’ ते म्हणाले, ‘Spiritualism is to love others and help them and serve them’ तेव्हा आत्म्यांच्या मृगजळाचा शोध घेणे समाजातील मान्यताप्राप्त विचारवंतांनी थांबवावे व नैतिक मूल्यासाठी योगदान द्यावे.

प्लँचेट म्हणजे काय?

प्लँचेटमध्ये आयुजा बोर्डचा वापर केलेला असतो. या बोर्डवर इंग्रजी मुळाक्षरे आणि एक ते नऊ व शून्य हे आकडे लिहिलेले असतात. याशिवाय Yes, No, May be आणि Good bye हे शब्द लिहिलेले असतात. हाताच्या तळव्याएवढा आणि हृदयाच्या आकाराचा गुळगुळीत लाकडी किंवा धातूचा पीस, तीन पायावर बसविलेला असतो. या पायांना पॅड किंवा चक्र बसविलेले असते. हे साधन आयुजा बोर्डवरून सहजपणे फिरू शकते. हृदयाकृती पीसच्या पुढच्या टोकाला पेन्सिल बसविलेली असते. जी अक्षरावरून व अंकावरून फिरू शकते. या साधनाला ‘प्लँचेट’ असे म्हणतात.

प्लँचेटमध्ये मृतात्म्याला बोलावता येते अशी समजूत आहे. ज्या मृतात्म्यांशी संवाद करावयाचा आहे तो प्लँचेटला आयुजा बोर्डवरून गतीमान करतो व अंक आणि अक्षरांद्वारे होय किंवा नाही अशा प्रकारची उत्तरे देतो अशी अंधश्रद्धा आहे. परंतु प्लँचेट फिरविणारा आत्मा नसून त्याचा नातेवाईक आपल्या बोटास सुप्त इच्छेतून हव्या त्या दिशेने फिरायला लावून उत्तरे शोधतो.

परंतु या नातेवाईकाचे किंवा प्लँचेट करणार्‍यांचे डोळे बांधले तर त्यांना उत्तरे मिळत नाहीत. मग आत्मा कुठे जातो? लोकांच्या प्रिय व्यक्तीच्या वियोगाच्या दु:खाचा गैरफायदा घेऊन प्लँचेट करणारे एक प्रकारची फसवणूक व आर्थिक शोषण करतात. प्लँचेटवरून खुनाचा किंवा गुन्ह्याचा तपास शक्य नाही.